तळकोकणातले दशावतारी

तळकोकणातले दशावतारी

‘रात्रीचा राजा, दिवसा डोक्यावर बोजा!’, ही म्हण आलीय ती तळकोकणातील ‘दशावतार’ या लोककलेवरून! रात्री प्रयोग झाला, की आपापल्या सामानाचे पत्र्याचे (ट्रंक) पेटारे उचलून मंडळी दुसर्‍या गावी चालू लागायची. रात्री जो कलाकार राजाच्या भरजरी वेषात सर्वत्र वावरत असायचा, तोच सकाळी सर्वसामान्य हमालाप्रमाणे स्वतःचं ओझं स्वतः वाहत वाट तुडवू लागायचा. हे चित्र पाहून ही म्हण त्या काळी रूजली असावी. आता बर्‍याच कंपन्यांकडे स्वतःच्या गाड्या आल्या तरी ही म्हण कोकणांतील संस्कृतीत चिकटली ती कायमचीच.

नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान ताबडतोब द्याः उपमुख्यमंत्री
इब्राहिम अल्काझी : रंगकर्मींचे श्रेष्ठ नाट्यगुरू
‘बाईच्या जाती’ची जखम आणि ‘देवबाभळी’ची चिंधी

 

‘रात्रीचा राजा, दिवसा डोक्यावर बोजा!’ ही म्हण ज्याला माहिती आहे व या म्हणीचा अर्थ ज्याला कळतो तो माणूस तळकोकणातला आहे असं म्हणायला हरकत नाही. ही म्हण आलीय ती तळकोकणातील ‘दशावतार’ या लोककलेवरून! प्रामुख्यानं सिंधुदूर्ग जिल्हा व उत्तर गोव्याच्या काही भागात ही लोककला प्रसिद्ध आहे. या म्हणीचा उगम साधारण साठ-सत्तर वर्षांपूर्वीचा असावा. कारण त्यावेळी गावोगावाच्या जत्रांमधे दशावतारी नाटकं करत ही मंडळी फिरायची व रात्री प्रयोग झाला की आपापल्या सामानाचे पत्र्याचे (ट्रंक) पेटारे उचलून दुसर्‍या गावी चालू लागायची. रात्री जो कलाकार राजाच्या भरजरी वेषात सर्वत्र वावरत असायचा तोच सकाळी सर्वसामान्य हमालाप्रमाणे स्वतःचं ओझं स्वतः वाहत वाट तुडवू लागायचा. हे चित्र पाहून ही म्हण त्या काळी रूजली असावी. आता बर्‍याच कंपन्यांकडे स्वतःच्या गाड्या आल्या तरी ही म्हण कोकणांतील संस्कृतीत चिकटली ती कायमचीच.

साधारण दिवाळी झाली व भातकापणीचा हंगाम संपला की गावोगावी दशावताराचे प्रयोग रंगू लागतात. गावोगावच्या ग्रामदेवतांच्या देवळांमधे जत्रा भरतात व त्या जत्रांमधे दशावताराचा प्रयोग हा अविभाज्य भाग असतो. सिंधुदूर्ग जिल्हात मिळून साधारण १२ ते १५ मुख्य दशावतारी कंपन्या आहेत. बाळकृष्ण गोरे, नाईक मोचेमाडकर, मामा मोचेमाडकर, वालावलकर, आजगांवकर, कलिंगन, पार्सेकर अशी काही मुख्य कंपन्यांची नावं. दशावताराचा उगम हा कुडाळ तालुक्यातील कवठी गावच्या बाळकृष्ण गोरे यांच्याकडे सापडतो तोही साधारण ६०० वर्षांपूर्वी असं अभ्यासकांचं मत आहे. प्रत्येक देवस्थानचं पिढ्यानपिढ्याचं या कंपन्यांशी बांधिलकी असते. प्रत्येक देवळातील जत्रेत दशावतार कोणत्या कंपनीनं सादर करायचा हे वर्षानुवर्षे ठरलेलं असतं.

मेकअप

स्वतःचा मेकअप स्वतःच करणारा कलाकार

ज्या गावची जत्रा असेल त्या गावी दशावतारी मंडळी साधारण संध्याकाळी सात वाजायच्या सुमारास दाखल होतात. मेकअप रूमच्या एका बाजूला दशावतारी मंडळींचा पारंपारिक पेटारा पूजला जातो. त्यात गणपतीचा लाकडी मुखवटा, गदा-तलवारी इत्यादी नाटकात वापरायला लागणारी आयुधं असतात. दिलेल्या जागेत कलाकार ओळीने आपापले पेटारे, प्रत्येकाची स्वतःची चटई व पांघरूण लावतात. कलाकार, संगीतवाली मंडळी, खानसामा हे पकडून साधारण १२ ते १५ जणांचा हा गट असतो. गेल्यागेल्या देवळाच्या आवारात आधी चूल पेटवली जाते. देवस्थान समितीकडून या मंडळींना तांदूळ, तूरीची डाळ, मीठ, मिरच्या, लाकडाची मोळी असा शिधा दिला जातो. पुढच्या तासाभरात चुलीवर डाळभाताचं साधं जेवण शिजून तयार होतं. मग सर्वजणांची पंगत बसते व साधारण रात्री नऊच्या सुमारास ही मंडळी जेवून झोपी जातात. आजूबाजूला जत्रेचा गलका असतो, ढोल वाजत असतात, फटाके फुटत असतात व लाऊड स्पीकरवर अजीत कडकडेंची भक्तीगीतं जोरजोरात वाजत असतात. जत्रेत सजलेल्या खेळण्यांच्या दुकानांतून पोराढोरांचं रडणं, हसणं ऐकू येत असतं. चहा भजीची दुकानं लागलेली असतात व वयात आलेली पोरं पोरी मोठमोठ्याने हसत खिदळत असतात. अशा वातावरणातही हे कलाकार घोरत पडलेले असतात. आदल्या दिवशीच्या जागरणामुळे त्यांना अशा कोलाहलातही झोप लागते. मग प्रेक्षक व लहान मुलांचं सतत मेकअपरूमधे डोकावणं सुरू होतं. कधी एकदा हे कलाकार झोपेतून जागे होतात व रंगायला सुरू होतात याची उत्सुकता सर्वांच्या चेहर्‍यावर डोकावत असते. तिकडे देवळाच्या गाभार्‍या बाहेर व्हरांड्यात बायकामुलं संध्याकाळी आठ वाजल्यापासून आपापली जागा अडवून बसलेल्या असतात. बायकांच्या ठेवणीतल्या साड्या बाहेर काढलेल्या असतात. त्यांच्या केसातील गजर्‍याच्या वासाने सर्व परिसर दरवळलेला असतो. नाटक सुरू होईपर्यंत बायका पोरींचे गट आपापसात कुजबुजत बसलेले दिसतात.

साधारण मध्यरात्र झाली की देवळातून पालखी निघते. पालखीचा हा कार्यक्रम तासाभराचा असतो. पालखी बाहेर पडली की कलाकारांपैकी जो गणपती व रिद्धीसिद्धीचं काम करणारा कलाकार असतो तो झोपेतून जागा होऊन मेकअप सुरू करतो. प्रत्येक कलाकारापूढे एक १०० वॅटचा बल्ब टांगलेला असतो. कालाकाराच्या पेटार्‍यात त्याचे स्वतःची वेशभुषा, रंगरंगोटीचं सामान, रंग मिसळायला आणि नाटक संपल्यावर मेकअप पुसायला खोबरेल तेलाची एक बाटली व आरसा या गोष्टी असतातच! समोरच्या पेटार्‍यावर आरसा ठेवायचा व स्वतःचा मेकअप स्वतः सुरू करायचा. सोबतीला मृदुंग वाजवणारा व पेटी वाजवणारा आपापली साधनं तयार करायला घेतात. साधारण एक वाजेपर्यंत पालखी देवळात स्थिरावते व पहिल्यांदा रंगमंचावर गणपती व रिद्धीसिद्धीची पूजा सुरू होते. ही पूजा करणारा ब्राम्हण व वेद पळवणारा संकासूर यांच्यात संवादांची जुगलबंदी इथं सुरू होते. याला म्हणतात आड-दशावतार. कोणत्याही दशावतारी कंपनीचा प्रयोग असेल तरी हा आड-दशावताराचा भाग सारखाच असतो. आड-दशावतार चालू असताना बाकीचे कलाकार नाटकातील आपापल्या प्रवेशानुसार रंगायला सुरूवात करतात. म्हणजे जर एखाद्या कलाकारांचा प्रवेश पहाटे पाच वाजता येणार असेल तर तो रात्री एक वाजल्यापासून रंगून बसत नाही. तो मेकअपला जितका वेळ लागेल तितका वेळ आधी उठतो व रंगायला सुरूवात करतो. साधारण पाऊणतास हा आड-दशावतार चालतो व साधारण रात्री दोन वाजता मुख्य दशावताराच्या प्रयोगाला सुरूवात होते.

दशावतारी नाटक हे प्रायोगिक रंगभूमीचं एक उत्तम उदाहरण आहे. यात कोणतीही लिखित संहिता नसते. प्रत्येक कंपनीकडे पुराणातील कथांची एक पोथडी असते. साधारण १५ ते २० वाक्यांमधे ही कथा लिहीलेली असते. संध्याकाळी देवळात दाखल झालं की जेवण तयार होईपर्यंतच्या वेळेत हे कलाकार एकत्र बसतात व एखादी कथा निवडतात. मग त्या कथेवरून प्रवेश ठरवले जातात. पात्र विभागणी होते. प्रत्येक प्रवेश किती वेळ सादर करायचा याचे ठोकताळे बांधले जातात. समजा एका प्रवेशातील एखाद्या कलाकाराला वेगळं पात्र होऊन पुढच्या प्रवेशात यायचं असेल तर त्याला मेकअप बदलायला किती वेळ लागेल याचे अंदाज घेतले जातात. तेवढा वेळ तो प्रवेश निरस न होता लांबवण्याची जबाबदारी संबंधित कलाकारांची. काहीवेळा एकाच दिवशी दोन नाटकांचे प्रयोग असतात. मग सर्व कलाकार दोन गटांत विभागले जातात. त्यामुळे मग दोन भूमिका करणार्‍या कलाकारांची यादी वाढते.

सादरीकरणासाठी तयार झालेले दशावतारी कलाकार

सादरीकरणासाठी तयार झालेले दशावतारी कलाकार

इथं नेपथ्य म्हणून फक्त एक लाकडी बाकडं! तेही पिढ्यानपिढ्याचा इतिहास असलेलं. त्याच बाकड्याचं कधी सिंहासन होतं तर कधी पर्वत होतो किंवा नदीवरचा एखादा दगडही. कलाकारही वातावरण निर्मिती संवादातून करतात. यातील संवाद पूर्णत: उत्स्फूर्त असतात. अशावेळी दोन कलाकारांचे संवाद एकमेकांवर ओव्हरलॅप होण्याचा धोका असतो पण तसं होत नाही. कारण या कलाकारांचा ताळमेळ निव्वळ अद्भूत असतो. त्यामुळे दशावतारात अभिनय करणं हे येरागबाळ्याचं काम नव्हे. त्यासाठी संस्कृत प्रचूर मराठीवर हुकूमत व पुराणातील कथांचा सखोल अभ्यास लागतो. नाहीतर एखादा कलाकार दुसर्‍या कलाकाराला एखादा अडचणीत टाकणारा संवाद फेकू शकतो व समोरच्याचा अभ्यास नसेल तर त्याची प्रत्युत्तर देताना तारांबळ उडू शकते.

संगीत म्हणून पेटी, मृदूंग व झांज असते. एखादं गाणं किंवा अभंग सुखाच्या व दु:खाच्या दोन्ही प्रसंगात ही मंडळी बॅकग्राऊंडला वापरू शकतात. फक्त दोन्ही वेळा त्याची लय व ठेका प्रसंगानुरूप वेगऴेगळा असतो.

देवळाबाहेरील व्हरांड्यात साधारण पन्नास साठ स्केअर फुटाच्या जागेमधे हे नाटक घडतं. ही जागा सोडून बाकी चहूबाजूने प्रेक्षक एकमेकांना खेटून बसलेले असतात. हे इंटिमेट थिएटरचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. इतक्या जवळून नाटक पहात असल्यामुळे बरेचदा राजाचा किंवा राक्षसाचा रूद्र अवतार पाहून पुढे बसलेल्या पोरांची बोबडी वळलेली असते. कडाक्याच्या थंडीत त्यांना मुतायला लागलेली असते पण समोर जे चाललय ते चुकवायचंही नसतं. असा परिस्थितीत ही पोरं हातातली मिठाई खात खात तोंड वासून नाटक पहात असतात. त्यातून एखादा राक्षस अचानक प्रेक्षकांतून प्रवेश घेतो आणि लहान पोरं भोकांड पसरून आई किंवा आज्जीला जाऊन बिलगतात. पुढचे चार पाच तास हे मंतरलेले असतात. अर्धवट झोपेत, पेंगत पेंगत लहान थोर मंडळी सकाळ होईपर्यंत नाटकाचा आनंद घेतात.

पहाटे सूर्योदय झाला की नाटक संपतं. लोकं पटापट आपापल्या चटया व सामान उचलून घराकडे चालू लागतात. दशावतारी मंडळींचा मेकअप उतरतो. आपापलं सामान पेटार्‍यांमध्ये भरून ते पेटारे गाडीच्या टपावर चढवले जातात. रात्रभराच्या जागरणाचा शीण चेहर्‍यावर जाणवत असतो. गाडी भरून झाली की ही मंडळी अंग एकदाचं गाडीत टाकतात व गाडी पुढच्या मुक्कामाला हलते.

या सर्व कामाचे सगळ्या कंपनीला मिळून सात ते आठ हजार मिळतात. त्यात कंपनीला प्रवासखर्चही पहायचा असतो. म्हणजे साधारण प्रत्येक कलाकाराला रात्रभराच्या मेहनतीचे दोनशे ते तीनशे रूपये मिळतात. त्यात काही गावकरी नाटक चालू असताना त्यांच्या आवडीच्या कलाकारांना बक्षीस देतात. हा त्या कलाकारासाठी बोनस. कधी दहा रूपये तर कधी पन्नास तर क्वचित शंभर रूपये देणाराही असतो. हे बक्षीस देण्याचीही प्रथा खूप मजेदार आहे. नाटक चालू असताना कुणीही जाऊन हे पैसे थेट कलाकाराच्या हातात देऊ शकतात. कलाकार नाटक थांबवून त्याचा स्वीकार करतो व त्या प्रेक्षकाच्या नावासहित आभार मानतो व नाटक परत पुढे सुरू होतं. आश्‍चर्य म्हणजे या प्रकारामुळे नाटकाची लय अजिबात बिघडत नाही.

दशावतारी नाटकांमधे स्त्रिया काम करत नाहीत. स्त्रियांची भूमिका पुरूषच करतात. पुरूषाचं स्त्रीमधे होणारं रूपांतर पहाणं हे गावकर्‍यांसाठी मोठ्या उत्सुकतेची गोष्ट असते. दशावतारी रंगभूमीने ओमप्रकाश चव्हाण सारखे दिग्गज कलाकार रंगभूमीला दिले. ओमप्रकाश हे मालवण तालुक्यातील आमडोस या गावी रहातात. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी दशावतारात काम करायला सुरूवात केली. सुरूवातीला एकवेळची जेवणाची भ्रांत मिटेल एवढाच त्यांचा नाटकात काम करायचा उद्देश होता. परंतु कालांतराने त्यांना या नाटकाची गोडी लागली व गेल्या तीस वर्षांत त्यांनी जवळपास आठ हजार प्रयोगांमधून काम केलंय. त्यांची अभिनयाची समज व स्त्रीमधील बारकावे हेरून ते अभिनयात मांडण्याची ताकद निव्वळ लाजवाब आहे. मी ओमप्रकाश यांच्यासोबत गेल्या काही वर्षांमध्ये जवळपास पन्नास गांव फिरलो. परंतू कुठेही त्यांच्यावर स्त्री भूमिका करतो म्हणून लोकांनी टोमणे मारलेले पाहिले नाहीत. मुळात त्यांनी त्यांच्या अभिनयातून कधीही स्त्री बिभत्सरूपात दिसू दिली नाही. त्यामुळे त्यांना स्त्री वर्गाकडूनही प्रचंड आदर मिळाला व मिळतो. २०१५ साली त्यांना नाटक करतांना ह्रदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. या कठीण प्रसंगात जनतेकडूनही त्यांना भरभरून मदत मिळाली. या आजारपणात त्यांचं करिअर ऐन भरात असताना जवळजवळ संपलं.

दशावतारी नाटकात काम करणारी मंडळी ही बहुतांश शेतकरी असतात. मान्सूनचे चार पाच महिने शेती करायची व उरलेला वेळ नाटक. वर्षभरातले सहा महिने नाटकासाठी फिरतीवर असल्यामुळे त्यांना कुठेही पूर्णवेळ नोकरीही मिळत नाही. दशावतारी कंपनी सिझनच्या सुरूवातीलाच या कलाकारांशी करार करते. नोव्हेंबर ते साधारण मे पर्यंत प्रत्येक कंपनी दिडशेच्या जवळपास प्रयोग करते. प्रत्येक प्रयोगाचं ठरलेलं मानधन आगावू या कलाकारांना कंपनी मालकांकडून दिलं जातं. मग त्यासाठी बरेचदा सावकारांकडून कर्ज घेतली जातात. प्रवासासाठी घेतलेल्या गाडीचं कर्ज असतंच. गाडीच्या देखभालीचाही खर्च असतो. अशात बरेचदा या कंपनीचे मालक आर्थिक कंगालीच्या चक्रात ओढले जातात. त्यामुळे आज बर्‍याच दशावतारी कंपन्या डबघाईला आलेल्या आहेत. सरकारकडून या कलाकारांना मिळणारी मदत हास्यास्पद म्हणता येईल. ज्येष्ठ कलाकारांना महिना बाराशे रूपयांच्या आसपास सरकार मदत करतं जी त्यांच्या औषधपाण्यालाही पुरत नाही. कलाकारांनाही प्रत्येक प्रयोगागणिक मिळणारं मानधन अत्यल्प असतं. त्यात त्यांचं पुरेसं काही भागत नाही. मग वेळ मिळेल तसं ही मंडळी सुतारकाम, गवंडीकाम करतात किंवा कुठेतरी मोलमजूरीही करतात परंतु नाटक काही सोडत नाहीत.

दशावतारासाठी वापरला जाणारा गणपतीचा मुखवटा

दशावतारासाठी वापरला जाणारा गणपतीचा मुखवटा

गेल्या काही वर्षांमधे दशावतारी कला बर्‍याच स्थित्यंतरांमधून जातेय. सिंधूदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यापासून केंद्र शासनाकडून पर्यटन विकासासाठी निधी येऊ लागला. परंतु या निधीचा वापर बरेच ठिकाणी जुनी चांगली देवळं पाडून तिथं सिमेंट काँक्रीटची अवाढव्य देवळं उभी करण्यासाठी होऊ लागला. मग या नवीन देवळासोबत कुणीतरी दशावतारी नाटकांसाठी एक स्टेज बांधू या असंही सुचवतं. मग ते स्टेज देवळाच्या बाहेर उभं केलं जातं व इथंच प्रेक्षक व नाटक यातील अंतर वाढतं. याचा परिणाम नाटकाच्या अनुभूतीवर होतो. हे दशावतारी कलाकारांनाही जाणवतं. एका नवीन बांधलेल्या देवळात प्रयोग संपल्यावर एक कलाकार मला म्हणाला होता, पूर्वी जुन्या देवळात जी मजा यायची ती आता येत नाही. रंगदेवता आता इथं राहिली नाही. त्या कलाकाराला हे नेमकं का झालं हे सांगता येत नाही पण त्याला हे नक्की जाणवतं! जागतिकीकरणाच्या या गाड्यात हे देवळांच्या जिर्णोद्धाराचं प्रकरण कसं थोपवायचं हा मोठा प्रश्‍नच आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आज दशावतारात काम करायला तरूण मंडळी तयार नाहीत. त्यामुळे 20 ते 30 वयोगटातील कलाकार क्वचितच दिसतात कारण त्यांना या कलेत त्यांचं भविष्य दिसत नाही. स्वतःचं व कुटुंबाचं पोट भरता येईल इतपत पैसे यात मिळत नाहीत याची जाणीव तरूण मंडळींना आहे.

जयवंत दळवींच्या ‘सारे प्रवासी घडीचे’ मध्ये एक जिवा नावाचं पात्र आहे. गावांत दशावतारी उतरलेत तर त्यांना भाजीला काहीतरी हवं म्हणून हा जिवा दूसर्‍याच्याच परसातला भोपळा चोरून या दशावतार्यांना नेऊन देतो. दऴवींनी हे लिहून पन्नासएक वर्ष झाली असतील. दशावतार्‍यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे. त्यांच्या पानात डाळ-भात सोडून क्वचित भाजी पडते. जिवा सारख्या दशावतारावर प्रेम करणार्‍याच्या मूठभरांच्या जोरावर दशावतार गावोगावी जिवंत आहे व अजून काही वर्ष जिवंत राहिल अशी आशा करायला हरकत नाही.

हा रात्रीचा राजा दिवसाचाही राजा कधी होईल याची वाट ही दशावतारी मंडळी आतुरतेनं पहात आहेत.

इंद्रजीत खांबे हे प्रसिद्ध फोटोग्राफर आणि कोकणातील पुरोगामी कार्यकर्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: