दलित-वंचित समूहाचा बहुआयामी कलात्मक संघर्षपट

दलित-वंचित समूहाचा बहुआयामी कलात्मक संघर्षपट

दलित-वंचित जगण्याचे-सोसण्याचे अनेकांगी अलक्षित विषय चित्रपट माध्यमातून दृष्यमान होऊन सिनेमा माध्यमासारख्या प्रभावी साधनाला प्रबोधनासाठी उपयोगात आणणे किती गरजेचे आहे, याचा अनुभव ‘झुंड’ पाहून आल्याशिवाय राहत नाही.

तरुणीने दिल्या पाकिस्तान-हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा
भारताच्या भविष्यासाठी केजरीवाल पुन्हा निवडून यावेत
कायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख

भारतीय चित्रपटाच्या शतकोत्तर पर्यावरणात सर्वगामी शोषणाला कलात्मकतेने भिडून सिनेमासारख्या अत्यंत प्रभावी दृकश्राव्य माध्यमांद्वारा व्यवस्थेचे शवविच्छेदन करणारे धाडसी दिग्दर्शक-निर्माता-कलावंत, यांची संख्या बोटांवर मोजावी इतकी रोडावत चाललेली आहे. साठ-सत्तरच्या दशकापर्यंत सिनेमाकलेच्या प्रदेशात समस्याप्रधान-कलात्मक समांतर चित्रपटांची रसद पुरविणार्‍या निर्माता-दिग्दर्शकांची एक फळी राबती असायची. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना एक वेगळा मान असायचा. अशा निर्मितीमध्ये ‘रिस्क फॅक्टर’ असायचा पण ती रिस्क पेलवणारे मजबूत खांदे सुद्धा साथीला असायचे. सिनेमाकला ही जनसामान्यांमध्ये विषम अमानवी शोषणमूल्यांविरुद्ध उभे राहण्याची नैतिकता पेरू शकते- हे त्यांच्या अंतर्मनाने स्वीकारलेलं शहाणपण, हेच त्यांचं बळ होतं. पुढेपुढे सिनेमाकलेत बाजाराचे ठेकेदार घुसले आणि सेक्स अ‍ॅण्ड व्हॉयोलन्ससह चटपट मसाल्याचा सराईतपणे वारेमाप वापर करून (काही सन्माननीय अपवाद वगळता) एका उत्तम कलेचा कल्ला होऊन केवळ गल्ला जमविणे सुरू झाले.

हिंदी सिनेसृष्टीमध्ये, काही मोजके अपवाद वगळता, दलित-वंचित समूहाच्या जीवनविषयावर थेट बेतेलेले फारसे चित्रपट आढळून येत नाहीत. जातीविषमतेचा उल्लेख काही सिनेमांमधून अधूनमधून पाहावयास मिळतो. तथापी, तो विषय केंद्रस्थानी न राहता सरंजामी-जमीनदारी विषमतेच्या मुख्य विषयाचा उपविषय म्हणून सादर केलेला आढळून येतो (‘आर्टिकल 15’ सारखे अपवाद वगळता). दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी मात्र याला अपवाद म्हणता येईल. त्यांमध्ये या विषयांवर बेतेलेले चित्रपट धडधडून प्रदर्शित होताना दिसून येतात. या पार्श्वभूमीवर सिनेमाकलेच्या नैतिक मूल्यांप्रतिंची जाण व तिच्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून या माध्यमांतून शोषणांविरुद्ध दलित-वंचित समूहाचा सिनेमाकलेतून जोरकसपणे कलात्मक एल्गार मांडणारे, ‘पिस्तुल्या’, ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे प्रख्यात दिग्दर्शक-लेखक-कलावंत नागराज मंजुळे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘झुंड’ हा चित्रपट हिंदी सिनेमासृष्टीत आपली एक नवी मळवाट निर्माण करणारा आहे. केवळ रंजन नव्हे तर रंजनासोबतच व्यवस्थाभंजनावरही मार्मिक भाष्य ‘झुंड’ मध्ये प्रस्फुटित झालेले आहे.

भारतीय हिंदी सिनेमासृष्टीमध्ये सर्वस्तरीय प्रेक्षकांनी पाहावा असा, रंजन करता करता डोळ्यांत नकळत अंजनही घालणारा, दलित-वंचित समूहाच्या वेदनेचा एल्गार मांडणारा, कदाचित पहिलाच चित्रपट असावा. अकारण रंजक गोष्टी, नयनरम्य सीन्स, आंबटशौकीनांसाठी एखादे अ‍ॅटम साँग, रोमाँस, किंवा केवळ सिनेमाची लांबी वाढविण्यास्तव टाकलेले फालतू फ्रेम्स आणि विषय ईत्यादी गोष्टींना चित्रपटात कुठेही थारा नाही. हा चित्रपट कमर्शियल जरी असला तरी समांतर चित्रपटाचे पर्यावरण यामधून डोकावत राहते. एका अस्पर्श विषयावर, उत्तम पटकथा, सर्वोत्तम दिग्दर्शन, हृदयाचा ठाव घेणारे संगीत, उत्कृष्ट कला दिग्दर्शन, उत्साहवर्धक-अर्थपूर्ण गिते या वैशिष्ट्यांसह हा चित्रपट एक उत्तम कलाकृती म्हणून हिंदी सिनेसृष्टीत दमदारपणे दाखल झालेला आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या परिपक्व दिग्दर्शनात घडलेला आणि बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, किशोर कदम, छाया कदम, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे यांसह नव्याने अभिनयात पदार्पण केलेल्या मुख्य भूमिकेतील अंकुश गेडाम सह झोपडपट्टीतील एकोणतीस कलाकारांच्या अभिनयांनी वठलेला ‘झुंड’ हा चित्रपट ‘फुटबॉल’ या खेळाच्या रुपकामधून वर्तमान प्रस्थापित ‘आहे रे’ विरुद्ध दलित-वंचित ‘नाही रे’ असे द्वंद्व उभारून व्यवस्थेला सवालजवाब करीत करीत दलित-वंचित समूहाचे जीवनदर्शन मांडते आणि सोबतच ‘मेरीट’ नावाच्या प्रस्थापित संकल्पनेच्या पुनर्मांडणीचा आग्रह धरते, खेळाच्या रुपकातून दलित-वंचित समूहाचे नवे मेरीट स्थापित करते. नागराज मंजुळे यांच्या संवेदनशील प्रतिभासंपन्न लेखणीतून साकारलेली सर्वोत्तम पटकथा चित्रपटाला लाभली आहे. पटकथेत संवादाचा नेमकेपणा आणि नेटकेपणा याचा समतोल उत्तमरित्या साधल्या गेला आहे. सबंध चित्रपटभर कुठेही अंडरअ‍ॅक्टिंग वा ओव्हरअ‍ॅक्टिंगचा मागमूस आढळून येत नसून थेट नैसर्गिक अभिनयाचा प्रत्यय चित्रपट बघताना येतो.

विजय बारसे या सामाजिक जाणिवेच्या क्रीडा शिक्षकाने २००१ मध्ये एकदा झोपडपट्टीतील काही मुले भर पावसात फुटक्या प्लास्टिक बादलीसोबत फुटबॉल खेळताना बघितले आणि दुसर्‍या दिवशी त्या मुलांना नवीन फुटबॉल खेळण्यासाठी आणून दिला, पुढे त्या मुलांना फुटबॉल खेळाचं प्रशिक्षण दिलं. मुले या फुटबॉल खेळात एकमय होऊन त्यांना त्या खेळाचे एकप्रकारे इतके व्यसन जडले की त्यांचे त्या काळात सिगारेट-गांजा पिणे, चोर्‍या करणे, गंजीपत्ता खेळणे यांसारखे पूर्वीचे व्यसन नकळतपणे बंद झाले, हळूहळू त्यांचे खेळातील नैपुण्य विकसित होत गेले. या परिवर्तनाने विजय बारसे यांचाही उत्साह वाढला आणि पुढे या झोपडपट्टीतील मुलांना सोबत घेऊन त्यांच्यासाठी २००२ मध्ये त्यांनी ‘झोपडपट्टी फुटबॉल क्लब’ निर्माण केला. या बीजारोपणाचे पुढे व्यापक स्तरावर ‘स्लम सॉसर क्रीडा विकास संस्था, नागपूर’ नावाच्या विराट वृक्षामध्ये रुपांतर झाले, आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘होमलेस वर्ल्ड कप फाउंडेशन’ सोबत संलग्न होऊन आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची अनमोल संधी प्राप्त होऊन प्रवाहामधून वगळल्या गेलेल्या झोपडपट्टीतील मुलामुलींना या खेळामुळे वेगळा मान-मराबत-पैसा, वेगळे जीवन मिळून त्यांच्या कालच्या बहकलेल्या जीवनाचे मोठ्या प्रमाणात सामाजिक सक्षमीकरण झाले.

विजय बारसे आणि अंकुश गेडाम यांच्या मुलाखतीद्वारा ही कथा आमिर खान यांच्या ५ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रक्षेपित झालेल्या ‘सत्यमेव जयते’ शोमध्ये (‘अ बॉल कॅन चेंज द वर्ल्ड’ सीझन-3, एपिसोड-1) लोकांसमोर आलेली होती. झोपडपट्टीतील नाही रे वर्गाच्या दलित-वंचित समूहाची ही संपूर्ण संघर्षगाथा त्यांच्या जगण्यातील सर्व बारकाव्यांसह ‘झुंड’मध्ये नागराज मंजुळे व त्यांच्या चमूने अत्यंत काटेकोर कलात्मकतेने चितारलेली आहे.

दलित-वंचित जगण्याच्या विषयावर बेतलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय करणारा नायक हा दलित-वंचित जगण्याच्या जाणिवेपर्यंत पोहोचला आहे की नाही हे एका उत्तम अभिनयासाठी अत्यंत गरजेचे असते. ‘झुंड’मध्ये नायकाच्या भूमिकेत वास्तव जीवनातील दलित-वंचित समूहाचा नायक ‘अंकुश गेडाम’ (चित्रपटातील ‘अंकुश मसराम’) आणि त्याच्यासोबतचे सर्व उपनायक हे वास्तव जीवनात दलित-वंचित समूहाच्या प्रत्यक्ष जगण्याचेच घटक राहिलेले आहे, त्यामुळे त्या सर्वांच्या सहज नैसर्गिक अभिनयाची साक्ष संपूर्ण चित्रपटात मिळते. याठिकाणी एक नमूद केले पाहिजे की, इतर प्रस्थापित उच्चभ्रू नायकाला जाणिवेच्या पातळीवर जशी मशक्कत करावी लागते, (‘आर्टिकल 15’ निर्माण होत असताना, दलित जगण्याच्या जाणिवेपर्यंत भिडण्यासाठी नायक आयुष्यमान खुराणा यांना दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ख्यातनाम हिंदी दलित लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांचे ‘झूठन’ हे आत्मकथन वाचावयास दिलेले होते.) तशी गरज येथे उरत नाही. याचा अर्थ मात्र असा घेऊ नये की, सर्वच दलित-वंचित जीवन जगणार्‍यांना उपजत अभिनयाचा वारसा असतो. एकूणच ‘झुंड’ तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी, त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे, एका सिद्धहस्त शिल्पकाराची भूमिका पार पाडलेली दिसून येते. शिल्पकार ज्याप्रमाणे ओबडधोबड दगडामधून आपल्या प्रतिभासंपन्न कुशल हाताने दगडातील अवांच्छीत भाग हळूवारपणे बाजूला सारतो आणि मग त्यात दडून असलेले एक सुंदर शिल्प दृष्यमान होते, अगदी त्याचप्रमाणे नागराज मंजुळे यांनी झोपडपट्टीतील ओबडधोबड दगडासारख्या बेशिस्त-राकट मुलांना, त्यांच्या स्क्रिनिंग टेस्टनंतर त्यांच्यावर आपल्या दिग्दर्शकीय छन्नी-हातोड्याने पैलू पाडलेत आणि त्यांच्यामध्ये दडून असलेल्या आखीव-रेखीव नैसर्गिक अभिनयाला वाट मोकळी करून दिली, हा एक्झरसाईज सहजी कोणी दिग्दर्शक करीत नसतो, (स्लममधील मुलांना सोबत घेऊन मीरा नायर यांनी केलेला ‘सलाम बाँम्बे’ चा एखाद अपवाद वगळता) पण नागराज मंजुळे ज्या पार्श्वभूमीतून तयार झालेत त्यातील जाणिवा इतक्या प्रगल्भ आहेत की ते केवळ दिग्दर्शक बनू शकत नाही. त्यासोबतच त्यांच्यामध्ये एक सांस्कृतिक कार्यकर्तेपण, व्यवस्थेविषयीची चीड आणि तिच्या बदलासाठीची चाड ओतप्रोत भरलेली आहे, म्हणूनच ते इतके डीपरुटेड दिग्दर्शक म्हणून दरवेळी सिद्ध होतात, हे त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवरून सहजी लक्षात येते.

या चित्रपटात काही दृष्ये ही अत्यंत जाणीवपूर्वक नव्याने दृष्यमान होताना दिसून येतात, जी ऐरवी कोणत्याही हिंदी चित्रपटात सहसा आढळून येत नाही. दुकानदाराच्या दुकानामध्ये शिवराय, जोतीबा आणि बाबासाहेब यांचे प्रतिमांकन. बाबासाहेबांच्या जयंतीवेळी महानायक अमिताभ यांचे बाबासाहेबांना हात जोडून अभिवादन. एकीकडे झोपडपट्टीतील मुले ढोलताशांच्या तालावर नाचताना दिसतात तेव्हा अमिताभ बच्चन यांची एंट्री होते. हे बघत असताना कोणत्याही प्रेक्षकाच्या मनात ही भावना येतेच येते की आता अमिताभ बच्चन सुद्धा ताल धरून नाचेल. पण नागराज मंजुळे या प्रसंगात अमिताभ बच्चन यांना नाचवित नाहीत, तर बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नम्रपणे अभिवादीत करतात, (येथे ट्रॅडिशनल पटकथाकार-दिग्दर्शक असता तर त्याला, एकूण हिंदी सिनेमाच्या शिरस्त्याप्रमाणे, अमिताभ बच्चन यांना नाचविण्याचा मोह आवरता आला नसता) याची इथे प्रामुख्याने नोंद घ्यावीशी वाटते.

‘सैराट’ प्रमाणे ‘झुंड’मध्येही संगीत व गाणे चित्रपटाचे वैशिष्ट्य राहीलेले आहे. अजय-अतुल या जोडगोळीने आपल्या कसदार संगीत जादूने चित्रपटाला झळाळी आणलेली आहे. अमिताभ भट्टाचार्य, अजय-अतुल गोगावले यांनी वेगळ्या खुबीने गीतांची रचना केलेली आहे. या गीतांमधून झोपडपट्टीच्या जीवनजाणिवा नेमकेपणाने गडद होतात.

“हम को दुनियाने रोज देखा है फिर भी अनदेखा झुंड है । हम ना जिंदा थे हम ना मरते है लोग कहते है झुंड है । क्या फायदा अपुन की जिंदा लाश पे रोने का । खतम हुआ जो भी कमाया अब क्या खोने का । अपुन की बस्ती गटर मे है पर तुम्हारे दिल मे गंध है । गटर की नाली से पब्लिक के गाली से रस्ते पे आया ये झुंड है ।”

किंवा

“बडा बडा घाव वाव वडा वडापाव जानके खा गये खा गये । लेना देना क्या है तडक धडक बंगलो से अपना तो सडक आशियाना है । और फुटपाथ नरम नरम तकीया है । खुला आसमान शामियाना है । हमे दुनिया जहा ने बडा रगडा बडा रगडा रे । किया इस दिल पे वार तगडा । गाली फटकार खाके अपनी ये हड्डीया बनी लोखंड और लकडा । हे लफडा झाला वाकडा तिकडा।”

ही गाणी ऐकताना सत्तरच्या दशकातील दलित पँथर कवींच्या विद्रोही कवितांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सौरभ अभ्यंकर व अमरावतीचे नवोदित रॅपर विपीन तातड यांनीही या चित्रपटाच्या संगीत व रॅपमध्ये सहभाग नोंदविलेला आहे.

चित्रपटाची लांबी मध्यांतरानंतर अकारण वाढली अशी चर्चा माध्यमात दिसून येत आहे. परंतु मध्यांतरानंतर झोपडपट्टीमधील जीवनदर्शन, त्यांचा रहिवाशी दाखला मिळण्यासाठीच्या साध्यासाध्या गोष्टींसाठीचा संघर्ष, जगण्याच्या वेदना, यशामधील प्रस्थापितांचे अडथळे, विद्रोह, संघर्ष हे सगळे टाळता येणारे नव्हते. वास्तवदर्शी चित्रपटामध्ये तर ते अत्यावश्यक आहे, आणि दलित-वंचित जीवनावरील चित्रपटात असे गाळून दर्शविणे न्यायसंगत होणार नाही, असे संवेदनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना वाटले असावे म्हणून पटकथा त्या पद्धतीची तयार केली. आणि त्यामुळे चित्रपटाची लांबी तीन तासपर्यंत लांबली. तसे पाहू जाता, रंजनप्रधान भारतीय चित्रपटाची सवय जडलेल्या प्रेक्षकांना, दलित-वंचितांचे दुखणे ऐकत बसण्याचा कंटाळा येणे स्वाभाविकचं!

‘फुटबॉल’ सारख्या खेळाच्या रुपकामधून झोपडपट्टीतील दलित-वंचित समूहाच्या वेदनेचा, विद्रोहाचा व त्यांच्यातील मेरीटचा स्वर ‘झुंड’ या चित्रपटामधून मुखरीत करणार्‍या नागराज मंजुळे आणि त्यांची चमू यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. बॉलीवूडचे महानायक म्हणून गणल्या जाणार्‍या अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात मोलाची कामगिरी दिसून आलेली आहे. संपूर्ण चित्रपटात महानायकी अ‍ॅटिट्यूट तसूभरही दिसून येत नाही, हा त्यांचा विशेष म्हणावा लागेल. एका संस्कारित ध्येयवेड्या क्रिडा शिक्षकाची भूमिका त्यांनी अत्यंत जिव्हाळाने, पोटतिडीकीने पार पाडलेली आहे. त्यात तसूभरही कसूर दिसून येत नाही. झोपटपट्टीतील दलित-वंचित समूहांसोबत शुटींगदरम्यान त्यांनी घालविलेले दिवस, त्यांच्या चित्रपट करीयरमध्ये पहिल्यांदा बैलगाडीतून प्रवास करण्याचा प्रसंग, खेळकरी मुलांमुलींसोबत बसून चिवडा खाण्याचा प्रसंग हे सगळे अनुभव या चित्रपटानिमित्ताने भारतीय प्रेक्षकांना दृश्यमान झाले, आणि अमिताभ यांच्याही जीवनातील हे सगळे अनुभव एक वेगळा थरार निर्माण करणारेच ठरले असावे. भारतीय प्रेक्षकांनी आजपर्यंत अनुभवलेला अत्यंत वेगळा ‘अँग्री यंग मॅन’ ‘झुंड’ मध्ये एका बालकाचे मन असणारा निर्व्याज प्रेम करणारा ‘करुणामय माणूस’ म्हणून दृष्यमान झालेला आढळून येतो, हे विशेष.

एकूणात नागराज मंजुळे या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाचा ‘झुंड’ हा चित्रपट मैलाचा दगड ठरणारा चित्रपट असून, सामान्यतः सर्व भारतीयांनी आणि विशेषेकरून परिवर्तनासाठी संघर्षरत असलेल्या सामाजिक/ राजकीय/ सांस्कृतिक चळवळीतील सर्वांनी सहकुटुंब पाहावा इतका उत्तम उतरलेला आहे. दलित-वंचित जगण्याचे-सोसण्याचे अनेकांगी अलक्षित विषय चित्रपट माध्यमातून दृष्यमान होऊन सिनेमा माध्यमासारख्या प्रभावी साधनाला प्रबोधनासाठी उपयोगात आणणे किती गरजेचे आहे, याचा अनुभव ‘झुंड’ पाहून आल्याशिवाय राहत नाही. भारतीय सिनेमाच्या शतकोत्तरी पर्यावरणात नागराज मंजुळे यांनी आपल्या प्रज्ञाप्रतिभेने दलित-वंचितांसाठीची ही मळवाट आपल्या संघर्षरत अथक प्रयत्नाने तयार केलेली आहे, असे समजण्यास हरकत नाही. भविष्यात या मळवाटेवरून विविधांगी विषयावरील प्रयोगशील पटकथा दृश्यमान होत राहतील, असा आशावाद ‘झुंड’ हा चित्रपट बळकट करतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0