श्रीनगरः गेल्या रविवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोस्ट वाँटेड दहशतवादी व लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर तालिब हुसैन शाह याला अटक केली. तालिब हुसैनला अटक केल्य
श्रीनगरः गेल्या रविवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोस्ट वाँटेड दहशतवादी व लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर तालिब हुसैन शाह याला अटक केली. तालिब हुसैनला अटक केल्यानंतर हा भाजपच्या अल्पसंख्याक सोशल मीडिया सेल विंगचा प्रभारी असल्याची माहिती पुढे आली.
तालिब हुसैन याची नियुक्ती भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष शेख बशीर यांनी ९ मे रोजी केली होती. या नियुक्तीचे पत्र बशीर यांनी भाजपचे वरिष्ठ नेते व अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कौल यांना पाठवले होते. या पत्रात तालिब हुसैन शाह याच्याकडून द्राग, कोटरंका, बुधन, जिल्हा राजौरी येथील अल्पसंख्याक आघाडीची जबाबदारी काढून भाजप अल्पसंख्याक आघाडी जम्मू प्रांताचा नवा आयटी व सोशल मीडिया प्रभारी म्हणून पदभार देत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
रविवारी तालिब हुसैन याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे फेसबुक प्रोफाइल हटवण्यात आले. तालिब हुसैन याचे भाजपच्या अनेक नेत्यांसोबत फेसबुकवर फोटो होते. यात भाजपच्या जम्मू व काश्मीरचे अध्यक्ष रविंदर रैना, जम्मूचे लोकसभा खासदार जुगल किशोर व भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत अनेक फोटो होते.
द वायरने कौल, रैना व अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला. त्यांना मेसेज पाठवले पण त्यांचे उत्तर आले नाही.
भाजपच्या प्रतिक्रिया
तालिब हुसैन याला अटक केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी वेगवेगळे दावे करण्यास सुरूवात केली. यात तालिब हुसैनचा भाजपच्या बड्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा डाव होता असा एक दावा करण्यात आला. शिवाय एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी न तपासणाऱ्या ऑनलाइन सदस्यत्व मोहिमेलाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दोष दिले.
भाजपचे एक प्रवक्ते आरएस पठानिया यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, तालिब हुसैन याच्या अटकेनंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. काही जण भाजपमध्ये सामील होतात, पक्षाची माहिती काढतात, रेकी करतात व बड्या नेत्यांना ठार मारण्याची योजना बनवतात. आता पोलिसांनी तालिब हुसैन याचे कारस्थान उधळून लावल्याने सर्व माहिती जनतेपुढे आली, असे पठानिया यांचे म्हणणे आहे.
राजौरी जिल्ह्याचे भाजप प्रमुख राजिंदर गुप्ता यांनी द ट्रिब्यूनला प्रतिक्रिया देताना भाजपचा विस्तार होत असून या पक्षात मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. प्रत्येकाची जबाबदारी पक्ष उचलू शकत नाही त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तालिब हुसैन फोटो काढू शकतो हे मान्य करावे लागेल.
काँग्रेस आक्रमक
भाजपचा सदस्यच दहशतवादी असल्याचे उघडकीस आल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. भाजपच काश्मीरमधील दहशतवादाचा प्रायोजक असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. उदयपूर प्रकरणात सापडलेला खूनी हा भाजपचा सदस्य होता. त्यानंतर तालिब हुसैन हा लष्कर ए तय्यबाचा कमांडर असल्याची माहिती उघडकीस येते, हे पाहता भाजपने देशापुढे आपण दहशतवादाचे प्रायोजक आहोत हे कबूल करावे असे काँग्रेसने म्हटले आहे.
तालिब हुसैन कोण आहे?
जम्मू व काश्मीर पोलिसांनी राजौरी येथे २६ मार्च व १९ एप्रिलला झालेल्या बॉम्बस्फोटाशी तालिबचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या बॉम्बस्फोटात ४ जण जखमी झाले होते. तालिबवर एका व्यक्तीचा खून केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. राजौरी जिल्ह्यात दहशतवादी संघटनांशी त्याचे काही संबंध आहेत का याची चौकशीही पोलिसांनी सुरू केली आहे.
तालिबला पूर्वीच मोस्ट वाँटेड दहशतवादी म्हणून पोलिसांनी घोषित केले होते. त्याचा नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रास्त्र तस्करीत हात असल्याचाही पोलिसांचा आरोप आहे.
सविस्तर वृत्त
COMMENTS