जगभर पुराचे थैमान : ग्लोबल वार्मिंगचे तडाखे

जगभर पुराचे थैमान : ग्लोबल वार्मिंगचे तडाखे

गेल्या १५ दिवसांत पावसाने जगातल्या अनेक भागात थैमान घातले आहे. पावसाने आणि पुराने तात्पुरत्या विस्थापित झालेल्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजात तफावत असली तरी ही संख्या लवकरच साधारण ३२ कोटीपर्यंत पोहचू शकेल असा अंदाज आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा थोडीशीच कमी भरेल. ग्लोबल वार्मिंगचे हे तडाखे आहेत.

राज्य वातावरणीय बदल परिषदेची स्थापना
हवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड
नव्या जीवनशैलीसाठी तयार राहा

जगभर पावसाचा कोप होण्याचा आज सलग १५वा दिवस सुरू आहे. दक्षिण आशिया मुख्यतः दक्षिण-पूर्व आशियात पावसाने नागरी वस्त्यांची केलेली वाताहत आणि यात झालेली प्रचंड जीवितहानी ही सहाव्या विलुप्तीला म्हणजेच ‘द सिक्स्थ एक्स्टिंनक्शन’ला अधिक वेगवान करते आहे. हा पाऊस आणखी २५ दिवस असाच चालत राहिला तर त्यामुळे पृथ्वीवरचे अर्धे जीवन धोक्यात येऊ शकते. हा अंदाज अर्थात प्रलयघंटेच्या जवळ जाणारा असल्याने त्या शक्यतेला एक आशावादी मनुष्य पूर्णतः नाकारेल.

बदलत्या जगात जगण्यासाठी काहींना हा आशावाद आवश्यक आहे. बहुतांश धार्मिक ग्रंथांनी अशा ४० दिवस आणि ४० रात्र चालणाऱ्या जगबुडीची रसभरीत वर्णने अगोदरच लिहून ठेवलेली असल्याने भवतालाच्या परिस्थितीत विविध धर्मांच्या पालनकर्त्यांचा त्यांच्या धर्मावर विश्वास अधिक घट्ट झाला नाही तरच नवल. त्यांचा परमेश्वर आता त्यांचे भले करो, अशा प्रकारची कुत्सित प्रार्थना काही पर्यावरणवादी करू लागले आहेत. ‘क्लायमेट चेंज’मुळे पावसाचे प्रमाण आणि कालखंड कमालीचा बदलू शकतो याविषयी आंतरराष्ट्रीय माध्यमात २००५पासून चर्चा सुरू झाली होती. आंतरराष्ट्रीय माध्यमांत या शक्यता आणि इशारे दिले गेले असले तरी २०१२ साल उजाडेपर्यंत जगभरात या शक्यता वास्तवात येऊ लागल्या. वातावरण कमालीचे बिघडू लागले आणि आशियाई देशांमध्ये पावसाच्या तडाख्यात महानगरे इतस्तः पाण्याने भरून जाऊ लागली. बुड़ू लागली. त्या काळाच्या जवळपासच या देशातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर मोटारी खरेदी केल्याने आणि त्यासाठी व्यापक रस्त्यांचे जाळे बांधल्याने वातावरण बदलाचा वेग दुपटीने वाढू लागला. काही ठिकाणी सरासरी उच्चतम तापमान ४ ते ६ अंश सेल्सियसने वाढल्याचे दिसून येऊ लागले, काही ठिकाणी ते २ अंश सेल्सियसने वाढले आणि पृथ्वीच्या एकूण सरासरी तापमानानेही १ अंश सेल्सियसने वाढल्याचा नवा उच्चांक नोंदविला.

जगभरात २०१२नंतर झालेल्या राजकीय बदलांमुळे ‘ग्लोबल हिटींग’ला थेट नकार देत उद्योगांना आणि लोकांना हवे तितके प्रदूषण करण्याची परवानगी देणारी एक नवी राजकीय जमात उदयाला आली. लवकरच पर्यावरणाच्या प्रश्नांचे वर्गीकरण पीआर कंपन्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये करण्यात आले आणि जो तो अगोदरपेक्षा दुप्पट प्रदूषण करूनही आपण कसे पर्यावरणस्नेही आहोत हे जगाला पटवून देऊ लागला.

वातावरण बदलाचे दुसरे मोठे पर्व सुरू झाले तेव्हा ते समोर दिसत असूनही पर्यावरणाची जाण असणाऱ्या अनेकांचे हात बांधले गेले. काही ठिकाणी त्यांना तुरुंगात धाडण्यात आले. काही ठिकाणी त्यांची आर्थिक कोंडी केली गेली तर काही ठिकाणी त्यांचे थेट शिरकाण करण्यात आले. मुख्य प्रवाहातून पर्यावरणाच्या बातम्याच गायब झाल्याने लोकांना या प्रश्नांचा सरळसरळ विसर पडला आणि आज जेव्हा पावसाच्या या संकटाला जग सामोरे जाते आहे तेव्हाही या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आहे असे खात्रीने कुणी म्हणू शकणार नाही?

गेल्या १५ दिवसात बांग्लादेशमध्ये पावसाने शंभरहून अधिक बळी घेतले आहेत. तिथल्या निर्वासितांना या पावसामुळे अक्षरश: मरणयातनांना सामोरे जावे लागत असून पाऊस असाच चालू राहिल्यास स्थलांतरितांच्या जगण्याच्या ओढताणीचा नवा नीचतम स्तर गाठला जाईल. म्यानमारमध्ये पन्नासहून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून भूस्खल्लनाच्या घटनांनी तिथल्या संकटात अधिक भर टाकली आहे. एरव्ही भारतातल्या अनेक वृत्तपत्रांत उल्लेख होणाऱ्या पाकिस्तानात सतराहून अधिक लोक पुरामुळे मृत्युमुखी पडले असून कराची शहराची अवस्था मुंबईतल्या पुरापेक्षा वेगळी नाही. पुराच्याबाबतीत कराची आणि मुंबई या सावत्र जुळ्या बहिणी ठरू शकतील. भारताच्या पोटात सुखाने जगणाऱ्या नेपाळलाही पुराचा तडाखा बसला असून तिथे पंधराहून अधिक लोकांना मृत्युला शरण जावे लागले आहे.

या पावसाने आणि पुराने तात्पुरत्या विस्थापित झालेल्या एकूण लोकांची संख्येच्या अंदाजात तफावत असली तरी ही संख्या लवकरच साधारण ३२ कोटीपर्यंत पोहचू शकेल असा अंदाज आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा थोडीशीच कमी भरेल.

समांतर काळात चीनमध्ये लेकीमा चक्रीवादळाने थैमान घातले असून तिथे बहुमजली इमारती कोसळल्याने झालेली जीवितहानी शेकडोंच्या घरात असावी असा अंदाज आहे. या घटनेचे वर्णन करतांना चीनच्या काही माध्यमांनी चुकून हजारो चीन नागरिक मारले गेल्याची बातमी दिली होती. त्या बातमीने झालेल्या गोंधळानंतर काही तास जगभरात अफरातफरीचे वातावरण होते. लवकरच ही चूक लक्षात आल्याने ती सुधारण्यात आली. याशिवाय ही चुकीची बातमी आणि तिच्या संबंधीचे इतर रिपोर्ट चीनला इंटरनेटवरून काढण्यात यश आले आहे. परंतु सध्या चीनशी व्यापारयुद्ध खेळणाऱ्या अमेरिकेतल्या सरकारधार्जिण्या वृत्त वाहिन्यांनी ही बातमी उचलून धरली असून हा गुंता लवकर न सोडविला गेल्यास चीनच्या पुढच्या संभाव्य आपत्तींची माहिती उर्वरीत जगाला मिळतांना त्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान भारतात महाराष्ट्रासह केरळ, गुजरात, आसाम या अन्य राज्यात उद्भवलेल्या पूरसमस्येमुळे ३०० लोकांचे प्राण गेले असून हा आकडा सरकारी आकड्यांच्या जवळपास जाणारा आहे. चीनने आपल्या प्रगत उपग्रहांच्या मदतीने भारतातल्या पुराची सविस्तर माहिती मिळविली असून पूरपरिस्थितीवर अधिक चांगले नियंत्रण मिळावे म्हणून भारताला सहकार्य दिले आहे. या पावसात इंडोनेशिया सर्वात कमी प्रभाव पडलेला देश आहे, यावर्षीच्या मार्च महिन्यात आलेल्या पुरामुळे आणि नंतर उद्भवलेल्या भूकंपांमुळे तिथे ४० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जून महिन्याच्या ११ तारखेला तिथे पूरपरिस्थिती निर्माण झाली तरी त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात तिथल्या व्यवस्थेला यश आले होते. असे असले तरी इंडोनेशियाच्या समुद्रात काही वादळे घोंगावण्यास सुरूवात झाली असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यास त्याचे इंडोनेशियावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

चीनमध्ये आलेल्या ‘लेकीमा’च्या प्रभावात जपान आणि तैवान हे देशही आहेत याशिवाय फक्त जपानवर ‘क्रोसा’ नावाचे दुसरे वादळ येऊन थडकले असून हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा तेथे काही मृत्यू झाले असतील. अवघ्या पाच दिवसांपूर्वी व्हिएतनाममध्ये आलेल्या ‘विफा’मुळेही फक्त एकाचाच प्राण गेला असला तरी वादळाने व्हिएतनामचे मोठे नुकसान केले आहे.

एकूण आशिया खंडातला लोकसंख्या घनतेत सर्वात जास्त असलेला पृथ्वीचा भाग सध्या पाऊस, वादळे आणि पुराच्या संकटात सापडला असून सुमारे चार अब्ज लोक सध्या पूरग्रस्त झाले आहेत. ही लोकसंख्या जगाच्या अर्ध्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. डेटाची ही जंत्री आशियातच संपते तर चालते ना, पण याचवेळी आफ्रिकेतल्या सुदानमध्येही पुराने थैमान घातले असून त्यात सहा लोकांचा बळी गेला आहे. सुदानची दुसरी मोठी समस्या म्हणजे पूर्व आफ्रिकेत सध्या चालत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे तिथे अन्नाची मदत पाठविणे अवघड झाले आहे. सुदानमधले २८ हजार पूरग्रस्त गेल्या काही दिवसांपासून अन्नपाण्यावाचून तडफडत मिळेल ती गोष्ट खाऊन दिवस मोजत आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात जीवघेणा पाऊस पडला असून तिथल्या ब्रिटीशकालीन धरणांचे व्यवस्थापन कोलमडले आहे. देशातल्या काही भागांत अंधार पसरला असून रेल्वेसेवा आणि वाहतूक सेवा कोलमडून गेल्या आहेत.

युरोपातील स्वित्झर्लंडमध्येही वेगाने आलेल्या पुरामुळे वाहने वाहून जात आहेत. गोष्ट आता युरोपातून अमेरिकेच्या दक्षिण भागात किंवा मेक्सिकोतही नेता येईल. पण एकदा युरोपात पोहचलो म्हणजे या जलसंकटच्या उगमापाशी पोहचता येते. आकाराने जवळपास भारताच्या अर्ध्याक्षेत्रफळाएवढ्या ग्रीनलँडमध्ये आपल्या ग्रहाचा आद्यपूर आला आहे.

युरोपात उन्हाळा सुरू झाला की ग्रीनलँडमधले बर्फ वितळून त्यातून हिमनद्यांची निर्मिती होणे आणि हिवाळा सुरू झाला की पुन्हा या नद्या गोठून जाणे ही प्रक्रिया तशी विनाव्यत्यय काही हजार वर्षे चालू आहे. यावर्षी मात्र ग्रीनलँडचे बर्फ वितळण्याचे प्रमाण हे कमालीचे जास्त आहे. इतके की एका दिवसाला एक हजार अब्ज टनापेक्षाही जास्त बर्फ वितळून त्याचे पाणी होत आहे आणि समुद्राला मिळत आहे.

जागतिक उष्णता वाढली म्हणजे घन बर्फाचे द्रवरुप पाणी होणे हे सहज समजून येते पण द्रवरुप पाण्याची वायूरुप वाफ होणे चटकन ध्यानात येत नाही. त्यामुळे ग्रीनलँडचे बर्फाचे वितळणे आणि जास्तीच्या वाफेमुळे तयार झालेल्या पावसाचे जास्तीचे बरसणे याचा थेट संबंध लगेच लावला जात नाही. तो अगदी तसाच आहे असेही नाही. पण गेल्या दशकात येऊ घातलेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे कुठेकुठे काय काय बदल संभवतात याच्या काही हवामान प्रतिकृती शास्त्रज्ञांनी तयार केल्या होत्या. त्यात २०३० सालापर्यंत किती बर्फ वितळेल, समुद्राची पातळी किती वाढेल, कुठल्या किनारपट्ट्या पाण्याखाली जातील, २०५०पर्यंत काय बदल संभवतात, २०७०मध्ये पाण्याची काय परिस्थिती असेल, हिमालय व इतर ठिकाणी बर्फ शिल्लक राहील का असे अनेक सविस्तर अंदाज या वेदर मॉडेल्समध्ये होते. त्यापैकी २०७०मध्ये जे नुकसान होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती त्या शक्यता यावर्षीच समोर येऊ लागल्या आहेत.

अशा काळात नव्याने डेटा जमा केला जाऊन येत्या वर्षांतल्या संभाव्य आपत्तींचा अंदाज लावलाही जाऊ शकतो पण हे सर्व अंदाज हे कमालीचे निराशाजनक आहेत. माणसाच्या जगात आता काही चांगले काही राहिलेय  की नाही, अशी शंका येऊ घातलेल्या काळासंबंधी पडते.

राहुल बनसोडे, हे मानववंशशास्त्राचे अभ्यासक असून सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0