एल्गार परिषद प्रकरणः प्रा. हनी बाबूंचा जामीन अर्ज फेटाळला

एल्गार परिषद प्रकरणः प्रा. हनी बाबूंचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्लीः एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू यांचा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. न्या. एन. एम. जमादार व न्या. एन. आर. बोरकर यांच्या पीठाने हा निर्णय दिला. प्रा. हनी बाबू यांच्या जामीन अर्जाला राष्ट्रीय तपास यंत्रणाने आक्षेप घेतला होता. त्यावर न्यायालयाने प्रा. हनी बाबू यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांचे प्राथमिक पुरावे मान्य केले व त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. प्रा. हनी बाबू हे पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप एनआयएचा आहे.

जुलै २०२०मध्ये प्रा. हनी बाबू यांना एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते सध्या नवी मुंबईनजीक तळोजा कारागृहात आहेत.

प्रा. हनी बाबू यांचा जामीन अर्ज या पूर्वी विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला होता. त्या निर्णयाविरोधात गेल्या जूनमध्ये प्रा. हनी बाबू यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. आपल्या विरोधात एनआयएकडे कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

मूळ बातमी

COMMENTS