कोकणसह प. महाराष्ट्राला लवकरच आर्थिक मदत

कोकणसह प. महाराष्ट्राला लवकरच आर्थिक मदत

रत्नागिरीः केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत

‘पुरामुळे नुकसान रोखण्यासाठी कठोर निर्णय हवेत’
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

रत्नागिरीः केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले.

वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी मंत्री रविंद्र माने, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, सोमवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसेच औषध कपडे-लत्ते व इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्दयांवर अडचणी येऊ नये यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत असेही ते म्हणाले. केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणे झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर तसेच हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राकडून आर्थिक मदतीबाबत पूर्ण आढावा घेतल्यानंतरच मागणी केली जाणार आहे.

 मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

२७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला, तरी या आपत्तींमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे अशी उद्धव ठाकरे यांनी विनंती केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: