केल्याने नियोजन, संगणकमैत्री…

केल्याने नियोजन, संगणकमैत्री…

संगणकाने ज्याप्रमाणे किंडल, आयपॉड, व्हिडिओ गेम्स या विशिष्ट उपयोगाच्या उपकरणांना जन्म दिला त्याचप्रमाणे त्यावर काम करणाऱ्या विशिष्ट प्रणालीही विकसित केल्या.

संगणकाचे नट आणि बोल्ट्स
संगणक आणि मनोरंजन
संगणकाचे भाऊबंद – २

गेल्या शतकातील सातव्या-आठव्या दशकातील हिंदी चित्रपटांतून दिसणारा प्रसंग आहे. एखादे पात्र ही मोठ्या अधिकाराच्या पदावर आहे हे दर्शवण्यासाठी त्याच्या सोबत त्याची ‘पर्सनल सेक्रेटरी’ किंवा स्वीय सहाय्यक असे. संगणकपूर्व काळात मोजणी करणाऱ्या, आकडेमोड करणाऱ्या, हिशोब ठेवणाऱ्या बहुधा स्त्रिया असत. (त्या Compute  करत म्हणून त्यांना Computer म्हणत. त्यावरूनच गणकयंत्राला Computer हे नाव दिले गेले.) त्याचप्रमाणॆ या स्वीय सहाय्यिका बहुतेक वेळा स्त्रियाच असत, आजही असतात. ‘साहेब’ कार्यालयात आले की ती  लगबगीने त्यांच्या केबिनमध्ये येऊन आजच्या दिवसातील नियोजित कामे, भेटींची यादी त्याला देई. किंवा एखाद्या क्लाएंटला लिहिण्याच्या पत्रासाठी त्याने तोंडी सांगितलेला मजकूर लिहून घेई. नंतर तो टाईप करून पुन्हा एकवार साहेबांकडे आणून त्यावर दुरूस्ती सूचना किंवा पाठवून देण्यापूर्वी सही घेई. याशिवाय इतर कुणाला संपर्क करावा, कार्यालयातील इतर कुणाला आपल्या भेटीसाठी पाठवावे वगैरे सूचना अंमलात आणणे हे तिचे काम असे.

साहेब आज तोंडी मजकूर सांगण्याऐवजी आपल्याच टेबलवर असलेल्या संगणकावर थेट टाईप करू शकतो. त्यातून त्या मजकुरावर त्याचे/तिचे पूर्ण नियंत्रण राहते. सहाय्यिकेने टाईप करून आणलेला मजकूर तपासण्याची गरज राहिली नाही. संगणकाला जोडलेल्या प्रिंटरमुळे तात्काळ त्याची छापील प्रतही उपलब्ध होत असते. मजकुराची निर्मिती ते पाठवण्यास सज्ज पत्र वा दस्त यादरम्यान जाणारा वेळ कमालीचा घटला. याशिवाय भेटींचे, संपर्काचे नियोजनही संगणकावरील प्रणाली करून देऊ लागल्याने, साहेबाच्या टेबलवर फोन आणि त्याला जोडलेल्या ईपी-बॉक्सच्या साहाय्याने त्याला आपल्याच कार्यालयातील कर्मचारी वा कार्यालयाबाहेरी कुणी व्यावसायिक भागीदार अथवा भागधारकाला सहज संपर्क करणे शक्य झाल्याने त्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दशकांत छोट्या ते मध्यम आकाराच्या कार्यालयांतून हे स्वीय सहायक दिसेनासे झाले आहेत. अगदी मोठ्या व्याप्तीच्या कंपन्यांमधील चेअरमन अथवा सीईओ दर्जाच्या अधिकाऱ्याचे अपवाद (आणि अगदी ज्येष्ठ नागरिक गटातील जुने अधिकारी) वगळता सर्वत्र ‘साहेब’ आपले काम आपणच करू लागले आहेत. त्यासाठी आता ते संगणकावर अवलंबून आहेत. दस्तनिर्मिती, मनोरंजन यासोबतच संगणकाने माणसाचे कामाचे नियोजनदेखील आपल्या शिरावर घेतले आहे.

संगणकाने ज्याप्रमाणे किंडल, आयपॉड, व्हिडिओ गेम्स या विशिष्ट उपयोगाच्या उपकरणांना जन्म दिला त्याचप्रमाणे त्यावर काम करणाऱ्या विशिष्ट प्रणालीही विकसित केल्या. यात कामाच्या नियोजनासाठी या अग्रगण्य कंपनीने तयार केलेली ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस (Microsoft Office) ही आजही निर्विवादपणे सर्वाधिक वापरली जाणारी प्रणाली आहे. या प्रणालीने संगणक आणि तद्जन्य उपकरणे यांच्या परस्परसंबंधाचेच तत्त्व वापरून एकाच वेळी परस्पर-संबंधित पण विशिष्ट कार्य स्वतंत्रपणे काम करणाऱ्या उप-प्रणाली सादर केल्या. यात दस्तनिर्मितीसाठी ‘वर्ड’ (MS Word ), आकडे अथवा डेटाच्या मांडणी आणि माफक गणिती कामांसाठी ‘एक्सेल’ (MS Excel) आणि कामाच्या नियोजनासाठी ‘आउटलुक’ (MS Outlook) या तीन प्रमुख उप-प्रणालींसह ही प्रणाली सादर करण्यात आली.

‘वर्ड’ ही प्रामुख्याने दस्तनिर्मितीची प्रणाली असल्याने त्यात मजकूर निर्मितीसाठी साहाय्यभूत साधनांचा अंतर्भाव केला गेला. यात मजकुराचा आकार, ठसा (तिरपा/जाड), रंग आदिंसह समास, तळटीप, पान क्र., काही तयार भौमितिक आकार, एखादा साधा आलेख (Graph) अथवा टेबल समाविष्ट करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. या सोबतच वारंवार वापरल्या जाणाऱ्या कामांसाठी काही तयार टेम्प्लेट्स अथवा आराखडे त्यासोबत देण्यात आले होते. उदाहरणार्थ वैयक्तिक आणि व्यावसायिक पत्रांचे, पुस्तकांचे, कायदेशीर वापराच्या दस्तांचे आराखडे तयार मिळाल्याने त्यातील लहान-सहान तपशीलांच्या जागा प्रत्येक दस्तनिर्मितीच्या वेळी तयार करण्याची गरज उरली नाही. ‘वर्ड’च्या तयार आराखड्यांपैकी आवश्यक तो निवडून नेमून दिलेल्या जागी आवश्यक तो मजकूर भरला की काम झाले.

‘वर्ड’ जरी सर्वाधिक वापरली जाणारी प्रणाली असली तरी ती एकमेव नव्हे अथवा तिच्या संगणकीय स्वरूपामुळे तिने दस्तनिर्मितीच्या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवली असे म्हणता येत नाही. माणसाला काही नवे पर्याय उपलब्ध झाले असले तरी त्याने दस्तनिर्मितीच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडवला असे म्हणता येत नाही. ‘एक्सेल’ आणि ‘आउटलुक’ या दोन प्रणालींनी मात्र तत्कालीन माणसांच्या गरजांच्या बराच पुढचा पल्ला गाठला.

यापैकी ‘एक्सेल’चे मूळ आणि मूलभूत कार्य म्हणजे आकडेवारीला टेबल्सच्या स्वरूपात सादर करणे. एकप्रकारे ‘वर्ड’मध्ये ज्याप्रमाणे पत्रे, पुस्तके यांचे तयार आराखडे होते त्याचाच हा अवतार. आकडेवारीच्या टेबल्सचा तयार आराखडा म्हणजे ‘एक्सेल’. परंतु एवढ्यावरच न थांबता, ‘एक्सेल’ने प्रथम त्यात माफक गणिती आकडेमोडीची सोय करून दिली. उदाहरणार्थ एका स्तंभातील अथवा ओळीतील आकड्यांची बेरीज अथवा सरासरी आपोआप तयार होऊन त्या आकड्यांच्या पुढे अथवा बाजूला लिहिली जाईल याची सोय उपलब्ध त्याने उपलब्ध करून दिली. पण केवळ बेरीज अथवा सरासरी या मूलभूत आकडेमोडीपलीकडे जाऊन अधिक गुंतागुंतीची गणिती आकडेमोडही त्यात समाविष्ट करण्यात आली. याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा असा की, ही गणिती प्रक्रिया आकडेवारीशी कायम सुसंगत राखली जाते. म्हणजे मूळ आकड्यांपैकी एखादा बदलला तर त्याला अनुसरून त्यांची बेरीजही आपोआप बदलते, त्यासाठी संगणकाला नव्याने आज्ञा देण्याची गरज उरली नाही. अशीच सोय ते आकडे वापरून सादर केलेल्या आलेखाची (graph). पण केवळ आकडेमोड अथवा गणिताकडेच न पाहता ‘एक्सेल’ने सादरीकरणास आवश्यक असलेले आलेख आणि ‘वर्ड’प्रमाणॆ रंग, आकार, पार्श्वभूमी वगैरे बाजूंनी अनेक पर्याय देऊ केले. एखादा आकडा अपेक्षित टप्प्याच्या बाहेर गेल्यास त्याचा अथवा त्याच्या पार्श्वभूमीचा रंग आपोआप बदलून तो वापरणाऱ्याचे लक्ष चटकन वेधून घेईल याची सोय करून दिली.

संगणकीय आज्ञावलीचे माफक ज्ञान असलेल्या व्यक्तीला ‘एक्सेल’ने देऊ केलेल्या पर्यायांना विशिष्ट क्रमाने अथवा संगतीने जोडून आपले अधिकची काही गणिते करण्याची सोय आहे. विशेष म्हणजे हा पर्याय जर त्या व्यक्तिशिवाय इतर अनेक व्यक्तींना उपयुक्त असेल तर तो त्यांना हस्तांतरित करण्याचा सोपा पर्यायही उपलब्ध आहे. त्यामुळे विविध व्यक्तींनी तयार केलेल्या गणिती प्रणालींची देवघेव एक्सेल मार्फत करता येऊ लागली.  या ‘एक्सेल’ने इतकी वेगाने आणि इतकी प्रचंड व्यापक मुसंडी मारली की विविध गणिती संगणक-प्रणाली केवळ ‘एक्सेल’मध्येच तयार करता येऊ लागल्या. औषधनिर्माण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या गुंतागुंतीच्या आकडेमोडी देऊ करणारी एक प्रणाली सर्वस्वी ‘एक्सेल’मध्ये विकसित करण्यात लेखक स्वत: सहभागी होता. ही प्रणाली जगातील पहिल्या ५० पैकी ४८ फार्मा कंपन्यांमध्ये आजही वापरली जाते.

‘एक्सेल’मधील पर्यायांमुळे वैयक्तिक हिशोबासाठी आणि आर्थिक नियोजनासाठी सोयीची टेबल्स बनवता येऊ लागली. ते वापरणाऱ्या प्रत्येकाला एका क्षणात तिची तंतोतंत कॉपी करून वापरता येऊ लागले. हिशोब लिहिण्यासाठी दरवर्षी नवी डायरी/दैनंदिनी, दररोजच्या कामांच्या नियोजनाचा आराखडा लिहिण्यासाठी नवा कागदी प्लॅनर, विकत आणायची आवश्यकता उरली नाही. आदल्या वर्षी वापरलेल्या आराखड्याचीच प्रत, कोरी करून नवी डायरी/दैनंदिनी, नवा प्लॅनर संगणकावरच तयार करता येणे शक्य झाले. पण हे सारे मुळात तुमचे तुम्हाला तयार करण्याची गरज लागू नये याची काळजी घेण्यासाठी ‘एक्सेल’ची सोबती ‘आउटलुक’ पुढे आली.

आठवड्याभराच्या कामाच्या वेळा, भेटींच्या वेळा, त्यांसाठी आवश्यक असणारी दस्त, आकडेवारी  अन्य माहिती नोंदवून ठेवणारी वैयक्तिक दैनंदिनी तिने संगणकावरच तयार करून दिली. ठरल्या वेळेच्या थोडे आधी त्याची आठवण करून देणारे देणारे ‘रिमाइंडर्स’ दिले. त्यामुळे पुढील कामाची सूचना मिळून त्या क्षणी चालू असलेले काम कुठे थांबवावे याचेही नियोजन करता येऊ लागले. याशिवाय एकाच वेळी एकाहून अधिक कामांचे नियोजन होऊ नये याची काळजी साहेबाच्या सेक्रेटरीऐवजी ‘आउटलुक’चे हे संगणकीय कॅलेंडरच घेऊ लागले. तशी सूचना ताबडतोब देऊन दोन्ही कामांच्या वेळांवर फेरविचार करण्याची संधी देऊ लागले. जे त्या कामापूर्वी ठराविक वेळ आधी तुम्हाला त्याची आठवण करून देणारा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दाखवू लागले. यामुळे विविध काम निश्चित झाल्यापासून प्रत्यक्ष त्या कामाची वेळ येईपर्यंत हे सारे डोक्यात ठेवण्याची गरज संपली.

पुढे इंटरनेटच्या आगमनानंतर वैयक्तिक कामांबरोबरच सामूहिक कामांचे नियोजनही ‘आउटलुक’सारख्या साधनांनी शक्य करून दिले. एखाद्या कामात सहभागी व्यक्तींच्या दैनंदिनींमध्ये आवश्यक माहितीसह त्या कामाचे नियोजन करता येऊ लागले. त्यात केलेले बदल एकाच वेळी सर्वांच्या दैनंदिनीमध्ये होतील याची खातरजमा ‘आउटलुक’ ही प्रणाली करून घेऊ लागली. उदाहरणार्थ एखाद्या बैठकीची वेळ बदलावी हा एका सहभागी व्यक्तीने दिलेला प्रस्ताव कदाचित अन्य सहभागी व्यक्तीच्या दुसऱ्या कामाच्या वेळेआड येतो आहे याची सूचना बदल सुचवणाऱ्याला आधीच मिळू लागली. नियोजनाची बहुतेक सारी जबाबदारी आणि त्यातील संभाव्य अडचणींवरील उपायांसाठी पर्याय ‘आउटलुक’ने देऊ केले. पण या ‘आउटलुक’चा वापर या कामांपेक्षा ‘ईमेल’ या पुढे इंटरनेटच्या आगमनानंतर विकसित झालेल्या संवाद-पद्धतीचे माध्यम म्हणूनच अधिक होतो.

शास्त्रीय संशोधनाच्या सर्वस्वी बौद्धिक क्षेत्रातही अनेकदा एकच शोध एकाहून अधिक शास्त्रज्ञांनी लावला असेल, त्याचे सादरीकरण अधिक व्यापक व्यासपीठावर सादर करणे, अधिक सुलभ, सामान्यांना समजेल अशा भाषेत अथवा स्वरूपात मांडणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या व्यावहारिक उपयुक्ततेबाबत भाष्य करणे या तीन निकषांच्या संदर्भाने त्यातील एखाद्याच्या नावे त्या शोधाचा उल्लेख होऊ लागतो. थोडक्यात कामाबरोबरच त्याचे सादरीकरण हे बौद्धिक क्षेत्रातही महत्वाचे ठरते. अशा वेळी स्पर्धा हा अविभाज्य भाग असलेल्या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये व्यावसायिक क्षेत्रात याला महत्त्व असणे अपरिहार्य आहेच. या कामात सहाय्य करण्यासाठी या तीन प्रणालींच्या जोडीला पॉवरपॉईंट (MS Powerpoint) या आणखी एका प्रणालीची जोड देण्यात आली.

चित्रपटाच्या फिल्म प्रोजेक्टरच्या धर्तीवर व्यावसायिक वापराच्या प्रोजेक्टर या उपकरणाची जोड देऊन तिच्या साहाय्याने झाल्या कामांचे, त्यांच्या आराखड्याचे, कार्यालयाच्या आर्थिक अथवा व्यावसायिक प्रगतीचे सादरीकरण (Presentation) केले जाऊ लागले. त्यासाठी स्वतंत्र स्वरूपाच्या संगणकीय दस्ताची निर्मिती करण्यात आली. यात पुस्तकांच्या पानाप्रमाणे अथवा जुन्या फिल्मवर आधारित फोटो किंवा चित्रपटाप्रमाणे अनेक स्लाईड्स (Slides) तयार केल्या जातात.  त्यावर किमान मजकूर, आकडेवारी नोंदवून, प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी त्याच्या आधारे विवेचन वा अधिक माहिती दिली जाते. त्याअर्थी हे सादरीकरण पूर्वी छायाचित्रांच्या ‘स्लाईड-शो’शी अधिक नाते सांगणारे असते. पण या छायाचित्रांच्या स्लाईड्सच्या शक्य नसलेली आणि संगणकीय ई-बुक्स संदर्भात न झालेली एक महत्त्वाची गोष्ट या ‘पॉवरपॉईंट प्रेजेंटेशन’ दस्ताने सादर केली, आणि ती म्हणजे दस्त, ध्वनि, चित्र, चलच्चित्र, आकडेवारी या साऱ्यांचे संमीलन अथवा एकत्रीकरण. संगणक-पूर्व काळात हे अर्थातच शक्य नव्हते.

एकाच सादरीकरणात अशा विविध स्वरूपातील माहितीचा समावेश करता येऊ लागल्याने सादरीकरण अधिक परिणामकारक बनवणे शक्य झाले.  ‘ई-बुक्स’ जरी या टप्प्यापर्यंत पोचली नसली, तरी या बहुआयामी सादरीकरणाला शैक्षणिक क्षेत्राने पुरेपूर स्वीकारले आहे. युरोप आणि अमेरिकेतील बहुतेक उच्चशिक्षण अभ्यासक्रमांसाठी दिली जाणारी व्याख्याने आता अशा दृक-श्राव्य माध्यमांतूनच दिली जातात. उलट दिशेने नामवंत प्राध्यापकांनी या स्वरूपात तयार केलेली ही प्रेजेंटेशन्स त्यांच्या शिक्षणसंस्थेच्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी नि:शुल्क अथवा माफक शुल्कासह उपलब्ध करून दिली जातात. आपापल्या संगणकावर ही प्रेजेंटेशन्स पाहून वाचून विद्यार्थी त्यातील माहिती वा आशय समजून घेऊ शकतात. व्यावसायिक शिक्षणाचे क्षेत्र वगळता भारतातील उरलेले शैक्षणिक क्षेत्र संगणकीकृत शिक्षणाबाबत अजूनही कमालीचे उदासीन दिसते. अशा संगणकीय अभ्यासक्रमाची निर्मिती तर सोडाच, पण संगणकीय साधनांचा वापरही अभ्यासक्रमीय शिक्षणासाठी अद्याप फारसा होताना दिसत नाही.

वर म्हटल्याप्रमाणे अनेकदा एखादा विशिष्ट शोध प्रथम लावणाऱ्यापेक्षा त्याची मांडणी, व्यावहारिकता आणि व्याप्ती याच्या संदर्भाने कदाचित अन्य कुणाचे नावच त्याला जोडले जाते. ‘वर्ड’ ही काही पहिली दस्त-निर्मिती प्रणाली नव्हे. ‘एक्सेल’ पूर्वी ‘लोटस-१२३’ आणि तशा काही प्रणाली वापरल्या जात होत्या. ‘आऊटलुक’ इतकी व्यापक नसेल, पण त्यातील विशिष्ट कामांसाठी छोट्या प्रणाली अस्तित्वात होत्या. पण या साऱ्यांना सुलभ स्वरूपात सादर करून, मूलभूत कामांसोबत भरपूर पर्याय उपलब्ध करून देऊन, आपलीच विंडोज ही मूलभूत प्रणाली वैयक्तिक संगणकांवर सर्वाधिक वापरली जात असल्याचा फायदा घेऊन आणि मुख्य म्हणजे कार्यालयीन कामासाठी आवश्यक त्या सर्व उपप्रणाली एकत्रित सादर करून ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस’ने कार्यालयीन वापराचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणून अनेक दशके आपले बस्तान बसवले आहे. आपले काम करणारा नेता भ्रष्ट असला तरी मतदार त्याला निवडून देतो त्याचप्रमाणे या प्रणालीच्याच संदर्भात मायक्रोसॉफ्टला एकाधिकार कायद्याखाली दंड होऊन, त्यावर निर्बंध घालूनही ती आजही Numero Uno म्हणून मिरवते आहे. ‘ओरॅकल’, ‘इंटेल’ वगैरे दिग्गज प्रतिस्पर्धी कंपन्यांनी एकत्र येऊन प्रथम ‘स्टार ऑफिस’, नंतर ‘ओपन ऑफिस’ सारख्या पर्यायी – आणि मुख्य म्हणजे मोफत-प्रणाली देऊ केल्यानंतरही तिच्या स्थानाला फारसा धक्का बसलेला नाही.

डॉ. मंदार काळेसंख्याशास्त्रज्ञ व संगणकतज्ज्ञ आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: