कर्क डग्लस : अमेरिकन ड्रीमचे प्रतीक

कर्क डग्लस : अमेरिकन ड्रीमचे प्रतीक

हॉलीवूडमध्ये सुमारे सात दशके अभिनयाचा दबदबा राखणाऱ्या कर्क डग्लस यांचे गेल्या बुधवारी वयाच्या १०३व्या वर्षी निधन झाले.

दलित कार्यकर्ता हत्येच्या मुद्द्यावरून मेवानींचे निलंबन
शेतकरी आंदोलनः शीख धर्मगुरुची आत्महत्या
वयोमर्यादा ओलांडलेल्यांना स्पर्धा परीक्षेची एक संधी

कर्क डग्लस हे नाव ५०-६०च्या दशकात ‘अमेरिकन ड्रीम’चे प्रतीक होते. अत्यंत जिद्दी स्वभावाच्या या कलाकाराने जीवनातल्या अनेक संघर्षांवर मात करत हॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि काही काळात त्यांचे नाव अमेरिकेत घराघरात घेतले जाऊ लागले.

कर्क डग्लस यांचा जन्म १९१६मध्ये न्यूयॉर्क राज्यातील अमस्टरडॅम येथे एका ज्युईश-रशियन कुटुंबात झाला. त्यांचे मूळचे नाव इसूर डॅनियोलोव्हिच होते. कर्क यांचे वडील बेलारुसमधून अमेरिकेत नोकरीधंद्याच्या निमित्ताने आले आणि त्यांनी अमस्टरडॅम या छोट्याशा  औद्योगिक शहरात आपले कुटुंब वसवले. कर्कच्या वडिलांचा कपड्याच्या चिंध्या गोळा करण्याचा व्यवसाय होता तर त्यांची आई घर सांभाळत असे. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने कर्कने लहानपणापासून मिळेल ती कामे करून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालण्यास सुरूवात केली.

पण कर्ककडे जीवनात मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यांचा हा स्वभाव पाहून आपण ज्यू असल्याने आयुष्यात चांगले काम करायला हवे असे त्याची आई त्यांना सतत सांगत असे. त्यामुळे कर्कने स्कॉलरशीपवर आपले शालेय शिक्षण केले पण कायद्याचे शिक्षण त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात जायच्या ओढीमुळे अर्धवट सोडून दिले.

शिक्षण मध्येच सोडल्यानंतर कर्कने ‘न्यू यॉर्क अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्टस’मध्ये प्रवेश घेतला. तेथे मेहनत घेतल्यामुळे त्यांना ब्रॉडवेवर काम करण्याची संधी मिळाली. पण नाट्यभूमी हे आपले क्षेत्र नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आपली पावले चित्रपटांकडे वळवली.

या काळात कर्कच्या आयुष्यात लॉरेन बेकॉल ही मैत्रिण आली. कर्क आपल्या मैत्रिणीबद्दल म्हणतात, ‘ती अत्यंत सुंदर होती. निळे डोळे, ब्लाँड, गालावर खळी व बुद्धिमान अशी लॉरेन होती’. लॉरेन त्या काळात प्रसिद्ध अभिनेता हम्प्रे बोगार्टसोबत काम करत होती. तिने काही चित्रपटांची निर्मितीही केली होती. लॉरेनच्या मदतीमुळे कर्कला १९४६मध्ये ‘द स्ट्रेंज लव्ह ऑफ मार्था इव्हर्स’ या चित्रपटात अभिनयाची पहिली संधी मिळाली. या चित्रपटादरम्यान इसूर डॅनियोलोव्हिचचे नामकरण कर्क डग्लस असे झाले.

या चित्रपटात कर्कला मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली नाही पण बार्बरा स्टॅनविक हिच्या अत्यंत दुबळ्या नवऱ्याची भूमिका कर्कला मिळाली. त्यावेळी बार्बरा हॉलीवूडमध्ये अत्यंत प्रसिद्ध होती.

डग्लसचे वडील दारुडे असल्याने दारु माणसाला काय बनवते हे त्यांनी प्रत्यक्षात पाहिले होते. या स्वानुभावातून कर्कने ‘द स्ट्रेंज लव्ह ऑफ मार्था इव्हर्स’मधील वॉल्टर ओ’नीलची अप्रतिम भूमिका वठवली. कर्कची ही सुरवात चांगली झाली पण त्यानंतर ते बघता बघता ‘अमेरिकन ड्रीम’चे प्रतीक बनले.

‘द स्ट्रेंज लव्ह ऑफ मार्था इव्हर्स’च्या यशात कर्कचे मोठे योगदान असल्याची चर्चा चित्रपट समीक्षकांनी केल्याने कर्कसमोर हॉलीवूडचे दार सहज उघडे झाले. त्यावेळी हाल बी वॅलिस हे हॉलीवूड चित्रपट निर्माते नव्या दमदार कलाकारांच्या शोधात होते. त्यांनी कर्कपुढे चित्रपटाचे सात वर्षांचे कंत्राट ठेवले. पण असे एकाच निर्मात्याकडे काम करणे गुलामासारखे असल्याचे वाटून कर्कने हा प्रस्ताव नाकारला. पण या दोघांनी बर्ट लॅन्स्टरला घेऊन १९४७मध्ये ‘आय वॉक अलोन’ हा न्यूयॉर्कमधील माफिया जगतावरचा चित्रपट केला. हाच बर्ट लॅन्स्टर पुढे कर्कचा एकमेव जवळचा मित्र बनून राहिला.

कर्कची महत्त्वाकांक्षा ही जबरी होती. ती त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. माझ्या महत्त्वाकांक्षेमुळे माझी हॉलीवूडमधील प्रतिमा काही काळ चर्चेत असे कर्कने आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.

आपल्या असा स्वभावामुळे १९४८मध्ये कर्कने जर्मन दिग्दर्शक रॉबर्ट सियोडमॅक याच्या ‘द गॅम्बलर’ या दोस्तोवस्कीच्या कथेवर आधारीत चित्रपटाला नकार दिला. या चित्रपटात इव्हा गार्डनर व ग्रेगरी पेक असे मातब्बर कलाकार होते. पण त्या काळात कर्कने कोणाच्याच परिचित नसलेल्या स्टॅनले क्रॅमर याच्या ‘चॅम्पियन’ (१९४९) या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट एका मुष्ठियोद्धाच्या जीवनावर आधारीत होता. हा मुष्ठियोद्धा स्वत:साठी व जगासाठी कसा निर्दयी बनतो यावर या चित्रपटाची कथा बेतलेली होती. या चित्रपटामुळे कर्कला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्यापुढे एका ऐतिहासिक कालखंडाला सुरूवात झाली. आपण गरीब परिस्थितीतून आलेलो आहोत व संघर्ष करणे हाच आपल्या जगण्याचा मार्ग असल्याची जाणीव कर्कला असल्याने त्यांनी हॉलीवूडमध्ये आपली मेहनत पणास लावली.

१९५६ साली प्रसिद्ध चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉघच्या जीवनावर आधारित ‘लस्ट फॉर लाईफ’ या चित्रपटासाठी कर्कला ऑस्करचे सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीत नामांकन मिळाले. हा चित्रपट माझ्यासाठी एक वेदना देणारा अनुभव होता, असे कर्क आपल्या आत्मचरित्रात म्हणतो. १९५६च्या ऑस्कर सोहळ्यात कर्कपुढे आव्हान होते आणखी एका मातब्बर अभिनेत्याचे. त्याचे नाव होते यूल ब्रायनर. त्यावेळी कर्कला ऑस्कर मिळाले नाही. नंतर त्यांनी अनेक दर्जेदार भूमिका केल्या पण ऑस्कर पुरस्काराने नेहमीच हुलकावणी दिली. अखेर १९९६मध्ये ऑस्कर समितीने त्यांच्या हॉलीवूडमधील उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.

अत्यंत जिद्दी व कमालीची महत्त्वाकांक्षा असल्याने कर्कची प्रतिमा हॉलीवूडमध्ये तशी नेहमीच चर्चेत असायची. त्यामुळे त्यांना भूमिका मिळताना अडचणी यायच्या. ही परिस्थिती पाहून कर्कने स्वत:ची एक चित्रपट निर्मिती‘ ब्रायना प्रॉडक्शन’ ही कंपनी १९५८मध्ये काढली. पण कर्कचे चित्त स्थिर नसल्याने ते चांगला निर्माते बनू शकले नाहीत.

कर्कचा पहिला विवाह डायना डील हिच्यासोबतचा झाला. डायनापासून त्यांना मायकेल व ज्युएल डग्लस ही दोन मुले झाली. पण १९५४मध्ये दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर जर्मनवंशीय अनी ब्युडेन्स हिच्याशी कर्कने दुसरा विवाह केला, तो अखेरपर्यंत टिकला. ‘आयुष्यात अनी येण्याने माझे विश्व पालटले. अनीवर माझे नितांत प्रेम होते. आमच्या रात्रभर चालणाऱ्या गप्पांनी मी अधिक जगलो’, असे कर्कने ‘क्लोसर विकली’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कबुली दिली आहे. अनीपासून कर्कला पीटर व एरिक अशी दोन मुले झाली.

बंडखोर आणि आद्य कलाकार

कर्क डग्लस हे नाव हॉलीवूडच्या इतिहासात आद्य कलाकार म्हणून घेतले जाते. तो बंडखोर होता व त्याच्या राजकीय भूमिकाही स्पष्ट होत्या. १९५७मध्ये कर्कने ‘पाथ्स ऑफ ग्लोरी’ हा प्रसिद्ध दिग्दर्शक स्टॅनले क्युब्रिकच्या युद्धविरोधी चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली होती. नंतर त्याने ‘द वायकिंग्ज्’ (१९५८), ‘स्पार्टाकस’ (१९६०) हे दोन गाजलेले चित्रपट केले. कर्कने डाल्टन ट्रम्बो याची पटकथा घेऊन मॅकार्थीच्या अँटी कम्युनिस्ट कारकिर्दीवर भाष्य करणारा एक चित्रपट केला होता. या चित्रपटाने त्यावेळी अमेरिकेत खळबळ उडवली होती.

१९८०नंतर कर्कने अभिनयातून आपले अंग काढून घेण्यास सुरवात केली व लेखनावर लक्ष केंद्रीत केले. ‘द रॅगमन्स सन’ हे त्यांचे आठवणींचे पुस्तक लोकप्रिय झाले पण या पुस्तकांव्यतिरिक्त कर्कने काही कादंबऱ्या व नंतर आत्मचरित्र लिहिले. यांचाही खप खूप झाला होता. आपल्या पत्नीसोबत कर्कने जगभ्रमंती केली. काही काळ संयुक्त राष्ट्रांचा दूत म्हणूनही त्यांनी काम केले.

१९९५मध्ये कर्कला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पण त्यातून ते कसेबसे वाचले. त्यांना बोलता येत नव्हते पण त्यातून ते बरे झाले होते. आपल्या या दुखण्याबद्दल त्यांनी कधी चिंता केली नाही. उलट अनेक टीव्ही शोमध्ये कर्क आपल्या दुखण्यावर विनोद करत असे.

आयुष्याच्या अखेरीस कर्कने ज्यू धर्मातील श्रद्धांचा प्रसार सुरू केला. आपल्या आयुष्यातील मोठी कमाई त्यांनी अमेरिका व इस्रायलमधील धर्मादाय ट्रस्टना देऊ केली. गरीब मुलांसाठी मैदाने बांधली. अल्झायमरवरील उपचाराचे एक रुग्णालय बांधले. आपले वय जसे वाढत जाईल तसे परमेश्वराकडे आपण जात आहोत असे कर्क म्हणे. या जगाचा अंत जवळ येत चालला आहे असेही ते म्हणत असतं.

२०१८मध्ये या महान कलाकाराला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराने सन्मानित केले. गेल्या बुधवारी वयाच्या १०३ व्या वर्षी या कलाकाराचे निधन झाले. आपले वडील गेल्याने भावविवश झालेल्या मायकेल डग्लस याने आपल्या फेसबुकवर अकाउंटवर वडिलांना श्रद्धांजली वाहताना, हॉलीवूडमधील सोनेरी काळातला एक हिरा आपण गमावल्याचे खंत व्यक्त केली. कर्क डग्लस हा केवळ अभिनेता नव्हता तर तो न्याय, माणुसकीचे मूल्य घेऊन जगणारा एक माणूस होता, त्याचे हे आयुष्य अनेकांना प्रेरणादायी ठरेल. पण आमच्यासाठी, माझा भाऊ जोएल व पीटरसाठी ते एक वडीलच होते, असे मायकेल डग्लसने म्हटले आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0