अमेरिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्याबरोबर नागरी हक्कांच्या चळवळीत सहा बिनीचे शिलेदार ( Big Six Activists) होते. त्या सहांपैकी महत्त्वाचे शिलेदार, किंबहुना क्रमांक दोनचे शिलेदार, म्हणजे जॉन लुईस. त्यांचे निधन गेल्या महिन्यात १२ जुलै रोजी झाले. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा..
कोणतीही चळवळ ही एक खांबी तंबू नसते. जरी एखादीच व्यक्ती प्रसिद्ध असली तरी तिच्याबरोबर अनेक बिनीचे शिलेदार असतात. त्याला अमेरिकेतील काळ्यांच्या नागरी हक्कांसाठी (Civil Rights Movent) झालेली अहिंसक चळवळ अपवाद नव्हती. डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्याबरोबर नागरी हक्कांच्या चळवळीत सहा बिनीचे शिलेदार ( Big Six Activists) होते. त्या सहांपैकी महत्त्वाचे शिलेदार, किंबहुना क्रमांक दोनचे शिलेदार, म्हणजे जॉन लुईस. यांचे निधन या वर्षी गेल्या महिन्यात १२ जुलै रोजी झाले. तेव्हा ते लोकप्रतिनिधी गृहातील अटलांटाचे (जॉर्जिया राज्य) १९८६ पासूनचे लोकप्रतिनिधी होते. त्याची दखल सर्व थरात मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली. त्यांचे पार्थिव कॅपिटॉलमध्ये (संसदेच्या इमारतीत) दर्शनाला ठेवण्यात आले होते. हा सन्मान फक्त शासनातील वरिष्ठ पदांना असतो. लुईस तर साधे लोकगृहाचे (House of Representative) प्रतिनिधी होते. राजकीय नेत्यांनी त्यांच्या कार्याच्या स्तुत्या (eulogies) केल्या त्यात लोकप्रतिनिधी गृहाच्या अध्यक्षा, नॅन्सी पलोसी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे उद्गार लक्षणीय होते. पलोसी म्हणाल्या, “जॉन लुईस ही व्यक्ती आमच्या संसदेची सद्सद्बुद्धी होती”. राजकारण्यांच्या बजबजपुरीत सद्सद्बुद्धी असणे म्हणजे व्यक्ती महान असणे. ओबामा म्हणाले, “a founding father of that fuller, fairer, better America”. भविष्यातील न्यायी अमेरिकेच्या स्थापनेचा पितामह म्हणजे भविष्यातील महत्त्वाचे स्थान. भारतातच काय पण अमेरिकेत सुद्धा सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसलेली पण ही उत्तुंग व्यक्ती कोण आहे? जॉन लुईस यांचे महत्त्व, इतर गोष्टींबरोबर अमेरिकेच्या इतिहासातील नागरी हक्कांच्या लक्षणीय चळवळीतील योगदानामुळे आहे. यासाठी अमेरिकन इतिहासातील नागरीहक्कांच्या चळवळीचे स्थान, चवळीची पार्श्वभूमी आणि चळवळीतील महत्त्वाच्या घटना जाणून घेणे इष्ट ठरेल.
अमेरिकेत उत्तरेकडची राज्ये (युनियन) आणि दक्षिणीकडील राज्ये (कॉन्फडरेट) यांच्यांत जे यादवी युद्ध झाले त्यात काळ्यांच्या गुलामीचा प्रश्न हा इतर गोष्टींबरोर महत्त्वाचा होता. युनियन जिंकले आणि अब्राहम लिंकन यांनी गुलामी नष्ट झाली असे जाहीर केले. गुलामी जरी अधिकृतरित्या संपली तरी जिम क्रो राज्यांनी (पूर्वीच्या गुलामी असणाऱ्या दक्षिणी राज्यांनी) काळ्यांना टार्गेट करणाऱ्या नवीन कायद्यांनी (ब्लॅक कोड) काळ्यांची दडपशाही चालू ठेवली. या कायद्यांनी काळ्यांना कागदोपत्री असणाऱ्या मतदानाचे अधिकार जवळ पास अशक्य केले. गुन्हेगारीची शिक्षा गोऱ्यांपेक्षा जास्त वर्षांची ठेवून पूर्वीच्या मालकांनी त्यांच्याकडून जवळपास फुकट कामे करून घ्यायला सुरुवात केली. थोडक्यात गुलामगिरी वेगळ्या प्रकारे चालू ठेवली. राहायला वेगळ्या वस्त्या, वेगळ्या शाळा, सार्वजनिक ठिकाणी (बसेस, टॉयलेट्स, रेस्टॉरंट्स, दुकाने इत्यादी) काळ्यांसाठी वेगळ्या जागा असे जाचक, अपमानास्पद कायदे होते. याला विभक्तीकरण (segregation) म्हणायचे. जास्त करून खालच्या दर्जाच्या, कमी पैशाच्या नोकऱ्या होत्या. अशा परिस्थितीत काळ्यांचे जीवन खडतर, अपमानास्पद झाले होते. स्वातंत्र्याच्या आणि संविधानातील मानवी हक्कांच्या (की ज्या त्या काळातील क्रांतिकारी होत्या) संकल्पनांना हरताळ फासून दुय्यम नागरिकांची वागणूक मिळत होती.
इथे नमूद केले पाहिजे की हे अमेरिकेत सर्वत्र नव्हते. फक्त दक्षिणेकडील राज्यात उदा. व्हर्जिनिया, नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरोलिना, जॉर्जिया, टेनेसी, अलाबामा, मिसिसिपी आणि न्यू ओर्लिन्स राज्यात होते. अमेरिकेत राज्ये खूप स्वायत्त असतात. केंद्रीय शासनाचे (federal government) ऑपशन्स कमी असतात. केंद्र शासनाने होईल तेव्हढी नागरी हक्कांच्या चळवळीला मदत केली. वर चर्चा केलेल्या अन्यायांविरोधी प्रतिकार करणाऱ्या चळवळी होऊ लागल्या. परंतु मोठी ठिणगी रोझा पार्क यांच्या बंडखोरीने पडली. मॉन्टगॅमरी (अलाबामा राज्य) मध्ये त्यांनी बसमध्ये गोऱ्या माणसाला सीट देण्यासाठी उठायला नकार दिला. त्यांना अटक झाली. काळ्यांनी बहिष्कार घातला. तिथून नागरी हक्कांच्या चळवळीची सुरुवात झाली. यामध्ये मुख्यतः काँग्रेस ऑफ रेशिअल इक्वालिटी (CORE), स्टुडंट नॉन-व्हायोलन्स कोऑर्डिनटिंग कमिटी – (SNCC) आणि डॉ. मार्टिन लुथर किंग यांच्या अधिपत्याखाली असलेली सदर्न ख्रिश्चन लीडरशिप कॉन्फरन्स (SCLC) या संघटनांचा सहभाग होता.
जॉन लुईस हे अलाबामा राज्यातील कुळाने जमीन कसणाऱ्या गरीब कुटुंबात जन्मले. त्यांना लहानपणी सहन करायला लागलेल्या वंशद्वेषाची आठवण ते कधीच विसरू शकले नाही. तरीसुद्धा त्यांचा गोरे आणि काळे अमेरिकन एकत्रपणे समृद्ध होतील या “प्रेममय लोकसमूहाची जागा” या संकल्पनेवर गाढ विश्वास होता.
१९६०मध्ये विभक्त असणाऱ्या रेस्टॉरंट्समधील फक्त गोऱ्यांच्या जागी काळे विद्यार्थी १ फेब्रु १९६० जाऊन बसू लागले. त्यांना सर्व्हिस नाकारण्यात आली. पण ते बसून राहिले. पोलिसांनी अटक करून नेले की त्या जागी दुसरे विद्यार्थी जाऊन बसायचे. गोऱ्या लोकांनी किंवा पोलिसांनी मारहाण केली तरी ते उलटी हिंसा करायचे नाही. याला सीट-इन (Sit-in) चळवळ म्हणतात. ही चळवळ पूर्णतः अहिंसक होती. ही चळवळ सर्वत्र वेगाने पसरली.
जॉन लुईस यांची नागरी हक्कांच्या चळवळीत भाग घ्यायला सुरुवात झाली ती टेनेसी राज्यातील नॅशव्हिल इथे. तिथे त्यांनी ऐतिहासिकरित्या काळ्यांसाठी असलेल्या फिस्क विद्यापीठात शिक्षण घेतले. इथे त्यांनी कित्येक सीट-इन चळवळींमध्ये भाग घेतला. नागरी हक्कांच्या चळवळींच्या विजयाची सुरुवात ही सीट-इन चळवळींमधून झाली. यात लुईस यांचा मोठा सहभाग होता.
स्टुडंट नॉन-व्हायोलन्स कोऑर्डिनटिंग कमिटी (SNCC) चा १९६०च्या दशकात नागरी हक्कांच्या चळवळीत मोठा हिस्सा होता. सीट-इनच्या यशाच्या पायावर १६ एप्रिल १९६० रोजी SNCC उभी राहिली. जॉन लुईस हे SNCC चे संस्थापक सदस्य होते. तसेच ते काही काळ कमिटीचे चेअरमन होते. सुरुवातीस हिच्यात काळे आणि गोरे अशा दोन्ही वंशाचे विद्यार्थी होते आणि तशीच ती अहिंसक चळवळ होती. तिने स्वातंत्र्याचे प्रवासी (Freedom Riders) आणि वॉशिंग्टन वरचा मोर्चा (March on Washington) मध्ये भाग घेतला. त्याचबरोबर दक्षिणी राज्यात काळ्यांच्या मतदानाच्या हक्कांसाठी (Voting Rights) आणि मत नोंदणीचे (Voters Registration) काम केले. स्वातंत्र्याचे प्रवासीमध्ये SNCC चा मोठा सहभाग होता.
मागे बघितल्या प्रमाणे सार्वजनिक स्थळे विभक्त (segregated) होती. हे विभक्तीकरण उत्तरेच्या राज्यात नव्हते. विभक्तीकरणावर आधी केंद्रीय (federal) सर्वोच न्यायालयाने निर्णय दिला होता की दोन राज्यातील प्रवासात बस, बस स्टॉप, तेथील टॉयलेट्स आणि इतर सुविधा ह्या विभक्त नाहीत. या निकालाची वास्तवातील परीक्षा घेण्यासाठी आणि वांशिक सलोख्यासाठी काँग्रेस ऑफ रेशिअल इक्वालिटी (CORE) या संघटनेने गोऱ्या आणि काळ्या अशा दोन्ही वर्णिय कार्यकर्त्यांना घेऊन एकत्र बसून बसने प्रवास केला. याला स्वातंत्र्याचे प्रवासी (Freedom Riders) चळवळ म्हणतात. हा प्रवास ४ मार्च १९६१ रोजी वॉशिंग्टन डी. सी.पासून ते अगदी दक्षिणेतील राज्यांच्या शेवटपणे केला. पहिल्या ग्रुपमधील सात काळे आणि सहा गोरे होते. यात जॉन लुईस होते. दक्षिणेतील वंशवादी लोकांनी प्रवाशांना मारहाण केली, एकदा तर बस जाळली. राज्य पोलिसांनी दुर्लक्ष केले.
जॉन लुईस यांना गोऱ्यांकडून मारहाण झाली. त्यांना प्रदर्शनांमध्ये भाग घेतल्याने अटक झाली. विद्यापीठातून काढून टाकण्याची शक्यता होती. त्यांच्या पुढे काही काळ पेच निर्माण झाला. पण त्यांनी चळवळीच्या बाजूने निर्णय घेतला. ते म्हणाले, “हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय आहे. स्वातंत्र्याच्या प्रवासासाठी गरज असेल तर माझे आयुष्य सोडून देईन. त्यामुळे दक्षिणी राज्यात न्याय आणि स्वातंत्र्य येऊ शकेल.”
मे १९६२ मध्ये डॉ. मार्टिन लुथर किंग यांच्या अधिपत्याखाली असलेली सदर्न ख्रिश्चन लीडरशिप कॉन्फरन्स (SCLC) ने त्यांना त्यांच्या बोर्डावर नेमले. १९६३ मध्ये ते SNCCचे चेअरमन झाले. जरी SCLC आणि SNCC यांची आघाडी होती तरी त्यांच्या विचारसरणीत फरक होता. SNCC प्रति निष्ठा आणि डॉ. किंग यांच्याशी असलेल्या संबंध त्यामुळे जॉन लुईस हे नेहमी द्विधा स्थितीत असायचे.
नागरी हक्कांच्या चळवळीत मिळालेली वर्तणूक, कामावर होणाऱ्या अन्याय, हक्क, स्वातंत्र्य अश्या गोष्टींसाठी डॉ. मार्टिन लुथर किंग यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच लाख निदर्शक राजधानी, वॉशिंग्टन डी. सी.ला २८ ऑगस्ट १९६३ रोजी जमले. याला वॉशिंग्टन वरचा मोर्चा (March on Washington) म्हणतात. इथेच डॉ. किंग यांनी त्यांचे “I have a dream” हे सुप्रसिद्ध भाषण दिले होते.
SNCC चे चेअरमन म्हणून लुईस वॉशिंग्टनवरच्या मोर्चात सहभागी झाले. डॉ. किंग आणि इतर काही जणांबरोबर ते की-नोट स्पीकर होते. त्यांच्या भाषणाचा मूळचा मसुदा फारच जहाल होता. म्हणून संयोजकांनी त्यात बदल करायची सूचना केली. बदलल्यानंतर सुद्धा त्यांचे भाषण सर्वात जास्त वादग्रस्त आणि लढाऊ झाले.
अलाबामा राज्यातील सेल्मा येथे ७ मार्च, १९६५ रोजी एडमंड पेटीस ब्रिजवर मोर्चा काढण्यात आला. दक्षिण राज्यातील मतदानाच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी होता. लुईस हे या मोर्च्याच्या नेत्यांपैकी एक होते. या अहिंसक मोर्चावर राज्य पोलिसांनी जबरी मारहाण केली. या मारहाणीत लुईस यांचे डोके फुटले. ते कित्येक दिवस गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये होते. मोर्चातील कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या रक्तामुळे तो दिवस रक्तरंजित रविवार किंवा ब्लडी संडे म्हणून कुप्रसिद्ध झाला. त्याची स्मृती म्हणून लुईस यांच्या पार्थिवाला याच पुलावरून नेण्यात आले.
SNCCही जहाल बनत चालली होती. संघटनेचा अहिंसेवरील विश्वास उडाल्यावर लुईस यांना पुढल्याच वर्षी संघटनातील चेअरमन पद गेले. या नंतर सुद्धा लुईस यांनी नागरी हक्कांचे काम चालू ठेवले. मतदानाच्या शिक्षणासाठी आणि मतनोंदणी सारखी विधायक विधायक कामे केली. ते म्हणाले, “स्वातंत्र्यच्या मार्गावर काळ्यांचे सर्वात जबरदस्त हत्यार म्हणजे मतदान.” इतर काही विधायक कार्यानंतर लुईस शेवटी राजकारणात आले.
ते अटलांटा शहराच्या कौन्सिल मध्ये १९८२ ते १९८६ या काळात होते. मग मात्र ते राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात गेले. ते लोकप्रतिनिधी गृहातील (House of Representative) अटलांटाचे (जॉर्जिया राज्य) १९८६ पासून ते निधन होईपर्यंत लोकप्रतिनिधी होते. जरी ते रस्त्यावरील चळवळीतून राजकारणात आले तरी त्यांनी त्यांची मूल्ये, नैतिकता जपली.
लुईस हे नैसर्गिकपणे डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये होते. परंतु त्यांच्या मूल्यांसाठी त्यांनी काहीवेळा पार्टीची अधिकृत लाईन सोडून विरोधी मतदान केले. १९९१चे आखाती युद्ध, २००३चे इराक युद्ध यांना त्यांनी विरोध केला. ते नेहमीच अमेरिकेच्या नव-साम्राज्याविरोधासाठी, वंशवाद आणि भेदभावाविरोधी लढले. अमेरिकेच्या नव-साम्राज्याविरोधी असल्याने कदाचित त्यांचे नाव मुख्य प्रवाहातील मीडियामध्ये कमी यायचे. त्यामुळे ते काळ्यांव्यतिरिक्त इतर जनतेत फारसे माहीत नव्हते. त्यांनी १९९६ साली त्यांनी लग्नासंदर्भात LGTB लोकांना सपोर्ट केले. प्रतिनिधी गृहात त्यांच्या बाजूने आवाज उठवला. तेव्हा फार थोड्या प्रतिनिधींनी सपोर्ट केले होते. “वंश आणि वर्ण यावरून केल्या जाणाऱ्या भेदभावाविरुद्ध मी कष्टदायक असा प्रदीर्घ लढा दिला आहे.” प्रतिनिधी गृहात ते बोलत होते. “लैंगिक वर्तणुकीवरून होणाऱ्या भेदभावाविरुद्ध मी उभारणार नाही हे होणे नाही.” National Museum of African American History and Culture च्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्यावर आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्यावर महात्मा गांधींच्या अहिंसक सत्याग्रहाचा प्रभाव असल्याने ते भारतात येऊन गेले. मागील वर्षी त्यांनी महात्मा गांधी आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्या वारशाचे प्रदर्शन वाढवण्यासाठी बिल मांडले.
त्यांना कित्येक पारितोषिके आणि ऑनररी पदव्या मिळाल्या. त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे २०११मध्ये अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, Presidential Medal of Honor मिळाले.
अमेरिकेत दोन्ही डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पार्टीत निवडणुकीतील पार्टीचा उमेदवार ठरवण्यासाठी अंतर्गत प्रायमरी निवडणुका होतात की ज्यात पार्टी समर्थक आपल्या पसंतीच्या उमेदवार निवडतात. २०१६च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रायमरी मध्ये लुईस यांनी बर्नी सँडर्सच्या विरुद्ध हिलरी क्लिंटनला सपोर्ट दिला. त्यांनी म्हटले, “नागरी हक्कांच्या चळवळीत मला बर्नी कधी दिसलाच नाही.” त्याच दमात लुईस म्हणाले की, “मात्र मी हिलरीला आणि बिलला यांना चळवळीत भेटलो आहे.” राजकारणात धोरण म्हणून खोटे बोलावे लागते. पण लुईस सारख्या नैतिकता असणाऱ्या व्यक्तीकडून हे अनपेक्षित होते. बर्नीने नागरी हक्कांच्या चळवळीत भाग घेतला याचे लिखित पुरावे आहेत तर हिलरीचे नाहीत. हे लक्षात आणून दिल्यावर त्यांनी सारवासारव केली. हिलरी क्लिंटन यांना काळ्यांची मते पडली. नुकत्याच झालेल्या २०२० च्या प्रायमरीत लुईस यांनी जो बायडेन यांना सपोर्ट केला. खरं तर तरुण पिढीचा ज्वलंत प्रश्न आहेत ते शिक्षण आणि शिक्षणासाठी घेतलेले कर्ज; सर्व जनतेचा ज्वलंत प्रश्न आहे परवडणारी आरोग्यसेवा. अमेरिकेतील संदर्भात या दोन प्रश्नांवर लिहायला इथे जागा नाही. या सर्व जनतेत काळे, गोरे, लॅटिनो, आशियायी असे सर्व प्रकारचे लोक येतात. सर्वांना असणारे ज्वलंत प्रश्न सोडून अस्मितेच्या राजकारणाने जॉन लुईस हे पुरोगामी, तरुण, समानतेची स्वप्ने बघणाऱ्या जनतेच्या तोंडात कडवटपणा ठेवून वारले.
तरीसुद्धा त्यांचे योगदान कमी होत नाही. ते आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्याचा सतत लढा देण्याचे मिशन देऊन अनंतात विलीन झालेले आहेत. त्यांना विनम्र श्रद्धांजली
डॉ. प्रमोद चाफळकर, हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कन्सल्टन्सी करतात. ते अमेरिकेत मिशिगन राज्यात राहतात.
COMMENTS