जितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा?

जितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा?

जितीन प्रसाद यांच्या भाजपप्रवेशाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना एक समाधान वाटत असले तरी काँग्रेसमध्ये त्या विषयी दुःखाचीही भावना नाही. त्याचे कारण जितीन प्रसाद गेले काही महिने काँग्रेसमध्ये अस्वस्थच होते आणि ते आज ना उद्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करणार होते.

४० टक्क्याहून मुस्लिम टक्केवारीचे ५ मतदारसंघ ‘आप’कडे
सीआरपीएफचा गोळीबार हे हत्याकांडः ममतांचा आरोप
राज्यसभा निवडणुका : गुजरात काँग्रेस आमदारांची चौकशी शक्य

उ. प्रदेशमधील काँग्रेसचे एक नेते व माजी मंत्री जितीन प्रसाद हे भाजपमध्ये आल्याने त्याचा पक्षाला मोठा फायदा आपल्याला होईल, या भाजपच्या नेत्यांच्या दाव्यात फारसा दम नाही. जितीन प्रसाद यांच्या भाजपप्रवेशाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना एक समाधान वाटत असले तरी काँग्रेसमध्ये त्या विषयी दुःखाचीही भावना नाही. त्याचे कारण जितीन प्रसाद गेले काही महिने काँग्रेसमध्ये अस्वस्थच होते आणि ते आज ना उद्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करणार होते. त्यामुळे तिसर्या पिढीतल्या एखाद्या नेत्याला अन्य पक्षात जाण्याचे मनापासून वाटत असेल आणि तसे त्याचे प्रयत्न सुरू असतील तर काँग्रेसचा तो नाईलाज होता. त्यात जितीन प्रसाद काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वर्तुळात असले तरी काँग्रेसमध्ये करण्यासारखे त्यांचे राजकारण पक्षाला मान्य नव्हते. त्यामुळे भाजप हाच चांगला पर्याय जितीन यांच्यासाठी शिल्लक होता.

हे पाहता जितीन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याने उ. प्रदेश काँग्रेसला जबर धक्का बसला, पक्षाला हादरे बसले वगैरे म्हणणे अतिरंजित वाटते. जो पक्ष संपूर्ण देशात स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या उ. प्रदेशमध्ये या पक्षाची परिस्थिती कित्येक वर्षे असमाधानकारक अशीच आहे, तिथे या पक्षाला जितीन यांच्या जाण्याने धक्का बसेल वगैरे चर्चा व्यर्थ स्वरुपाच्या आहेत.

पण भाजपला जितीन यांचे पक्षात येणे साजरे करावेसे वाटत आहे. जितीन यांचे राजकीय व्यक्तिमत्व फारच खुलवून, त्यांची प्रतिमा अव्वाच्या सव्वा वाढवून सांगण्यात भाजपला अधिक स्वारस्य वाटत आहे. वास्तविक जितीन यांना राजकारणात मिळालेले महत्त्व हे ते केवळ राहुल गांधी यांच्या गोटात असल्या कारणामुळे मिळालेले आहे. दुसरे महत्त्व म्हणजे त्यांच्या घराण्यात काँग्रेसचा वारसा असल्याने. अनेक दशके काँग्रेसमध्ये असल्याने तयार झालेली राजकीय प्रतिष्ठा त्यांना आपसूकच मिळाली. जितीन हे तसे चर्चेतले नेतेही नव्हते. काँग्रेसचा कायमस्वरुपी अध्यक्ष असावा यासाठी जे पत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते, त्या पत्रावर जितीन यांची स्वाक्षरी असल्याने ते एकदम चर्चेत आले होते.

असे असताना यूपीएच्या दोन्ही कारकिर्दीत जितीन मंत्रीपदावर असल्याने, ज्या कारकिर्दीत त्यांनी भरीव असे काही केले आहे, असेही असताना एक माजी मंत्री, नेता आपल्या पक्षात आला यावर भाजप आनंदात आहे. भाजपचे नेते या पुढे जाऊन जितीन ब्राह्मण असल्याचा डंका पिटत आहेत. कारण उ. प्रदेशात मुख्यमंत्री पदाची सूत्रे ठाकूर समाजाच्या आदित्यनाथ यांच्या हाती गेल्याने व राज्यात बहुतांश मंत्रीपद व पक्षातील पदे ब्राह्मणांना डावलून ठाकूर समाजाकडे असल्याने जी अस्वस्थता उच्च जातीत पसरली आहे, ती अस्वस्थता कमी होण्याच्या दृष्टीने जितीन यांचे ब्राह्मण असणे कामी येईल, असे भाजपला वाटते.

पण भाजप, जितीन प्रसाद यांचे गेल्या काही वर्षांतले लोकसभा व विधानसभेतील पराभवाकडे दुर्लक्ष करत आहे. जितीन यांच्या ब्राह्मण कार्डचा त्यांना खुद्द फायदा झालेला नाही. त्यांचे ब्राह्मण असण्याचे प्राबल्य त्यांच्या शहाजहाँपूर मतदारसंघातही अत्यंत मर्यादित भागात आहे.

एवढ्या मर्यादा असतानाही भाजप जितीन प्रसाद यांच्या आपल्या पक्षातील प्रवेशाचे स्तोम का माजवत आहे का एक महत्त्वाचा प्रश्न पडू शकतो. त्याचे एक कारण हे असू शकते की मीडियात दाखवले जात असलेले पंतप्रधान मोदी व उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यातील शीतयुद्ध या विषयाने कदाचित मागे पडले जाईल. आणि जितीन यांच्या प्रवेशाने आपला पक्षामध्ये सर्व आलबेल आहे असे सांगण्याची संधी भाजपला सोडायची नाही. मोदी-आदित्यनाथ यांच्यातील संघर्ष हा मीडियाचा खेळ आहे, असेही भाजपचे नेते म्हणत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जितीन यांचा राजकीय प्रवेश भाजप नेते साजरा करताना दिसत आहेत.

गंमतीचा भाग असा की जितीन प्रसाद आजपर्यंत मीडियाचा विषय नव्हते, आता ते झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आदित्य नाथ यांनी जितीन यांच्या पक्षप्रवेशाने उ. प्रदेशातील भाजपची शक्ती वाढेल असे ट्विट केले आहे.

आता ब्राह्मण समाजाला भूलवण्यासाठी जितीन यांना कॅबिनेटमध्ये किंवा पक्षात महत्त्वाचे पद दिल्यास आश्चर्य वाटायला नको. पण या मेलोड्रामाने उ. प्रदेशातील राजकारणावर किती परिणाम होईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: