मेळघाटमध्ये ‘अपलिफ्टमेंट’साठी पुण्यातून ‘लिफ्ट’

मेळघाटमध्ये ‘अपलिफ्टमेंट’साठी पुण्यातून ‘लिफ्ट’

भाषेचा प्रश्न, इंग्रजीची अडचण, घरची गरीबी, शिक्षणाच्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, त्यात लॉक डाऊन अशा अनंत अडचणींचा सामना करत मेळघाटमधल्या काही आदिवासी मुलांनी यंदाची ‘नीट’ (NEET) परीक्षा उत्तीर्ण केली. ही मुले उद्या डॉक्टर बनणार आहेत. पण त्यांच्या डोळ्यातील स्वप्ने पाहिली ती पुण्यातील ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (Lfu), या सामाजिक संस्थेने. या संस्थेशी निगडित असलेले बी.जे मेडिकलमधील आजी-माजी विद्यार्थी व काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे आज डॉक्टर तयार करण्याचा वेगळाच प्रयोग महाराष्ट्रात आकारास आला आहे.

अपस्मार (epilepsy) मेंदूचा एक आजार
आयुष डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दोन्ही बाजूंनी तोट्याचे!
आरोग्य व्यवस्था सरकारची प्राथमिकता नाही

१६ ऑक्टोबर  २०२० या दिवशी  ‘नीट’ (NEET) २०२० परीक्षेच्या निकाल लागणार होता. आमची सर्व टीम त्या दिवशी आमच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटची कॉपी घेऊन निकाल जाहीर होण्याची वाट पाहत होती. सरतेशेवटी रात्री ८ वाजता निकाल जाहीर झाला. आमच्या एका एका विद्यार्थ्यांचे गुण जसे-जसे समोर येऊ लागले तसे आम्ही एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत गेलो.

शांतीलाल कसदेकर

शांतीलाल कसदेकर

आमचा दुर्गम अशा मेळघाटातील विद्यार्थी शांतीलाल कासदेकर याला ४२६ गुण मिळाले. तो आता एका वैद्यकीय महाविद्यालयात MBBS ला प्रवेश घेऊ शकणार आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या आमच्या इतर ६-७ विद्यार्थांना वैद्यकीय महाविद्यालयात MBBS ला प्रवेश मिळेल एवढे गुण आहेत. अन्य काही जण BAMS, BHMS, BSc Nursing, इ. कोर्सेसला प्रवेश घेऊ शकणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसारख्या आदिवासी भागातून आम्ही शिक्षण दिलेले विद्यार्थी आज MBBS डॉक्टर होत आहेत. विद्यार्थ्यांनी आणि आमच्या ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ टीम मधील सहकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळालं आहे.

जसं जसं एका एका विद्यार्थ्यांचे गुण कळत गेले तसतसे ३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या या मोहिमेची पाने माझ्या डोळ्यासमोर उघडत गेली.

माझा २०१७ चा ‘नीट’ (NEET) परीक्षेचा ( वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश परीक्षा) निकाल लागला आणि मला मुंबईमधील कुपर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. या सर्व गोष्टींचं श्रेय जाते ते माझे आई वडील आणि ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ (Lfu) या पुण्यातल्या एका सामाजिक संस्थेला. या संस्थेकडून पुण्यात ‘नीट’च्या प्रवेश परीक्षेचे मोफत शिकवणी वर्ग चालवले जातात. हे वर्ग वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले माझ्यासारखे डॉक्टर घेत असतात.

१५ डिसेंबर २०१५ साली बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात MBBS करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या संस्थेची सुरुवात केली. तेव्हापासून या संस्थेमधील अनेक गरजू विद्यार्थ्यांना विविध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मला या संस्थेमध्ये काम करायचे होते आणि तशी संधी मला संस्थेच्या अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासीप्रवण मेळघाट येथे सुरू झालेल्या दुसऱ्या शाखेची स्थापना झाल्यामुळे मिळाली.

मेळघाटला कुपोषणाची राजधानी म्हणतात. येथील आदिवासी लोकांच्या आरोग्य आणि उदरनिर्वाहाच्या अनंत अडचणी आहेत. येथील सामाजिक आणि आर्थिक विकास झालेला नाही. येथील आरोग्य सेवेची अतिशय वाईट परिस्थिती आहे, कारण मेळघाट हा जंगल भाग असल्याने तिथे कुणी डॉक्टर जात नाहीत. आणि यामध्ये डॉक्टरांची पण काही चूक नाही, कारण असा बाहेरून एखादा माणूस जाऊन तिथे किती दिवस राहणार आणि ज्याच्या-त्याच्या परिवाराची जबाबदारी पण असते. मग या वरील एक कायम स्वरूपी उपाय म्हणजे त्या भागातीलच विद्यार्थ्यांना डॉक्टर तयार करणे आणि हे साध्य होऊ शकते ते फक्त शिक्षणाच्या जोरावर. जर त्याच भागातील डॉक्टर तयार  झाले तर ते नंतर त्याच भागात जाऊन काम करणार व अशा प्रकारे त्या भागातील आरोग्य तर सुधारेलच आणि आर्थिक विकास पण होईल, असा एकूण उद्देश आहे.

हा व्यापक उद्देश समोर ठेवून २ सप्टेंबर २०१७ रोजी मेळघाट येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या LFU टीमने मेळघाटमधील पहिली बॅच “उलगुलान” या नावाने सुरू केली आणि या बॅचचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. एक नवीन पाऊल टाकल्याने आमची टीम खूप उत्साही होती. मेळघाटमधील ५ आश्रम शाळेतील निवडक विद्यार्थी तेथील शिक्षकांनी आम्हाला दिले आणि आमचा शिकवणी वर्ग सुरू झाला.

आमच्यासमोर आता सर्वात मोठा प्रश्न होता की शिकवणी वर्ग चालू ठेवण्यासाठी शिक्षक वर्ग कुठून आणायचा. कारण पुण्यातही शिकवणी वर्ग असल्याने तेथेही शिक्षक वर्ग कमी पडत होता. पण LFUमधून शिकलेले माजी विद्यार्थी व अन्य महाविद्यालयातून स्वतःहून मदत करण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी पुढे आले आणि हा प्रश्न सुटला.

सूरज जाधावर, पवन डोंगरे, प्रसाद कांबळे, अक्षय हिरवे, बुधभूषण साळवे, आकाश राऊत, शंतनु देशमुख, भाग्यश्री घुघे, निशा पवार, आनंद बराटे, अमर कोरे, प्रतीक्षा राख, साहिल, शब्दाली केंद्रे, सृष्टी अगरवाल, स्वप्नील सोनवणे व अन्य अशी आमची एक टीम तयार झाली.

प्रत्यक्ष शिकवणी वर्ग सुरू झाला आणि डॉ. अतुल ढाकणे यांनी एक तास घेतल्यानंतर आम्हाला लक्षात आले की त्या विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीमध्ये जेवढे ज्ञान व माहिती होती तेवढीच आता होती. त्यांचा गणित, विज्ञान, इंग्रजी अशा महत्त्वाच्या विषयांचा पाया अतिशय कमकुवत होता. जीवशास्त्र, रसायनशास्त्र या विषयातील संज्ञा, प्रयोग, अवघड शब्द त्यांना शिकवणे हे एक मोठे आव्हान आमच्यापुढे होते.

हे आव्हान आता स्वीकारण्याची सर्वांनीच तयारी दाखवली. प्रत्येक शनिवारी ५ आश्रम शाळेतील विद्यार्थी मेळघाटातील बिजुधावडी या गावातील शाळेत येत असत. या विद्यार्थ्यांकडून जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयातील अवघड व मोठे शब्द १०-१० वेळा लिहून पाठ करून नंतर त्यांना समजावून सांगू लागलो. विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या आठवडी परीक्षा घेतल्या गेल्या. गणितातील मूलभूत संज्ञा व आकडेमोड आम्ही शिकवण्यास सुरूवात केली. काही महिन्यात त्यामुळे मुलांचा गणिताचा पाया मजबूत झाला. यात पुढची अडचण जीवशास्त्र व अन्य विज्ञान विषयांची होती. मग आम्ही या मुलांकडून फक्त ४५०-६०( ३६० बायोलॉजी + ९०-१०० केमिस्ट्री) मार्कांचीच तयारी करून घेण्यावर लक्ष केंद्रीत केले.

आमचा शिकवणी वर्ग हा दर आठवड्यात शनिवार व रविवार असा चालत असे. आमच्या टीमचे सदस्य प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मेळघाटला १४-१५ तासांचा प्रवास करून शिकवायला जात असत. या प्रवासाचा व तेथे राहण्याचा खर्चही खूप होऊ लागला. आमच्या टीमपुढील ही समस्या पाहून श्री गणेश आणि निमेश सुमती या मित्रांनी आम्हाला आर्थिक मदतीचा हात दिला. व ते आमच्या मागे ठामपणे उभे राहिले. या सर्व प्रयत्नात मेळघाट येथील स्थानिक प्रशासकीय अधिकारी तसेच काही शिक्षकांनी खूप सहकार्य केले. यामध्ये विशेषतः सुधीर चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. चव्हाण सरांनी आपली स्वतःची मुले समजून या विद्यार्थ्यांना मदत केली.

कोणत्याही प्रकल्पामध्ये किंवा आपल्या सामाजिक कार्यामध्ये आपल्या लाभार्थींना सर्व माहिती देणे हे गरजेचे असते. म्हणून आम्ही मेळघाटमध्ये पहिला शिक्षक-पालक मेळावा आयोजित केला. त्यास पालकांचाही खूप प्रतिसाद मिळाला. त्या भागातील पालक म्हणजे सर्व अशिक्षित, अल्पभूधारक शेतकरी व मजूर. त्या पालकांचा मुलांना आम्ही डॉक्टर बनवणार असे सांगितल्यावर त्यांच्यासाठी आम्ही देवा समान झालो, आमच्यावर आणखी जबाबदारी वाढली. पालकांचा अशा संपूर्ण सहकार्यामुळे नंतर त्यांच्या मुलांना पुण्यातील गोहे येथील आश्रम शाळेत स्थलांतरित करता आले. अशा प्रकारे आमचा २ वर्षे शिकवणी वर्ग चालला आणि ५ मे २०१९ रोजी आमच्या पहिल्या बॅचने परीक्षा दिली. पण या बॅचने दिलेल्या निकालाने आम्हाला धक्का बसला. एकाही विद्यार्थ्याला कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. एक मुलीला फक्त नर्सिंग कॉलेजला प्रवेश मिळाला.

या अपयशाने आम्ही खचलो व स्वतःहून हार पत्करून हा उपक्रम बंद करण्याचे ठरवले. पण तसे होणार नव्हते. पुन्हा आमच्या टीममध्ये या अपयशाची चर्चा सुरू झाली. एकूण उणीवा लक्षात आल्या. झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची तयारी ठेवली व नव्या जोमाने मुलांवर कष्ट व मेहनत करण्याचे आम्ही सर्वांनी ठरवले.

आमच्याच टीममधील ऐश्वर्या जठार हिने नव्या बॅचची जबाबदारी घेतली. जुन्या बॅचमधील विद्यार्थी व नवे विद्यार्थी असे शिकवणी वर्ग सुरू केले. आमचा हा उत्साह पाहून किरण तोगे, तेजस अहिरे हे नवे सहकारी आम्हाला मिळाले. योगिनी शिरोडे, अक्षदा धाणे व तनय बुगडे यांनी व अन्य काही सहकारी केतन दरेकर, सौरभ पवार, वैष्णवी निपणीकर, शरयू नीपणीकर यांनी आठवडी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे काम आपल्या खांद्यावर घेतले.

आम्ही नव्या भूमिकेतून व दृष्टिकोनातून मुलांच्या जगाकडे पाहू लागलो. ‘नीट’ परीक्षेची तयारी करून घेत असताना या विद्यार्थ्यांना त्यांच्या आदिवासी संस्कृतीविषयी, राहणीमानाविषयी न्यूनगंड वाटणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतली. मानववंश शास्त्र (anthropology) या विषयातील  सांस्कृतिक सापेक्षतः (cultural relativism) या संकल्पनेचा आम्ही पूर्णपणे अवलंब केला. याचे एक छोटे पण महत्त्वाचे उदाहरण म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्यांच्या कोरकू आदिवासी देवांची सामूहिक प्रार्थना आम्ही घेऊ लागलो. या आमच्या सांस्कृतिक सापेक्षतःमुळे आम्हाला विद्यार्थांचा विश्वास संपादन करायला सोपे गेले.

मागच्या अपयशाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या नियमित आठवडी परीक्षा न होणे व या कामाची जबाबदारी तेथील स्थानिक शिक्षकांवर होती. तसेच आमचा शिकवणी वर्ग हा फक्त २ दिवस चाले पण बाकी ५ दिवस विद्यार्थी काय करतात यावर आमचं लक्ष देणे हे शक्य नव्हते. पण या सर्व समस्यांचा उपाय निघाला.

आमच्या उपक्रमाची माहिती कळाल्यानंतर महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी स्वतःहून आम्हाला बोलावले. हे सर्व विद्यार्थी शिकवणी वर्गासाठी एका जागेवर एकत्र असावेत, अशा आमच्या विनंतीवरून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव या प्रकल्पातील गोह या गावातील आश्रम शाळेत स्थलांतरित केले. तसेच आम्हाला आर्थिक सहकार्य दिले.

विद्यार्थ्यांच्या आठवडी परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजेत म्हणून व त्यांच्यासोबत २४ तास, ७ दिवस राहील अशी एक जबाबदार, मुलांना उत्साहित ठेवेल अशी एक व्यक्ती आम्ही ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या महत्त्वाच्या कामात एक मेंटोर म्हणून आम्हाला राहुल जरांगे लाभले. राहुल जरांगे यांनी मुलांचे फक्त मेंटोर म्हणूनच नाही तर विद्यार्थ्यांना मानसिक बळ द्यायचे काम केले. राहुल जरांगे विद्यार्थ्यांचे खूप जवळचे मित्र झाले. ते १३ सप्टेंबर २०२० ( ‘नीट’ परीक्षेचा दिवस) पर्यंत विद्यार्थ्यांसोबत होते. तसेच फक्त मुलींसाठी आम्ही एक केअरटेकर पण ठेवली, जी मुलींची चांगली मैत्रीण झाली.

अशा प्रकारे आमचा शिकवणी वर्ग परत एकदा गोहेमध्ये सुरू झाला, याच सर्व श्रेय हे मनीषा वर्मा यांना जाते. कारण एवढ्या वरच्या पदावरचा एखादा सनदी अधिकारी तातडीने अपुर्या वेळात खूप संवेदनशील पद्धतीने विचार करून निर्णय घेणे हे आमच्या टीमसाठी खूप प्रोत्साहित करणारी बाब होती. आमचे काही सहकारी जे पुढे जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात त्यांना समजले की अशा प्रकारचे संवेदनशील अधिकारीही प्रशासनात काम करत असतात.

हे सगळं सुरळीत चालू असतानाच मार्चमध्ये कोविड-१९ आला व सर्व मेहनतीवर पाणी फिरेल की काय अशी भीती वाटू लागली. स्थानिक सरकारी कर्मचाऱ्यांनी आग्रह केला की विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवलं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीच तयार नव्हतं. पण या विद्यार्थ्यांचे कष्ट पाहून आमच्या टीमला वाटत होतं की मुलांना घरी नाही पाठवलं पाहिजे, कारण जर मुले घरी गेली तर तिथं त्यांचा अभ्यास होणार नाही, जो अभ्यास केला आहे तो पण विसरून जातील, तिथं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणी नव्हतं, त्यांना पुढील सर्व प्रश्नपत्रिका सोडवता येणार नव्हत्या, म्हणून मुलांना इथेच ठेवावं असं वाटत होत. या मुलांचे कष्ट पाहून आम्ही प्रेरणा घेत होतो. म्हणून मी म्हणतो की हे विद्यार्थी हे आमच्यामुळे नाही ते त्यांच्या स्वतःच्या कष्टामुळे घडली आहेत व डॉक्टर बनत आहेत.

कोरोनाच्या या संकटात आमच्या मदतीला धावून आल्या त्या पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या ( TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE, PUNE) च्या तत्कालीन सहसंचालक नंदिनी आवडे. त्यांनी व मनिषा वर्मा यांनी स्वतःहून या बाबतीत लक्ष घालून मुलांना घरी न पाठवण्याचा निर्णय घेतला.

कारण सर्व विद्यार्थी हे गोहेमध्ये पूर्णपणे आयसोलेटेड, सुरक्षित होते. या दरम्यान मनीषा वर्मा आमच्याशी बोलताना एक महत्त्वाचे वाक्य म्हणाल्या,  “जर ही माझी मुलं असती तर मी यांना अशा ठिकाणी ठेवलं असतं की जिथं त्यांना अभ्यासाचं वातावरण मिळेल.”

आणि मला वाटतं की ही संवेदनशीलता जपली गेली. या मुलांसाठी अभ्यासाचं वातावरण हे आश्रम शाळेतच मिळू शकतं. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना गोहेमध्ये ठेवण्याचा निर्णय झाला. पण तरीही काही स्थानिक वृत्तपत्रांतून या निर्णयाचा विरोध करण्यात आला, मात्र नंदिनी आवाडे आणि मनीषा वर्मा हे दोन्ही अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

परंतु लॉकडाऊन जसा वाढू लागला तसे  मे महिन्यात काही विद्यार्थ्यांना घराची आठवण होऊ लागली. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा मेळघाटमधील धरणी येथील वसतिगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. याची पूर्णपणे जबाबदारी मेळघाटच्या प्रकल्प अधिकारी मिथाली सेठी यांनी घेतली. मिथाली सेठी यांनी स्वतःहून या विद्यार्थ्यांचे काही तास घेतले. त्या सतत या विद्यार्थ्यांच्या भेटीला जात असतं व त्यांना प्रोत्साहित करत असतं.

या सर्व घडामोडींमध्ये आमच्यासोबत असलेल्या डॉ. नरेश सोनकवाडे, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. स्वप्नील सांगळे यांनी विद्यार्थ्यांचे काही तास घेतले व मुलांना प्रोत्साहित केले. तसेच TRTI च्या संचालक पवनीत कौर यांनी मुलांसोबत संवाद साधून त्यांना तसेच आम्हालाही प्रोत्साहित केले.

या पूर्ण काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिकवणी वर्ग चालू होते. त्यात आम्ही मेंटोरशीपचा उपक्रम सुरू केला. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक आमचा टीम सदस्य मेंटोर म्हणून दिला गेला. हा सदस्य त्या विद्यार्थ्यांसोबत दररोज फोनवरती बोलत असे व मार्गदर्शन करत असे. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवत असे.

या सर्व उपक्रमामध्ये आमच्यातील आणि आदिवासी विभागमध्ये सुरळीत संवाद घडवून आणण्याचा तसेच गरज लागेल तेव्हा मदत करण्याचं काम नम्रता शाह आणि सिद्धी यांनी केलं. आमच्या टीमला सतत प्रोत्साहित करणारे आमचे पडद्यामागील ‘LFU’चे सगळे संस्थापक म्हणजे डॉ. अतुल ढाकणे, डॉ. केतन देशमुख, डॉ. अभिरज म्हात्रे, डॉ. मयंक त्रिपाठी, डॉ. फारुक फरास, डॉ. अजिंक्य वेडे, डॉ. सितांसू प्रधान, इ. या सर्वांनी आमच्या टीमला मार्गदर्शन दिले.

या एकूण कार्यक्रमात आम्ही विद्यार्थ्यांकडून १०० पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या. या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम योगिनी शिरोडे, तन्वी शिंघवी व अक्षदा धाने यांच्या टीमने मेहनतीने केले. ज्या विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीला साधे इंग्रजी शब्द उच्चारताना प्रयत्न करावे लागत होते ती मुले जीवशास्त्रातील कठीण शब्द व वाक्ये सहज सांगत होती. त्यांचे पाठांतर चांगले झाले होते. संकल्पना त्यांना समजल्या होत्या. प्रश्नांची उत्तरे देत होती. याचे चित्र आम्हाला प्रत्यक्ष परीक्षेचे गुण हाती आल्यानंतर लक्षात आले. शांतीलाल कसदेकर याला जीवशास्त्रामध्ये ३६० पैकी ३२५ गुण मिळाले व तर अन्य विद्यार्थी शिवकुमार, अंकुश, गजानन यांना ३६० पैकी ३०० पेक्षा जास्त गुण मिळाले.

निकाल लागल्यानंतर शांतीलाल म्हणाला, “मला सुद्धा आता अशाच गरजू विद्यार्थ्यांना मदत करायची आहे व डॉक्टर झालो की माझ्याच भागात येऊन माझ्या कोरकू समाजाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे .” शांतीलालचे हे वाक्य ऐकून आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य “INSPIRED TO SERVE, SERVE TO INSPIRE” हे साध्य झाल्यासारखं वाटते.

मेळघाटमधील विद्यार्थ्यांना डॉक्टर करण्याचे आमचे प्रयत्न आता आम्ही राज्यातल्या अन्य आदिवासी भागातही नेत आहोत. महाराष्ट्रातील आदिवासी भागातील विद्यार्थी निवडून आम्ही त्यांचे शिकवणी वर्ग पुण्यात “उलगुलान महाराष्ट्र” या नावाने सुरू केला आहे. आज कोरोनामुळे त्या बॅचचे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू आहेत.

हे यश LFU, आदिवासी विकास विभाग आणि विद्यार्थांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आहे.

अखेरीस सांगेन की भविष्यात समाजातील दिन-दुबळ्या, वंचित घटकांमधून शेकडो डॉक्टर बनवण्याचा आमच्या स्वप्नपूर्तीची ही एक सुरूवात आहे..!

डॉ. संतोष चाटे, हे ‘एम.बी.बी.एस’च्या तृतीय वर्षाला असून, LFU ऊलगुलान (मेळघाट) प्रकल्प प्रमुख आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: