तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अहमदाबादः २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात खोटे साक्षीदार उभे करून निर्दोष व्यक्तींना फसवण्याच्या आरोपावरून सध्या अटकेत असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या

‘बार्क’चा रिपब्लिकवर आरोप
महुआ मोईत्रा : १० मिनिटांचे तडफदार भाषण
राज्यातल्या ७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्ह्यांची नोंद

अहमदाबादः २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात खोटे साक्षीदार उभे करून निर्दोष व्यक्तींना फसवण्याच्या आरोपावरून सध्या अटकेत असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या व पत्रकार तिस्ता सेटलवाड व गुजरातचे माजी पोलिस महानिरीक्षक आर. बी. श्रीकुमार यांना शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या दोघांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. या दोघांची पोलिस चौकशी पूर्ण झाल्याने पोलिसांनी पुन्हा रिमांड मागितला नाही. त्यामुळे शनिवारी महानगर दंडाधिकारी ए. पी. पटेल यांनी या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठ़डी सुनावली.

आपल्याला पोलिस कोठडीत संरक्षण द्यावे अशी मागणी सेटलवाड यांनी आपल्या वकिलांमार्फत केली होती. स्वयंसेवी संघटनेत अनेक वर्षे काम केल्याने साबरमती तुरुंगात असलेले अनेक आरोपी आपल्याला ओळखतात, त्यांच्याकडून आपल्याला धोका असून संरक्षण न दिल्यास इजा पोहचेल अशी भीती सेटलवाड यांनी व्यक्त केली होती.

गेल्या शनिवारी तिस्ता सेटलवाड व श्रीकुमार या दोघांना गुजरात एटीएसने ताब्यात घेतले नव्हते. हे दोघे पोलिसांना सहकार्य करत नसल्याने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी न देता पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी गुजरात पोलिसांनी केली होती. त्यावर अहमदाबाद येथील स्थानिक न्यायालयाने सेटलवाड व श्रीकुमार यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

२५ जूनला गुजरात एटीएसने मुंबईतून सेटलवाड यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली व त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले. या प्रवासादरम्यान पोलिसांनी आपल्याला शारीरिक इजा केली असा आरोप सेटलवाड यांनी केला. सेटलवाड यांचा ताबा अहमदाबाद क्राइम ब्रँचकडे सध्या असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

अहमदाबाद क्राइम ब्रँचने सेटलवाड, श्रीकुमार व संजीव कुमार भट्ट यांच्याविरोधात २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात खोटे पुरावे सादर करून कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याची फिर्याद दाखल केली आहे. या तिघांवर भारतीय दंड संहितेअंतर्गत कलम ४६८, ४७१, १२०ब, १९४, २११ व २१८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

या तिघांची चौकशी एसआयटीने करत आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0