दविंदर सिंह संसद हल्ल्याच्या कटात होता का?

दविंदर सिंह संसद हल्ल्याच्या कटात होता का?

नवी दिल्ली : गेल्या शनिवारी जम्मू व काश्मीरमध्ये कार्यरत असलेला एक वरिष्ठ पोलिस अधिकारी दोन दहशतवाद्यांसमवेत दिल्लीला जाताना सापडला. ज्या पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली त्याचे नाव दविंदर सिंह असे असून हा अधिकारी सध्या जम्मू व काश्मीर पोलिस दलातील दहशतवादविरोधी पथकात असून पूर्वी तो काश्मीरमध्ये पोलिसदलातील अपहरणविरोधी पथकात कार्यरत होता. दोन दिवसांपूर्वी काश्मीरच्या दौऱ्यावर युरोपियन युनियनचे काही सदस्य आले होते. त्यांच्यासोबत दविंदर सिंह या दौऱ्यात सामील झाला होता. तसे त्याचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे.

शनिवारी कुलगाम जिल्ह्यातील वानपोह येथे दविंदर सिंह याला हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला एक दहशतवादी नवीद बाबू याने गेल्या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात द. काश्मीरमध्ये एका ट्रक चालकासह ११ मजूरांची हत्या केली होती. पोलिस त्याच्या शोधात होते. हे दोन दहशतवादी पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत होते.

दविंदर सिंह याचे नावे २००१मध्ये संसदेवर हल्ला प्रकरणातील त्याच्या एका साक्षीने प्रकाशात आले होते.

२००१ साली संसदेवरच्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू याने २००४मध्ये आपला वकील सुशील कुमार याला एक पत्र लिहिले होते. या पत्रात अफजल गुरुने त्यावेळी जम्मू-काश्मीर पोलिस दलातील स्पेशल ऑपरेशनमध्ये काम करत असलेल्या दविंदर सिंह याने संसदेवर हल्ला करणाऱ्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला-मोहम्मदला- दिल्लीत जाण्यासाठी गाडी व त्याला एक भाड्याने फ्लॅट द्यावा असे आपल्याला सांगितले होते अशी माहिती या पत्रात दिली होती.

एवढेच नव्हे तर अफजल गुरुने आणखी एक पोलिस अधिकारी शैंटी सिंह याचेही नाव घेतले आहे. या शैंटी सिंह व दविंदर सिंहने आपल्याला हुमहमा येथील एसटीएफ शिबिरात जबर मारहाण केली होती, असल्याचे नमूद केले होते.

अफजल गुरुने आपल्या पत्रात अल्ताफ हुसेन या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. हा अल्ताफ बडगामचे एसएसपी अशाक हुसैन (बुखारी) यांचा मेहुणा होता. अल्ताफ यांची सुटका व्हावी म्हणून अशाक हुसैनने दविंदरसिंहशी चर्चाही केली होती.

अफजल गुरूला ९ जानेवारी २०१३मध्ये संसद हल्ल्यातील प्रमुख दोषी म्हणून फाशी देण्यात आली.

महत्त्वाची बाब अशी की दविंदर सिंह याचे दहशतवाद्यांशी इतके जवळचे संबंध असूनही त्याची एकदाही चौकशी झाली नाही. शनिवारी जेव्हा काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार सिंह यांना या संदर्भात पत्रकारांनी विचारले तेव्हा, त्यांनी आमच्याकडील माहिती पुस्तकात दविंदर सिंह याच्याविषयी कोणालाच माहिती नव्हती व तशा नोंदी नव्हत्या असे सांगितले. आम्ही या व्यक्तीची सखोल चौकशी करू व तो दहशतवादी समजून चौकशी करून असे विजय कुमार सिंह यांनी सांगितले.

‘कर्माचे फळ मिळाले’

दविंदर सिंहला ताब्यात घेतल्याने त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले अशी प्रतिक्रिया एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. या व्यक्तीला आता कोणीही वाचवू शकत नाही असेही या अधिकाऱ्याने म्हणणे आहे.

आता दविंदर सिंहला अनेक प्रश्न विचारले जातील. तो दोन दहशतवाद्यांसोबत कुठे गेला होता? हे दहशतवादी खोऱ्यातून जम्मूकडे जात असताना त्यांना रस्त्यावर ताब्यात घेण्यात आले. तेव्हा या दहशतवाद्यांची नेमकी योजना काय होती? आजपर्यंत दविंदर सिंह दहशतवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमांमध्ये सामील होता. या मोहिमेत त्याची भूमिका काय होती, असे अनेक प्रश्न त्याला विचारले जातील, असे या पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे होते.

दविंदर सिंह हा काश्मीर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकात सामील झाल्याने तो काश्मीरमधील अनेक भागात काम करत होता. दविंदर सिंह पुलवामाचा जिल्हा पोलिस प्रमुख होता. तो आता बोलल्यास अनेक गुपिते बाहेर येतील, असे पोलिस सांगतात.

दविंदर सिंहबाबत अफजल गुरूने जसे प्रश्न उपस्थित केले होते तसे काही प्रश्न शँटी सिंहबाबतही उपस्थित केले होते. पण शँटी सिंहबाबत फारशी माहिती बाहेर आली नाही. मात्र २००३मध्ये एका बनावट चकमकीप्रकरणात त्याची चौकशी होऊन त्याला तुरुंगात टाकले गेले.

शँटी सिंहने शोलीपोरा, पाखरपोर या गावातील एक सामान्य नागरिक अयूबला ताब्यात घेतलं आणि त्याला मारहाण करून त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. नंतर अयूब हा दहशतवादी होता अशी आवई उठवली. ती चौकशीदरम्यान खोटी ठरली.

हे प्रकरण क्राइम ब्रँचने राज्य मानवाधिकार आयोगाच्या आदेशानुसार आपल्या हाती घेतले आणि त्याची चौकशी करत शँटीला दोषी ठरवले.

आता देविंदर सिंहच्या अनेक कारवाया उघडकीस येतील. पण संसद हल्ल्यात त्याचा नेमका किती सहभाग होता हे कळणे महत्त्वाचे आहे.

मूळ बातमी

COMMENTS