काश्मीर अशांत,  जनतेची निदर्शने

काश्मीर अशांत, जनतेची निदर्शने

मागच्या काही दिवसांमध्ये श्रीनगरच्या श्री महाराजा हरी सिंग रुग्णालयामध्ये पेलेट गनमुळे जखमी झालेल्या वीसहून अधिक लोकांवर उपचार केले जात आहेत. सर्व काही “शांत” असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा खोटा असल्याचे त्यामुळे दिसून येत आहे.

सत्ताधाऱ्यांच्या दबावाला काँग्रेससह सर्वच बळी
काश्मीरमधील पंचायत पोटनिवडणुका अनिश्चित काळ स्थगित
जम्मू आणि काश्मीरचे विभाजन का केले

श्रीनगर : मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरसाठी विशेष घटनात्मक तरतुदी रद्द करण्याची, आणि त्याचा राज्याचा दर्जा समाप्त करण्याची घोषणा केल्यानंतरच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये किमान २१ तरुणांना पेलेटच्या इजांसाठी श्रीनगर येथील मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयाच्या प्रशासकांना याबाबत माहितीसाठी औपचारिक विनंती केली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला. मात्र गुरुवारी एसएमएचएस रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी सांगितले, की ६ ऑगस्ट रोजी १३ जणांना आणि ७ ऑगस्ट रोजी आणखी ८ जणांना त्यांच्या डोळ्यांना आणि शरीरातील इतर भागांना पेलेटमुळे झालेल्या जखमांकरिता रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांच्यापैकी अनेकांनी एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे; काही जणांनी दोन्ही डोळ्यांची दृष्टी कायमस्वरूपी गमावली असण्याची शक्यता आहे.

एका तरुण निदर्शकाचा मृत्यू झाल्याचीही बातमी असली, तरीही कोणत्याही रुग्णालयाने याची पुष्टी केली नाही.

द वायर ने रुग्णालयाच्या वॉर्ड ८ मधल्या काही पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. काहींनी शहराच्या मुख्य भागातल्या निदर्शनांच्या वेळी आपल्यावर गोळीबार झाल्याचे सांगितले, तर कोणतीही दगडफेक चालू नसताना सुरक्षा दलांनी आपल्यावर गोळीबार केल्याचे काही जणांचे म्हणणे होते.

प्रसारमाध्यमांच्या एका भागाने काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती “शांत” असल्याचा दावा केला आहे. मात्र पेलेट गन मुळे जखमी झालेल्या या तरुणांना, त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर, आणि मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द करण्याची घोषणा केल्यापासून येथील लोकांच्या आयुष्यावर अनिश्चिततेचे जे सावट दिसून येत आहे ते पाहता हा दावा निखालस खोटा असल्याचे दिसून येत आहे.

ही घोषणा केली जाण्याच्या आधीच काश्मीरमध्ये मोबाईल आणि लँडलाईन नेटवर्क, इंटरनेट सेवा इ. बंद करण्यात आले होते, वर्तमानपत्रांचे प्रकाशन थांबवण्यात आले होते आणि कोणतेही नियम घोषित न करता, किंवा असे काही अधिकृत नियम न ठरवताच एक सलग संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही लॉकडाऊनची परिस्थितीही अजूनही चालू आहे.

काही महत्त्वाच्या रस्त्यांवर, विशेषतः मोठ्या रुग्णालयांच्या आसपास वाहतुकीला परवानगी आहे – मात्र जागोजागी घातलेल्या काटेरी तारांच्या (concertina wire) अडथळ्यांमधून वाट काढतच या रस्त्यांवरून पुढे जावे लागत आहे.  काही विशिष्ट ठिकाणी येणे-जाणे खूपच कठीण आहे, विशेषतः स्वतःचे वाहन नसेल तर. आपापल्या वस्त्यांमध्ये लोक थोडेफार बाहेर पडत आहेत, संध्याकाळी एखादा किराणा दुकानदार, एखादा फळविक्रेता किंवा बेकरीवाला थोडा वेळ दुकान उघडून बसत आहेत. पण कशाकशाला परवानगी आहे आणि कशाला नाही हेही धड माहित नाही, त्यामुळे रोजच्या साध्यासाध्या गोष्टींचीसुद्धा कधीकधी मोठी किंमत चुकवावी लागत आहे.

श्रीनगरमधील नातीपोरा येथील १५ वर्षांचा नदीम ७ ऑगस्टला शिकवणीसाठी बाहेर गेला होता आणि पेलेट गनचा बळी झाला. त्याच्यावर उपचार होत आहेत, परंतु तो म्हणतो त्याला आता उजव्या डोळ्याने काहीही दिसत नाही.

गांदरबलमधील दोन तरुणांवरही डोळ्यांना झालेल्या जखमांकरिता उपचार होत आहेत. त्यांच्यापैकी दोन्ही डोळ्यांना जखमा झालेल्या असल्यामुळे काळा चष्मा घातलेला एक जण बेकरीतला कामगार आहे. त्याला संताप इतका अनावर झाला होता की त्याने या पत्रकाराबरोबर काहीही बोलण्यास आधी नकारच दिला. “मला दिल्लीतून आलेल्या कुणाशीही बोलायचे नाही, कशाला बोलायचे? आम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला खरंच ऐकायचे तरी आहे का?” तो म्हणाला.

त्याचा मित्रही जखमी होता, परंतु त्याच्या जखमा कमी गंभीर होत्या. त्याने काय झाले ते वर्णन करून सांगितले. “आम्ही आमच्या दुकानात रोट्या बनवत होतो, तेव्हा सुरक्षा दलाचे लोक आले आणि म्हणाले, “काश्मीरी लोकांना तुम्ही ब्रेड खाऊ घालताय? विष खायला द्या त्यांना.” त्यांनी आमच्या दुकानावर गोळीबार केला आणि निघून गेले असा दावा त्याने केला.

या प्रसंगाचा खरेखोटेपणा पडताळून पाहणे अशक्य आहे. पण त्यांना झालेल्या जखमा खऱ्या होत्या, त्यात शंकेला काही वावच नव्हता. तसाच त्यांच्या संतापाबद्दलही.

एक जखमी तरुण म्हणाला, आता जास्तीत जास्त लोकांनी हातात शस्त्र घेण्यावाचून पर्याय नाही. एका तरुण मुलाचे वडील म्हणाले, सरकारी धोरण योग्य असल्याचे लोकांना पटवून द्यायचे असेल तर त्यासाठी लोकांना पेलेट गनने जखमी करणे हा मार्ग नव्हे.

टेलिफोनवरच्या बंदीवरही त्यांनी तीव्र टीका केली, “त्यांनी कलम ३७० बद्दल काय केले आहे त्याबाबत मी आत्ता काहीच बोलू इच्छित नाही. पण अमित शाहनी बाकी जे काही केले आहे, वडिलांना मुलापासून वेगळे केले आहे, नवऱ्याला बायकोपासून, बहिणीला भावापासून. आमची बहीण कुठे आहे, आमची आई कशी आहे याची आम्हाला माहितीही मिळत नाही..त्यांना इंटरनेट बंद करायचे तर करू द्या, पण निदान आमचे फोन तरी चालू ठेवा. या असल्या गोष्टी झिओनिस्ट (इस्राइली लोक) करतात. मला खात्री आहे, अमित शाह खरे हिंदू नाहीत, एक हिंदू असं कधीच करणार नाही. ते झिओनिस्ट असल्यासारखं वागत आहेत.”

मूळ लेख

(छायाचित्र – नातीपोरा येथील १५ वर्षांच्या नदीमवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्याबरोबर त्याची आई. छायाचित्र – सिद्धार्थ वरदराजन)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: