बिबट्याच्या मागावर…

बिबट्याच्या मागावर…

बिबट्याला विविध प्रकारच्या अरण्यात राहण्याची सवय असते. दाट जंगले, विरळ रान, शेताशेजारचे जंगले असे कुठेही बिबळ्या स्वतःला सहजपणे सामावून घेतो. काही ठिकाणी तर बिबळयांनी उसाच्या शेतातच वीण घातल्याचे दिसून येते. त्यामुळे मानव- बिबळ्या संघर्षालाही तिथे सुरुवात झाल्याचे दिसून येते.

जिम कॉर्बेटचे नामांतर रामगंगा नॅशनल पार्क?
फुलपाखरांच्या दुनियेत…
अ‍ॅमेझॉन वर्षावनाच्या आगीमुळे साओ पावलो अंधारात

प्राणी आणि पक्ष्यांची संख्या अधिकाधिक नेमकी निश्चित करता यावी यासाठी त्यांची गणना करताना विशिष्ट कालावधी निश्चित केला जातो. “बिबळ्या व वाघ” यांची गणना करताना उन्हाळा हा ऋतू निवडण्यात येतो. या काळात जलसाठे मर्यादित असतात व प्राणी २४ तासांमधून एकदा तरी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येत असल्याने जलसाठ्याजवळील झाडांवर मचाण बांधून बिबळे किंवा वाघांची संख्या मोजता येते. हे प्राणी निशाचर असल्याने बरेचदा रात्री पाणवठ्यावर येतात. ते नीट दिसावेत म्हणून भर चांदण्यात अर्थात पौर्णिमेच्या रात्री ही गणना करण्यात येते. त्यामुळे उन्हाळ्यात येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला बहुतांश अभयारण्यात प्रगणना होते.

शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानगळ होते. दाट जंगलांमध्ये त्यामुळे पक्षी ओळखता येणे सोपे जाते. त्यामुळे जानेवारी महिन्यात “बर्ड – रेस” घेतली जाते. अर्थात स्थलांतरित पक्षीही या काळात येत असल्याने ते मोजण्यासाठीही या काळाचा फायदा होतो. झाडांची गणना करण्यासाठी मात्र कोणताही विशिष्ट ऋतू आवश्यक नाही, वर्षभरात कोणत्याही वेळीही गणना करता येते.
पूर्ण भारतात वाघ व बिबळे या अन्नसाखळीतील सर्वात वरच्या स्तरातील प्राण्यांची कमी होत असलेली संख्या हा जैवविविधतेच्या आणि नैसर्गिक समतोलाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. या प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना किती यश- अपयश आले ते पाहण्यासाठी आणि पुढच्या प्रयत्नांची दिशा निश्चित करण्यासाठी या प्रगणनेचा उपयोग होतो. जैविक साखळीतील सर्व स्तरांतील प्राण्यांच्या संख्येवरून जंगलाची समृद्धता समजत असल्याने या प्रगणनेदरम्यान बिबळे व वाघांसह इतर प्राण्यांचीही गणना केली जाते.
जंगलाच्या घनदाट भागात हिंडणार्या बिबळ्यांची गणना करणे किंवा त्यांचा मग काढणे तसे जिकीरीचे व धाडसाचे काम! जंगलातल्या अत्यंत रुबाबदार, देखण्या व हुशार प्राण्यांची म्हणजेच बिबळ्याची प्रगणना वैशिट्यपूर्ण आहे.
भारतात बिबळयांचा आढळ सर्वच प्रकारच्या जंगलात आहे. त्यांच्या कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या सवयीमुळे ते अजूनही बहुतेक संपूर्ण भारतात टिकून आहेत. वाघाप्रमाणे बिबट्याला दाट जंगलात राहावे लागत नाही. त्याला विविध प्रकारच्या अरण्यात राहण्याची सवय असते. दाट जंगले, विरळ रान, शेताशेजारचे जंगले असे कुठेही बिबळ्या स्वतःला सहजपणे सामावून घेतो. काही ठिकाणी तर बिबळयांनी उसाच्या शेतातच वीण घातल्याचे दिसून येते. त्यामुळे मानव- बिबळ्या संघर्षालाही तिथे सुरुवात झाल्याचे दिसून येते.

बिबळे सहसा रात्रीच शिकार करतात. त्यांची तीक्ष्ण नजर, चौकस कान व आवाज न करणारी चाल भक्ष्याचा मागोवा घेत असते. बिबळ्या भक्ष्य दिसताच अगदी आवाज न करता जवळ जाऊन एकदम हल्ला करून त्याला घाबरवून टाकतो. त्याचा हल्ला जोरदार असतो. त्याच्या तावडीतून भक्ष्य फार क्वचित निसटू शकते. बिबळे विविध प्रकारचे भक्ष्य पकडतात. जंगलात ते चितळ, सांबर, काकर, चौशिंगा, वानर यांची शिकार करतात तर काही वेळेस ते लहान जनावरे, पाखरे, साळींदर यांनाही मारतात. भुकेल्या पोटी बिबळ्या खेकडे, सरपटणारे प्राणीही खातो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारामुळे मोठी शिकार करणे शक्य होत नाही. गावाशेजारी राहणारे बिबळे बकर्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात. क्वचितप्रसंगी लहान मुलांवरही हल्ला करतात.

बिबळ्यादेखील वाघाप्रमाणेच लघवी व विष्ठेच्या साहाय्याने आपली हद्द निर्धारित करतो. बहुतेक त्याची रात्री स्वतःच्या हद्दीत गस्त सुरू असते. त्याचवेळी तो भक्ष्याचाही मागोवा घेत असतो. बिबळ्याच्या लहान आकारामुळे त्याचे भक्ष्य तरस, रानकुत्रे किंवा वाघाकडून हिसकावले जाण्याची भीती असते. त्यामुळे तो मारलेल्या भक्ष्याला झाडावर नेतो व तिथेच खातो. त्याच्या आकाराच्या दीडपट वजनाचे भक्ष्यही तो सहजतेने झाडावर नेतो. त्यावेळी त्याच्या ताकदीची कल्पना येते.

मिलनकाळात बिबळे मादीला “खर्र खर्र खर्र खर्र” अशा करवतीने लाकूड कापल्यावर होणार्या आवाजासारखी साद घालून बोलावतात. मिलन झाल्यावर १३ ते १५ आठवड्यांच्या गर्भावस्थेनंतर मादी २ ते ४ पिल्लांना जन्म देते. जन्मानंतर १० दिवसांत पिल्ले डोळे उघडतात. मादी पिल्लांना दोन ते अडीच वर्षांपर्यंत स्वतःबरोबर ठेवून शिकारीचे सगळे प्रशिक्षण देते. मादी साधारणतः वयाच्या अडीच ते तीन वर्षात सक्षम होते. नराला जननक्षम व्हायला थोडा जास्त काळ लागतो.

बिबळे मोजण्याची पहिली पारंपरिक पद्धत पावलांच्या ठशांवरून मोजण्याची व दुसरी ” कॅमेरा trapping”. यात स्वयंचलित कॅमेर्यांच्या साहाय्याने संख्या मोजता येते. ही पद्धत महागडी असली तरी याद्वारे मिळणारी संख्या अचूक असते. या पद्धतीत जंगलात बिबळ्या नेहमी जी वाट, रस्ते, सागरी चालण्याकरिता वापरतो त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित कॅमेरे लावलेले असतात. हे कॅमेरे “इन्फ्रारेड” या प्रकारचे असून त्यांच्यावर उत्तम प्रतीचा “flash” लावलेला असतो. त्यामुळे अंधारातदेखील बिबळ्याचे उत्तम प्रकाशचित्र घेत येते. एका कॅमेरामधून निघणारा सेन्सर दुसर्या कॅमेर्याशी संलग्न्न असतो. त्यामुळे वाटेवरून चालणार्या कोणत्याही जनावरामुळे हे सेन्सर तुटले तर त्वरित कॅमेर्याद्वारे फोटो घेतला जातो.

कोणत्याही बिबळ्याच्या अंगावरचे ठसे दुसर्या बिबळ्याशी मिळतेजुळते कधीच नसतात. त्यामुळे प्रकाशचित्रे बघून बिबळ्यांना ओळखता येऊन मोजणी करता येते. याशिवाय बिबळ्यांच्या विष्ठेवरून मोजणी करायच्या पद्धतीत जरी बिबळ्यांच्या संख्येचे आकलन होत नसले तरी त्यामुळे संख्या कमी होतेय की जास्त हे कळू शकते. बिबळ्यासारख्या हुशार व देखण्या जनावराच्या जीवनचक्राचा अभ्यास थरारक व कुतूहल वाढवणारा आहे. कोणतेही जनावर वाहनातून बघण्यापेक्षा पायी चालत जाऊन केलेले अरण्यवाचन नेहमीच चांगले! बिबळ्याच्या मागावर निघणे म्हणजे एक थरारच…

सौरभ महाडिक, वन्यजीव अभ्यासक व संशोधक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0