विधान परिषद निवडणुकाः सत्ता स्थैर्याची चाचणी 

विधान परिषद निवडणुकाः सत्ता स्थैर्याची चाचणी 

सरकारच्या स्थैर्याच्या दृष्टीने विधान परिषद निवडणुक महत्त्वाची ठरणार आहे. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले तर पक्षाला १३५ आमदारांचे पाठबळ आहे, हे सिद्ध होईल. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा १४४ आहे. तो गाठण्यात गेली अडीच वर्षे तरी भाजपला यश आलेले नाही.

केरळ, पुद्दचेरीत भाजपचे दुर्लक्ष?
उन्नाव : भाजप आमदारावर हत्येचा गुन्हा दाखल
फेसबुक आणि ‘आरएसएस’शी संबंधीत मोठा खुलासा

राज्यसभेच्या एका जागेमध्ये धोबीपछाड मिळाल्याने खडबडून जागे झालेल्या महाविकास आघाडीने आता विधान परिषद निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ‘अकरावा’ कोण याची चर्चा दबक्या आवाजात सर्वच आमदारांमध्ये सुरू आहे. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपली रणनीती गुप्त ठेवत हालचालीना सुरुवात केली असल्याने आणि गुप्त मतदान असल्याने पुन्हा एकदा ‘घडलंय बिघडलंय’ अशी अवस्था महाविकास आघाडीमध्ये होणार नाही ना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरा उमेदवार रिंगणात कायम ठेवल्याने खऱ्या अर्थाने काँग्रेसची कसोटी यामध्ये लागणार असून त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच अपक्षांची साथ कशी मिळते यावर मतांचा सर्व खेळ मांडला जाणार आहे.

भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा संधी दिली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे, भाजप प्रवक्ते श्रीकांत भारतीय असे एकूण पाच उमेदवार दिले आहेत. भाजपचा कट्टर विरोधक शिवसेनेने माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे. तर, त्यांच्या जोडीला अनुभवी असे एकनाथ खडसे विधान परिषदेत पाठविण्यात येणार आहे.

दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुख्य लढत अपेक्षित असल्याने या निवडणुकीत काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांना विशेष मेहनत करावी लागणार आहे. विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर आहे. भाजपच्या रणनीतीवर मात करण्यासाठी काँग्रेसला काही रणनीती ठरवावी लागेल.

राज्यसभा निवडणुकीत भाजपने सूक्ष्म आणि अचूक नियोजन करून आपली तिसरी जागा निवडून आणली. आता भाजपने आपले लक्ष विधान परिषदेची पाचवी जागा निवडून आणण्यावर केंद्रीत केले आहे. भाजपची मते फुटली नाही तर आपले पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी जवळपास १५ ते २० अतिरिक्त मतांची गरज आहे.

सध्याच्या संख्याबळानुसार पाचवा उमेदवार निवडून आणणे भाजपला सोपे नाही. राज्यसभा निवडणुकीत ११ मते फोडत भाजपने धनंजय महाडिक यांना विजयी केले. भाजपला राज्यसभा निवडणुकीत एकूण १२३ मते मिळाली. विधान परिषदेसाठी २२ मते भाजपला बाहेरून आणावी लागणार आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान असल्याने भाजपला सहजपणे चमत्काराची अपेक्षा आहे. भाजपकडे स्वतःचे १०६ आमदार आहेत. याशिवाय सहा अपक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांचे प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे हे सहज निवडून येऊ शकतात. त्यासाठी एकूण १०८ मते त्यांना आवश्यक असतील. प्रसाद लाड निवडून येण्यासाठी त्यांना बाहेरून २३ मतांची गरज पडेल. मनसेचे मत त्यांच्या सोबत जाऊ शकते. त्यामुळे किमान २२ मतांची त्यांना व्यवस्था करावी लागणार आहे. राज्यसभेत केवळ ११ मते अपक्षांची मिळवून भाजपने विजय मिळवला होता. आता त्याच्या दुप्पट मतांची व्यवस्था त्यांना करावी लागणार आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसला १० ते १२ अतिरिक्त मतांची गरज आहे. या मतांचे गणित लक्षात घेऊन काँग्रेसने एकजुटीने प्रयत्न केले तर राज्यसभा निवडणुकीतील पराभवाची परतफेड करणे शक्य असल्याचे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. विधान परिषद निवडणुकीत माघार घेण्यास काँग्रेसने नकार दिला. त्यामुळे आता दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसवर आहे.

या निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान २७ मतांचा कोटा आहे. शिवसेनेकडे सध्या ५५ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे निर्धोकपणे निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ आमदार असल्याने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनाही कोणतीच अडचण नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क मिळाला नाही तर राष्ट्रवादीची दोन मते कमी होऊ शकतात. तरी इतर अपक्षांच्या बळावर राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना विजय मिळवणे अवघड नाही. काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. त्यावर एक उमेदवार चंद्रकांत हंडोरे सहज निवडून येतील. काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना १० मतांची बाहेरून मदत लागणार आहे. शिवसेनेकडील १२ अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांच्या मदतीसाठी जगताप यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

शिवसेनेचे संजय पवार राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. आघाडीबरोबर असलेल्या अपक्षांची भाजपला मदत झाली. हे शिवसेनेला कमालीचे झोंबले. राजकारणात आक्रस्ताळेपणा चालत नाही. कमालीचा संयम, हेच पुढची गणिते सुकर करणारे समीकरण ठरते. शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उघडपणे अपक्षांवर तोफ डागली, नावे घेत अपक्ष आमदारांवर आरोप केले. विधान परिषद निवडणूक तोंडावर असताना अपक्षांना चुचकारण्याऐवजी त्यांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न करून शिवसेनेने जोखीम पत्करली. यातून महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तर अनेक अपक्ष आमदारांमध्ये मुख्यमंत्र्यांकडून दिसणार्‍या संवादाच्या अभावासह अनेक बाबतीत खदखद आहे. आता शिवसेनेकडून सारवासारव करण्यात येत असली तरी अपक्षांना थेट दुखावल्याने झालेले नुकसान भरून काढता येणार का? असा प्रश्‍न पडतो. मतदारांवर विश्‍वास दाखवावा लागतो, असे विधान एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात केले आहे. हा सल्ला शिवसेना नेते ऐकतील असे नाही. मात्र बेलगाम विधाने थांबली नाहीत तर भाजपची गणिते सोपी होणार आहेत.

काँग्रेसला दुसऱ्या जागेच्या विजयासाठी आवश्यक असणाऱ्या मतांसाठी स्वतः भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत त्यांच्याकडे असलेल्या आमदारांची मते देण्याची विनंती केली. पण यावर हितेंद्र ठाकूर यांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीत आपल्याकडील तीन आमदारांचे मत भाजपच्या पारड्यात टाकले असल्याने यावेळी त्यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे या साऱ्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांचे जावई आणि भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांचीही कसोटी लागणार आहे. एकीकडे सासरेबुवा आणि दुसरीकडे पक्षनिष्ठा असा दुहेरी पेच त्यांच्या समोर आहे. विधान परिषदेचे मतदान हे गुप्त असल्याने ते पक्षाच्या प्रतिनिधींना दाखवायचे नसते. त्यामुळे अशा नातेसंबंधांतील नेते कोणता राजकीय निर्णय या घडामोडीत घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेपासून दूर राहावे लागले, याचा वचपा काढण्याची एकही संधी भाजप वाया जाऊ देणार नाही, हे एव्हाना समोर आले. ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची राज्यातील मुक्त घोडदौड त्याचाच भाग. आघाडी सरकारचे दोन मंत्री आज तुरुंगात आहेत. आघाडी सरकार अथवा नेते, त्यांचे निकटवर्तीय यांच्यावर दररोज आरोपाच्या तोफा भाजपकडून डागल्या जात आहेत. सरकारला पेचात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये राज्यपालांची भूमिका लपून राहिलेली नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर अधिकाधिक समन्वयाचे दर्शन घडविण्याऐवजी आघाडीतील अंतर्विरोध पुढे येताना दिसतो.

सरकारच्या स्थैर्याच्या दृष्टीने विधान परिषद निवडणुक महत्त्वाची ठरणार आहे. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले तर पक्षाला १३५ आमदारांचे पाठबळ आहे, हे सिद्ध होईल. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा १४४ आहे. तो गाठण्यात गेली अडीच वर्षे तरी भाजपला यश आलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका काँग्रेसने सातत्याने मांडली. महाविकास आघाडीत आपल्याला दुय्यम स्थान आहे, ही त्या पक्षातील अनेकांची भावना असून वेळोवेळी ती उघड झाली. अशावेळी भाजपचे पाचही उमेदवार निवडून आल्यास काँग्रेसला एका जागेवर पराभवाचा सामना करावा लागू शकतो आणि महाविकास आघाडीच्या पुढच्या वाटचालीवर त्यातून प्रश्‍नचिन्ह उभे राहू शकते. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे अथवा शिवसेनेचे आमशा पाडवी यांना ‘लक्ष्य’ केले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. राज्यसभेच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाला आव्हान देणारी ठरू शकते.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: