खोट्या माहितीच्या महापुरात लोकस्वास्थाचा बळी

खोट्या माहितीच्या महापुरात लोकस्वास्थाचा बळी

संसर्गजन्य रोगाच्या आपत्तीपासून बचाव करायचा असेल तर दोन आव्हानांना सामोरे गेले पाहिजे. पहिले आव्हान रोगाचे कारण व त्यावरचे उपचार शोधणे आणि मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करणे. दुसरे आव्हान आहे ते इंटरनेटवर पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या माहितीच्या महापुराचे.

उत्तर प्रदेशात आगामी टप्पे भाजपसाठी कठीण
साऊंड ऑफ मेटल
‘कोविशिल्ड’ व ‘कोवॅक्सिन’ लसीच्या वापरास मंजुरी

मध्य आफ्रिकेतल्या काँगो प्रजासत्ताकात गेले वर्षभर इबोला या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. या साथीने आतापर्यंत १६०० हून अधिक जणांचा जीव घेतला आहे. तर संसर्ग झाल्यानंतर औषधोपचारामुळे ७०० लोक या रोगातून बरे झाले आहेत. इबोला हा प्रचंड संसर्गजन्य रोग असला तरी त्यावर औषधोपचार आणि लस उपलब्ध आहे, परंतु या लसीची एकूण उपलब्धता, तिचे वितरण आणि लसीकरणाच्या कार्यक्रमात येणारे अडथळे पाहता वर्षभरापूर्वी सुरू झालेली ही साथ अजूनही आटोक्यात आणता आलेली नाही.

संशयित रुग्णाला दवाखान्यात घेउन जातांना. छायाचित्र: दियागो गुर्गेल / Secom

संशयित रुग्णाला दवाखान्यात घेउन जातांना. छायाचित्र: दियागो गुर्गेल / Secom

दरम्यान काँगोच्या किऊ नावाच्या भागात सुरू झालेली ही साथ आता गोमा नावाच्या शहरातही पोहचली असून तिथून पुढे ती जवळच्या रवांडा देशात पसरली आहे. त्यामुळे हा संसर्ग आंतरराष्ट्रीय होऊ शकतो. नेमका हाच धोका लक्षात घेऊन बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने ही समस्या आंतरराष्ट्रीय आरोग्य आपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

२००५ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून एकूण चार वेळा अशी आपत्ती जाहीर करण्यात आली होती, ज्यात २००९ सालच्या स्वाईनफ्लू संसर्ग आणि २०१६ सालच्या झि़का व्हायरसचा समावेश आहे. या चारही आपत्तींवर योग्य नियोजन आणि सहकार्यातून पूर्णतः नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते.

काँगोमध्ये सुरू झालेली इबोलाची साथही योग्य वेळी आटोक्यात आणता आली असती परंतु मध्य अफ्रिकेत चाललेल्या अंतर्गत कलहांमुळे आणि अराजकतेमुळे आरोग्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांना आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांना काँगोमध्ये काम करणे अशक्य झाले आहे.

साथ सुरू झाल्यापासुन निरनिराळ्या हॉस्पिटलवर चाळीसहून जास्त हल्ले झालेले असून त्यात पन्नासहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे गृहकलहांमुळे वैद्यकीय सेवा पुरवितांना अडचणी येत असतांनाच लोकांमध्ये अफवाचे प्रचंड पीक आले आहे. रोगप्रतिरोधक लसीकरण करून हा आजार होणारच नाही, अशी शाश्वती काहींना नाही तर लसीकरणामुळेच हा आजार होतो आहे असा काहींचा गैरसमज आहे.

‘द लान्सेंट’ या आरोग्य संशोधनाच्या नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार काँगोमधल्या स्वयंघोषित सोशल मीडिया पंडितांना इबोलाचा आजार हा गौरवर्णीय पाश्चात्यांनी काळ्या लोकांवर केलेला जैविक हल्ला वाटतो तर काहींना हे सरकारी षडयंत्र वाटते. २५ टक्क्यांहून अधिक लोकांना तर असा काही आजार आहे यावरच विश्वास नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या पोस्ट व्हायरल होण्यासाठी वास्तवाचा अपलाप करून लोकप्रियतेसाठी शब्दांशी खेळ करण्यात वैद्यकीय क्षेत्रातले काही जण पुढे आहेत.  सोशल मीडियात वेगाने पसरणाऱ्या अफवांमुळे एकूण वातावरण गोंधळाचे, संशयाचे आहे आणि अशा परिस्थितीत ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला अपयश येत आहे.

इबोलाने दगावलेल्या रुग्णाचे दफन. छायाचित्र: मार्टीन पेरेट UNPHOTO संयुक्त राष्ट्रे

इबोलाने दगावलेल्या रुग्णाचे दफन. छायाचित्र: मार्टीन पेरेट UNPHOTO संयुक्त राष्ट्रे

गेल्या वर्षी किऊमध्ये इबोलाच्या प्रादूर्भावानंतर तो नियंत्रणात आणण्याची पद्धती तशी आटोपशीर आणि कमी खर्चाची होती पण आता ही समस्या दूरवर पसरल्याने परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक कार्यक्रमाची आखणी करावी लागणार आहे. यासाठी अर्थातच प्रचंड पैशाची गरज असून जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय समुहाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. या अगोदर २०१४ साली पसरलेल्या इबोलाच्या साथीत अमेरिकी प्रशासनाच्या सजगतेमुळे आणि पुढाकारामुळे समस्या वेळीच नियंत्रणात आली होती. या वेळी मात्र अमेरिका आणि आणखी काही महत्त्वाच्या राष्ट्रांनी या समस्येकडे तूर्तास तरी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

साथ नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेकडून अपेक्षित असलेल्या रकमेच्या अर्धीच रक्कम जमा करण्यात आली असून, अमेरिकेच्या आरोग्यसंस्थामध्ये काम करणाऱ्या निष्णात डॉक्टरांना काँगोच्या मुख्य भागांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ही मनाई सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असली तरी जोपर्यंत निष्णात तज्ज्ञ एकत्र येऊन मुख्य प्रादुर्भाव क्षेत्रांमध्ये काम करीत नाहीत तोपर्यंत समस्येचे मूळापासून निराकरण होणे अवघड आहे.

इबोलाची साथ जगभर पसरू नये यावर नियंत्रण आहे त्यामुळे त्याबद्दल घाबरून जाण्याची अद्याप गरज नाही. पण जंतूसंसर्ग हा माणसाच्या पाचवीलाच पुजलेला आहे हे आपण विसरता कामा नये. किंबहुना दक्षिण आशियात लहान बाळाची पाचवी पुजण्याच्या परंपरेचा एक संदर्भ त्याला पहिल्या पाच दिवसात जंतूसंसर्ग न झाल्याशीच संबंधित आहे. मानवंशशास्त्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘गन जर्म्स अँड स्टील’ या ग्रंथात त्याचे लेखक जेरेड डायमंड यांनी जगभरात महत्त्वाच्या संस्कृतींच्या उदयात आणि प्रगतीत जंतूंचा कसा सहभाग होता ते सप्रमाण दाखवून दिले आहे.

काँगोच्या उत्तर किउ भागात संयुक्त राष्ट्रांचे मदत कार्य. छायाचित्र: MONUSCO संयुक्त राष्ट्रे

काँगोच्या उत्तर किउ भागात संयुक्त राष्ट्रांचे मदत कार्य. छायाचित्र: MONUSCO संयुक्त राष्ट्रे

डायमंड यांच्याच ‘कोलॅप्स’ नावाच्या दुसऱ्या एका ग्रंथात जंतू संसर्गामुळे इतिहासातल्या अनेक संस्कृती आणि सभ्यतांचे कसे पतन झाले हेही सांगितले आहे. डायमंड यांनी इतिहासातल्या संस्कृतींच्या पतनाविषयी केलेल्या भाष्याच्या आधारावर अनेक लोक वर्तमानातल्या जागतिक संस्कृतीच्या आणि प्रसंगी मानवजातीच्या पतनाच्या शक्यता वर्तवू लागले आहेत. यापैकी काही शक्यता या पूर्णतः मनोरंजनात्मक पातळीच्या असून त्यांचा ‘नेटफ्लिक्स’ आणि हॉलीवूडच्या सिनेमांमध्ये मुक्तहस्ते वापर केला जातो.

दुसऱ्या काही शक्यता या कमालीच्या निराशावादातून आणि प्रलयघंटावादाच्या अनुनयातून आलेल्या आहे. या दोन्ही प्रकारांशिवाय सत्यापासून फारकत न घेता संपूर्ण जगभर साथ पसरलेल्या परिस्थितीत समाज नेमके काय करील या विषयी अनेक समाजशास्त्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रांतले संशोधक अभ्यास करीत आहेत. या संशोधकांमध्ये हार्वर्ड केनडी स्कूलचे ब्रुस श्नेयर आणि ‘टेडमेड’ या जागतिक परिषदेचे अध्यक्ष जे वॉकर यांचे नाव बरेच वरती आहे.

आपण भविष्यात अशा आपत्तीला रोखण्यासाठी पूर्णत: सज्ज असले पाहिजे या न्यू यॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात ब्रुस श्नेयर दोन महत्त्वाच्या आव्हानांकडे लक्ष वेधतात. पहिले आव्हान हे अर्थातच रोगाचे कारण व त्यावरचे उपचार शोधणे आणि मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करणे असेल. दुसरे आव्हान असेल ते इंटरनेटवर पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या माहितीच्या महापुराचे.

हे आव्हान सध्या इंटरनेटवर अथांग पसरलेल्या भस्मासुराचा नवा अवतार असेल. इंटरनेटवर असत्याचा महापूर आल्यानंतर जगभरातल्या लोकशाही राष्ट्रांच्या व्यवस्थांवर आणि प्रत्यक्ष लोकशाहीवरच झालेले परिणाम जगाने अनुभवले आहेत. खोटेपणाने केलेल्या लोकशाहीवरच्या हल्ल्यानंतर भविष्यात खोटेपणा लोकस्वास्थ्यावरही आघात करू शकतो. खोटारडेपणामुळे लोकशाहीची झालेली अवस्था आणि खोटारडेपणामुळे लोकस्वास्थ्यावर होणारे परिणाम हे तसे वेगवेगळे आहेत.

लोकशाहीचे असत्यापासून रक्षण करणे प्रत्येकालाच आवश्यक वाटेल, असे नाही पण असत्यापासून आपले आणि आपल्या नातलगांचे रक्षण करणे प्रत्येकालाच आवश्यक वाटेल. सध्या सत्याची सगळ्यांनाच चाड आहे असे नाही पण मोठ्या साथीच्या शक्यतेत सत्य हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र असेल आणि अशा संकटात जर आपण सत्याचा अनुनय केला तर सत्याच्या उपयोगातून आपण कदाचित लोकशाहीत असत्यामुळे उद्भवलेले प्रश्नही सोडवू शकू, असा विश्वास ब्रुस श्नेयर यांना वाटतो.

‘इश्यूज इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ‘सर्वत्र फैलावलेल्या साथीच्या काळात सभ्य समाजाची भूमिका’ हा जे वॉकर यांचा निबंध मात्र बराचसा व्यापक आणि सर्वंकष आहे. या निबंधात सुरुवातीला जे वॉकर एका महत्त्वाच्या शक्यतेकडे निर्देश करतात. भविष्यात जेव्हा केव्हा मोठी साथ येईल तेव्हा ती पहिल्यांदाच आपल्यासोबत माहितीचा एक मोठा विस्फोटही घेऊन येईल. कोट्यवधी मेसेज, ट्विटस, इमेल्स, ब्लॉग्ज, फोटोज आणि व्हिडिओचा जगभरातल्या फोनवर आणि संगणकावर सुळसुळाट होईल. यातील काही माहिती ही उपयुक्तही असेल पण त्यात मोठ्या प्रमाणावर अफवा, चुकीची माहिती, प्रतिवादच करता येणार नाही असे ढळढळीत खोटे आणि सनसनाटी पसरवणाऱ्या बातम्या असतील. वारंवार अशा माहितीची मोठी लाट आल्याने त्यात अधिकृत माहितींचे स्रोत, शासकीय सूचना आणि जबाबदार पत्रकारिताही दाबली जाईल ज्याचा अंतिम परिणाम अर्थव्यवस्थेचे नुकसान, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे संकट आणि सामाजिक अधःपतनात होईल.

एरवी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये पूर्णतः खोट्या असलेल्या पण मनाला पटलेल्या माहितीला गांभीर्याने घेणाऱ्या आणि सत्य असूनही आपल्याला न पटणाऱ्या माहितीला धुडकावून लावणारा समाज कुठल्या भयंकर परिस्थितीत सापडू शकतो या बद्दल ब्रुस श्नेयर आणि जे वॉकर यांचे विवेचन कुठल्याही विचारी माणसाला चिंतेत टाकणारे आहे.

जगाच्या अलिकडच्या इतिहासात वास्तवाला बगल देऊन खोटारडेपणा दामटत सत्तेच्या अंकुशाखाली आलेले देश पाहता या देशांतल्या माध्यमांत विशेषतः सोशल मीडियात पसरलेला खोटारडेपणा आणि सनसनाटीपणा अशा देशांना कुठल्या संकटाकडे घेऊन जातो याची कल्पना येथे येते. आपल्या राजकीय स्वार्थासाठी भयंकर सत्त्योत्तर परिस्थितीला जन्म देतांना खऱ्याची कुठलीही चाड न बाळगणाऱ्या समाजाची शेवटची अवस्था काय होती याविषयी भविष्यातले शास्त्रज्ञ आजच्या दिवसाचा अभ्यास करतील तेव्हा त्यांना जंतू संसर्गाच्या अगोदरच्या काळात झालेला विचार संसर्गही दिसून येईल. त्या विचार संसर्गातून निर्माण झालेल्या समस्या दिसून येतील, आणि समूहहत्येची उदाहरणेही दिसून येतील. फार फार वर्षानंतर आपल्या पतनाचा उगीच कुणाला अभ्यास करू द्यायचा नसल्यास आपण लवकरात लवकर भानावर येणे गरजेचे आहे.

(लेखाचे छायाचित्र – इबोला विषाणूचे कण. छायाचित्र: नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजेस/क्रियेटीव्ह कॉमन्स)

राहुल बनसोडे, मानववंश शास्त्राचे अभ्यासक असून ते सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: