दहशतवाद्यांना आर्थिक मदतः यासिन मलिकला जन्मठेप

दहशतवाद्यांना आर्थिक मदतः यासिन मलिकला जन्मठेप

नवी दिल्लीः दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्या प्रकरणी बुधवारी काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्य

ओमर अब्दुल्लांची अखेर सुटका
काश्मीरमध्ये जमीन, रोजगारासाठी १५ वर्षाच्या वास्तव्याची अट?
जम्मू-काश्मीर राज्यपालांच्या सूर्य मंदिरातील पूजेवर पुरातत्व खाते नाराज

नवी दिल्लीः दहशतवाद्यांना आर्थिक मदत दिल्या प्रकरणी बुधवारी काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने सुनावली. या शिक्षेबरोबर १० लाख रु.चा दंडही न्यायालयाने सुनावला.

१९ मे रोजी दहशतवाद्यांना मदत दिल्याप्रकरणी यासिन मलिकला न्यायालयाने दोषी ठरवले होते. पण न्यायालयाने शिक्षा सुनावली नव्हती. त्यावेळी यासिन मलिकला फाशी द्यावी अशी मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयाला केली होती. तर यासिन मलिक याच्या वकिलाने जन्मठेप द्यावी अशी विनंती केली होती. खुद्ध मलिक याने न्यायालयाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली होती.

मलिकवर दहशतवाद्यांना आर्थिक मदत, दहशतवादी कारवाया, दहशतवाद कटकारस्थान, दहशतवादी गटाचा सदस्य असणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आरोपांव्यतिरिक्त यूएपीए , देशद्रोह कायद्यांतर्गतही काही गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले होते. पण मलिक याने या आरोपांसंबंधी आपण कोणताही खटला चालवण्यास उत्सुक नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याने आपल्यावरच्या आरोपांची कबुलीही दिली.

न्यायालयीन सुनावणीत यासिन मलिक याने आपण १९९४पासून हातात शस्त्र घेणे बंद करून म. गांधींच्या अहिंसा तत्वावर चालण्याचा निश्चय केला होता. त्यानंतर काश्मीरच्या राजकारणात आपण आजपर्यंत त्याच मार्गावर चालत असल्याचे सांगितले. गेल्या २८ वर्षांत कोणत्याही दहशतवादी कृत्यात आपण सामील असल्याचे भारतीय गुप्तचर खात्याने सांगावे, आणि तसे सिद्ध झाल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ किंवा फाशी मंजूर करू. आपण आजपर्यंत ७ पंतप्रधानांबरोबर काम केले, असे मलिक याने न्यायालयात सांगितले.

दरम्यान यासिन मलिकला न्यायालय शिक्षा सुनावणार असल्याने श्रीनगरमध्ये अनेक भागात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शहरातील मुख्य लाल चौक भाग व त्याच्या आसपासचे सर्व व्यवहार बंद होते. शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0