काश्मीर प्रश्नी मध्यस्थी : ट्रम्प यांचे विधान भारताने फेटाळले

काश्मीर प्रश्नी मध्यस्थी : ट्रम्प यांचे विधान भारताने फेटाळले

वॉशिंग्टन/ नवी दिल्ली : दोन आठवड्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरप्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी आपल्याला विनंती केली होती,

ट्रम्प आणि ‘चौघीजणी’
राजकीय करिष्मा : निर्मिती आणि परिणाम
बरं झालं, डॉनल्ड ट्रम्प हरले!

वॉशिंग्टन/ नवी दिल्ली : दोन आठवड्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरप्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी आपल्याला विनंती केली होती, असे सनसनाटी विधान सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. मंगळवारी दिवसभर सरकारने या विषयावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींनी संसदेत येऊन ट्रम्प यांच्याशी काय चर्चा झाली हे स्पष्ट करावे अशी भूमिका विरोधकांनी घेतली. पण परराष्ट्र मंत्र्यांनी भारताने अशी कोणतीही मागणी अमेरिकेला केली नव्हती असे स्पष्ट करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या तीन दिवसांच्या अमेरिकेच्या भेटीवर आले असून ट्रम्प आणि इम्रान खान यांनी सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे पण भारताकडून त्याबाबत योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याची खंत ट्रम्प यांच्यापुढे व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी आपल्याला काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करायला आवडेल असे मत व्यक्त केले. त्यावर इम्रान खान यांनी ‘अमेरिकेच्या मध्यस्थीस पाकिस्तानला हरकत नाही, पण तुमच्या मध्यस्थीमुळे या दोन देशातील कोट्यवधी जनता तुम्हाला दुवा देतील’, असे विधान केले.

भारताने ट्रम्प यांचे विधान फेटाळले

मंगळवारी या विधानाचे पडसाद देशाच्या राजकारणात उमटू लागताच परराष्ट्र खात्याने ट्रम्प यांचे काश्मीर प्रश्नातील मध्यस्थीचे विधान फेटाळत भारताने काश्मीर प्रश्नातल्या मध्यस्थीबाबत कोणतीही अशी विनंती अमेरिकेला केली नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही, ही भारताची भूमिका कायम असल्याचे निवेदन भारतीय परराष्ट्र खात्याकडून सोमवारी रात्री उशीरा प्रसिद्ध करण्यात आले. काश्मीर प्रश्नाची चर्चा सिमला करार व लाहोर डिक्लेरेशनच्या आधारावर होऊ शकते असेही भारताने स्पष्ट केले .

संसदेत विरोधक आक्रमक

ट्रम्प यांच्याशी मोदी काय बोलले याचा खुलासा संसदेत येऊन मोदींनी केला पाहिजे ही मागणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी केली. राज्यसभेत काँग्रेसचे नेते आनंद शर्मा व भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांनी हा मुद्दा उचलला. त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यांनी भारताने असा कोणताही प्रस्ताव अमेरिकेपुढे ठेवलेला नाही असे स्पष्ट केले. काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तानमधील मुद्दा असल्याने तो दोघांमध्येच चर्चेद्वारे सुटला पाहिजे हीच भारताची भूमिका कायम असल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले.

एस. जयशंकर यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र खात्याकडून असल्या कमकुवत विधानाने काही साध्य होणार नाही, नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन त्यांच्यात व ट्रम्प यांच्यामध्ये नेमके काय झाले हे देशापुढे स्पष्ट करावे असे आव्हान मोदींना दिले.

ट्रम्प –इम्रान यांच्यातील संवाद

सोमवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर इम्रान खान व ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी द. आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका कोणती भूमिका घेणार, असा प्रश्न दोघांना उद्देशून केला.

त्यावर इम्रान खान म्हणाले, ‘उभय देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने सातत्याने प्रयत्न केले आहेत. पण त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. अशावेळी अमेरिकेने काही मदत केली तर शांतता प्रक्रियेला गती मिळेल’.

त्याला उत्तर देताना ट्रम्प यांनी, दोन आठवड्यांपूर्वी मोदींनी काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी विनंती केली होती. मोदी मला म्हणाले, की तुम्ही मध्यस्थ किंवा पंच बनणे पसंत कराल का? मी विचारले कुठे? त्यावर मोदी म्हणाले काश्मीर. हा प्रश्न अनेक वर्षांपासून सुरू आहे.

ट्रम्प यांनी आश्चर्य चकित होऊन विचारले की हा प्रश्न किती वर्ष सुरू आहे. त्यावर इम्रान म्हणाले, सत्तर वर्षे.

ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘मी असा विचार करतोय की तुम्हा दोघांना हा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यासाठी मदत करायची असेल तर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. पण मला विश्वास बसत नाही की, दोन देश इतके प्रगल्भ आहेत. त्यांच्याकडे प्रगल्भ नेतृत्व आहे पण हा प्रश्न ते का सोडवू शकत नाहीत. तुम्हाला हवं असेल तर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे.’

त्यावर इम्रान ट्रम्पना उद्देशून म्हणाले, ‘तुम्ही असे प्रयत्न कराल तर लाखो लोकांच्या दुवा तुम्हाला मिळतील’.

त्यावर ट्रम्प म्हणाले, “हा प्रश्न मिटला पाहिजे. आणि त्यावर त्यांनीही (मोदी) विचार केला पाहिजे. असेही होऊ शकतं की मीच केवळ त्यांच्याशी बोललो तर या प्रश्नावर काय करता येईल ते पाहता येईल. काश्मीरविषयी मी बरेच काही ऐकले आहे. हे नाव किती सुंदर आहे, असं वाटतंय की हा पृथ्वीवरचा सर्वात सुंदर भाग असावा पण आज तेथे बॉम्बस्फोट होताहेत.”

आजपर्यंत अमेरिकेच्या एकाही अध्यक्षाने, भारताकडून काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची विनंती आली असल्याचे विधान केले नव्हते. ते विधान ट्रम्प यांनी केले.

दोन आठवड्यांपूर्वी ओसाका येथे जी-२० देशांची शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या शिखर परिषदेत ट्रम्प व मोदी यांची भेट झाली होती.

इम्रान खान यांचा पहिला अमेरिका दौरा

पाकिस्तानचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर इम्रान खान यांचा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून  इम्रान खान यांनी पहिल्या दिवशी वॉशिंग्टन येथे पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना ‘नया पाकिस्तान’ घोषणेमागची पार्श्वभूमी सांगितली. त्यांनी सोमवारी दिवसभर अमेरिकेतील भांडवलदार, गुंतवणूकदारांशीही चर्चा केली. अमेरिकेशी ताणलेले संबंध आपल्या कार्यकाळात कमी व्हावेत आणि ते नव्याने चांगले जुळावे म्हणून इम्रान खान प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावर सर्वांचीच नजर आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: