लढवय्या पँथर

लढवय्या पँथर

एप्रिल ते सप्टेंबर २०१२च्या ‘खेळ’ या मासिकात राजा ढाले यांची मनोहर जाधव व मंगेश नारायण काळे यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली होती. ती मुलाखत इथे प्रसिद्ध करीत आहोत.

कुटुंब व समाजामधील स्त्री-पुरुषाच्या भूमिकेकडे भारतीय कसे पाहतात?
ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच ‘शरद शतम्’ योजना
सांगली-कोल्हापूर पूरपरिस्थिती गंभीरच

मनोहर जाधव : आपली ओळख एका वाक्यात सांगायची झाल्यास तर काय सांगाल?

राजा ढाले : बुद्ध-कबीरापासून फुले-आंबेडकरांपर्यंत चालत आलेल्या मानव मुक्तीच्या लढ्यातील एक अत्यंत सामान्य पण सचोटीने आणि अटीतटीने लढणारा सैनिक आहे.

जाधव : तुम्ही या चळवळीकडे कसे काय आलात?

ढाले : अहो, ते माझ्या रक्तातच आहे. हे माझे ‘ढाले’ हे आडनावच सांगेल. आणि ते मिलिटरीशी संबंधित आहे. ‘ढाले’ म्हणजे बिनीचा सैनिक. हे ‘ढाले’ प्राचीन काळी किल्ल्यात राहात असतं. आणि या गडकिल्ल्याचे अहोरात्र संरक्षण करीत असतं. आता ही ‘ढाल’ म्हणजे ढालतलवारीतली ढाल नव्हे तर किल्ल्यावर फडकणारा भला मोठा ध्वज. त्याचप्रमाणे युद्धाच्या आघाडीवर असा ध्वज घेऊन उभे असलेले लोक. मेलो तरी बेहत्तर, पण ध्वज खाली पडू देणार नाही हे त्यांचे ब्रीद. एक गडी घायाळ झाला की त्याची जागा दुसऱ्याने त्वरेने घ्यायची, पण ध्वज खाली पडू द्यायचा नाही. तो वरच्यावर झेलायचा. कारण ध्वज खाली पडणे हे पराभवाचे लक्षण होय. ते सगळे पहिल्या रांगेतले लोक म्हणजे ‘ढाले’…

जाधव : आपण विद्यार्थीदशेपासून आंबेडकरी चळवळीत आहात..

ढाले : होय. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्राणज्योत अचानक मावळली. त्यांचे परिनिर्वाण झाले. त्यावेळी मी नववीत शिकत होतो. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही वरळीमधील विद्यार्थी वर्गाची संघटना स्थापन करून सभा आयोजित केली. तिचा संघटक व चिटणीस म्हणून मी त्याकाळी चोख भूमिका बजावली होती. ती सभा मे १९५७ मध्ये पार पडली आणि प्रचंड यशस्वी झाली. वरळीतल्या आंबेडकर मैदानात पार पडलेली दलित विद्यार्थ्यांची ही पहिला सभा आजही मला स्पष्ट आठवते. थोडक्यात माझ्यातील कार्यकर्ता असा जागा झाला होता. प्रकट होत होता. परंतु कलेच्या वाटाही मी धुंडाळत होतो, चोखा‌ळत होतो..

मंगेश नारायणराव काळे :  हे तुमच्या कधी लक्षात आलं…

ढाले : माझ्यातला हा गुप्त कार्यकर्ता प्रसंगवशात जागा होण्याआधी, माझ्यातला चित्रकार आणि कवी त्याआधी जागा झाला होता. त्याचं असं झालं की, जेव्हा मला काहीही कळत नव्हतं, अशा अबोध वयात माझं जन्मगांव आणि आई-वडिलांना सोडून माझ्या नवविवाहित चुलता-चुलती सोबत मुंबईला आलो. तेव्हा मी असेन जेमतेम चारपाच वर्षांचा. आता हे माझे चुलता-चुलती कोण?.. तर माझ्या मावशीचं म्हणजे माझ्या आईच्या सख्ख्या छोट्या बहिणीचं लग्न, माझ्या वडिलांच्या सख्ख्या भावाशी म्हणजेच, ‘तात्यां’शी झालेलं होतं. माझ्या मावशीनं मुंबईला निघताना मला विचारलं, चल, येतोस का मुंबईला? आणि मी मुंबईला आलो. माझ्या कवितेचा अंकुर माझ्या वडिलांकडून आलेला आहे हे माझ्या वयाच्या विशीत कळलं. त्यांच्या कवितेचं बाड चुकून हाताला लागल्यानंतर… पण माझ्यात वसत असलेला चित्रकलेचा हा धागा कुठून आला याचा मी सतत विचार करतोय आणि बालपणातल्या विस्मृतीच्या अंधारात मी डोळे फाडून इतस्त:त शोधतोय तेव्हा ते माझ्या मावशीच्या (Wall Paintings) भित्तीचित्रकलेपर्यंत घेऊन जातं. ती सारवलेल्या भिंतीवर वा जमिनीवर काचेच्या बांगड्याच्या रंगीत तुकड्यांच्या साहाय्याने तिच्या तरुणपणी भिंतीवर कुंड्या, फुले, मोर अशा विविध पण देखण्या आकृती अत्यंत एकाग्रचित्ताने आकारित असे. अगदी कागदावरही चित्र काढीत असे. प्रत्येक माणसात लपलेला असा आदिम चित्रकार असतोच. आणि या चित्रांचं नातं गुह्यचित्रांशी असतं. चित्रकला आणि कविता यांनी माझ्या व्यक्तिमत्वात अगदी लहानपणीच माझ्याही नकळत मागच्या दारानं प्रवेश केला. आणि बरं का सर.. माझ्या जीवनाची चित्तरकथाही त्याच काळात सुरू झाली.

जाधव : ती कशी काय?

ढाले : अहो, लहानपणीच मी चुलता-चुलतीबरोबर गावाकडून मुंबईला आलो.. आणि माझ्या माघारी १९४७ साली माझी आई आणि १९४९ साली माझे वडील वारले. मग माझ्या चुलत्याने माझी सगळी भावंडंही मुंबईला आणली. आई वारल्यावर आमच्या आळीवाड्यातल्या बायका माझं रुबाबदार रुपडं नी कपडे पाहून म्हणायच्या, “आई मरावी आन् मावशी जगावी हे खरं हाय बग.” आणि मला जवळ घेऊन रडायच्या.

जाधव : Never mind go on!! It happens like that!

ढाले : मी मुंबईला आल्यावर लहानपणापासून ते माध्यमिक शिक्षणापर्यंत वरळीला राहात होतो नी १९५८ला वरळी सोडली तरी मॅट्रीकच्या वर्षांपर्यंत वरळीशी संबंधित होतो. ही वरळी म्हणजे आंबेडकरी जनतेचा बालेकिल्ला होता. त्या वातावरणात मी श्वास घेत असल्यामुळे माझ्यामधला कार्यकर्ता आपोआप जागत गेला. तो जिवंत राहिला. मी चित्रकलेच्या प्रेमात तर होतोच, पण त्याचबरोबर साहित्य चळव‌ळीकडे नकळत वाटचाल करीत होतो. त्याकाळी वरळी नाक्यावरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱ्या चित्रकला स्पर्धेत मी ओळीनं सहा वर्षे पहिला येत असे. त्या स्पर्धेत वयाच्या दहाव्या वर्षांपासून मी सक्रीय झालो होतो. खरं तर ती स्पर्धा २ ते १६ अशा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठीच खुली होती. त्यामुळे वरळीत माझं नाव चित्रकार म्हणू गाजू लागलं. वरळी बी.डी.डी. चाळीत १९४८ पासून कार्यरत असलेल्या ‘दलित सेवक साहित्य संघा’च्या संपादकद्वय असलेल्या अडसूळ-रणपिसे या जोडीच्या ते कानावर गेलं. त्यांना वाटलं कोण हा माणूस आहे हा आणि ते दोघे मला शोधत हेन्सरोडवरील वरळी सोनापूरच्या स्मशानभूमी समोरली ‘पठाण चाळ’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या वसाहतीत येऊन धडकले. मला पाहिल्यावर टी. पी. अडसूळ म्हणाले, “आरं राजा ढाले म्हटल्यावर आमाला वाटलं की, कुणातरी भली थोरली… वयानं पोक्त असामी असशील, पण असं भारदस्त नाव धारण करणारा एक हाफपँटीतला एवढासा पोरगा निघालास.” मग त्यांनी माझं वळणदार अक्षर पाहिलं आणि वरळीच्या बी.डी. चाळीतल्या ‘६०-३५’ या पत्त्यावर बोलावून त्यांचं हस्तलिखित लिहिण्याचं काम सोपवलं. त्यातला एक लेख म्हणजे ‘कार्ल मार्क्स की गौतम बुद्ध’ या नावाचं डॉ. आंबेडकरांचं अत्यंत गाजलेलं खाटमांडूच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसमोर केलेलं ऐतिहासिक भाष्य होतं. डॉ. आंबेडकरांचे आयुष्यातलं ते अखेरचे भाषण असल्यामुळे १९५६च्या २५ नोव्हेंबरच हे भाषण मी १९५७सालच्या सुरुवातीला अडसूळ यांच्या सांगण्यावरून हस्तलिखितासाठी लिहीत होतो. त्यावेळी पोस्टकार्डावर लिहून पाठवलेलं ‘पाऊलवाट’ हे बालगीत ‘नवशक्ती’ दैनिकात छापून आलेलं होतं. त्याच दरम्यान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीनंतर उगवलेल्या पहिल्या बुद्धजयंतीदिनी बुद्धांच्या आगमनार्थ ‘फिरूनी एकदा’ ही कविता लिहिली होती आणि आणि ती १७ मे १९५७च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. म्हणजे १९५७ साली डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याच्या रूपात आंबेडकरी चळवळीत झालेला शिरकाव अडसूळ-रणपिसे यांच्या सान्निध्यातून झालेला माझा आमच्या साहित्यातील चळवळीतील प्रवेश आणि ‘प्रबुद्ध भारता’तून माझं लेखन छापून यायला तयार झालेली सुरुवात हे सगळ एकदमच महिन्यापंधरादिवसाच्या वा एका आठवड्याच्या अवधीत घडून येताना दिसेल. परंतु माझे हे पूर्वचरित्र कोणालाच माहीत नसल्याने किंवा अहंमन्यतेची टिमकी वाजवणाऱ्या माझ्या आसपासच्या जगात मी कुणाला सांगू न शकल्यामुळे माझ्याबद्दलची ही माहिती अन्य कुणाला असणार? म्हणजेच माझ्याबद्दल आपल्या पदरची माहिती पुरवणारेच जास्त असल्यामुळे या विषयावर विचारानं बोललो. पण अधिक नव्हे! मी त्याच काळात पलीकडच्या पठाण चाळीतील झोपडपट्टीतल्या लहान लहान मुलांचा वर्ग भरवून त्यांना शिकवित होतो आणि बुद्धजीवनासंबंधी एक कलापथक काढले होते. हे तर सांगता सांगता बाजूलाच राहिले.

जाधव : राजाभाऊ, आपण ज्या ‘दलित साहित्य संघा’चा उल्लेख केलात. त्याचं पुढं काय झालं? त्यांनीच पुढे दलित साहित्य संमेलन घेतलं होतं ना?

ढाले : नाही. या आधीच्या क्रमाने घडलेल्या काही गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत, तर या बाबतीत घडलेला इतिहासाचा विपर्यास होईल. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या साहित्याचे संवर्धन आणि निर्मिती करणारे साहित्य संस्था असावी अशी १९४८ च्या दरम्यान बाबासाहेबांची संकल्पना होती. त्याकाळी ‘जनता’ पत्रात कथा कविता लिहिणारे श्री. रणपिसे, टीपी अडसूळ या लोकांना ही आपली मनिषा त्यांनी बोलून दाखवली. म्हणजे नेमके काय करायचे हे त्या लोकांना कळेना. त्यातच हे सगळे समजावण्यासाठी बाबासाहेबांना वेळ नव्हता आणि आचार्य यांनीही त्यात लक्ष घातले नाही. म्हणून या संस्थेला या लोकांनी पहिले ओबड धोबड नाव दिले. ‘दलित साहित्य सेवक संघ’.

इसवी सन १९५३ साली त्या नावातलं ‘सेवक’ हा शब्द वगळला गेला आणि त्यावेळी किंवा त्यानंतर कधीतरी त्या नावाच्या सुरुवातीला ‘महाराष्ट्र’ शब्द येऊन बसला असावा. असे ‘महाराष्ट्र दलित साहित्य संघ’ इसवी सन १९५८ सालच्या २ मार्च रोजी जे ‘पहिले दलित साहित्य संमेलन’ मुंबईतल्या परेलच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये पार पडले ते याच लोकांनी याच संस्थेने आयोजित केले होते. या संमेलनाचे स्टेजवर आणि सभागृहाबाहेर लावण्याचे सर्व बॅनर्स त्याकाळी मी आणि माझा परम मित्र चित्रकार दत्ता शेलार यांनी आदल्या रात्री रात्रभर जागून केले होते. त्याचीच पुनरावृत्ती पुढच्या वर्षी पार पडलेल्या १९५९ सालच्या साहित्य संमेलनात झाली. या आमच्या धडपडीचे प्रतिबिंब दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष भाषणात उमटले. स्वागताध्यक्ष प्राध्यापक यादवराव गांगुर्डे म्हणाले, हे साहित्य संमेलन राजा ढालेच्या कुंचल्याने सजले आहे.

जाधव : पहिल्या ‘दलित साहित्य संमेलना’तल्या अण्णाभाऊंच्या ‘रोल’बद्दल काही सांगा?

ढाले : अरे, ते राहूनच गेलं.. त्या ऐतिहासिक अशा पहिल्या दलित साहित्य संमेलनाचा इतिहास घडणार होता वेगळाच, परंतु ऐनवेळी तो घडला वेगळाच. त्या नियोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते आचार्य अत्रे. परंतु संमेलन अगदी तोंडावर येऊन ठेपलं असताना ऐनवेळी काहीतरी सबब सांगून त्यांनी आपलं अंग त्यातून काढून घेतलं. त्यावेळी आमची धावाधाव झाली. त्यात त्यावेळचा त्या संघातील दुसऱ्या फळीच्या सर्वात तरुण तेजस्वी आणि तडफदार असा जनार्दन वाघमारे हा आमच्या संघटनेचा बिनीचा कार्यकर्ता आणि त्याच्या मागे मी व आमच्या शिष्टमंडळाचा नेता अण्णा रणपिसे असे तिघे म्हणून घाटकोपरच्या चिरागनगरमधील अण्णाभाऊंचे घर गाठले. तेव्हा रात्र झाली होती. कंदिलाच्या प्रकाशात घडलेला सर्व वृत्तांत गंभीरपणे अण्णांच्या कानावर घातल्यावर ते अस्वस्थ दिसले. खूप मिनतवारीने अण्णाभाऊनी अखेर उद्घाटन जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि दुसऱ्या दिवशीच्या आपल्या ऐनवेळेच्या लिखित भाषणात ते गरजले, अरे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. क्षणभरातच श्रोत्यांच्या मनात लख्ख प्रकाश पडला आणि त्या छोट्याशा सभागृहात अचानक टाळ्याच्या असंख्य विजा कडकडून गेल्या. परंतु आज आमच्या कॉम्रेड मित्रांनी अण्णाभाऊंच्या वाक्याचे ‘भांडवल’ आणि ‘विकृतीकरण’ चालवले आहे. या वाक्यातील ‘दलित’ हा शब्द हुसकावून त्याजागेवर ते ‘कष्टकरी’ आणि ‘कामगारां’ची वर्णी लावत आहेत. याला काय म्हणावे? कॉम्रेड? अरे तुम्ही अण्णा भाऊंचे मित्र असाल पण मालक नव्हे, कशासाठी त्यांच्या या वाक्याची मोडतोड आणि विडंबन? तुमचा हा वर्गलढा ‘दलितां’वरच का बेतलाय? अरे हे डोकं कुणाचं आहे? कम्युनिस्टांचं की बामणांचं? कारण पाश्चात्य जगातल्या कम्युनिझमनं १९८९ सालीच गाशा गुंडाळला असताना हे आमच्यातच Divide and Rule या Policy चा वापर करून कोण Division करतंय?

जाधव : आता आपण साहित्यातल्या चळवळीकडे आणि पर्यायाने ‘लिटल मॅगझिन्सच्या चळवळीकडे वळूया का?

ढाले : हो चालेल.

जाधव : त्याबद्दल सांगा?

ढाले : मी १९६० साली कॉलेजविश्वात पाय ठेवला आणि माझं जगच बदललं. माझ्या जीवनाचं क्षितिज विस्तृत झालं. त्या आधी एक वर्षभर एसएससी बोर्डानं मला एकाच इयत्तेत कोंडून ठेवलं होतं. मी त्यातून सुटलो नि थेट सिद्धार्थ कॉलेजात दाखल झालो. तिथं मला पहिल्या वर्षाच्या वर्गात चिं. त्र्य. खानोलकर उर्फ विख्यात कवी आरती प्रभू भेटले. त्यांच्या शिक्षणात तब्बल अकरा वर्षाचा गॅप पडला होता. तेवढाच गॅप माझ्या आणि त्यांच्या वयात होता. तेही माझ्याच वर्गात होते आणि त्यांना मी त्यांच्या नव्या कविता मुखोद्गत असल्यामुळे समोर गाठ पडताच भडाभडा म्हणून दाखवल्या आणि ते अचंबित झाले. त्यांच्याशी मैत्र जुळल्यावर त्या क्रिकेटर आणि कवींनी गजबजलेल्या कॉलेजात माझी इतर कवींशी ओळख व्हायला वेळ लागली नाही. त्यात केशव मेश्राम, वसंत सावंत ही बडी कवी मंडळी आणि वसंत हुबळीकर, वसंत सोपारकर, सुधीर नांदगावकर, माधव अत्रे… अशी बरीच साहित्यिक मंडळी भेटली. ही सगळी मंडळी नोकरी करून शिकणारी होती आणखी सगळे विद्यार्थी मंडळी बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होती. कवी शांताराम नांदगावकर हे त्याआधीच्या बॅचचे विद्यार्थी होते, परंतु ही सगळी मंडळी कविसंमेलनाच्या दिवशी एकत्र येत. माझ्या पहिल्या वर्षीच्या कविसंमेलनात मंचावर बसलेला आरती प्रभूंनी विद्यार्थी श्रोत्यात बसलेल्या माझ्याकडे हातवारे करीत वर यायला खुणावले नी ते खरे न वाटून मी आसपास या मुलांकडे बावळटासारखा पाहात राहिलो. तेवढ्यात कुणीतरी मला हाताला धरून खेचले आणि माझ्या या साहित्यिक वर्तुळात प्रवेश झाला. आम्ही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना रूपारेल सोडून वसंत गुर्जर आमच्या वर्गात दाखल झाला आणि त्याची नि माझी कायमची जोडी जमली. कॉलेजात शिकत असो-नसो जोडी मात्र कायम.

दरम्यानच्या काळात १९६०च्या सुमारास ‘शब्द’ नावाच्या १९५५पासून निघणाऱ्या कवितेला प्राधान्य देणाऱ्या चक्रमुद्रित नियतकालिकाचा अखेरचा अंक छापील स्वरूपात निघाला आणि मराठी साहित्यात एक खळबळ माजली. एक धरणीकंपासारखा धक्का बसला. अशोक शहाणे संपादित ‘शब्द’ या नियतकालिकाचा अखेरचा अंक एकीकडे नियतकालिकांच्या पद्धतीचा मुडदा पाडणारा अंक होता. दुसरीकडून पाहिलं तर तेच खरं मराठीतलं पहिलं अनियतकालिक होतं. याचं प्रतिक म्हणजे ‘शब्द’चा अंक पुन्हा निघाला नाही. कारण it is beginning has got end in itself. तर असं हे अनियतकालिकाचं जग ‘शब्द’च्या त्या अंकाच्या रूपात मला भेटायला आल, तेव्हा तो अंक माझ्या हातात पाहून माझा साहित्यिक मित्र माधव अत्रे मला म्हणाला, अरे, हा अशोक शहाणे फार भयंकर माणूस आहे. तू त्याच्या नादाला लागू नकोस. आणि पुढे त्याच्याच नादाला लागलो. पुढे वर्षभराने सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकाचे साहित्यविषयक पुरवणीचे संपादक असलेले शंकर सारडा यांना मी ‘असो’चा अंक द्यायला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात गेलो. तेव्हाही – अहो, या लोकांच्या नादी आपले करिअर का खराब करताय? असा त्यांनी मला सल्ला दिला होता.

इकडं मधल्या वर्षभरात अशोकनं आधीपासून तोट्यात चाललेल्या ना. वि. काकतकरांच्या ‘रहस्यरंजन’ या रहस्यकथा छापणाऱ्या मासिकाचं एका उत्कृष्ट साहित्यविषयक नियतकालिकात तर रुपांतर केलेच, परंतु साईड बाय साईड काकतकरांनी दुर्गा भागवत यांना घेऊन ‘गंमतजंमत’ हे लहान मुलांचं मनोरंजन करणाऱ्या नमुनेदार मासिक काढले. त्याच दरम्यान सुविख्यात कवी विंदा करंदीकर यांनी ‘एटू लोकांचा देश’ या नावाचा लहान मुलांसाठी मोठ्यांच्या वेगळ्याच बालगीतांचा गुच्छ ‘मौज’च्या दिवाळी अंकात छापला होता. माझ्यातला बालक जागा होऊन, माझ्या डोळ्याच्या खिडकीत उभा हे सगळं सतर्कपणे टिपत होता.

हॅलो! पोपट भाय!..

तुमच्या गळ्यामध्ये टाय

ओठावर लिपस्टिक

भलतेच काय?

त्या दोन दिवसात माझ्या सुप्त मनात झोपलेली ६१ बालगीते माझ्या ओठावर आली. ती कागदावर उमटली. त्यातल्या निवडक बालगीतांचा एक बंच मी ‘गंमतजंमत’च्या पत्त्यावर पाठवला आणि काही महिने उलटल्यावर त्यांचा पाठलाग करत मी ३७ वेस्टन इंडिया हाउस वर पोहोचलो तर काय? माझ्या कवितांची वही ही दुर्गाबाई भागवतांच्या समोरच्या टेबलावर पडली होती आणि तिला जोडलेल्या शेवटच्या दोन चार पानांपैकी एक कोरं पान टर्रकन फाडून आपल्या समोर येऊन बसलेला अभ्यागताला चिठ्ठी लिहून देत होत्या. त्यावर मी मनात खट्टू झालो. नंतर काही दिवसांनी कार्यालयात गेलो. आणि त्या बेवारस वहीकडे बोट दाखवून नाना काकतकरांना मी म्हणालो, अहो, ती बालगीते छापणार आहात की नाही, नसाल तर ती वही मी घेऊन जातो. ते पटकन मान वर करून भांबावलेल्या नजरेने मजकडे पाहू लागले. का? ती वही तुमची आहे? बसा.. बसा! काही चहा वगैरे…

आणि मग त्यांच्या कार्यालयावर काही ना काही कारणाने कधी केशव मेश्राम बरोबर तर कधी चिं. त्र्य. खानोलकरांबरोबर कधी एकटाच. कारण तोपर्यंत माझे काकतकरांमार्फत अशोकशी, रघुशी सूर जुळत गेले होते आणि त्यांच्या कंपूपैकीच एक झालो होतो. एक वेळ मी नानांसमोर बसलो होतो. इतक्यात भला उंच नी धट्टाकट्टा माणूस खुर्चीत येऊन बसला. हातात पुस्तकाचे बंडल. इतक्यात ना. वि. काकतकर म्हणाले, अरे ये ये! हा बघ तुझ्या कवितेची स्तुती करत असतो. नेमाड्यांनी माझ्याकडे चमकून पाहिलं. कोणती कविता?

‘पाठीशी भिंत तुझ्या/ वरती चिमण्यांचा खोपा.’

ती ‘रहस्यरंजन’च्या दिवाळी अंकातील. असं बोलून ते खो खो हसले आणि म्हणाले, हा हा ती तर आम्ही बरीच लिहिली होती. असं म्हणून त्यांनी मला टाळी दिली. मैत्री वाढली. पुढे १९६४ साली मला नोकरी लागली आणि नानांच्या आणि अशोकच्या कृपेने माझा ‘आत्ता’चा फोल्डर अवघ्या वीस रुपयात पुण्यात छापून मुंबईत येता झाला. हे सांगताना जे सांगायचं ते राहून गेलं. मी माझ्या बालगीतांबद्दल विचारल्यानंतर दोन-चार महिन्यातच ‘गंमतजंमत’च्या पहिल्या पानावर माझी बालगीते छापून येऊ लागली. पुढे ‘गंमतजंमत’ बंद पडलं. पण माझं बालगीत लिहिणं बंद पडलेलं नाहीत. आजही माझ्याकडे जवळजवळ ३०० बालगीते पडून आहेत.

जाधव : ‘आत्ता’ बंद पडण्याचे कारण काय?

ढाले : अहो त्यावर आम्ही लिहिलं होतं, ‘वाट्टेल तेव्हा निघेल’. म्हणजे कधीही निघू शकतं. अगदी आजसुद्धा. पण त्याला चांगला मजकूर वेळोवेळी मिळायला नको का? तरीही त्यांचे मी सहा अंक काढल्याचे आठवतं. त्यानंतर मी ‘तापसी’चा एक अंक काढला. त्यानंतर ‘येरू’चे दोन अंक काढले. त्यात १९६९ला निघालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ‘येरू’त मी ‘सत्यकथेची सत्यकथा’ हे ‘सत्यकथे’बद्दलचं स्फोटक समीक्षण लिहिलं व त्यांच्या खटाववाडीच्या गल्लीत जाऊन ‘सत्यकथे’चा ताजा अंक जाहीरपणे आम्ही जाळला. त्यामुळे हळूहळू उच्चभ्रू वाचकातील ‘सत्यकथे’बद्दलची क्रेझ मावळत गेली आणि ‘सत्यकथा’ मासिक बंद पडलं.

काळे : तुमचा ‘येरू’मधील ‘सत्यकथेची सत्यकथा’ हा लेख प्रकाशित झाल्यावर तुम्ही दिल्लीला आलेल्या लघुअनियतकालिकांच्या संमेलनाला गेलात. या मागे काय भूमिका होती? तुम्हाला का जावसं वाटलं?

ढाले : हिंदीत ‘लिटल मॅगझिन्स’ना त्या काळात ‘लघुपत्रिकाएँ’ असं संबोधन होतं. दिल्लीतल्या चालवल्या जाणाऱ्या ‘आवेश’ नावाच्या या एका लघुपत्रिकेचे संपादक असलेला हिंदीतला नवकवी, नवकथाकार नी नवकादंबरीकार म्हणून प्रख्यात असलेल्या रमेश बक्षीने हे भारतातल्या लघुपत्रिकांचे प्रदर्शन निमंत्रित व आयोजित केलं होतं आणि त्याचं निमंत्रण त्याने आम्हाला पाठविले होते. कारण त्याला मराठीतल्या या चळवळीची माहिती झाली होती म्हणा अथवा आम्ही त्याचा हा अभिनव उपक्रम त्याकाळच्या वृत्तपत्रातून वाचला म्हणा. आम्ही या प्रदर्शनात सहभागी होत आहोत, असं त्याला कळवलं. आता त्याच्या या उपक्रमात का सामील झालो? ह्याचं माझ्या परीनं मला वाटलेलं उत्तर असं की, भारतात फोफावलेली ‘लिटिल मॅगझिन’ची चळवळ प्रस्थापित साहित्य व्यवस्थेविरुद्धची लढाई होती. साहित्यातील प्रस्थापिततेचं एक प्रतीक म्हणजे माझ्या दृष्टीनं ‘सत्यकथा’ सुद्धा होती. म्हणून आम्ही ती जाळली होती. साहजिकच आम्ही ‘लिटिल मॅगझिन’चळवळीचे पुरस्कर्ते आणि प्रस्थापित साहित्य व्यवहाराच्या विरुद्ध उभे ठाकलेले लोक होतो. तेव्हा दिल्लीतल्या त्या ‘लिटिल मॅगझिन’च्या प्रदर्शनाला जाण्यात आमचं काही चुकलं, असं आजही आम्हाला वाटत नाही.

काळे : तुमच्या जाण्याबद्दल ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही.. मी भूमिकेबद्दल विचारलं…

ढाले : तर याबाबत अधिक काही सांगायचं तर या पथकात वसंत गुर्जर, चंद्रकांत खोत, सतीश काळसेकर, प्रदीप नेरूरकर आणि मी असे पाच लोक होतो. दिल्लीत तेव्हा नुकतेच टीव्हीचे प्रसारण सुरू झाले होते. या प्रदर्शनाच्या बातमीत मी प्रथमच टीव्हीवर चमकलो होतो. कदाचित तो टीव्ही प्रक्षेपणाचा पहिला किंवा दुसरा दिवस असावा.

जाधव: दिल्लीत भरलेल्या लघुपत्रिकांच्या १९६९च्या त्या प्रदर्शनाला आपण कसे गेलात, त्या विषयी थोडे सांगा. या विषयी गुरुनाथ धुरींनी काही लिहिलं होतं…

ढाले : त्यावेळी आम्ही आम्हा पाच जणांचा राऊंड टूर तिकीट काढलं होतं. पंधरा दिवसांच्या प्रवासाचं. त्यात ठिकठिकाणी मुक्काम करत आम्ही दिल्ली गाठली. दिल्लीत उतरायचं कुठं हा प्रश्न होता. म्हणून गुरुनाथ धुरीचा पत्ता शोधत गेलो. सामान ठेवलं. रमेश बक्षीच्या पत्त्यावर जाऊन त्याला आलो असल्याचा निरोप दिला. प्रदर्शनाच्या दिवशी त्या हॉलमध्ये आमचं अगत्यानं स्वागत करणाऱ्या लोकांमध्ये हिंदी साहित्य विश्वातील प्रसिद्ध लेखक आणि लोक साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. श्याम परमार आणि त्यांची पीएचडीची विद्यार्थिनी असलेली त्यांची परमशिष्या मोना गुलाटी हे अग्रभागी होते. हिंदीतले डॉ. नामवरसिंह यांनी त्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले असावे. त्यांच्या अध्यक्षतेखाली मुद्राराक्षस आदी प्रसिद्ध लेखकांच्या भाषणांनी गुंफलेला एक परिसंवादही संपन्न झाला असावा, असे अंधुकपणे आठवते. पण स्पष्टपणे आठवतात त्या त्याकाळी दिल्लीत राहणाऱ्या प्रसिद्ध मराठी लेखिका वसुधा माने. प्रदर्शनस्थळी त्या आम्हाला शोधतच आल्या आणि प्रदर्शन संपल्यावर आमच्या चंबुगबाळ्यासहित आम्हाला आपल्या घरी मुक्कामाला घेऊन गेल्या. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या ‘अबकडई’च्या संकलनात गुरुनाथ धुरी यांनी ‘अबकडइ’च्या दिवाळी १९८१च्या अंकातला त्यांचा या बाबतीतला संदर्भ असलेला लेख पुनर्मुद्रित झालाय. त्यात माझ्याबद्दलची मनातली मळमळ ओकताना ते म्हणतात पण या क्रांतिकारी लोकांना हरिद्वारला जाण्याची तलफ आली. हरिद्वारला जाऊन ढालेंसहित या सर्व क्रांतिकारकांनी भक्तिभावाने गंगेत अंघोळी केल्या. तोवर मी त्यांनी सोडून ठेवलेली वस्त्रे सांभाळीत किनाऱ्यावरच बसून राहिलो.

आता पहा, गुरुनाथ धुरींनी माझ्याबद्दल असं उपहासानं का लिहिलं? कारण ते ‘सत्यकथे’चे मान्यवर कवी होते आणि मी तर ‘सत्यकथा’ जाळली होती. त्याचीही मळमळ होती, आहे. माझ्याबरोबर असलेले माझे चारही सोबती धर्मानं हिंदू होते आणि त्यांच्यासोबत मीही होतो. ते करतील ते करण्यात माणुसकी होती आणि कुणा धर्माचा बांधील नाही – हे सांगणाऱ्या नी सत्याग्रह करणाऱ्यांपैकी मीही एक आहे. मग पाण्यात उतरण्याचा हक्क मी कसा नाकारीन? गुरुनाथांचं हे सगळं म्हणणं आणि वागणंच तर्कदुष्टपणाचं आहे आणि नेमकं तेच मांडणारा लेख संपादक सतीश काळसेकर यांनी ‘अबकडई’च्या सर्वोत्कृष्ट लेखनाच्या संकलनासाठी निवडावा? Is there any design behind it?

असा प्रश्न पडायचं कारण या आमच्या दिल्ली प्रवासाची डायरी आमचे मित्र सतीश काळसेकर यांनीही लिहिली आहे. तिच्यातला काही भाग त्यानंतर कधीतरी एका मासिकात वा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला मी वाचला आहे. त्या अंकात नेमका तोच भाग त्यांनी छापला आहे, ज्यात त्यांनी मला भित्रा ठरवला आहे. मिस्टर सतीश काळसेकर हे लक्षात ठेवा की, दलित पँथर ही लढाऊ संघटना, त्यानंतर स्थापन झाली. त्याआधी नव्हे. मी जर भित्रा असतो, तर मला हे कसं शक्य आहे वा असते? खरं तर दलित पँथरच्या लढाऊ इतिहासात पोलिसांशी समोरा-समोर टक्कर देणारा आणि प्रत्यक्ष रणांगणावर रक्त सांडणारा एकच माणूस आहे. तो म्हणजे राजा ढाले. दुसरे भगोडे होते. त्याचं महत्त्व वाढविण्यात तुम्ही सतत मदत केलीत. त्याला पुरोगामी ठरवलंत. पण आज तो कुठे आहे? ज्याच्यावर केवळ २७ केसेस सरकारने चळवळीच्या संदर्भात भरल्या. त्यांचा गाजावाजा त्याने कधी ३०० तर कधी ३००० सांगून आकडा वाढवत नेला आहे. माझ्यावर आधी ६९ केसेस होत्या. ती संख्या आजमितीस ७० आहे. परंतु मी कधी बडेजाव मारलेला नाही. पण डाव्या चळवळीतल्या आपल्यासारख्या लोकांनी माझ्याविरुद्ध खोटेनाटे लिहून त्याच कागदपत्राचा वापर करून आमच्यातल्या स्वतःला डावे समजणाऱ्या कुणा एका राहुल कोसंबीच्या हाताने ‘मुक्तशब्द’च्या दिवाळी अंकात लेख लिहून खऱ्याचं खोटं नी खोट्याचं खरं करत आहात ते का? खरं तर या ‘लिटिल मॅगझिन्स’च्या चळवळीची फलश्रुती हीच काय? लिटिल मॅगझिन्सच्या अंताला सुरुवात झाली ती १९६९नंतर आम्ही दलित साहित्याच्या संकल्पनेत शिरल्यावर, तुम्हाला वाटते. आम्ही तर सवर्ण आहोत मग आम्ही दलित कसे? कारण आपण जाती जवळ अडला होतात. मग मानवतावादाकडे येणार कसे? म्हणून तुम्ही आणि तुमचे विचारवंत मार्क्सवादाकडे पळालात. डाव्या चळवळीच्या आड लपलात. हे तुमचे पुरोगामित्व!

जाधव : हे सगळं विदारक आहे…

काळे : १९६९साली लिटल मॅगझिन्सची जी काय तथाकथित चळवळ होती ती दुभंगण्याकडे प्रवास करत असताना आपण काय केलंत?

ढाले : त्याच काळाच्या आसपास दलित साहित्याची संकल्पना ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाच्या आधारे उभी राहू पाहत होती आणि दलित साहित्याच्या आधारे ‘अस्मितादर्श’ हे नियतकालिक नव्यानं उभं राहू पाहत होतं. त्या नियतकालिकाचा पहिला अंक डिसेंबर १९६७मध्ये ‘अस्मिता’ या नावाने निघाला होता. ते त्रैमासिक असून त्याचा दुसरा अंक ‘अस्मितादर्श’ या नावाने निघाला आणि पुढं तो त्याच नावानं निघू लागला. त्यावेळी त्याची सूत्रं डॉ. म. ना. वानखेडे यांच्या हाती होती. अंक निघत राहिले. चर्चेने जोर धरला. त्यातच १९६८ सालच्या ‘मराठवाडा’ दिवाळी अंकात दलित साहित्याची संकल्पना उलगडणारी, या विषयीचा मूलगामी वेध घेणारी चर्चा प्रा. एम. बी. चिटणीस आदींच्या नेतृत्वाखाली झडू लागली. दरम्यानच्या काळात वरून पुरस्कार आणि आतून तिरस्कार हे संकल्पनेच्या विरोधकांनी सूत्र अवलंबिले. यात डाव्या विचारसरणीचे डॉ. सदा कऱ्हाडे आणि प्र. श्री. नेरुरकर यांचा या संकल्पनेला बेमालूम विरोध होता. तो ‘सत्यकथे’तून लेखरूपाने प्रकट झाला, तर ‘समाजप्रबोधन पत्रिके’तून लेख लिहून हेच काम उघडपणे वसंत पळशीकर यांनी चालविले होते. म्हटली तर ही ब्राह्मण लॉबी होती. म्हटली तर ही पुढे प्रगत साहित्य सभेचं गोंडस रूप घेऊ पाहणारी डाव्यांची दलित साहित्य चळवळीला आतून विरोध करणारी कारवाई होती. १९७० सालच्या अखेरीस तिचा दंभस्फोट करणारा एक खळबळजनक नी तर्कशुद्ध असा प्रदीर्घ लेख मी नामदेवच्या ‘विद्रोह’साठी लिहिला. तो प्रदीर्घ लेख छापण्याची ऐपत छदामही खिशात नसलेल्या नामदेव ढसाळांची नसल्यामुळे मी अलिबागच्या चिंतामण वामन जोशी यांच्या मुद्रणालयातून छापून घेतला. हा त्याचा खरा इतिहास आहे. त्याच्या कव्हरवरचं चित्रही माझंच आहे. त्या लेखाचं नाव होतं, ‘दलित, दलित साहित्य, टिक्कोजी… वगैरे वगैरे’ या लेखातच सर्वप्रथम निग्रो जमाती आणि दलित जमाती यांच्या जीवनातील आणि गुलामगिरीतील साम्य मी दाखवून दिले आहे. मराठवाड्यातील कुणा जनार्दन वाघमारेने नव्हे. या लेखात मी निग्रोंच्या मुक्ती चळवळीचा आलेख काढताना प्रा. काणेकरांच्या एका लेखात अपवाद करता मीच सर्वप्रथम ‘ब्लॅक पँथर’ या चळवळीचा उल्लेख केला आहे. कुणा ऐऱ्यागैऱ्या नथुखैऱ्याने नव्हे. ‘पँथर’ आपल्या दबलेल्या पावलानं दलित जगतात वावरू लागला तो इथून. तो अंक दिनांक ११ फेब्रुवारी १९७१ रोजी महाड येथे संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेच्या अधिवेशनात प्रकाशित झाला होता.

काळे : तर ‘ब्लॅक पँथर’चं काय?

ढाले : १९६८ साली अमेरिकेत‘ब्लॅक पॅँथर’ची चळवळ सुरू झाली. अमेरिकेतील निग्रोंना स्वतःला ‘ब्लॅक’ म्हणून घेणं अधिक उचित वाटतं. कारण ‘निग्रो’ हा वंशवाचक शब्द आहे. तर ‘ब्लॅक’ हा कलरवाचक शब्द आहे आणि निग्रो या शब्दापासून अमेरिकेतील गोऱ्यांनी त्यांच्यासाठी ‘निगर’ हा तुच्छतावाचक शब्द प्रचारात आणलेला आहे. अमेरिकेत राहणारे आणि ‘रेड इंडियन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिथल्या वसाहतकारी आदिम जमाती पलीकडे पसरलेले गोऱ्या रंगाचे नववसाहत कार हे जसे अनेक देशातून आलेले विविध वंशाचे ‘व्हाईट’ आहेत, तसेच विविध देशातून आणि विविध पार्श्वभूमीतून आलेले आम्ही लोक ‘ब्लॅक’ आहोत हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हा अमेरिकेतील वंशभेदाचा लढा आहे. असं म्हणणं त्यांना अधिक व्यापक आणि सयुक्तिक वाटतं. म्हणून ते स्वतःला ‘ब्लॅक’ म्हणून घेतात आणि स्वतःच्या साहित्याला ‘ब्लॅक लिटरेचर’, स्वतःच्या काव्याला ‘ब्लॅक पोएट्री’ असं संबोधतात. असं मला त्या विषयाकडे वळल्यावर अभ्यासाअंती आढळून आलं. परंतु मी या विषयाकडे कसा वळलो? त्याविषयीची एक गंमत सांगतो. फोर्टमधल्या पी. एम. रोडवरील ३७ वेस्टर्न इंडिया हाऊसमधल्या ‘रहस्यरंजन’च्या कार्यालयात वा त्यासमोरच्या रस्त्यापलीकडील सेलर रेस्टॉरंटमधील मधूनमधून घडणाऱ्या गप्पांच्या अड्ड्यावर अशोक शहाणे, रघू दंडवते, भाऊ पाध्ये, कधीकधी ‘एक शून्य बाजीराव’च्या स्वगतात रमलेला, रंगलेला माधव वाटवे, मधूनच भालचंद्र नेमाडे, अधून मधून अरुण कोलटकर असे लोक उगवत असत. त्यात मीही डोकावत असे. एकवेळ गप्पांच्या ओघात अशोक म्हणाला, “अरे, जमिनीचा एक इंच जाडीचा सुपीक थर निर्माण व्हायला सुमारे चारशे वर्षं लागतात” आणि मी हडबडलो. आयला ह्याला हे ज्ञान कुठून प्राप्त होतं? त्याकाळी मी रद्दीतली मासिकं, पुस्तकं धुंडाळत असायचो. अशाच एका चाळणीत मला ‘टाईम’ या अमेरिकन साप्ताहिकात नव्यानंच येत असलेल्या Ecology या टॉपिकचा शोध लागला. मग त्याच्या आसपासच ‘ब्लॅक पँथर’च्या अमेरिकेतील शूट आऊटच्या भानगडीबद्दल, पोलिसांच्या त्यांच्याबद्दलच्या सक्त कारवायांबद्दल नी पँथर्सच्या बळी जाण्याबद्दल आणि त्यांच्यावरील न्यायालयीन ‘ट्रायल्स’बद्दलचे रकाने ‘टाईम’ मधून येऊ लागले. पाठोपाठ मी ‘न्यूजवीक’ही त्यासाठी घेऊ लागलो. तो काळ होता १९६८ व त्यानंतरचा. त्या काळात धीरेधीरे पँथरची धीमी पावलं माझ्या मनात उमटू लागली, वाजू लागली. त्यातच देशभर दलितांवर होणाऱ्या भयभीषण अत्याचारांची हृदयद्रावक कहाणी आकडेवारीतून सांगणारा १९६९-७०चा एलिया पेरूमल कमिशनचा रिपोर्ट बाहेर आला आणि मी प्रचंड अस्वस्थ झालो. आणि या अत्याचारांच्या मुळावर प्राणांतिक घाव घालावा असं मला वाटू लागलं. यातूनच पुढे पँथर ही चळवळ जन्माला आली. पण हा पँथर दलित कसा असेल? हा पँथर ‘दलितत्त्वा’चा अर्धांगवायू झालेला अथवा लकवा मारलेला कसा असू शकेल? या पॉइंटवर मी अडलो होतो. परंतु हा सारासार विवेक न उरलेल्या दोघांनी, माझ्याकडून ऐकलेल्या ब्लॅक पँथर बद्दलच्या ऐकीव माहितीवर विसंबून माझ्या गैरहजेरीत माझ्या अपरोक्ष त्यांनी दलित पँथर या संघटनेची घोषणा केली व पहिले कार्यकारी मंडळही ‘नवाकाळ’ मधून जाहीर केले. त्याचा इतरत्र एका पुस्तिकेत मी साधार ऊहापोह केलेला आहेच. (पहा दलित-पँथर वस्तुस्थिती आणि विपर्यास, राजा ढाले) आज ते दोघे कुणाच्या वळचणींना अंगाचं मुटकुळं करून इमानी कुत्र्यांसारखे हांपत पडलेले दिसतील आणि आपणाला प्रश्न पडेल की हेच का ते एकेकाळचे ‘पँथर’ आणि ‘पँथर’चे संस्थापक.

खरं तर, नामदेव ढसाळ आणि माझा परिचय १९७० ला झाला. माझ्या ऑफिसमधले एक सहकारी भीमराव शिरवाळे यांची कथा ‘सत्यकथे’च्या फेब्रुवारी १९७०च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यांनी ती मला वाचायला दिली. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती मी वाचली व पाठ थोपटली. त्यानंच मला त्या अंकातील नामदेव ढसाळांची कविताही वाचायला सांगितली व तोही आपलाच आहे असं मला सांगितलं. ती ‘मशिदीच्या वाटेवरून’ नावाची ‘सत्यकथे’तून प्रसिद्ध झालेली कविता होती. म्हणजे मी जी ‘सत्यकथे’च्या उंच मिनाराची वाट नाकारली होती, त्याच वाटेवरून हे गवसे गडी अथवा वाट चुकलेले फकीर चालले होते. त्यांना माहितच नसावे की आदल्याच वर्षी मी ‘सत्यकथे’ची होळी केली आहे, किंवा त्या होळीचा एक चांगला परिणाम म्हणून त्यांच्या कथा कवितांची वर्णी ‘सत्यकथे’त लागली आहे. परंतु मी ‘सत्यकथा’जाळली आहे, हे कळल्यावर त्यांच्या मनात एक सुप्त इसाळ वा असूया निर्माण झाली असावी आणि ती पहिल्यापासूनच त्यांच्या मनात दबा धरून असावी आणि माझ्याविरुद्ध सतत काम करीत असावी. खरं तर ‘दलित’ या शब्दाला माझा तात्विक विरोध असताना या बाबूराव बागुलांच्या तत्कालीन शिष्याने ‘दलित पँथर’ हे अडनिडे नाव जाहीर करण्यात बाजी मारली परंतु जेव्हा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आपला अग्रलेख या नावावर आगपाखड करून लिहिला तेव्हा त्या ‘दलित’ या शब्दात लपलेल्या विरोधाभासावर तर्कशुद्ध भाष्य करण्यासाठी नामदेव ढसाळ पुढे आले नाहीत. आले ते राजा ढाले आणि त्यांनी या बोलघेवड्यांना चारी मुंड्या चीत केले. कारण मित्र संकटात आल्यावर लपून बसणारा मी नाही. मी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेले ते टोलेजंग उत्तर कोण विसरेल?

आणि नामदेवनं माझ्यावर आणलेली दुसरी बिलामत म्हणजे त्याच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा प्रसंग. घड्याळाचे काटे सहावर सरकले आणि तो प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला..ताडदेवचा ताटकळलेला रुसी मोदी हॉल अस्वस्थ झाला. मंचावर सगळे निमंत्रित भाष्यकार आणि अध्यक्ष उपस्थित होते. प्रकाशक नारायण आठवले आणि नामदेव ढसाळ, विजय तेंडुलकर यांची वाट पाहत होते. इतक्यात नामदेव ढसाळ मंचावरून उतरून थेट शेवटी बसलेल्या मी व गुर्जरापर्यंत आले. तशा सभागृहातल्या सगळ्या माना गर्रकन मागे वळल्या. नामदेव मला हाताला धरून उठवीत होता. आणि मी त्याला सांगत होतो की मी नियोजित वक्ता नाही. आणि मी वर येणार नाही. परंतु सभागृहातल्या सगळ्या नजरा माझ्यावर खिळल्यावर मला ऑकवर्ड वाटले आणि मी उठत उठत त्याला अट घातली की मी सगळ्यात शेवटी बोलेन. नामदेवनं ते मान्य केलं आणि शेवटी भयानक नाट्य घडलं. माझ्या आधी सदा कऱ्हाडे, दुर्गा भागवत प्रभृती चार-पाच वक्ते बोलून झाल्यावर मी बोलायला उभा राहिलो. महाराचं गाणं आणि बामणाचं लिवणं या म्हणीपासून मी लोकसाहित्याच्या प्रांगणात शिरलो आणि दैवतशास्त्र आदी दोन-तीन ज्ञानशाखातलं काहीही येत नाही हे सोदाहरण स्पष्ट केलं. तसं सभागृहासकट दुर्गाबाईही अवाक् झाल्या. त्यांची मान होकारार्थी हलू लागली. डोळ्यातून टिपंगळू लागली. समोर बसलेले माझे मित्र अशोक शहाणे, रघू दंडवते, भाऊ पाध्ये आदी हा प्रकार आ वासून पाहतच राहिले आणि त्यातच मी दुर्गाबाईंवर अखेरचा हल्ला चढवला आणि म्हणालो की, कवितेतले यांना काहीच कळत नाही… त्यानंतर प्रकाशकावर मी घसरलो. तो बाहेरच उभा होता. त्याला आतली गडबड ऐकू गेली, परंतु दरवाजात तुडुंब गर्दी असल्यामुळे तो बाहेरूनच ओरडू लागला, ए भाषण बंद करा! त्यांना बोलू देऊ नका! हे ऐकल्याबरोबर आमचा सर्वात मागे बसलेला होस्टेलियर मित्र लतिफ खाटिक लोकांच्या अंगावरून पुढे पळत आला आणि म्हणाला भाषण झालेच पाहिजे कोण बंद पाडतंय ते बघू. समोर येऊन बोला. त्या जनसंमर्दासमोर नारायण आठवले यांचा आवाज गडप झाला. पुन्हा पाच-दहा मिनिटं मी बोललो आणि थांबलो. खाली उतरलो नी बाहेर पडण्यासाठी दरवाज्याकडे चाललो तर अभिनंदन करण्यासाठी माझ्यावर गर्दीचा लोंढा तुटून पडला.

इतक्यात त्या गर्दीतून वाट काढत प्र. श्री. नेरुरकर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, अरे बाई एकट्याच डायसवर बसून रडत आहेत. चल त्यांची माफी माग. इतक्यात माझ्या बाजूला उभा असलेला भाऊ पाध्ये उसळून म्हणाला, माफी कशासाठी? बाईंना सांगा की त्यानं उभ्या केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, माफी कसली. या माझ्या अडेलतट्टू वागण्यावर संतापून, त्यानंतर महिन्या पंधरा दिवसातच ‘साधना’ साप्ताहिकातून प्रकाशित झालेल्या माझ्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखाविरुद्ध ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये निषेधाचं पत्र लिहून दुर्गा भागवतांनी माझ्याविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अपमान केला म्हणून महाराष्ट्रात काहूर उठविलं. सरकारनं केसेस भरल्या परंतु दुर्गाबाईंच्या शाब्दिक ठोक्यांनी ज्याच्या कवितेची नौका त्यादिवशी कायमची रसातळाला जाणारी ती त्याची डगमगती नैया मी माझ्या शब्दाच्या धारेने उद्धरली होती, तो नामदेव ढसाळ कुठल्याही प्रकारचा बंडखोर नाही. उलट तो पावलोपावली व्यवस्थेला नी सर्वांना शरण जाणारा लाचार मनुष्य आहे. काही लोक चळवळी जगतात, काही लोक चळवळीवर जगतात, असं हे ‘पँथरचं जग’ आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0