इरफान : माणूस आणि अभिनेता

इरफान : माणूस आणि अभिनेता

वास्तवाभासी अभिनय करणारा इरफान खान अभिनेता होता. तो मिश्कील होता, तो मित्र होता, उत्तम सहकारी होता आणि माणूस म्हणूनही तो तेव्हढाच मोठा कसा होता. त्याचे आणि तिग्मांशू धुलिया यांचे संबंध कसे होते, अशा अनेक आठवणी सांगणारा नाट्य दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड यांचा कोलाज.

प्रजासत्ताक दिनाला अयोध्येत मशिदीचे काम सुरू
ऑनलाईन शिक्षणाचा उहापोह
डोईजड झाल्याने किरण बेदींची हकालपट्टी

गेलं वर्षभर इरफान भाईंच्या तब्येती बद्दल अधूनमधून टिव्ही, वर्तमान पत्रातून कळत होतं, पण अखेर ती बातमी आली आणि ऐकून मन एकदम सुन्न झालं. सुरवातीला काही वेळ विश्वासच बसेना, या दु:खद धक्क्यातून सावरायला जरा वेळ लागला. मनात ‘हासिल’ च्या काळातल्या आठवणी जाग्या झाल्या.

खरं तर इरफान सारख्या भारतीय आणि पाश्चिमात्य सिनेमात आपलं स्थान निर्माण करणार्‍या प्रगल्भ अभिनेत्याचे कर्तुत्व सर्वांना माहीत आहेच. इरफान यांच्या सिनेमा करिअर मधील सुरुवातीच्या काळात मला सुद्धा काही वर्षं त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांचा वास्तवाभासी अभिनय (Realistic acting) जवळून समक्ष पाहण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी दिग्दर्शक म्हणून खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे.

इरफान यांनी अभिनयाच्या एकूण करीअरमध्ये, तिग्मांशू धुलिया यांच्या बरोबर हासिल, पानसिंग तोमर, साहेब बिवी और गँगस्टर २ असे सिनेमा आणि बर्‍याचशा शॉर्ट फिल्म्स केल्या. ‘पानसिंग तोमर’ या सिनेमाला ६०व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि इरफान यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

मला तिग्मांशू यांच्या हासिल या पहिल्या सिनेमाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो कारण हा सिनेमा इरफान यांच्या करीअर मध्ये खूप महत्वाचा आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालय मधील इरफान आणि तिग्मांशू यांच्या मैत्रीचे पुढे सर्जनशील मैत्रीमध्ये कसं रूपांतर झालं, त्याचे ‘हासिल’ आणि ‘पानसिंग तोमर’, हे दोन्ही चित्रपट उत्तम उदाहरणं आहेत. खास करून ‘हासिल’च्या काळात मी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं असल्यामुळे, या लेखात इरफान यांच्या अभिनया विषयी लिहीताना तिग्मांशू यांचा दिग्दर्शक म्हणून संदर्भ येणं अविभाज्य भाग आहे.

१९९६ दरम्यान, तिग्मांशू यांच्याबरोबर जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा, ‘जस्ट मोहब्बत’ या सिरीयलसाठी मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करु लागलो. इथं इरफान यांच्याशी पहील्यांदा ओळख झाली. या सिरीयलमध्ये इरफान, ‘सायको सिंग’ नामक एका विक्षिप्त माणसाची भूमिका करत होते. त्यात एक सीन असा होता, की औषधांचा बॉक्स हातात घेऊन हा माणूस रस्त्यावर आपल्याच नादात चालत असतो. तेंव्हा समोरून येणारा एक जण वेळ विचारतो. पण हा माणूस थांबावं लागल्यानं चिडून म्हणतो, “मैं तुम्हें घंटाघर दिखता हूं?” आणि त्याच्याशी हुज्जत घालत राहतो. शेवटी तो इसम वैतागून त्याला “पागल है”, असं म्हणतो. या सीनसाठी तिग्मांशू यांनी, त्या समोरून येणाऱ्या इसमाची भूमिका मला करायला सांगितलं. मला एकदम टेन्शन आलं. कारण मी पहील्यांदाच कॅमेरा समोर अभिनय करणार होतो आणि माझ्या समोर इरफानभाई असणार होते. आम्ही सुरुवातीला काही तालमी केल्या पण मला त्यांच्याकडे पाहून ‘पागल है’ असं म्हणायचं धाडसच होईना. तिग्मांशू यांनी, “अरे डोण्ट वरी, डट कर बोलो सीन ठीक हो जायेगा”, असा विश्वास दिला. शेवटी इरफान यांनी मला बाजूला घेऊन विश्वासात घेतलं आणि म्हणाले, “देखो अन्नी, थोडी देर के लिये भूल जाओ, की मैं इरफान हूं और मेरी आँखोंमें देखकर बोलो. अरे कोई भी सीन एक अकेले से नहीं बनता है. दोनों अॅक्टर्स की रिअॅक्शन्स उतनी ही जरूरी है, है ना?” हे ऐकून माझा सुद्धा आत्मविश्वास बळावला आणि हा प्रसंग व्यवस्थित पार पडला. अभिनय करताना डोळ्यांत बघून बोलणं ही अगदी छोटी गोष्ट होती, पण माझ्यासाठी हा जणू एक साक्षात्कारच (realisation) होता.

मी साधारण १९९६ ते २००२ दरम्यान, पुण्यात आणि मुंबईत नाट्य क्षेत्रात आणि चित्रपट क्षेत्रात स्ट्रगल करत होतो. पुण्यात प्रायोगिक रंगभूमीवर नाट्यदिग्दर्शन करणं, तसंच काही नाट्य कार्यशाळांमध्ये अभिनय शिकवणं, अशी कामं करत होतो. मुंबईत हिंदी चित्रपट क्षेत्रात सुध्दा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला लागलो होतो. याच दरम्यान मला तिग्मांशू धुलिया यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. क्लॅप मारण्यापासून सुरूवात केली आणि हळूहळू सेटवर अनेक जबाबदाऱ्या अंगावर घेत गेलो. ‘नया दौर’, ‘जस्ट मोहब्बत’सारख्या काही टिव्ही सिरीयलसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून, तर ‘स्टार बेस्ट सेलरमधील ‘एक शाम की मुलाकात’, ‘अनेकों हिटलर’, ‘मुसाफिर’, ‘फुरसत में’ सारख्या काही शॉर्ट फिल्म्ससाठी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. यातूनच पुढे ‘हासिल’ या सिनेमासाठी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायची मला संधी मिळाली. यात माझ्यावर अभिनेत्यांच्या निवडी पासून (casting process) ते प्रत्यक्ष शूटींगमध्ये अभिनेत्यांना शॉटसाठी तयार करणं, त्यांच्या संवादाची तालीम करून घेणं, शूटिंग शेड्युल चं प्लॅनिंग करणं, शूटींगच्या प्रत्येक दिवशी शूटिंग स्क्रीप्ट आणि लोकेशन प्रमाणे शूटींग होतय ना हे पाहणं, त्यासाठी सर्व टीम ला प्रोत्साहित करत राहणं अशा विविध जबाबदाऱ्या होत्या. पुढे एडिटींग, डबींगच्या प्रोसेसमध्ये सुद्धा मी तिग्मांशू यांच्या बरोबर होतो. या निमित्ताने मला इरफानभाई यांच्या बरोबर काम करायला मिळालं.

राष्ट्रीय नाट्य विद्यालय(NSD), नवी दिल्लीमधून इरफान खान यांनी १९८७ मध्ये पदवी घेतली तर तिग्मांशू यांनी १९८९ मध्ये घेतली आणि मी १९९४ मध्ये पदवी घेतली. म्हणजेच इरफान साधारण सात वर्षे मला सिनियर तर तिग्मांशू पाच वर्षे सिनियर असल्याने मी त्यांना सुरूवातीच्या काळात आदरपूर्वक इरफानभाई आणि तिशूभाई असं म्हणायचो. (बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘खान’ नावाच्या पुढं भाई असं बिरूद लावण्याचा इथं काहीही संबंध नव्हता) परंतु जसजसं पुढे, दिग्दर्शन विभागातील माझी जबाबदारी वाढत गेली आणि मी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला लागलो. तिग्मांशू यांनी मला स्पष्ट सांगितलं, “अनिरुध्द, तू तो हमें भाई बुलाया मत कर.” बरेच समवयस्क कलाकार मित्र तिग्मांशू यांना तिशू असं म्हणायचे. पण मला हे काही रुचत नव्हतं, त्यामुळे मी, तिग्मांशू असं पूर्ण नावाचा उच्चार करायचो. इरफानभाई यांनाही हळूहळू इरफान असं संबोधायला मला बराच वेळ लागला.

इरफान यांचा स्वभाव अंतर्मुख (introvert) असा होता. प्रथम दर्शनी मोठ्या डोळ्यांमुळे हा माणूस रागीट स्वभावाचा, आत्मकेंद्री(reserved) असावा असा संभ्रम झाला होता. पण जसजसं प्री-प्रॉडक्शन मिटींग वा शुटींग दरम्यान त्यांच्या बरोबर संवाद होऊ लागला, तसं जाणवलं की मनानं खूप संवेदनशील, हळवा, मितभाषी, थोडासा मिश्किल, प्रगल्भ अशा स्वभावाचा हा माणूस आहे. इरफान यांचं वाचन अफाट होतं तसंच भारतीय आणि पाश्चात्य सिनेमाचं समृद्ध असं ज्ञान होतं, हे त्यांच्या मुक्त संवादातून व्यक्त व्हायचं. खास करून मार्टीन स्कॉर्सिसी आणि वूडी अॅलन हे त्यांचे आवडते दिग्दर्शक, तर रॉबर्ट डी निरो हा अभिनेता. इरफान आणि तिग्मांशू दोघांनाही फिल्मी चित्रपटांपेक्षा वास्तववादी चित्रपट जास्त आवडतात, हे त्यांच्या गप्पांमधून लक्षात यायचं. अशा कॉमन आवडींमधून त्यांच्यामधील मैत्री दृढ होत गेली असावी. इरफान आणि तिग्मांशू यांच्यामध्ये होणाऱ्या चर्चा ऐकताना असं जाणवायचं, की इरफान यांना जशी स्क्रीप्टमधील कहाणी जाणून घेण्यामध्ये उत्सुकता होती, तशीच त्या पात्राची पार्श्वभूमी काय असेल, तो कोणत्या सामाजिक, मानसिक परिस्थिती मध्ये जगतोय, या बद्दलही होती. अर्थात अशा चर्चा कधीच औपचारिक पणे होत नसत. पण शूटिंगच्या आधी काही दिवस जेव्हा अनौपचारिक चर्चा झडत तेव्हा दोघंही एकमेकांशी जसे मनमोकळेपणाने व्यक्त व्हायचे, त्यातूनच मला इरफान कळत गेले.

इरफान यांची आपल्या भूमिकेवर सातत्याने चिंतन करण्याची वृत्ती प्रकर्षाने मला जाणवायची. मिळालेल्या संवादांच्या प्रेरणेतून आणि वेगवेगळ्या सीन्समधून व्यक्त होणार्‍या पात्राच्या अस्तित्वातून, इरफान आपल्या भूमिकेचा विचार आणि कल्पना करत. एखाद्या भूमिकेची तयारी करताना त्या व्यक्तिरेखेचं रूप कसं असेल, कोणत्या शैलीमध्ये सादर करता येईल. त्या भूमिकेला कसं सजवता येईल (अर्थात अशा प्रक्षोभक भूमिका सुद्धा त्यांनी या आधी चंद्रकांता सारख्या सिरीयल मध्ये केल्या होत्या आणि या गोष्टीला कंटाळून टिव्ही सिरीयल करणं त्यांनी एव्हाना थांबवलं होतं.) अशा टिपिकल बॉलिवूड स्टाईलपेक्षा विशिष्ठ प्रसंगी, ती व्यक्तिरेखा कोणत्या विचारांत असेल, कोणत्या मन:स्थितीत असेल ती मनोवस्था मिळवण्यावर आणि त्या भूमिकेतून समोर असलेल्या पात्राला अथवा परिस्थितीला प्रतिक्रया (reaction) देण्यावर त्यांचा अधिक विश्वास होता. आपली भूमिका साकारताना इरफान यांचं लक्ष हे त्या पात्राचं वागणं, बोलणं कसं असेल, बोलताना लहेजा कसा असेल, देहबोली, हातवारे, चेहर्‍यावरील हावभाव कसे असतील, हे पात्र विशिष्ठ परीस्थितीत नेमका काय विचार करत असेल, अशा गोष्टींकडे असायचं. संवाद बोलताना त्या संवादा मागं दडलेला गर्भितार्थ (subtext) कसा व्यक्त होईल या वर त्यांचा भर असायचा. अशा तर्‍हेनं साधेपणाने ( simplicity) स्वाभाविकपणाने (naturalness) अभिनय करणं ही इरफान यांची खासियत होती.

स्टॅनिस्लावस्की यांच्या वास्तवाभासी अभिनय पध्दतीवर (system) इरफान यांचा विश्वास होता, हे त्यांनी साकारलेल्या विविध चित्रपटांमधील भूमिकांमध्ये दिसून येतं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना इरफान यांनी, माक्सिम गॉर्की लिखित लोअर डेप्थ्स या नाटकात क्लेश्च या पात्राची भूमिका केली होती. बी.एम.शाह यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. तिग्मांशू नेहमी इरफानच्या या भूमिकेची मनापासून कौतुक करायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘एन.एस.डी.’मध्ये या भूमिकेमुळे इरफान यांची ओळख निर्माण झाली होती. (लोअर डेप्थ्स हे नाटक रशियन दिग्दर्शक स्टॅनिस्लावस्की यांनी माक्सिम गोर्की यांच्याकडून लिहून घेतले होते. स्टॅनिस्लावस्की यांनी हे नाटक १९०२ साली दिग्दर्शित केले होते.)

शूटींगच्या वेळी मात्र सेट वरील धबडग्यात इरफान कधी स्वत:चा सीन वाचण्यात मश्गूल असायचे तर कधी मेकअप करताना किंवा फावल्या वेळेत त्या दिवशी असलेल्या निवडक कलाकारांबरोबर दिलखुलासपणे गप्पा मारत बसलेले असायचे. आपली भूमिका आणि दुसऱ्या दिवशी शूट करायचे सीन्स यांबद्दल तिग्मांशू आणि इरफान यांची आधीच चर्चा झालेली असल्यामुळे, सेट वर दोघं सीन बद्दल फार चर्चा करत नसत पण शूटींगच्या वेळी प्रत्येक टेक मध्ये इरफान आपल्या अभिनयातून तिग्मांशू यांना अपेक्षित क्षण (moments) मिळवून देण्यासाठी जीवापाड मेहनत घेताना दिसत. इरफान यांना वेगवेगळ्या शॉट्समध्ये घडण्यार्‍या छोट्या छोट्या घटना जाणून घेण्यामध्ये रस होता. तो प्रसंग कॅमेऱ्यासमोर वास्तवाभासी पद्धतीने अभिनीत करण्यासाठी कसं इंम्प्रूवाइज करावं, छोट्या छोट्या क्षणांमधून, कृतींमधून प्रसंग कसा उभा करावा यामध्ये ते मनापासून आनंद शोधायचे. आपला अभिनय विश्वसनीय (believable) व्हावा यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत. होणाऱ्या सीनची कंटिन्युटी काय आहे, या सीनच्या अलिकडे पलिकडे काय घडतंय ते समजून घेण्यासाठी कधी कधी मला सुद्धा विचारायचे. तसेच कॅमेरा ट्रीटमेंट कशी आहे, शॉटची फ्रेम कशी असणार आहे, क्लोजप ते वाईड शॉट्स अशा टेक्निकल गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष असे. या बाबतीत इरफान यांचा तिग्मांशू आणि राफे मोहम्मद यांच्याबरोबर नेहमीच संवाद होत होता.

इरफान यांच्या बरोबर, मी अनुभवलेल्या शुटींगमधल्या काही आठवणी अजूनही माझ्या मनात घर करून आहेत. ‘स्टार बेस्ट सेलर’ या कार्यक्रमात ‘वन एपिसोड वन स्टोरी’ अशा स्वरुपात, तिग्मांशू यांनी वेगवेगळ्या दहा शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केला होत्या. पैकी ‘एक शाम की मुलाकात’ आणि ‘फुरसत में’ या दोन शॉर्ट फिल्म्समध्ये इरफान यांनी काम केलं होतं. ‘एक शाम की मुलाकात’मधल्या एका सीन साठी, किराणा दुकानात आपल्या आजूबाजूच्या किराणा मालाची त्यांनी स्वत:च्या हाताने मांडणी केली, खातेवहीमध्ये त्या दिवशीच्या किराणा मालाच्या विक्रीची नोंद करून ठेवली, जेणेकरून त्या दुकानाचे मालक आपण आहोत, हे फील व्हावे. यामध्ये नवविवाहीत महेशची भूमिका इरफान यांनी खूप मनापासून आणि प्रासंगिक विनोदातून फुलवली आहे.

‘फुरसत में’च्या शूटिंगमध्ये, एके काळी आंदोलनकारी जुनून असलेल्या पण आता रिटायर्ड झालेल्या क्लर्कची भूमिका करताना ते वय मिळावं, म्हणून इरफान आपले सहकारी अभिनेता जितेंद्र शास्त्री यांच्याबरोबर बागेत शूटिंगच्या व्यतिरिक्त काही वेळ सावकाश चालत फिरायचे, वा बराच वेळ बेंचवर बसून राहायचे. (जितेंद्र शास्त्री यांनी, म्हातारपणामुळं कामावरून काढून टाकण्यात आलेल्या हैदराबादी बावर्ची ची भूमिका केली होती) जणू काही आपण स्वत:च रिटायर्ड झालो आहोत हा मनोमन विश्वास निर्माण व्हावा यासाठी, इरफान आपल्या पात्राची काठी, चष्मा, बॅग, व्हिजीटींग कार्ड्स, हॉटशॉट कॅमेरा आदी चिजवस्तू शूटिंग संपेपर्यंत दिवसभर स्वत:कडे बाळगून ठेवायचे. रिटायर्ड झालो असलो तरीही अन्यायाविरोधात लढा देण्याची खुमखुमी अजूनही आपल्या रक्तात आहे, असा भासमय विश्वास बाळगणार्‍या या म्हातार्‍या तरुणाची खट्याळ आणि तितकीच संवेदनशील भूमिका इरफान यांनी अगदी मनापासून केली आहे.

‘हासिल’ या सिनेमात रणविजयच्या भूमिकेमध्ये अनेक छटा होत्या. सुरुवातीला विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाविरुध्द उभा ठाकणारा हा रणविजय विद्यार्थी नेता म्हणून निवडून येतो, त्यानंतर मात्र त्याची वागणूक बदलत जाते. आपण निवडून यावे, यासाठी विद्यापीठात नाटक करणार्‍या नवथर तरूणांना हाताशी घेतो. तेव्हा अनिरुध्द (जिमी शेरगीलनं ही भूमिका केली होती. तिग्मांशू यांनी या नायकाच्या भूमिकेला माझं नाव दिलं होतं) या तरुणाचं, आपल्याला आवडत असलेल्या मुलीबरोबर प्रेम संबंध असल्याचे, जेव्हा रणविजयला कळतं, तसा रणविजयमधला मत्सर जागा होतो आणि रणविजयचा नवीन चेहरा समोर येतो. अशा धर्तीच्या टिपिकल खलनायक नसलेल्या पण खलनायकी प्रवृत्तीच्या रणविजयच्या भूमिकेत इरफान यांनी दमदार अनुभव दिला होता. सुरुवातीलाच रणविजयचा विद्यार्थी नेता गौरी शंकर पांडे याच्याबरोबरचा झालेला पहिला संघर्ष. नंतर त्याला निवडणुकीत हरवण्यासाठी एका सिनेमा थिएटरमध्ये आपल्या गँगमधल्या तरुणांना बोलावून रणविजय गोरिल्ला वॉरचं महत्त्व समजावून सांगतो, तो प्रसंग किंवा जिमी शेरगील बरोबरचा प्रसंग. अनिरुध्द या नव्या ज्युनिअर मित्राकडून जेव्हा कळतं की आपल्याला आवडणाऱ्या मुलीशी या तरुणाचे प्रेम संबंध आहेत, तेंव्हा “प्यार तो हमारे दिल में भी है, लेकीन भगवान ने हमें जो यह ऐसी आँखे दी हैं”, अशी मनापासून आपल्या मनातली खदखद व्यक्त करणारा हा प्रसंग, असे अनेक प्रसंग इरफान यांनी अगदी मनापासून केले आहेत.

‘हासिल’मध्ये असाच एक ह्रदय पिळवटून टाकणारा प्रसंग आहे, रणविजयच्या आक्रंदनाचा प्रसंग. जेंव्हा त्याला कळतं, की विद्यार्थी नेता गौरी शंकर पांडे, यानं आपल्या गावातल्या माणसांची हत्या केली आहे. तेव्हा ज्या कापडाच्या दुकानात रणविजयची गँग लपून बसली आहे, त्या दुकानाच्या बेसमेंटमध्ये रणविजय, गौरी शंकरला मारण्याची शपथ घेतो. या प्रसंगाचे शूटींग तिग्मांशू यांनी भल्या पहाटे ठेवले होते. कापडाच्या दुकानात या शॉटची तयारी सुरू होती. आम्हाला सगळ्यांना शांततेत आपापली कामे करण्यासाठी सांगीतलं होतं. इरफान यांना खुर्चीत दोरीनं बांधून ठेवण्यात आलं. बाकी अभिनेत्यांना सुध्दा आपापल्या जागी उभं राहायला सांगितलं गेलं. इरफानसुध्दा अगदी शांतपणे एकटेच, रणविजयची त्या वेळची मन:स्थिती मिळवायचा एकाग्रतेने प्रयत्न करत होते. सिनेमॅटोग्राफर राफे मोहम्मद यांनी शॉट रेडी असल्याची खूण केल्यावर तिग्मांशू यांनी अगदी हळू आवाजात अॅक्शन असं म्हटलं आणि एका दमात इरफान यांनी आर्ततेने टाहो फोडायला सुरुवात केली. हा शॉट रणविजयचं आक्रंदन शांत होई पर्यंत चालू ठेवण्यात आला. शेवटी गँगमधल्या एका जणानं तोंडावर चिकट टेप गुंडाळून त्यांचं तोंड बंद केलं आणि आक्रोश थांबला. कट असा तिग्मांशूचा आवाज आला तसं वातावरण शांत झालं. इतक्या जवळून हा जिवंत प्रसंग पाहताना मला सुद्धा सुन्न व्हायला झालं.

तिग्मांशू यांनी १९९८ दरम्यान लिहिलेला हा पहीला चित्रपट तयार झाला २००१ ते २००२ दरम्यान, पण प्रदर्शित व्हायला पुढं अजून एक वर्षं लागलं. तिग्मांशू आणि इरफान या दोघांसाठी हा चित्रपट प्रदर्शित होणं करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यांच्या बरोबर आम्हा सर्वांनाच आस लागून राहिली होती. ‘हासिल’ जेंव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांना खूप आवडला. बॉलीवूडच्या चकचकीत पॉलिश्ड सिनेमांच्या दुनियेत या अस्सल देशी चित्रपटाचं नाणं खणखणीत वाजलं. इरफान यांना हासिल मधील रणविजय या भूमिकेसाठी फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा (खलनायक) पहिला पुरस्कार मिळाला होता.

‘हासिल’ सिनेमाच्या शूटींग दरम्यान अलाहाबाद विद्यापीठात शूटिंग सुरू असताना, तिथला तत्कालिन विद्यार्थी नेता आणि त्याच्या गँगनं आमचं शूटींग बंद पाडलं. कुलगुरुंनी शूटींगसाठी दिलेली परवानगी नाकारण्यात आली. तिग्मांशू यांचं हे शहर असल्याने असं काही घडेल असं त्यांना वाटलं नव्हतं. खूप ताण निर्माण झाला होता. पुढे जवळजवळ दिड महिनाभर शूटींग बाकी होतं. पण विद्यापिठात घडणाऱ्या पुढील प्रसंगांचं चित्रिकरण करण्यासाठी नवीन लोकेशन शोधावी लागणार होती. ठरलेलं शेड्यूल सुद्धा नव्यानं बदलावं लागलं. तिग्मांशू यांच्या स्थानिक मित्रांनी यावेळी खूप मदत केली. त्या वेळी आमच्या डायरेक्शन डिपार्टमेंट आणि टेक्निकल टीमला रिलॅक्स करण्यासाठी इरफान आम्हाला सगळ्यांना म्हणाले, “गोरिल्ला वॉर किया जायेगा नहीं तो, गोरिल्ला जानते हो कि नहीं?” आमच्या डोक्यावरचा ताण काही वेळासाठी निखळून पडला आणि सगळेच हसायला लागले.

‘हासिल’ नंतर पुढे मुंबईत मला अधूनमधून नवीन कामं मिळू लागली. पण कामांमध्ये सलगता नव्हती. अशा स्थितीत मी पुन्हा पुण्यात परतलो. कारण नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून काम करायचं, असं आधीच मी माझ्या मनाशी ठरवलं होतं. तिग्मांशू यांना जेव्हा मी ही गोष्ट सांगितली, तेव्हा ते मला पाठींबा देत म्हणाले, “अगर तुम थिएटर करना चाहते हो, तो दिल से करना, जैसे यहां हमारे साथ जुड गये थे, नाटक भी उतनी ही सच्चाई के साथ करो.” माझ्यासाठी हा खूप मोलाचा सल्ला होता. पुढे राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली मध्ये आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यांमधील नाट्य विद्यालय आणि फिल्म इन्स्टिट्यूट्समध्ये वास्तवाभासी अभिनय कार्यशाळांचे संचालन करणं आणि नाटक दिग्दर्शन करणं, हेच माझं नवीन करिअर डेव्हलप होत गेलं.

तिग्मांशू यांच्या बरोबर काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली ती २००४ साली. तिग्मांशू यांनी ‘गुलामी’ या नव्या फिल्म साठी मला मुंबईला बोलावून घेतलं. शूटिंग पुण्या जवळच्या भोर भाटघर धरणाच्या बॅक वॉटर भागात होणार होतं. या फिल्मसाठी मी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जॉईन झालो. इरफान, समीरा रेड्डी आणि सनी देओल असे प्रमुख अभिनेते होते. ब्रिटिश काळातील विषय असल्याने सलग एका शेड्यूल मध्ये शूटींग होणं अपेक्षित होतं. बिग बजेट प्रोजेक्ट असल्याने चार निर्माते यात सामील होते. कला दिग्दर्शक जयंत देशमुख यांनी ठरल्याप्रमाणे वेळेत गुंजावणी नदीच्या काठावर भव्य सेट उभा केला आणि ठरल्या दिवशी शूटींग सुरू झालं. इरफान आणि समीरा या दोघांचं शूटींग पहिल्या दिवसापासूनच होतं. शूटींग साधारण आठ दहा दिवस चांगलं चाललं. पण पुढे चारही मिर्मात्याचं आपापसात पटेना. निर्मिती व्यवस्था बघणार्‍या पुण्यातल्या टीमचं सुद्धा निर्मात्यांशी ठीक जुळेना. या सगळ्याचा परिणाम शुटींगवर झाला. हळूहळू एकेक निर्माता मुंबईला पळून जाऊ लागला आणि एक दिवस शूटींग पूर्ण थांबलं. एव्हाना सनी देओल यांचं शूटींग

तिग्मांशू आणि इरफान यांची मैत्री अखेरपर्यंत होती. शेवटी इरफान खान यांच्या अंत्यसंस्काराला तिग्मांशू उपस्थित होते.

तिग्मांशू आणि इरफान यांची मैत्री अखेरपर्यंत होती. शेवटी इरफान खान यांच्या अंत्यसंस्काराला तिग्मांशू उपस्थित होते.

सुरू व्हायला वेळ होता म्हणून त्यांना मुंबईतच थोपवण्यात आलं. प्रॉडक्शन मॅनेजरनं तिग्मांशू आणि आम्हा सर्वांना विश्वासात घेतलं आणि जो पर्यंत झालेल्या शूटींगचा स्थानिक खर्च, आम्ही राहात असलेल्या हॉटेलचा खर्च आणि मुंबईहून आणलेल्या कामगारांचे वेतन निर्मात्यांकडून मिळत नाही, तो पर्यंत तिग्मांशू, सिनेमॅटोग्राफर आणि आम्हा सर्व टीम ला हॉटेलवरच राहावं लागेल, इथून बाहेर पडायचे नाही असं ठरलं. सर्व अभिनेत्यांना मात्र मुंबईला पाठवण्यात आलं. शूटींग पूर्णपणे थांबल्यामुळे तिग्मांशू खूप व्यथीत झाले होते. त्यांच्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट होता. अशा वेळी इरफान यांनी आम्हा सर्वांना खूप धीर दिला आणि स्वत: सुद्धा आमच्या बरोबर थांबून राहण्याची तयारी दर्शवली. पण तिग्मांशू यांनी त्यांना मुंबईला पुढे जाण्यास सांगितलं. पुढे दोन दिवसांनी एका निर्मात्यानं मुंबईहून भोरला येऊन हा आर्थिक तिढा सोडवला आणि एका अर्थाने स्थानबध्द झालेल्या आम्हां सर्वांची सुटका झाली. अशा वेळी आपल्या दिग्दर्शक मित्राला धीर देणार्‍या इरफान यांचं हे व्यक्तिमत्व पाहून विचार आला की, अभिनेता म्हणून जितका अप्रतिम आहे त्या बरोबरच माणूस म्हणूनही हा खूप भला माणूस आहे.

‘गुलामी’च्या शूटींग दरम्यान सुरुवातीच्या दिवसांत, एके दिवशी सकाळी इरफान यांना बरं वाटत नव्हतं. पण त्यांचं शूटींग त्याच दिवशी असल्याने त्यांनी, मला जवळपासच्या भागात डॉक्टर आहे, का याची चौकशी करायला सांगितलं.

माझे नातेवाईक नसरापूर इथं राहात असल्याने, मी त्यांच्याकडे फोन करून चौकशी केली. तेव्हा नसरापूरमध्ये एक महीला एमबीबीएस डॉक्टर असल्याचं त्यांनी सांगितलं. तिग्मांशू यांनी मला इरफान यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची जबाबदारी दिली. मी इरफान यांना त्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांना मी इरफान यांची ओळख करून दिली. भोर भाटघर भागात आम्ही शूटींग साठी आलो आहोत म्हणून आपल्याकडे आलो हे सुद्धा सांगितलं. डॉक्टरांनी सुध्दा व्यवस्थित तपासणी केली आणि औषधं लिहून देता देता, इरफान यांच्याकडे पाहून त्या एकदम म्हणाल्या, “तुम्हाला टिव्हीवर पाहिलंय, तुम्ही चंद्रकांता सिरीयलमध्ये होता ना?” इरफान यांनी हसतमुखाने ही ओळख स्वीकारली आणि डॉक्टरांचे  मनापासून आभार मानले. आम्ही दोघेही दवाखान्यातून बाहेर पडलो आणि शूटींगसाठी परतीच्या वाटेवर निघालो.

खरं तर एव्हाना इरफान यांच्या मकबूल, हासिल सारख्या चित्रपटांना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण गावांमध्ये अजूनही त्यांची ओळख ही चंद्रकांता सारख्या सिरीयल पुरतीच सिमित होती. इरफान यांना राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून बाहेर पडल्यावर, चित्रपटांमध्ये मनासारख्या भूमिका मिळायला जवळपास दहा-बारा वर्षं तरी लागली असतील. तोवर चरीतार्थासाठी त्यांनी चंद्रकांता सारख्या सिरीयल करत राहणं, हे क्रमप्राप्त होतं.

पुढे २००८ दरम्यान  ‘पानसिंग तोमर’साठी तिग्मांशू यांनी प्रोजेक्टमध्ये सामिल होण्यासाठी बोलावून घेतलं होतं. सुरुवातीच्या काळात मी मुंबईला जाऊन राहीलो होतो. पण प्रत्यक्ष शूटींग सुरू व्हायला जवळपास वर्षं लागलं. जेव्हा शूटींग सुरू होणार होतं त्या काळात मी नेमका आसाम आणि मणीपूरमध्ये सलग दोन महिन्यांसाठी थिएटर वर्कशॉपसाठी गेलो होतो. त्यामुळे मला ‘पानसिंग तोमर’ च्या शूटींगमध्ये सहभागी होता आलं नाही, याची आजही खंत वाटते. माझी तिग्मांशू आणि इरफान यांच्या बरोबर काम करण्याची ही मोठी संधी हुकली. या चित्रपटास जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा तिग्मांशू यांना आवर्जून भेटायला मुंबईला गेलो. इरफान यांची भेट होऊ शकली नाही, म्हणून त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला. तेव्हा इरफान तितक्याच आत्मियतेने माझ्याशी बोलले. अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळून सुध्दा जमीनीवर असलेल्या या अभिनेत्याबद्दल मनातला आदरभाव आणखी वाढला

२०१४ दरम्यान एकदा इरफान पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, ‘किस्सा’ या फिल्मचे दिग्दर्शक अनूप सिंह यांच्या बरोबर आले होते. तेव्हा त्यांच्या बरोबर मनमोकळ्या गप्पा झाल्या. या गप्पांच्या ओघात मी नुकतंच राष्ट्रीय नाट्य विद्यालयमध्ये ‘लोअर डेप्थ्स’ हे नाटक दिग्दर्शित केलंय असं हळूच सांगितलं, तेव्हा माझ्या पाठीवर हात ठेवून इरफान आनंदाने म्हणाले, “लोअर डेप्थ्स यह मेरा भी बहोत फेव्हरेट प्ले है. डायरेक्ट करते हुए तुम्हें भी बहुत मजा आया होगा.”

‘एक शाम की मुलाकात’ मधील नवविवाहित महेश, ‘फुरसत में’ मधील रिटायर्ड क्लर्क, ‘हासिल’ मधील विद्यार्थी नेता रणविजय, ‘मकबूल’ मधील मकबूल मियां, ‘किस्सा’ मधील पंजाब मधल्या गावाकडचा चार मुलींचा बाप उम्बर सिंग, ‘मदारी’ मधील निर्मल, ‘हैदर’ मधील राजकैदी, ‘लंच बॉक्स’मधील साजन फर्नांडिस, ‘हिंदी मिडियम’ मधील दिल्लीच्या चांदनी चौकमधील व्यापारी राज बात्रा,  ‘लाईफ ऑफ पाय’मधील पाय पटेल आणि ‘पानसिंग तोमर’चा अॅथलेट सैनिक, अशा अनेक भूमिकांसह आजही इरफान डोळ्यासमोर आहे.

त्यांचा वास्तवाभासी अभिनयही सतत दिसत राहतो, मात्र इरफान आज आपल्यांत नाहीत, हे वास्तव आहे.

अनिरुध्द खुटवड, नाट्य दिग्दर्शक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0