नवी दिल्लीः बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीवर काँग्रेसचे नेतृत्व चर्चा करण्याच्या तयारीत नाही, आता जनता काँग्रेसला पर्याय म्हणूनही पाहात नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केली.
काँग्रेसपुढे अनेक समस्या आहेत, त्या समस्यांची उत्तरेही पक्षापुढे आहेत पण ती उत्तरे प्रत्यक्षात आणण्याच्या मनःस्थितीत काँग्रेस नाही, असेही ते म्हणाले.
आत्मपरिक्षण करण्याची वेळही आता गेली आहे, असे म्हणत सिब्बल यांनी एका जेष्ठ नेत्याने काँग्रेसमध्ये आत्ममंथन व्हावी असा मुद्दा मांडला होता, त्याची आठवण करून दिली. पण आता ६ वर्षाहून अधिक काळ झाला आहे, आत्ममंथनाचीही वेळ गेली आहे. काँग्रेसकडे त्यांच्या समस्यांची उत्तर आहेत, पण ती प्रत्यक्षात आणत नसल्याने काँग्रेसचा आलेख वेगाने खाली येत राहील, गुजरातमध्ये पोटनिवडणुकात काँग्रेसने सर्व ७ जागा गमावल्या, त्यातील तिघांची अनामत रक्कम जप्त झाली. उ. प्रदेशात ७ जागांवर २ टक्क्यांपेक्षा कमी मते काँग्रेस उमेदवारांना मिळाली. म. प्रदेशात २८ जागांवरही काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली, हे सर्व पराभव साधी घटना आहे का? काँग्रेसचे नेतृत्व त्यावर काय म्हणतेय? असा सवाल सिब्बल यांनी केला.
काँग्रेसमध्ये निवडणुका संदर्भात सिब्बल म्हणाले, संपर्क क्रांतीमुळे देशातील निवडणुका या अध्यक्षीय निवडणुका सारख्या लढल्या जात आहेत. आपण आपल्यातील कमतरता समजून घेतल्या नाहीत तर निवडणूकांत त्याचे चित्र स्पष्ट दिसणार नाही. केवळ उमेदवार जाहीर करून निवडणुका लढवून बदल होणार नाहीत तर काँग्रेसची विचारधारा, तिची विश्वसनीयता, पक्षात असलेली संवादाची जागा बदलल्यास जनता आपल्याला स्वीकारू लागेल, असे सिब्बल म्हणाले.
सिब्बल यांच्या या मताचे अनुमोदन तामिळनाडूतील खासदार कार्ती चिदंबरम यांनी केले आहे. त्यांनी एक ट्विट करून काँग्रेसने आत्मविश्लेषण, चिंतन, विचार विनिमय केला पाहिजे असे म्हटले आहे.
मूळ बातमी
COMMENTS