‘एनआयए’ने दहशतवादी कटाशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या १३ जणांमध्ये मनन गुलजार दार आणि त्याचा भाऊ हनान यांचा समावेश आहे.
श्रीनगर : ‘द गार्डियन’ सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये काम करणाऱ्या एका तरुण फ्रीलान्स पत्रकाराला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काश्मीरच्या दहशतवादी कट प्रकरणात अटक केली आहे.
मोहम्मद मनन म्हणून पत्रकारितेमध्ये ओळखला जाणाऱ्या मनन गुलजार दार, २४, याला १० ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या बटामालू परिसरातील पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.
गार्डियनच्या ‘आठवड्यातील वीस छायाचित्रे’ विभागात, या वर्षी जुलैत श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीनंतरची डारचा एक फोटो प्रसिद्ध झाला होतं.
त्याचे वडील, गुलजार अहमद दार यांनी ‘द वायर’ला सांगितले की, ‘एनआयए’ने नवी दिल्लीला नेण्यापूर्वी सुमारे पंधरा दिवस अगोदर त्यांनी त्यांच्या मुलाला श्रीनगरमध्ये पोलिसांच्या ताब्यात चौकशीसाठी सोपवले होते.
“आम्हाला वर्तमानपत्रांद्वारे कळले की त्याला अटक करण्यात आली आहे. पंधरवड्याहून अधिक काळ लोटला आहे पण तो जिवंत आहे की मेला हे आम्हाला माहीत नाही. पोलिसांनी आम्हाला सांगितले की त्याला एनआयएने अटक केली आहे आणि त्याला नवी दिल्लीला नेण्यात आले आहे,”
गुलजार अहमद म्हणाले. ते एक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत.
‘एनआयए’ने या महिन्याच्या सुरुवातीला मनानचा भाऊ हनान गुलजार दार या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक केली होती. पोलिस सूत्रांनी सांगितले, की हनानवर यापूर्वी टेरर फंडिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मनानची आई फहमीदा अख्तर म्हणाली, “आम्हाला वाटले की ही नेहमीची चौकशी आहे. कारण आजकाल काश्मीरमध्ये पोलिसांकडून अनेक पत्रकारांना उचलले जात आहे.”
या महिन्याच्या सुरुवातीला काश्मीरमधील संशयित अतिरेक्यांनी अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य आणि स्थलांतरित कामगारांना लक्ष्य केल्यावर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांखाली एजन्सीने अटक केलेल्या १३ संशयितांमध्ये हे दोघे भाऊ आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘द वायर’ला सांगितले, “तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी, दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी, शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानमध्ये रचलेल्या कटाचा, मनन हा भाग होता.
“तो अतिरेक्यांचा सर्वोच्च कमांडर अब्बास शेखचा ‘ओव्हरग्राउंड’ कार्यकर्ता होता. तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आली होती,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले.
अटक केलेल्यांमध्ये सोबिया अझीझ उर्फ मरियम-अल-काश्मिरी आणि २०१७ मध्ये काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटच्या पहिल्या हल्ल्यादरम्यान कारवाईत ठार झालेल्या श्रीनगर-स्थित मुगेस अहमद मीर याच्या बहिणीचा समावेश आहे. ‘अमाक’ या इस्लामिक स्टेटच्या अधिकृत न्यूजलेटरद्वारे इस्लामिक स्टेटने हल्ल्याचा दावा केला होता.
अतिरेकी कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इतर संशयीत लोकांमध्ये आदिल अहमद वॉर, हिलाल अहमद दार, रौफ भट्ट, साकीब बशीर, जमीन आदिल आणि हरिस निसार लांगू, कामरान अश्रफ रेशी, रयद बशीर आणि सुहेल अहमद ठोकर यांचा समावेश आहे.
बहुतांश संशयित श्रीनगरमधील असून, दोन कुपवाड्यातील आणि एक दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील आहे.
षडयंत्र
‘एनआयए’ने १० ऑक्टोबर (R0-20/2021/NIA/DLI) आयपीसी कलम 120 (B), 121 (A), 122 आणि 123 (गुन्हेगारी कट, गुन्हा करण्याचा कट, शस्त्रे गोळा करणे) अंतर्गत दहशतवादी कट रचण्याचा खटला दाखल केला. तसेच बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA ) कलम 18, 18A, I8B, 20, 38 आणि 39 (ज्यामध्ये कट रचण्यासाठी शिक्षा आणि दहशतवादी संघटनेच्या सदस्यत्वाशी संबंधित विविध शिक्षा) नवी दिल्लीमधील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दकाहल केला.
३६ तासांच्या कालावधीत झालेल्या हल्ल्यांमध्ये एक शीख महिला मुख्याध्यापकांसह पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे आणि अल्पसंख्याक समुदायातील इतर तीन सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर ‘एनआयए’ने एफआयआर दाखल केला. ठार झालेल्यांमध्ये काश्मिरी पंडित केमिस्ट माखन लाल बिंद्रू यांचा समावेश आहे.
एजन्सीने श्रीनगरमधील एका न्यायालयात आठ जणांच्या पाच दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. त्यापैकी मनन आणि सोबिया यांच्यासह पाच जण श्रीनगरचे आहेत. इतरांपैकी दोन उत्तर काश्मीरच्या कुपवाड्यातील आणि एक दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील आहे. उर्वरित आरोपींनाही रिमांडवर घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘द वायर’ने कोर्टात दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पहिली असून, त्यामध्ये एनआयएने “विश्वसनीय माहिती” मिळाल्याचा दावा केला आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजब-उल-मुजाहिदीन, अल बद्र, द रेझिस्टन्स फ्रंट अशी अशा संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसक दहशतवादी कारवाया करण्यासाठी कट रचत असल्याचे म्हंटले आहे.
एजन्सीने न्यायालयाला सांगितले की, ‘पाकिस्तानस्थित हँडलर्स’ आणि त्यांचे ‘ओव्हरग्राउंड लोक’ आत्मसमर्पण केलेले अतिरेकी, सहानुभूती देणारे, वित्तपुरवठा करणारे, समर्थक आणि इतर यांच्या सहकार्याने, कट्टरपंथीकरण आणि विविध दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक काश्मिरी तरुणांची भरती करण्यात संशयित गुंतलेले होते.”
एजन्सीने न्यायालयात सांगितले की, संशयित “नवी दिल्लीसह” जम्मू आणि काश्मीर आणि इतर ठिकाणी “दहशतवादी कारवाया करणार होते. संशयितांच्या निवासस्थानांच्या झडतीदरम्यान, एजन्सीने “इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गुन्ह्य़ाची कागदपत्रे इ. जप्त केल्याचा दावा केला. ” तसेच हे लोक विविध तुरुंगात बंद असलेल्या सक्रिय दहशतवाद्यांच्या संपर्कात होते, असं दावाही एजन्सीने केलं.
“ते जम्मू आणि काश्मीरमधील मुस्लिम समुदायातील तरुणांना कट्टरपंथी बनवत होते आणि त्यांना देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रेरित करत होते,” असे एजन्सीने श्रीनगर न्यायालयाला सांगितले.
फ्रेम-अपची भीती
अमेरिकेत नुकताच बंद करण्यात आलेल्या ‘कश्मीरफाइट नावाच्या ब्लॉगने काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्ये करण्याची पोस्ट केली होती. त्यानुसार पाकिस्तानमध्ये कट करण्यात आल्याचा एनआयएने दावा केला आहे.
फोटोग्राफीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि वाणिज्य पदवीधर असलेल्या मननच्या कुटुंबाला एनआयएच्या आरोपांमुळे धक्का बसला आहे. त्याच्या आईने सांगितले, “आम्हाला त्याचा गुन्हा माहीत नाही. १५ दिवस आम्हाला एका पोलिस स्टेशनमधून दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास भाग पाडले गेले पण आम्हाला त्याला भेटू दिले गेले नाही.”
त्याचे वडील गुलजार पुढे म्हणाले, “आम्ही त्याला कपड्यांचा एक जोडही देऊ शकलो नाही.”
काश्मीरमधील अनेक स्वतंत्र पत्रकारांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर मनानची अटक करण्यात आली आहे. त्यापैकी तिघांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर डझनभरांवर त्यांच्या व्यावसायिक कामासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये, ही चौकशी अनेक तास चालली आहे.
पोलिसांनी काश्मीर फाईट ब्लॉगपोस्ट प्रकरणी अलीकडेच शौकत मोटा, शाह अब्बास, मीर हिलाल आणि अझहर कादरी या चार पत्रकारांना ताब्यात घेतले. त्यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप यांसारखी गॅझेट जप्त करण्यात आली असली, तरी अद्याप त्यांच्यावर कोणताही औपचारिक आरोप लावण्यात आलेला नाही.
COMMENTS