काश्मीरमध्ये वीज नाही, मेणबत्त्यांचाही तुटवडा

काश्मीरमध्ये वीज नाही, मेणबत्त्यांचाही तुटवडा

अधिकारी म्हणतात, या मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर विद्युत पुरवठा पुन्हा सामान्य होण्यास आणखी “काही वेळ” लागेल.

काश्मीर – माणसांना जोडुया : संजय नहार
३७० कलमाचे पडसाद द. आशियाच्या राजकारणावर
७ महिन्यानंतर काश्मीरमध्ये शाळा सुरू…

श्रीनगर: काश्मीर मधील विद्युत पुरवठा गेल्या पाच दिवसांपासून विस्कळित आहे. गुरुवारी झालेल्या बर्फवृष्टीनंतर खोऱ्यातील बराचसा भाग अंधारात बुडाला आहे. यामुळे उजेडासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक स्रोताच्या, मेणबत्त्यांच्या विक्रीत अचानक मोठी वाढ झाली आहे.

मागील काही दिवसांमध्ये, मेणबत्त्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे खोऱ्यातील अनेक बाजारांमध्ये त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

काश्मीर खोऱ्यामध्ये ७ नोव्हेंबर रोजी या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. त्यामुळे विद्युत वितरण व्यवस्था पूर्णपणे कोसळली. वीज गायब झाल्यानंतर लोकांनी जवळपासच्या बाजारांमध्ये मेणबत्त्या खरेदी करण्यासाठी धाव घेतली.

“मागील काही दिवसांमध्ये मेणबत्त्यांच्या विक्रीत खूपच वाढ झाली आहे,” शहरापासून दूर सनत नगर चौकातील एका दुकानाचे मालक रौहल्ला सांगतात. “माझ्या दुकानात येणारा जवळजवळ प्रत्येक ग्राहक दोन किंवा तीन मेणबत्त्यांची पाकिटे घेऊनच जातो.”

काश्मीरमध्ये विजेची समस्या नवीन नाही. हिवाळा सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये सुरू होतो आणि तीन महिने चालतो. मागील तीन वर्षात मात्र काश्मीरमध्ये नोव्हेंबरमध्येच बर्फवृष्टी होत आहे.

हिवाळ्याच्या सुरुवातीला संपूर्ण प्रदेशात जुनी आणि जीर्ण झालेली विद्युत वितरण व्यवस्था कोसळते आणि विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो.

काश्मीर खोऱ्याला नॉर्दर्न ग्रिडमधून विजेचा पुरवठा होता. ही ग्रिड काश्मीरला जोडणारी ट्रान्समिशन लाईन पिर पंजल पर्वतरांगांच्या खडतर प्रदेशातून जाते. याच प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी होते. हिवाळ्यामध्ये एकेका वेळी दिवसचे दिवस वीजपुरवठा खंडित असतो. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांसाठी प्रकाशाचा सहज उपलब्ध आणि सर्वात विश्वसनीय स्रोत असतो तो म्हणजे मेणबत्त्या.

बेमिना येथील पत्रकारितेचे शिक्षण घेणारी समरीन सांगते, मागच्या शुक्रवारी, बर्फवृष्टीनंतरच्या दिवशी कडाक्याच्या थंडीतही तिची आजी बाहेर, जवळच्या किराणा दुकानात चालत गेली आणि तिने मेणबत्त्या आणल्या.

“विजेवरच्या सर्व प्रकाश देणाऱ्या उपकरणांची बॅटरी संपलेली होती. त्यामुळे माझी आजी मेणबत्त्या आणण्यासाठी बाहेर पडली,” समरीन म्हणाली. “ती दोन मेणबत्त्यांची पाकिटे घेऊनच परतली. मला माझ्या लहानपणच्या दिवसांची आठवण आली.”

श्रीनगरमधील अनेक भागांमध्ये दुकानांमध्ये मेणबत्त्यांचा स्टॉक संपला आहे.

चानपोरामधील एक दुकानदार मुख्तार भट म्हणतात, “मेणबत्त्या हा प्रकाशासाठीचा पारंपरिक स्रोत आहे पण हिवाळ्यात लोक सर्वात जास्त त्यावरच विसंबून असतात.” बर्फवृष्टीच्या पहिल्याच दिवशी त्यांच्याकडचा मेणबत्त्यांचा साठा संपला. “मी नवीन मालाकरिता ऑर्डर दिली आहे पण तो अजून मला मिळालेला नाही.”

“लोक साधारणपणे हिवाळ्यासाठी मेणबत्त्यांचा साठा करून ठेवतात, परंतु यावेळी वीज गेल्यानंतर लोक घाबरले आहेत आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत,” भट म्हणाले.

मागच्या पाच दिवसात खोऱ्याचा बहुतांश भाग अंधारात आहे, आणि जम्मू काश्मीरच्या ऊर्जा विभागाकडून पुरवठा पुन्हा पूर्ववत केव्हा होईल याबाबत काहीही सांगितले गेलेले नाही.

“आमच्या घरातली वीज मागच्या गुरुवारी गेली,” मध्य काश्मीरच्या चरार-ए-शरीफ शहरातील रहिवासी झाकिर मकबूल म्हणाले. “तेव्हापासून ती पुन्हा पूर्ववत झालेलीच नाही.”

जम्मू काश्मीरच्या ऊर्जा विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, वीजपुरवठा पुन्हा पूर्णपणे सुरळित होण्यास “काही वेळ” लागेल.

“बर्फवृष्टीमुळे संपूर्ण वितरण नेटवर्कवर परिणाम झाला आहे. केवळ पुरवठा करणाऱ्या तारा नव्हेत तर संपूर्ण खोऱ्यात विजेच्या खांबांचेही नुकसान झाले आहे,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. “आम्ही एकेका भागाचा पुरवठा पूर्ववत करत आहोत.”

काही दशकांपूर्वी काश्मीरमध्ये मेणबत्त्या तयार करण्याचा व्यवसाय जोरात चालत असे. विशेषतः हिवाळ्यात विजेचा पुरवठा अपुरा असे तेव्हा!

विजेची उपलब्धता वाढली तसे हा व्यवसाय कमी कमी होत गेला. २०१५ पर्यंत ७०% हून अधिक उत्पादन केंद्रे बंद झाली होती, असे काश्मीरमधील एक वृत्तपत्र काश्मीर टाईम्सच्या एका बातमीत म्हटले होते.

एकेकाळी “एकेक युनिटचा वर्षाला लाखो रुपयांचा व्यवसाय होत असे,” विविध व्यापारी मंडळांचा संयोग असलेल्या फेडरेशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, काश्मीरचे एक सदस्य अल्ताफ कादरी म्हणाले. मात्र आता संपूर्ण खोऱ्यातला व्यवसाय काही लाख रुपये इतकाच असतो. “युनिटची संख्याही एकेरी आकड्यात आहे,” असेही कादरी म्हणाले. आज जुन्या शहरातील काश्मीरच्या सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या महाराजजी गंजमध्ये अगदी थोडे मेणबत्त्यांचे पुरवठादार आहेत. अलिकडे मात्र त्यांच्याकडे असाधारण मागणी दिसून येत आहे.

“मला या पुरवठादारांनी ताज्या मालासाठी आणखी तीन दिवस थांबायला सांगितले आहे,” बंड, लाल चौक येथील किरकोळ विक्रेते इश्तियाक याकूब म्हणाले.

येत्या काही दिवसात मेणबत्त्यांचा आणखी तुटवडा पडू शकतो, कारण १४ नोव्हेंबरपासून पुन्हा नव्याने बर्फवृष्टी होण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0