कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

द हेग/नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात बंदिवासात असलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीस बुधवारी आंतरराष्ट्रीय न्

‘भारतीय गोबेल्सचा विजय’
मुसलमान परके हा लोकप्रिय समज
‘तुम्ही सेक्युलर नाही?’

द हेग/नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात बंदिवासात असलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीस बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यांच्या फाशीचा पुनर्विचार करावा, असे न्यायालयाने पाकिस्तानला सांगितले आहे. न्यायालयाने जाधव यांचा भारतीय दूतावासाशी संपर्क करून द्यावा असेही आदेश पाकिस्तानला दिले आहेत.

बुधवारी भारतीय प्रमाणवेळ साडेसहा वाजता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयावर १६ पैकी १५ न्यायमूर्तींची मोहोर असल्याने भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तानच्या तुरुंगवासात असलेल्या भारतीय नागरिकाचा भारतीय दूतावासाशी संपर्क करू न देणे हा जिनिव्हा कराराचा भंग झाल्याचेही न्यायालयाने पाकिस्तानच्या निदर्शनास आणून दिले आहे.

पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या सुटकेची भारताने केलेली मागणी फेटाळली आहे. पाकिस्तानने जाधव प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करावी असे न्यायालयाने सांगितले आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तर माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारतासाठी हा निर्णय मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या निर्णयानंतर जाधव यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.

परराष्ट्र खात्याचे पत्र

जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क करू देण्याच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना भारतीय परराष्ट्र खात्याने पाकिस्तानला या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पाकिस्तानने पुन्हा चौकशी करावी असेही परराष्ट्र खात्याने एका पत्राद्वारे पाकिस्तानला कळवले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांनी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दूतावासाशी पाकिस्तानने संपर्क साधू न दिल्यास न्यायालयाचे पुन्हा दरवाजे ठोठावणार असल्याचे सांगितले. पाकिस्तानला जो कायदा आहे त्याचे पालन करावे लागेल व या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी पारदर्शक व्हायला हवी अशी साळवे यांनी प्रतिक्रिया दिली.

पाकिस्तान म्हणते आमचाच विजय

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची भारताची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे. या एकूण निर्णयात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्याचा कोठेही भंग केला आहे असे न्यायालयाने कोठेही नमूद केले नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. जाधव हे पाकिस्तानात घातपात, दहशतवादी कारवाया व कटकारस्थानांना जबाबदार असल्याचाही आरोप पाकिस्तानने केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0