जेएनयू : एक महान विद्यापीठ बरबाद झाले त्याची गोष्ट

जेएनयू : एक महान विद्यापीठ बरबाद झाले त्याची गोष्ट

मी नेहमीच माझ्या विद्यापीठाच्या बाबतीत अती-उत्साही होतो. पण आज कँपसवरची भीतीची मानसिकता आणि विरोधी आवाज गप्प करण्याचे धोरण यामुळे माझा आत्मविश्वास संपला आहे.

‘अम्मा वोदी’ – चेहरामोहरा बदलणारी शिक्षण व्यवस्था
इंग्रजीतून शिक्षण हा केवळ उच्चभ्रूंचा अधिकार असू नये
गणित शिकवणे सोपे आणि इंटरेस्टिंग करूया म्हणता?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिक्षक संघटनेद्वारे आयोजित केलेल्या एका शांततामय निषेध मोर्चामध्ये भाग घेतल्याबद्दल ज्या ४८ शिक्षकांना आरोपपत्र दिले गेले, त्यांच्यामध्ये माझेही नाव आहे. पण हा लेख नोकरशाहीने आणि कायद्याने ‘नियम आणि नियमनांचे’ अर्थ कसे लावावे, आणि ‘शिस्त आणि शिक्षा’ यांची व्यवस्था कशी असावी याबद्दल नाही.

तो माझ्या अतिशय वैयक्तिक अशा अनुभवाबद्दल, काहीतरी गमावल्याच्या तीव्र वेदनेबद्दल आणि त्यामागच्या ‘वस्तुगत’ कारणांबद्दल आहे.

परवाच माझ्या एका मित्राने मला त्याच्या मुलीने पदव्युत्तर अभ्यासासाठी जेएनयूबाबत विचार करावा का असे विचारले तेव्हा मी अगदी स्पष्टपणे ‘नको’ असे सांगितले. माझ्या आयुष्यात असे पहिल्यांदाच घडले आहे. याआधी मी माझ्या विद्यापीठाबद्दल खूपच उत्साही असे; मी नेहमी लोकांना सांगत असे : जेएनयू एक स्वप्न आहे, एक प्रकल्प, एक अद्भुत प्रयोग – उत्तम दर्जा आणि समता यांचा मिलाफ असणारे सरकारी विद्यापीठ,समीक्षात्मक विचार, मुक्तीवादी कल्पना आणि पर्यायी जीवनशैली यांच्या वाढीसाठी सहाय्यक ठरणारा सर्जनशील अवकाश.

भीतीने सर्जनशील शिक्षण नष्ट केले आहे

मात्र, आज मी माझा आत्मविश्वास गमावला आहे. जिथे भीतीची मानसिकता किंवा धमक्या देणाऱ्या पत्रकांचा वर्षाव जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात घुसतो आहे अशा विद्यापीठात आपल्या मुलीला पाठव असे मी माझ्या मित्राला कसे सांगू?

शैक्षणिक मंडळांच्या एकांगी बैठकांमध्ये विरोधी सूर असणाऱ्या वरिष्ठ प्राध्यापकांचा अपमान केला जातो आणि इतर सर्वजण शांत बसतात हे तुम्ही पाहता तेव्हा आपोआपच तुम्हाला एक संदेश मिळतो:‘सक्षम प्राधिकाऱ्यांना’ प्रश्न विचारू नका. अनेक वरिष्ठ आणि अनुभवी प्राध्यापकांना डावलून एका तरुण प्राध्यापकाला समाजशास्त्र विभागाचे डीन म्हणून नियुक्त केले जाते तेव्हा तुम्हाला समजते, संस्थात्मक प्रघात किंवा शैक्षणिक क्षेत्रातील संकेत या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत; ‘सक्षम प्राधिकाऱ्यां’चा ‘निर्णय घेण्याचा अधिकार’ हाच सर्वात महत्त्वाचा!

किंवा त्या बाबतीत, जेव्हा कलात्मकदृष्ट्या समृद्ध आणि राजकीयदृष्ट्या अर्थपूर्ण पोस्टर भिंतीवरून काढून टाकली जातात, तेव्हा विद्यार्थ्यांना तुम्ही विद्यापीठात ज्या उद्देशासाठी आहात त्याच्या मर्यादा ओळखून वागा असे सांगितले जाते. ‘सुरक्षित’ राहण्यासाठी उपस्थिती नोंदणीच्या रजिस्टरमध्ये आपले नाव नोंदवले पाहिजे का (जरी अजून ते सक्तीचे नसले तरी) अशी कुजबूज शिक्षकांमध्ये सुरू होते (बायोमेट्रिक येत आहे अशी भीतीही त्यांना वाटते), तेव्हा शिक्षक समुदायाचा कणाच पद्धतशीरपणे मोडला जात असल्याचे तुमच्या लक्षात येते.

किंवा मग, ज्या शांततामय निषेध मोर्चात १५० हून अधिक शिक्षकांनी भाग घेतला त्यामधल्या ४८ शिक्षकांनाच लक्ष्य केले जाते तेव्हा त्यांची रणनीती स्पष्ट असते: फोडा, तुकडे करा आणि नाउमेद करा.

भीती सर्जनशील शिक्षणाच्या विरोधात असते. या प्रकारच्या विषारी वातावरणात, प्रत्येक गोष्ट ढोंगी, रिक्त आणि वरवरची असते – मग ते गांधींच्या कायदेभंग चळवळीबद्दलचे भाषण असो, मायकेल फोकॉल्टच्या Discipline and Punish बद्दलचा सत्र निबंध असो, किंवा ‘Marginality and Resistance’ वरचे चर्चासत्र असो (त्याचे उद्घाटन ‘सक्षम प्राधिकाऱ्यांनी’ का केलेले असेना!)

मला माहीत आहे, मी काही प्रमाणात निराशावादी होत आहे. मी माझ्या संशोधन विद्यार्थ्यांना सांगतो: तुमचे प्रबंध शक्य तितक्या लवकर सबमिट करा; ही आता तुमच्या स्वप्नातली जागा राहिलेली नाही. मला जाणवते, कितीतरी महान व्यक्तींनी आपली संपूर्ण जीवनऊर्जा हे विद्यापीठ निर्माण करण्यामध्ये घालवली आहे. कित्येक वर्षांच्या कामानंतर ते उभे राहिले आहे. पण व्यंग्य असे, की केवळ तीन वर्षात ते उद्ध्वस्त होऊ शकते. आपल्या काळात निर्मात्यांपेक्षा विध्वंसक जास्त ताकदवान झाले आहेत असा याचा अर्थ आहे का?

नोकरशाही आणि रहस्यमय किल्ला

मी आणखी एक असाच अनुभव सांगतो. इथे काहीही सहज मिळत नाही. एक विद्यार्थिनी चार वर्षे काम करून पीएचडीचा प्रबंध लिहिते, आणि त्यानंतर कुठेतरी एक क्लार्क किंवा सेक्शन ऑफिसरकडून एक तांत्रिक चूक होते – उदाहरणार्थ, प्रबंधाच्या शीर्षकामध्ये स्पेलिंगमधली छोटीशी चूक. तिला खूप धावपळ करावी लागते, अनेकांना भेटावे लागते, अपमानास्पद बोलणे ऐकून घ्यावे लागते.

तिला मदत करण्याच्या उद्देशाने मी शैक्षणिक मूल्यमापन विभागातल्या त्या कर्मचाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न केला. पण ते सोपे नव्हते. सुरक्षा रक्षकाने माझी चौकशी केली. हो. २९ वर्षे मी इथे शिकवत आहे, माझे अनेक विद्यार्थी देशभरात आणि जगातही वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवत आहेत, आणि आता अचानक मला समजते की हे आता माझे विद्यापीठ राहिलेले नाही. हे आता रजिस्ट्रार आणि रेक्टर, सेक्शन ऑफिसर आणि सुरक्षारक्षकांचे विद्यापीठ आहे. आणि अर्थातच हे ‘कार्यक्षम प्राधिकाऱ्यांचे’ विद्यापीठ आहे.

विद्यापीठात नवीन मुलांनी –MCQ पिढीने – प्रवेश घेतला आहे. मला माहित आहे, माझे केंद्र त्यांच्यासाठी एक ओरिएंटेशन प्रोग्रॅम आयोजित करेल. पूर्वी मी या नवीन मुलांचे स्वागत करत असे, आमच्या सामायिक आठवणींबद्दल त्यांना सांगत असे: एक जुने वडाचे झाड ज्याने रोमिला थापर आणि बिपन चंद्रा यांच्यासारखे लोक विद्यार्थ्यांच्या गटाबरोबर वाचनालयात जाताना पाहिले आहे; प्रा. नामवर सिंह आणि प्रा. सुदिप्ता कविराज यांच्याशी गप्पा मारणारे, त्यांना नवीन पुस्तके दाखवणारे शॉपिंग कॉम्प्लेक्समधल्या पुस्तकाच्या दुकानाचे मालक; आणीबाणीच्या विरोधातले ऐतिहासिक आंदोलन; १९८४ च्या दंगलींच्या वेळी जवळपासच्या वस्त्यांमधल्या शिखांना संरक्षण देणारे आणि भोपाळ गॅस दुर्घटनेच्या पीडितांसाठी निःस्वार्थपणे काम करणारे विद्यार्थी; आणि होस्टेल मेसमधल्या रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या मीटिंग, ज्यामध्ये मेधा पाटकरसारख्या लोकांनी सामाजिक चळवळींबाबत भाषणे केली आहेत.

पण आता मी काय करायचे?मी त्यांच्यामध्ये भीती उत्पन्न करावी का, आणि त्यांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असलेली पोस्टर तयार करण्यासाठी रात्री जागवू नका, अभ्यासक्रमाच्या बाहेरचा काहीही विचार करू नका, लिंचिंग, हिंसा, दारिद्र्य आणि भूक यांच्याकडे दुर्लक्ष करा, शिस्तबद्ध सैनिकांसारखे केवळ ‘पदवीदान’ समारंभांनाच उपस्थित रहा  असे सांगायचे? चांगली पुस्तके वाचू नका, त्याऐवजी वेळोवेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या परिपत्रकांचे अर्थ आणि परिणाम समजून घेण्यासाठी वकील नियुक्त करा असे सांगू का मी त्यांना?

एका महान विद्यापीठाच्या उद्ध्वस्त होण्याच्या कहाणीने माझे मन विदीर्ण होते.

उपसंहार

तरीही, दोस्तोयेवस्कीच्या पुस्तकातल्या पात्रांसारखे काही क्षण असे असतात, जेव्हा मी पुन्हा स्वप्न पाहतो. त्या स्वप्नाची एक कथा:

मी ‘सक्षम प्राधिकाऱ्यांना’ एक पत्र लिहिले आहे.

प्रिय प्रोफेसर,

कृपया आपल्या किल्ल्यातून बाहेर या; कृपया आपल्या एकाकीपणावर मात करा; माझ्याबरोबर या, एकत्र चाला, पावसाळ्यातले ढग आणि मोरांचे नृत्य पहा, आणि संवाद करा – एक प्राध्यापक दुसऱ्या प्राध्यापकांबरोबर करेल तसा संवाद, एक संवेदनशील मनुष्य करेल तसा संवाद, आणि परिपत्रके, शोकॉज नोटिसा, न्यायालयातील खटले, आरोपपत्रे, शिक्षांचे प्रकार (काढून टाकणे, निलंबित करणे, सेवा खंडित करणे) यांच्या पलिकडचे जग पहा. आपण एकत्रितपणे जगाचा पुन्हा शोध घेऊ या – जिथे टागोरांनी भीतीपासून स्वतंत्र होण्याबद्दल लिहिले, मार्टिन ब्यूबर आणि पावलो फ्रेअर हे ऐक्य आणि संवादाबद्दल बोलले, आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या उद्घाटनाच्या दिवशी मोहनदास करमचंद गांधींनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एक समावेशक/सहानुभूतीशील/समतावादी समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली, ते जग.

मार्क्सच्या दाढीचा उबदारपणा, टॉलस्टॉयच्या पावलांमधला शहाणपणा, बुद्धाच्या डोळ्यातली करुणा अनुभवा. सत्याग्रहाचा अर्थ समजून घ्या, विरोधातल्या कवितेचा अनुभव घ्या. आणि होमी तुमच्यासाठी एक भेटही घेऊन आलो आहे, आणि तुमचे कायदेशीर सल्लागार किंवा हाताखालचे लोक यांच्या मनात विचारही येणार नाही अशी भेट!

हे एक फुलपाखरू आहे. विल्यम वर्ड्सवर्थप्रमाणे, ते तुमच्याही बालपणाचा इतिहास सांगते का पहा. स्वातंत्र्य हा तुमचा अधिकार आहे. नोकरशाहीच्या श्वास गुदमरून टाकणाऱ्या लोखंडी पिंजऱ्यातला एकाकी ‘सम्राट’ बनण्यातून तुम्हाला काय मिळते?

अविजित पाठक, हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: