जो बायडन, ही तर सुरुवात आहे

जो बायडन, ही तर सुरुवात आहे

जो बायडन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहे पण जॉर्जिया राज्यात एकूण दोन सिनेटपदाच्या निवडणुका येत्या जानेवारीमध्ये आहेत. त्या जिंकायला पाहिजेत. त्या जिंकल्या तर सिनेट रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात जाणार नाही. सिनेट हे महत्त्वाचे गृह आहे.

बायडेन यांच्या भेटीची शक्यता इराणने फेटाळली
बायडेन विजयाच्या नजीक; सिक्रेट सर्व्हिसचे संरक्षण
बायडन यांच्याकडे सूत्रे देण्यास ट्रम्प तयार

जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी डॉनल्ड ट्रम्प सारख्या राष्ट्राध्यक्षपदाला खालच्या पातळीवर नेणाऱ्या, एखाद्या राजासारख्या लहरी, आत्मकेंद्रित, वास्तवापासून दूर असलेल्या घातक प्रेसिडेन्टला हरवून ऐतिहासिक कार्य केले आहे. जो बायडन, आज विजय साजरा करा कारण उद्यापासून कामाला लागायचे आहे एवढे भविष्य काठावर आले आहे.

सर्व प्रथम, जरी बायडन जिंकले असले तरी या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाची म्हणावी तशी प्रगती झाली नाहीये. प्रतिनिधी गृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) संख्या कमी झाली आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जरी प्रतिनिधी गृहात काठावर बहुमत असले तरी, सिनेटमध्ये डेमोक्रॅट्स बहुमतात नाहीत. डेमॉक्रॅट ४६ – स्वतंत्र २ – रिपब्लिक ४८ अशी स्थिती आहे.

जॉर्जिया राज्यात एकूण दोन सिनेटपदाच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत. त्या जिंकायला पाहिजेत. त्या जिंकल्या तर सिनेट रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात जाणार नाही. सिनेट हे महत्त्वाचे गृह आहे.

कायदे हे काँग्रेसमधील दोन्ही गृहात पारित व्हावे लागतात. अध्यक्ष शेवटी सही करतो किंवा नकाराधिकार वापरतो. सध्या प्रतिनिधी गृहात काकणभर बहुमत असले तरी सिनेटमध्ये अल्पमत असल्याने कायदे बनवताना रिपब्लिक पक्षाशी तडजोडी कराव्या लागतील. अध्यक्षांनी निवडलेल्या सेक्रेटरीजना (मंत्र्यांना) सेनेटची मंजुरी लागते. इथेही तडजोडी कराव्या लागणार. त्यामुळे जॉर्जियामधील दोन सिनेट पदाच्या निवडणुकांना महत्त्व आले आहे. सिनेटमध्ये अल्पमत असेल तर बायडनचे हात बांधले राहतील. सध्याच्या सिनेटमधील रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी मिच मकालन यांनी बायडनविरोधी शिंग फुंकले आहे. त्यामुळे बायडन यांच्या मनातील कल्पनांना आणि निवडणुकीतील आश्वासनांना मर्यादा राहील. २०२०-२२च्या मध्यवर्ती निवडणुकांची वाट पाहावी लागेल.

अमेरिकेत हे पक्ष भारतातील पक्षांपेक्षा वेगळे आहेत. इथे कुणीही स्वतःला डेमोक्रॅट किंवा रिपब्लिक म्हणून घेऊ शकतो. निवडणुकी आधी प्रायमरीज मध्ये इतर उमेदवार लोकांत निवडणूक लढवून पार्टीचे तिकीट मिळवू शकतात. पक्षात हायकमांड हा प्रकार नाही. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षात डाव्यांपासून सेंटरपर्यंत आणि उजवेपण असतात. एखादा उमेदवार प्रायमरीज आणि मुख्य निवडणूक लढवून आल्यास त्याला पक्षातून हाकलणे फार अवघड असते. बायडन हे सेंट्रिस्ट आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातील कॉर्पोरेट डेमोक्रॅटबरोबर नवीन आकांशा घेऊन आलेले आणि वाढत चाललेले समाजवादी डेमोक्रॅट या सर्वांना सांभाळावे लागणार आहे. तुलनेने रिपब्लिक पक्ष एक संघ आहे.

आता पूर्वीपेक्षा डेमोक्रॅटिक पक्ष बळकट राहिलेला नाही. त्यांच्याकडे सत्ता आली असली तरी त्यांना पक्ष बळकट करण्याकडे भर द्यावा लागणार आहे.

डॉ. प्रमोद चाफळकर, हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कन्सल्टन्सी करतात. ते अमेरिकेत मिशिगन राज्यात राहतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: