केशवराव जेधेः पुरोगामी व समतेचे पुरस्कर्ते

केशवराव जेधेः पुरोगामी व समतेचे पुरस्कर्ते

देशभक्त केशवराव जेधे यांची आज २१ एप्रिल २०२१ रोजी १२५वी जयंती. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे आणि छत्रपती शाहू महाराजांचे 'बहुजन हिताय' धोरण जपणारे केशवराव जेधे मुख्यतः ओळखले जातात ते ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून. त्यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांचे पणतू आणि देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय सर्जेराव जेधे यांनी या पैलूवर टाकलेला प्रकाश

केंद्रीयमंत्री शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
‘राईज ऑफ एम्पायर- ऑट्टोमन’
रॅपिड टेस्ट कीटसाठी सरकारने मोजली दुप्पट किंमत

सन १९२९… पुण्यातील पर्वती टेकडी अशांत आणि अस्वस्थ होती. या टेकडीवरच्या मंदिरात फक्त सवर्णांनाच प्रवेश होता. पुण्यातील तत्कालीन सनातनी वृत्तीच्या लोकांनी या मंदिरात दलितांना प्रवेश निषिद्ध केला होता. जणू दलितांच्या स्पर्शाने या मंदिरात विटाळ होणार होता. अशा भेदाभेद करणार्‍या परिस्थितीत अवघ्या ३३ वर्षांच्या एका युवकाने आपल्या सहकार्‍यांसोबत वरच्या जातीतल्या मूठभर लोकांची ही मक्तेदारी मोडून काढण्याचा चंग बांधला. हा युवक आपले सहकारी आणि जवळपास तीनशे तरुणांसह पर्वतीच्या पायथ्याशी जमले. तो दिवस होता १३ ऑक्टोबर १९२९. तीन दलितांसह तो युवक पुढे झाला. पर्वती टेकडीची एकेक पायरी चढू लागला. ते निम्म्या वाटेवर पोहोचले आणि तितक्यात वरून दगडांचा मारा होऊ लागला. सोबतीला शिव्यांची लाखोली होतीच. रेटारेटी झाली आणि बघता-बघता मारहाण होऊ लागली. बरेच सत्याग्रही जखमी झाले. त्यांना निवडुंगाच्या काटेरी झुडपात ढकलून देण्यात आलं. पण तरीही ते मागे हटले नाहीत. हा युवक तर मुळीच डगमगला नाही. तो आपल्या मागणीवर ठाम होता. दुसर्‍या दिवशी फुले मंडईत झालेल्या सभेत या तरुणाने सत्याग्रहींना मारहाण करणार्‍या सनातनी लोकांचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि हा सत्याग्रह असाच सुरू ठेवण्याचा निर्धार पक्का केला.

काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे.

काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे.

कोण होता तो युवक? तो होता, अन्यायकारी जोखड फेकून देण्यासाठी सज्ज झालेला आणि दीनदलितांविषयी कणव असणारा नेता, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे मूल्य अनुसरणारा दुर्मीळ राजकारणी आणि तत्कालीन जातीय वर्चस्वाला भिडत समाजाला समानतेच्या दिशेने घेऊन जाणारा लढवय्या. ते आहेत – देशभक्त केशवराव जेधे.

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी भारावलेल्या केशवरावांवर महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्यता निवारण-कार्याचा विशेष प्रभाव होता. २३ व २४ मार्च १९१८ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत अस्पृश्यता निवारक परिषद भरवली होती. या परिषदेचे अध्यक्ष होते, सयाजीराव गायकवाड. या परिषदेत केशवरावांनी स्वयंसेवक म्हणून काम केले होते. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात केशवराव जेधे अत्यंत समरसून कार्य करत होते. महर्षी शिंदेंच्या अस्पृश्यता निवारण परिषदेतील सक्रिय सहभाग ही केशवराव जेधेंच्या सामाजिक जीवनातील कार्याची नांदीच होती.

५ सप्टेंबर १९१९ रोजी विठ्ठलभाई पटेल यांनी हिंदुंमध्ये आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी मध्यवर्ती कायदेमंडळात बिल मांडले. पण लोकमान्य टिळक, डॉ. कुर्तकोटी, पंडित मालवीय यांसारख्या नेत्यांनी या बिलाला कडाडून विरोध केला. या वेळी केशवराव जेधे मात्र या बिलाच्या समर्थनार्थ पुढे आले. त्यांनी ब्राह्मणेतर नेत्यांच्या-समर्थकांच्या सभा-बैठका बोलावल्या आणि मोर्चेही काढले. या बिलाच्या निमित्ताने केशवराव जेधे आणखी लोकप्रिय होऊ लागले, ब्राह्मणेतर चळवळही गतिमान होऊ लागली.

सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या उजव्या बाजूला केशवराव जेधे.

सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या उजव्या बाजूला केशवराव जेधे.

केशवराव जेधेंचा औपचारिकदृष्ट्या राजकारणात प्रवेश झाला तो १९२५ साली. या वर्षी ते पुणे म्युनिसिपालिटीत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुणे नगरपालिकेच्या खर्चातून चालणारे सार्वजनिक पाणवठे आणि नळ सर्व जाती-धर्मांतील लोकांसाठी खुले करावेत, हा क्रांतिकारी ठराव सभागृहात मांडणारे पहिले राजकारणी म्हणून केशवराव जेधेंची नोंद इतिहासात झालीच आहे. या ठरावामुळे पुण्याचे समाजजीवन ढवळून निघेल आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल अशी स्वतः अध्यक्षच म्हणू लागले. केशवराव संतापले. त्यांनी त्यांच्या शैलीत अध्यक्षांना हरकत घेतली. दोघांतही वादावादी झाली. मग मतदान घेण्यात आले आणि १२ विरुद्ध १५ मतांनी हा ठराव फेटाळण्यात आला. भेदभावाने पोखरलेल्या, गांजलेल्या समाजाला त्याचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी केशवराव जेधे झटत होते. त्यांचे ठराव कित्येकदा फेटाळले जायचे. तरी ते पाठपुरावा करतच राहिले. व्यवस्थेशी दोन हात करतच राहिले. प्रसंगी त्यांनी कठोर संघर्ष केला, सभागृहात तंटेबखेडे उभे केले. ऐतिहासिक ठरलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही केशवराव जेधे आघाडीवर होते.

४ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सीताराम केशव बोले यांनी असा ठराव मांडला की, मंदिरे, धर्मालये, सार्वजनिक पाणवठे हे अस्पृश्य समजल्या जाणार्‍या लोकांसाठी खुली करण्यात यावीत. हा ठराव सभागृहात पासही झाला. पण महाड येथील बहुसंख्य हिंदुंनी तिथल्या दलितांना चवदार तळ्याचे पाणी प्राशनास बंदी घातली होती. १९२४ साली पारित झालेल्या या ठरावाला अनुसरून, १९२७ साली काही दलित बांधव चवदार तळे येथे पाणी पिण्यासाठी गेली असता, तिथल्या ब्राह्मणांनी त्यांना जबर मारहाण केली. या प्रकाराने व्यथित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्‍नाकडे लक्ष घातले; त्याच वेळी केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर या ब्राह्मणेतर नेत्यांनीही महाड येथे सत्याग्रह पुकारला. केशवराव जेधेंनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या ब्राह्मणेतर पक्षातील मंडळींना आणि त्याचबरोबर अस्पृश्य मानल्या जाणार्‍या पुढार्‍यांनाही आवाहन केले – अस्पृश्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरिता त्यांच्या बरोबर येण्याची विनंती आम्ही आमच्या सर्व ब्राह्मणेतर बंधुंना करत आहोत. सार्वजनिक विहिरी, हौद, पाणवठे व देवळे या निकडीच्या प्रश्‍नाचा कायमचा निकाल लावून घ्यावा अशी आम्ही सर्व अस्पृश्य पुढार्‍यांना विनंती करत आहोत.

२५ डिसेंबर १९२७ ही महाड सत्याग्रहाची तारीख निश्‍चित झाली. ठरल्याप्रमाणे जेधे-जवळकर स्पेशल मोटारने मुंबईहून महाडला निघाले खरे; पण अधेमधे मोटार कुरबुरू लागली आणि त्यांच्या प्रवासात व्यत्यय येऊ लागले. परिणामी, ते दुसर्‍या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी महाडला पोहोचले. दरम्यान, मराठा समाज हा खरं तर अस्पृश्यांच्या विरोधात आहे अशा कंड्या महाडमध्ये पिकवण्यात आल्या होत्या. अशा तणावपूर्ण परिस्थितीत केशवराव जेधेंनी महाडमधील मराठा पुढार्‍यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांना मराठे हे अस्पृश्यांच्या बाबतीत अगदीच अनुकूल असल्याचे ध्यानात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार केशवराव जेधे आणि जवळकर यांनी सभामंडपात भाषणे केली. आदल्या दिवशी इथे मनुस्मृतीचे आणि भाला व संग्राम या वृत्तपत्रांचे दहन करण्यात आले होते. यासाठी केशवरावांनी सत्याग्रहींचे अभिनंदन केले. सभामंडपात ३,८८४ सत्याग्रही हे अगदी तुरुंगात जाण्यासाठीही सज्ज होते; पण ऐनवेळी सभास्थळी जिल्हाधिकारी आले आणि त्यांनी मांडलेले सरकारी धोरण लक्षात घेऊन सत्याग्रह स्थगित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच ही भूमिका घेतली. महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने केशवरावांच्यात दडलेला एक पुरोगामी विचारांचा, समतेचा पुरस्कार करणारा नेता दिसून येतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: