जूडस अँड ब्लॅक मेसिया

जूडस अँड ब्लॅक मेसिया

एकाच वर्षी एकाच विषयावर दोन चित्रपट. दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन या चित्रपटात एक आरोपी आहे बॉबी सील्स. बॉबी सील्सची कोर्टातली उपस्थिती थरारक घटनांनी भ

‘007 जेम्स बाँड’: शॉन कॉनरी यांचे निधन
नोमॅडलँड
‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्तम मराठी चित्रपट

एकाच वर्षी एकाच विषयावर दोन चित्रपट.

दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन या चित्रपटात एक आरोपी आहे बॉबी सील्स. बॉबी सील्सची कोर्टातली उपस्थिती थरारक घटनांनी भरलेली आहे. बॉबी सील्सच्या मागच्या खुर्चीवर बसून एक फ्रेड हँप्टन नावाचा तरूण सतत बॉबी सील्सला सल्ला देत असतो. कोर्ट या हँप्टनला झापतं. खटला  सुरू असतानाच हँप्टनचा खून होतो.

‘जूडस अँड ब्लॅक मेसिया’ हा चित्रपट फ्रेड हँप्टनच्या खुनावर आहे.

हँप्टन, ब्लॅक पँथर या संघटनेच्या शिकागो शाखेचा चेयरमन आहे. शिकागो सेवन खटला कोर्टात चालू असतानाच हँप्टन विविध संघटनांना एकत्र आणून क्रांतीकारक लढा रचत असतो. ब्लॅक पँथर आणि हँप्टन समाजवादी विचारांचे आहेत. भांडवलशाही, काळे व एकूणच जगातले गरीब,  यांचं शोषण करते, म्हणून क्रांती करून भांडवलशाही (उदा. अमेरिकेतलं सरकार) नष्ट करणं हे या मंडळींचं उद्दीष्ट आहे. चे गेवारा, फायडेल कॅस्ट्रो हे यांचे आदर्श आहेत. कधी ना कधी तरी क्रांती सशस्त्र होणार असल्यानं ही माणसं बंदुका इत्यादी बाळगतात, वापरतात. अमेरिकन डुकरं (म्हणजे अमेरिकन पोलिस, सरकारी अधिकारी) वेळप्रसंगी मारायचे असा यांचा कार्यक्रम असतो. लोकामधे पाठिंबा मिळावा, संघटनेला व्यापक जनाधार मिळावा यासाठी हँप्टन गरीब मुलांना  शिक्षणाची सोय करणं, त्यांना आहार देणं इत्यादी गोष्टी करत असतो.

तर अशा या हँप्टनला, पोलिस, आईसक्रीम चोरलं अशा आरोपावरून तुरुंगात घालतात. वीस डॉलरची खोटी नोट दिली या आरोपावरुन नुकतंच अमेरिकन पोलिसानी जॉर्ज फ्लॉईडला ठार मारलं त्याची आठवण होते. तुरुंगवास  संपवून  हँप्टन बाहेर येतो तेव्हां पुन्हा अपील करून त्याला तुरुंगात घालायची सरकारची तयारी चाललेली असते. त्या काळाले सीआयएचे संचालक हुवर सांगतात की माणसाला तुरुंगात घातलं की तो हीरो होतो. तेव्हां तुरुंगात घालता उपयोगाचं नाही, मारून टाकणं हा कायम स्वरूपी उपाय असतो.

हँप्टनला मादक द्रव्य चारून नंतर त्याच्यावर गोळीबार करून त्याला मारलं जातं.बिल ओनिल या एका कारचोराला एफबीआय ब्लॅक पँथरमधे घुसवतं आणि तो हँप्टनचा खून घडवून आणतो.अशी आहे कथा.

काळ्या पुढाऱ्याचा खून घडवून आणण्याची  गोष्ट म्हणजे एक थरारक गुन्हेपटाचा मसाला. पण   खून हे एक वास्तव आहे, ती एक गाजलेली घटना आहे,  त्यामुळं तो एका डॉक्युमेंटरीचा विषय होतो. शाका किंग या दिक्दर्शकानं या दोन्ही शैलीचं मिश्रण चित्रपटात साधलं आहे.

एका रात्रीच्या दृश्यात चालत जाणारे पाय आणि गुडघ्यापर्यंतचा कोट फक्त दिसतो. हळूहळू आपल्याला तो अख्खा माणूस दिसतो. नंतर तो माणूस एका गाडीशी चावीनं काही तरी झटापट करतो. नंतर तो कार ज्या बारच्या दारात उभी असते त्या बारमधे जातो. तिथं तो आपण एफबीआयचा एजंट आहे असं दाखवून धत्तिंग करतो.

पुढे याच माणसाला एका गजबजलेल्या बारमधे एक गोरा एफबीआय एजंट ब्लँक मेल करून सांगतो की तुला तुरुंगवास टाळायचा असेल तर तू ब्लॅक पँथर या संघटनेत हस्तक म्हणून घूस.

मग कोंदट वातावरणात ब्लॅक पँथरच्या बैठका. मग सीआयएच्या ऑफिसात कट रचला जातो. नंतर पँथरच्या घरात  पोलीस घुसतात, काळोखात गोळीबार. वगैरे.

थेट स्कॉरसेसेचा सिनेमा वाटावा अशी दृश्यं.

हॉलीवूड चित्रपटाची एक शैली असते, म्हटलं तर एक साचा असतो. पहिल्या दृश्यापासूनच चित्रपट एका ओळीत पुढंपुढं सरकत जातो. जुडासमधे पहिल्या चारेक मिनिटांतच चित्रपटातली मुख्य पात्रं कुठली असणार आहेत आणि पुढं काय होणार आहे त्याची कल्पना आपल्याला येते. संघटना, प्रमुख, हस्तक, त्याला हाताळणारा एक अधिकारी, त्याला हाताळणारा आणखी एक वरिष्ठ अधिकारी, संघटना प्रमुखाचा खातमा करणार. साडेतीनव्या मिनिटालाच पत्ता लागतो. पण तरीही पुढले दोन तास चित्रपट पेलून धरायचा असतो. एका सरळ ओळीत जाणारी कथा पुढं कशी उलगडते याची उत्सूकता आपल्याला लागून रहाते. ती उत्कंठा दिक्दर्शक पक्की धरून ठेवतो आणि चित्रपट अपेक्षीत शेवटाकडं जातो.

पण ही रचना करत असतानाच थरारपटाबरोबरच हा एक वास्तव पट आहे हे दिक्दर्शक आपल्याला सांगत रहातो. सर्व पात्रं खरीखुरी असतात. त्यांची नावं आपल्याला सांगितली जातात. त्या काळातले प्रेसिडेंट कोण होते आणि सीआयएचा प्रमुख कोण होता हेही नावानिशी सांगितलं जातं. मार्टीन लूथर किंग,सरकारनं चालवलेली दडपशाही याचं फूटेज काळ्या पांढऱ्या रंगात दाखवलं जातं.

आपण कल्पना रंजन करू लागतो तेव्हां दिग्दर्शक आपल्याला सतत वास्तवात बुचकळून काढत असतो.

काळोखी अंधुक वातावरणातली रहस्यपोषक दृश्यं चित्रपटात भरपूर. ती दृश्यं प्रभावी ठसावीत यासाठी क्लोज अप. भरपूर गोळीबार.

सेविंग दी प्रायव्हेट रॅनमधे युद्धपटाच्या शैलीत एका सैनिकाची कहाणी गुंफली गेलीय. इथे गुन्हेपटात एक राजकीय स्टेटमेंट आहे.

चित्रपटातला अगदी वेधक भाग म्हणजे त्या काळातलं वातावरण. त्या काळात लोकप्रीय असलेल्या पंक संगिताचा वापर चित्रपटात जागोजागी आहे. पंक, जाझ संगितात एक थरार असतो, त्याला एक वेग असतो. घटना वेगानं घडतात तेव्हां लय जलद असते, पात्र विचार करत असतं किंवा रोमान्स वगैरे करत असतं तेव्हां लय खूप संथ होते. हे संगीत कधी आपल्याला शांत करतं तर कधी कधी आपल्याला चिथावतं. या चित्रपटाला एक ऑस्कर नामांकन उत्तम ओरिजिनल गाण या प्रकारासाठी आहे.

चित्रपटाचं कलादिग्दर्शनही छान आहे. शिकागोतले बार, ऑफिसं, काळ्यांची घरं, रेस्त्राँ, ताणलेल्या रबरासारख्या लांबट गाड्या, त्या काळातल्या पर्यायी संस्कृतीची चिन्हं दाखवणारे कपडे आणि केशभुषा, शिकागोतल्या निरूंद आणि आडनिड्या गल्ल्या, संघटनांच्या बैठका. खूप तपशीलात या गोष्टी पहायला मिळतात.

चित्रपटातली दोन मुख्य पात्रं म्हणजे फ्रेड हँप्टन आणि  बिल ओनिल. डोंबाऱ्याच्या खेळात दोन बांबूवर ताणलेल्या दोरीवर कसरत चालते. ते दोन बांबू म्हणजे वरील दोन पात्रं. डॅनियल कालुया आणि लेकीथ स्टॅनफील्ड यांनी त्या भूमिका केल्यात. कालुयाची भाषण करण्याची, समोरच्याला पटवून देण्याची एक स्टाईल आहे. ठासून बोलणं. ही शैली काळ्यांच्या संस्कृतीत चर्चमुळं आलीय.  व्याख्यानातली शब्दफेक आणि गाणी म्हणण्याची एक शैली विशिष्ट सांप्रदायिक चर्चमधे (विशेषतः काळ्यांच्या चर्चमधे) विकसित झाली आहे. भाविकाला भारून टाकणं हे या शैलीचं वैशिष्ट्यं असतं. एकच वाक्य, एकच शब्द वारंवार, वारंवार ठासून उच्चारला जाणं,  ते वाक्य आणि ते शब्द समोरच्या समूहाकडून वारंवार वदवून घेणं. ही शैली कालुयानं वापरलीय.

त्या बरोब्बर उलट स्टॅनफिल्डची अभिनय शैली आहे. आयुष्यभर असहाय्य असलेला, मनाविरोधात जाऊन वागावं लागणारा काळा (किवा कोणताही वंचित माणूस) स्टॅनफिल्डनं उभा केलाय.

दोघांनाही सहाय्यक अभिनेत्याची नामांकनं मिळालीत.

चित्रपट पहाताना सतत डिपार्टेड या गाजलेल्या चित्रपटाची आठवण यावी असा एक घट्ट धागा चित्रपटाला आहे. एफबीआय ही तपास यंत्रणा विविध गुन्हेगार संघटनामधे आपले हस्तक पेरते. गंमत म्हणजे आपल्यासारखेच इतरही हस्तक पेरले गेलेले आहेत आणि आपल्यावरही लक्ष ठेवण्यासाठी हस्तक पेरले गेलेत हे हस्तकांना माहित नसतं. डिपार्टेडमधे गुन्हेगारी संघटनेनंही एफबीआयमधे हस्तक पेरलेला असतो. या हस्तकाला गुन्हेगार जगात रॅट अशी संज्ञा वापरली जाते. या उंदरांची धम्माल डिपार्टेडमधे पहायला मिळते.

शाका किंग या दिग्दर्शकाला चित्रपट उंदीरपटाकडं नेण्याचा मोह झालेला दिसत नाही. दोनच उंदीर आहेत आणि त्यांची उंदीरगिरी पटकथेनं  मर्यादित ठेवली आहे.

अमेरिकेतलं राजकीय सामाजिक वातावरण, काळ्यांची चळवळ व संघटना, अमेरिकन समाजातली विसंगती आणि तणाव हा चित्रपटाचा गाभा आहे. एक राजकीय स्टेटमेंट हा चित्रपट करतो. अमेरिकेतल्या वंशद्वेषाबद्दल हा चित्रपट बोलतो. गोरे वेळीच सावरले नाहीत तर गोष्टी कुठल्या थराला जाऊ शकतात ते चित्रपट दाखवतो.

चित्रपटात मार्टीन शिनची सीआयए संचालकाची छोटीशी भूमिका आहे. डिपार्टेडमधे त्यानं पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केलीय. पटकथेतच डिपार्टेडमधे मार्टीन शीनची भूमिका जितकी कोरीव होती तितकी या चित्रपटात नाही. नट मोठा पण त्याला बंडल भूमिका असा प्रकार झालाय.

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण पाच नामांकनं आहेत.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

जूडस अँड ब्लॅक मेसिया 
दिग्दर्शक – शाका किंग 
कलाकार – डॅनियल कालुया, लेकीथ स्टॅनफील्ड, जेस प्लेमॉन्स

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0