‘काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही’

‘काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही’

नवी दिल्लीः जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष व भाकपचे नेते कन्हैया कुमार व गुजरातमधील अपक्ष आमदार व दलित नेते जिन्गेश मेवाणी यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहीद भगत सिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधत या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या आधी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. मेवानी यांनी राहुल गांधी यांना भारतीय राज्य घटनेची प्रत तर कन्हैया यांनी म. गांधी, डॉ. आंबेडकर व भगत सिंह यांचा फोटो भेट दिला.

कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस सदस्यत्वाचा अर्ज भरला. पण जिग्नेश मेवानी यांनी काही तांत्रिक कारणामुळे आपण सदस्यत्वाचा अर्ज भरू शकत नाही असे स्पष्ट केले. पण २०२२ची गुजरात विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या विचारधाराशी जुळणारी आपली विचारधारा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमार यांनी काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही, असे विधान केले. या देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये आलो असून देशामध्ये वैचारिक संघर्ष केवळ काँग्रेसचे नेतृत्वच देऊ शकते असे सांगितले. देशातील सत्तेत असे लोक आले आहेत की ज्यांच्याकडून देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, मूल्ये, इतिहास व वर्तमान नष्ट केला जात आहे. काँग्रेस देशातील सर्वात जुना व लोकशाही पक्ष आहे आहे. हा पक्ष वाचला नाही तर देश वाचणार नाही. आज देशाला भगत सिंग यांचे साहस, आंबेडकरांची समता व गांधींची एकता गरजेची आहे असे ते म्हणाले.

जिग्नेश मेवानी यांनी देशापुढे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी देशातील सर्व तरुणांनी व राज्य घटनेवर विश्वास ठेवणार्यांनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादन केली. गुजरातमधून हा सगळा प्रवास सुरू झाला आहे व गेली ६-७ वर्षे त्याने देशात उत्पात माजवला आहे. देश एका अभूतपूर्व अशा संकटामध्ये अडकला आहे. आपल्या राज्य घटनेवर हल्ले केले जात आहेत. दिल्लीच्या रस्त्यांवर राज्य घटनेची होळी केली जात आहे. देशाच्या लोकशाहीवर हल्ला सुरू आहे. एक भाऊ दुसर्याचा शत्रू झाला आहे. देशात इतके विष ओतले गेले आहे. हे सर्व सुनियोजित कट असून दिल्ली व नागपूरकडून ते पसरवले जात असल्याचा आरोप मेवानी यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS