कस्तुरी : न्यूनगंडात दडपलेल्या मनाचा आत्मशोध

कस्तुरी : न्यूनगंडात दडपलेल्या मनाचा आत्मशोध

जीवनासाठी नशीबाला जबाबदार धरणं हे आपलं आवडतं तत्वज्ञान आहे. अभावग्रस्त जीवन जगणाऱ्या माणसांना या तत्वज्ञानाची गुटी लहानपणीच पाजली जाते. मग आहे ती परिस्थिती ते गपगुमान स्वीकारतात. समाजाने दिलेले न्यूनगंड जपत झुरत राहतात.

पीएम केअर्स हा भारत सरकारचा निधी नाही
प्लेटोची गुहा आणि आंखो देखी
‘करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार’

नशीब, प्राक्तन हे आपल्यासाठी परवलीचे शब्द आहेत. आयुष्यात घडणाऱ्या घटना प्राक्तनात ठरल्याप्रमाणे घडतात यावर विश्वास असणारी आपण माणसं आहोत. जन्मल्यावर पाचव्या दिवशी सटवाई आपल्या भाळी नशीब लिहून जाते. मग मरेपर्यंत त्याच्या बाहेर पडणं आपल्यासाठी अशक्य होऊन बसतं. अनेक गोष्टी केवळ दिवास्वप्न ठरतात. जीवनासाठी नशीबाला जबाबदार धरणं हे आपलं आवडतं तत्वज्ञान आहे. अभावग्रस्त जीवन जगणाऱ्या माणसांना या तत्वज्ञानाची गुटी लहानपणीच पाजली जाते. मग आहे ती परिस्थिती ते गपगुमान स्वीकारतात. समाजाने दिलेले न्यूनगंड जपत झुरत राहतात. किमान गरजा भागवणं  हेच जिथं दुरापास्त असतं, तिथं एखादी महत्वकांक्षा बाळगणं हे आकाशातून तारे तोडण्यासारखं आहे. पण माणसाला प्रगतीची आस उपजतच असते.  परिस्थितीच्या फाटक्या चादरीतून आभाळाची भव्यता तो बघत असतो.  यातूनच महत्वकांक्षेचं, विद्रोहाचं रोप त्याच्यात रुजत असतं. योग्य वेळ मिळताच ते उभारी घेतं. दिग्दर्शक विनोद कांबळे यांचा ‘कस्तुरी’ हा चित्रपट हेच सांगु बघतो. नेमून दिलेल्या प्राक्तनाला आव्हान देतो. बदल होऊ शकतो या विश्वासाला बळकटी देतो.

सिनेमाच्या प्रस्थापित सौंदर्यशास्त्राला छेद देण्याचं काम काही दिग्दर्शक करत आहेत. मराठीत नागराज मंजुळे, चैतन्य ताम्हाणे, दक्षिणेतील पा.रंजित यांनी आपल्या सिनेमात सौंदर्याची नवी परिमाणं प्रस्थापित केली आहेत. विनोद कांबळे यांचाही तोच प्रयत्न आहे. ‘कस्तुरी’तील पहिल्याच दृश्यात घाणीने बरबटलेलं शौचालय दिसतं. आणि ते साफ करणारा  १४ – १५ वर्षांचा गोपी. जो कथेचा नायक आहे. अगदी सुरुवातीलाच सिनेमाचा टोन दिग्दर्शक सेट करतो. त्यामुळे यात आपल्या डोळ्यांना सुखावेल फक्त अशीच दृश्ये दिसणार नाहीत याची खुणगाठ प्रेक्षकाला बांधावी लागते. आपल्या मध्यमवर्गीय प्रेक्षकाला सिनेमात पानं, फुलं, चकचकीत इमारती आणि माणसं पाहावी वाटतात. आपला सिनेमाही सुखवस्तू वस्त्यातून फिरत राहतो. या सिनेमाला नाही रे वर्गाच्या जीवनाशी जोडण्याचं, त्यांच्या वस्त्या, वाड्यातून सफर घडवण्याचं काम नागराज, रंजितसारखे दिग्दर्शक करत आहेत.  विनोद कांबळेही तोच कित्ता गिरवतात.  अभावग्रस्ततेत जीवन जगणाऱ्या लोकांच्या वस्तीत आपल्याला हवं ते सौंदर्य दिसणार नाहीच. तिथं दिसतील झोपड्या, गटार, उघडे नाले, घाणीचं साम्राज्य. आणि यात दडपलेलं दरिद्री जीवन. त्यामुळे ‘कस्तुरी’ च्या सुरुवातीच्या दृश्यातच दिसतो आईसह शौचालय साफ करणारा आणि बापासोबत बेवारस प्रेत पुरणारा गोपी.

गोपी १४ – १५ वर्षांचा शाळकरी मुलगा. या वयातील मुलं असतात तसं आई वडिलांच्या जीवावर निर्धास्त राहण्याची गोपीला सोय नाही. त्याची परिस्थिती त्याला तशी परवानगी देत नाही. शाळा शिकून उरला वेळ खेळण्यात किंवा मित्रांसोबत उनाडक्या करण्यात घालवायला त्याला परवडत नाही. ही त्याची निवड नाही. तर ही परिस्थिती त्याला जन्मतःच मिळाली आहे. कारण गोपी मेहतर जातीत जन्माला आलाय. ज्यांचा व्यवसाय शौचालय साफ करणं आहे. गोपीची आई सुद्धा हेच काम करते. तर वडील दवाखान्यात डॉक्टरला पोस्टमॉर्टममध्ये मदत करतात.  गोपी सुद्धा सकाळच्या रामप्रहरी  आईसोबत शौचालय साफ करण्यासाठी जातो. दवाखान्यात काम करणाऱ्या दारुड्या बापाला पोस्टमॉर्टम करण्यात मदत करतो. याच गोष्टी पाहत तो लहानाचा मोठा झालाय. हे काम करणं त्याला आवडत नाही. पण, ते करण्याशिवाय भाग नाही.  गोपीला अभ्यासात रस आहे. संस्कृत विषयात त्याला विशेष रुची आहे. एकेकाळी देवभाषा म्हणून जिचा अहंगंड मिरवला जात होता, त्या भाषेत एका मेहतर जातीतल्या मुलाला गती असणं हा काव्यगत न्यायच म्हणावा लागेल.

पण, जातीचं कवच माणसाच्या अंगाला घट्ट चिकटलेलं असतं. गोपीची जात त्याला जखडून बसली आहे. त्याच्या वर्गातील मुलं त्याला जातीवरून चिडवतात. त्याच्या अंगाला दुर्गंध येतो असं म्हणून हिणवतात. जो गोपी लोकांच्या घाणीत हात घालून ती साफ करतो. त्याच लोकांना त्याची दुर्गंधी येते. ही दुर्गंधी खरं तर जात नावाच्या गलिच्छ गोष्टीची आहे. जी समाजाच्या जाणीवेत रुतून बसली आहे. लोकांनी दिलेल्या न्यूनगंडाच्या दडपणाखाली गोपी दबून जातो. आपल्या अंगाला येणारी दुर्गंधी कशी घालवावी याचा रात्रंदिवस विचार करतो. अंगाला, कपड्याला अत्तर लावून ती कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण, तरीही समाधान होत नाही. काय केलं म्हणजे आपण सुगंधी होऊ याचा ध्यास त्याला स्वस्थ बसू देत नाही. यातूनच त्याला ‘कस्तुरी’ नावाच्या सुगंधी द्रव्याबद्दल माहिती मिळते. कस्तुरी मिळवण्याच्या ध्यासाने तो झपाटून जातो.  टाळताच येणार नाहीत अशी दररोजची कामं करणं. आणि बाकीचा वेळ कस्तुरी मिळवण्याच्या विचारात घालवणं हाच गोपीचा उद्योग बनतो. गोपीच्या कस्तुरीच्या ध्यासाचा प्रवास हा त्याच्या आत्मशोधाचा प्रवास आहे. जो त्याला एका निर्णायक वळणावर घेऊन जातो.

आपल्याला नायक नायिका शोधणं आणि त्यांचं उदात्तीकरण करण्याची फार आवड असते. एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन पुढे आली की तिचं आपण गौरवगाण गातो. असे नायक समाजातील प्रस्थापित वर्गाला हवे असतात. आपण कसे समतावादी आणि गुणांची कदर करणारे आहोत हे दाखवता येतं. समाजातील कुरुपता झाकता येते. आणि परिस्थिती आहे तशीच ठेवता येते. पण, ज्या परिस्थितीमुळे त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागला त्याचं विश्लेषण होत नाही. ‘कस्तुरी’ ही कुरुपता डोळे उघडून बघायला लावतो. कुणीही आपणहून संघर्ष निवडत नसतो. परिस्थितीची प्रतिकूलता त्याला झगडायला लावते. आणि अशी प्रतिकूल परिस्थिती लादण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. जात ही अशीच चिवट परंपरा आहे. जिथं माणसाच्या सर्व क्षमता छाटल्या जातात. पण हे सत्य कळू नये यासाठी पाजलं जातं नशिब आणि प्राक्तनाचं तत्वज्ञान. ज्याचा उल्लेख आपण वर केला आहे. एकदा का माणसाने परिस्थितीचा स्वीकार केला की तिला बदलायला तो उत्सूक नसतो. तेवढी ताकदच त्याच्यात नसते. जगण्याची निकड एवढी असते की त्याला ते परवडत नाही. त्यामुळे गोपीच्या शाळेत जाण्याला त्याची आई हरकत घेते. शाळेत जाण्यापेक्षा बापासोबत पोस्टमॉर्टम करून पैसे कमावणं तिला जास्त महत्वाचं वाटतं.

”इस्कूल जाके पैसे नहीं मिलते. पैसे काम करने से ही मिलते. ” असं म्हणून ती तिला कळलेलं तत्वज्ञान पोराला सांगते. शाळेत जाणं हे आपलं काम नाही. शिकून काही होणार नाही याची तिला खात्री असते. शौचालय साफ करणं हेच आपलं काम.

” अपने हात मे खराटाच है ” हे वाक्य ती गोपीला अटळ सत्य असल्यासारखं सांगते. शौचालय साफ करणं हेच आपलं जीवनध्येय आहे याचा ती स्वीकार करते. आणि आपल्या मुलानेही हे स्वीकारावं अशी तिची इच्छा असते. पण, जे आपल्यासाठी नाही त्याचं स्वप्न गोपी बघतो. आणि समाजाने त्याच्यासाठी निवडलेल्या जीवनापेक्षा वेगळ्या जगण्याची आशा करतो.

किशोरवयीन मुलाच्या भावविश्वावर आधारित काही सिनेमे मागच्या काळात मराठीत येऊन गेले. नागराज मंजुळेंचा फँड्री, अविनाश अरुणचा किल्ला, परेश मोकाशींचा एलिझाबेथ एकादशी. यांचे विषय वेगवेगळे आहेत. पण, समान दुवा हा की यातील मुख्य पात्रं किशोरवयीन आहेत. कस्तुरीचा गोपी सुद्धा त्याच वयाचा आहे. स्वप्नाळू असणं, कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास टाकणं, मनापासून मैत्री करणं, कुणावर तरी श्रद्धा असणं हे खास या वयाचे गुण. पण, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा यावर मोठा परिणाम असतो. एलिझाबेथमधला ज्ञाना न्यूटन वगैरेंच्या गोष्टी करतो. तर जब्या आणि गोपी मात्र एखाद्या चमत्काराची वाट पाहत असतात. परिस्थिती जेव्हा आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असते तेव्हा माणूस साहजिकच चमत्काराचा आधार घेतो. मिथक कथा खऱ्या वाटायला लागतात. आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं यात शोधावी वाटतात. अशाच मिथक कथेतील कस्तुरी गोपीला आकर्षित करते. कस्तुरी मिळाली तर आपल्या अवतीभवतीच्या लोकांचं आपल्याविषयीचं मत बदलेल असं त्याला वाटतं. पण, तेव्हा हे त्याला ठाऊक नसतं की दुर्गंध त्याच्या शरीराला नाही तर लोकांच्या मेंदुत आहे.

जातीची ही दुर्गंधी नकळत मनाला चिकटत जाते. ती तुमची रोजीरोटी निश्चित करतेच. पण, तुमचं चरित्र, तुमचे विचार, आवडीनिवडी, तुमचे मित्रही निश्चित करते. जातीच्या उतरंडीत तळाशी असणारे तळाशीच राहतील अशीच व्यवस्था असते. साहजिकच एकाच स्तरावर असणाऱ्यांची मैत्री होते. कारण त्यांचं अनुभव विश्व सारखं असतं. गोपीचा एकमेव मित्र असतो खाटकाचा आदिम. तोच त्याला समजून घेऊ शकतो. त्याची काळजी घेऊ शकतो. कारण तोही त्याच तळाचा भाग आहे.

अभावग्रस्तता मन मारून जगण्याचं प्रशिक्षण देते. गोपीला छोट्या छोट्या गोष्टीत याची प्रचिती येते. अंगाला सुगंध यावा यासाठी धडपडणारा गोपी घरच्यांना चोरुन साबण विकत आणतो. न्हाणीत दगडाखाली ती लपवून ठेवतो. साबणाच्या वडीचे फुगे करणाऱ्यांना हे विचित्र वाटेल. ज्या शाळेत शिक्षण घेतो त्याच शाळेचा हौद साफ करण्याचं काम गोपीला आदिमसोबत करावं लागतं. सुट्टीचा दिवस इतर मुलांसारखं अंथरुणात पडून राहता येत नाही. इतर वेळी अवहेलनाच वाटेला येणाऱ्या गोपीच्या जीवनात सन्मान मिळण्याचा एक क्षण येतो. संस्कृत भाषेच्या एका स्पर्धेत त्याचा पहिला क्रमांक येतो. आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत त्याचा सत्कार करण्याचं ठरतं. स्वप्नरंजन करत गोपी त्या दिवसाची वाट पाहतो. तू प्रमाणपत्र घ्यायला पुढे गेल्यावर सर्वजण टाळ्या वाजवतील, असं आदिमने सांगितल्यावर हरखून  जातो. पण, ध्वजारोहणाच्या वेळीच दवाखान्यात पोस्टमॉर्टमसाठी एक प्रेत येतं. गोपीला शाळेतील कार्यक्रम सोडून चिरफाडीचं काम करावं लागतं. गोपीच्या वतीने आदिम त्याचं प्रमाणपत्र घेऊन येतो. सगळे त्याच्याविषयी विचारत होते असं सांगतो. तेव्हा गोपी त्या प्रमाणपत्राकडे बघत राहतो. यावेळी

मुल्क राज आनंद यांच्या ‘अनटचेबल’ या कादंबरीची आठवण होते. ती अशाच मेहतर जातीच्या बाखाची गोष्ट सांगते. बाखा   सुद्धा त्याच्या छोट्या छोट्या इच्छांसाठी झुरत असतो.  आपल्या भावविश्वात उंच उंच भराऱ्या घेणाऱ्या बाखाला वास्तव नेहमी जमिनीवर आणून आपटत असतं. गोपीची परिस्थिती सुद्धा अशीच आहे.

सुगंधाच्या ध्यासापायी गोपी कस्तुरीच्या नादी लागतो खरा. पण, या प्रक्रियेत त्याला त्याच्या आतील कस्तुरीचा शोध लागतो. कस्तुरी विकत घेण्यासाठी अनेक दिवसाच्या मेहनतीनंतर कमावलेले तीन हजार तो पारध्याच्या विकासला देतो. पण, खोटी कस्तुरी देऊन विकास त्याची फसवणूक करतो. पैसे जातात, कस्तुरी मिळतच नाही. यामुळे गोपीला शहाणपण मात्र मिळतं. परिस्थितीला शरण गेलेली आई त्याच्या शाळेला विरोध करते. चिडून त्याचं पुस्तक फाडून टाकते. गोपीचा हिरमोड होतो, पण तो काही वेळच. शौचालय साफ करणारा खराटा आणि पोस्टमॉर्टम करणाऱ्या शस्त्रांपेक्षा गोपीचं मन पुस्तकात रमतं. आईने फाडून टाकलेल्या पुस्तकाला तो पुन्हा निट शिवतो. जणु काही तो मनातल्या मनात काही निश्चयच करतो. आणि पुन्हा शाळेची वाट धरतो. कस्तुरी न मिळाल्याने हिरमोड झालेल्या गोपीला खूश करण्यासाठी आदिम अत्तराची बाटली घेऊन येतो. गोपी ती बाटली घेतो आणि  भिरकावून देतो. दूर वाहणाऱ्या गटारात ते अत्तर झिरपायला लागतं. गोपी दुर्गंधीच्या जोखडातून कायमचा मुक्त होतो.

विनोद कांबळे आणि शिवाजी करडे यांनी कस्तुरीचे संवाद लिहिले आहेत. चित्रपटातील मुख्य पात्रं मराठी मिश्रित हिंदी बोलतात. दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक या भाषेचा वापर केला आहे. मेहतर जात ही मूळची उत्तर भारतातील आहे. इंग्रज त्यांची शौचालये साफ करण्यासाठी यांना देशभरात घेऊन गेले. जिथं इंग्रजांच्या छावण्या होत्या तिथं मेहतर जातींची वस्ती तयार झाली. पुढे इंग्रज देशातून गेले. पण मेहतर समुह देशभरात विखुरलेला राहिला. त्या त्या प्रदेशातील भाषा त्यांनी अवगत केली. पण आपली मूळ भाषा सोडली नाही. त्यामुळे त्यांच्या हिंदीत प्रादेशिक भाषेचा मोठा प्रभाव पडला. विनोद कांबळेंचा हा पहिलाच चित्रपट आहे. अभियंता असणाऱ्या विनोद यांनी स्वतः अनुभवलेली, बघितलेली परिस्थिती पडद्यावर उतरवण्याचं ठरवलं.  दोन लघुपट केल्यावर त्यांनी कस्तुरी करण्याचं ठरवलं. अभिनय माहीत नसणाऱ्या लोकांकडून त्यांनी अभिनय करून घेतला. गोपीच्या भूमिकेतील समर्थ सोनवणे आणि आदिमच्या भूमिकेतील श्रवण उपलकर यांचे निरागस चेहरे  मनात घर करून जातात. अर्थात चित्रपटातील काही फ्रेम बघताना दिग्दर्शकाचं नवखेपण  जाणवतं. पण, सिनेमाचं कुठलही प्रशिक्षण न घेता त्यांनी केलेली ही निर्मिती आदरास पात्र आहे. कस्तुरीतील काही प्रसंग दाद द्यायला भाग पाडतात. वंचित समूहातील व्यक्ती सिनेमासारख्या कलेचा वापर करत आहेत. ज्यांचं जगणं मुख्य प्रवाहात कधी आलं नाही त्यांना केंद्रस्थानी आणत आहेत. ही गोष्ट सिनेमासाठी आणि समाजासाठी महत्वाची आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0