काबूलमध्ये अडकलेल्या काश्मिरींचे स्थलांतरासाठी केंद्राला आवाहन

काबूलमध्ये अडकलेल्या काश्मिरींचे स्थलांतरासाठी केंद्राला आवाहन

काबूलच्या बख्तर युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आसिफ अहमद स्वप्नवत आयुष्य जगत होते. त्यांच्या कित्येक समवयस्कांहून किंवा वर्गमित्रांहून उत्तम नोकरी त्यांन

तालिबानला पाठिंबा द्यावा की नाही; भारतापुढे पेच
ट्रंप यांचा ट्वीटखेळ
काबूलमध्ये अडकलेले १७० भारतीय मायदेशी परत

काबूलच्या बख्तर युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आसिफ अहमद स्वप्नवत आयुष्य जगत होते. त्यांच्या कित्येक समवयस्कांहून किंवा वर्गमित्रांहून उत्तम नोकरी त्यांना मिळाली होती. मायदेश सोडून दुसऱ्या देशात राहावे लागत होते पण अफगाणिस्तान राहण्याच्या दृष्टीने तसा चांगलाच होता. त्यांच्या धर्माचे लोक तेथे होते आणि मुख्य म्हणजे उत्साही विद्यार्थी होते.

अहमद दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील त्यांच्या गावी आलेले होते. मात्र, युनिव्हर्सिटीने अहमद यांना परीक्षा घेण्यासाठी कॅम्पसमध्ये परत येण्यास सांगितले तेव्हा त्यांना कोणतीच भीती वाटली नाही. ते गेल्या चार वर्षांपासून तेथे अर्थशास्त्र शिकवत होते. कोविड-१९ साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारत होती, आयुष्य हळुहळू पूर्वपदावर येत होते आणि असेही ते १६ ऑगस्टला घरी परत येणारच होते. त्यांचे परतीचे तिकीटही काढलेले होते. त्यामुळे अहमद २७ जुलैला अफगाणिस्तानात गेले. तेथील परिस्थिती एवढ्या नाट्यमय वेगाने बदलेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. आता मात्र अहमद यांना अफगाणिस्तानात राहण्याची भीती वाटत आहे. तेथून लवकरात लवकर हलवले जाईल या आशेवर ते जगत आहेत.

“कोविड साथीमुळे मी काश्मीरला परतलो होतो आणि तेथूनच ऑनलाइन वर्ग घेत होतो. गेल्या महिन्यात कोविडच्या रुग्णांची संख्या बरीच कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचे निर्देश आम्हाला मिळाले आणि आम्ही २७ जुलैला काबूलला आलो. मात्र, तालिबानने देशावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आणि गोष्टी मुळापासून बदलू लागल्या. आता आम्ही प्रचंड भयाखाली जगत आहोत,” असे ३१ वर्षीय अहमद यांनी फोनवरील संभाषणात सांगितले. ते सध्या काबूलमध्येच युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये राहत आहेत आणि त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही, असेही त्यांनी सांगितले.

“कॅम्पसच्या बाहेर काय चालले आहे हे आम्हाला माहीत नाही. माझे १६ ऑगस्टच्या दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे तिकीट काढलेले होते. मात्र, विमानतळावरील गोंधळामुळे ते रद्द करण्यात आले,” असे अहमद म्हणाले.

काबूलमधील स्थिती गंभीर आहे असेही त्यांनी सांगितले. “आम्ही या देशात एवढा गोंधळ कधीच बघितला नव्हता. येथे अडकलेले सगळे काश्मिरी लोक चिंतेत आहेत. माझी पत्नी व दोन वर्षांचा मुलगा काश्मीरमध्ये आहेत. त्यांना माझी काळजी वाटत आहे. ते सतत फोन करत असतात,” असेही त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानात अडकलेले काश्मिरी नागरिक सातत्याने ईमेलद्वारे भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत, असेही अहमद यांनी नमूद केले. अफगाणिस्तानात जे घडले ते अनपेक्षित होते आणि अद्याप आम्हाला त्याचे पुरते आकलन होत नाही आहे, असेही ते म्हणाले. बख्तर युनिव्हर्सिटीतील आणखी एक प्राध्यापक अदील रसूलही मूळचे काश्मिरी आहेत. त्यांचे कुटुंबीयही काळजीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

“बाहेरचे संपूर्ण जग आमच्यासाठी बंद होऊन गेले आहे असे वाटत आहे. आम्हाला लवकरात लवकर घरी पोहोचायचे आहे,” असे रसूल म्हणाले.

अफगाणिस्तानात अडकलेले काश्मिरी चिंताग्रस्त आहेत, सतत भयाच्या छायेखाली आहेत आणि आपल्याला लवकरात लवकर मायदेशी परत आणावे असे आवाहन केंद्र सरकारला करत आहेत. बख्तर युनिव्हर्सिटी शिकवणारे दोन सहाय्यक प्राध्यापक आणि आणखी एका प्राध्यापकाच्या पत्नी असे तिघेजण युनिव्हर्सिटीच्या आवारात अडकले आहेत.

१५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल आपल्या ताब्यात घेतली आणि अफगाणिस्तानातील ‘युद्ध’ संपल्याचे जाहीर केले. अफगाणिस्तानचे नामकरण तालिबानींनी पुन्हा एकदा ‘इस्लामिक एमिराट ऑफ अफगाणिस्तान’ असे केले.

अमेरिकेने फौजा मागे घेतल्यानंतर आठवडाभरात वेगाने घडामोडी झाल्या आणि अफगाणिस्तानातील विविध भाग तालीबानी बंडखोरांच्या हातात गेले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी, आपल्याला रक्तपात टाळायचा आहे, असे सांगत १५ ऑगस्ट रोजी देशातून पलायन केले. काबुलच्या बख्तर युनिव्हर्सिटीत अडकलेल्या काश्मिरी प्राध्यापकांना भारतात आणण्याबाबत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्याशी बोलल्याचे जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी १७ ऑगस्ट रोजी सांगितले.

“अफगाणिस्तानात अडकलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला लवकरात लवकर सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असे आश्वासन मुरलीधरन यांनी दिले आहे. प्राध्यापक आसिफ अहमद आणि अदिल रसूल यांना लवकरात लवकर भारतात आणले जाईल असे आश्वासन मी त्यांच्या कुटुंबियांना देतो” अशा आशयाचे ट्विट नायब राज्यपालांच्या कार्यालयाने पोस्ट केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकार अफगाणिस्तानमधील सर्व भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी बांधील आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे.

“काबूल विमानतळ व्यावसायिक ऑपरेशन्ससाठी खुला झाला की आम्ही विमानसेवा उपलब्ध करून देऊ. काबूलमधील सध्याची परिस्थिती बघता, आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना तातडीने भारतात आणले पाहिजे असा निर्णय झाला. त्यांना हलवण्याचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आले आहे. आपले राजदूत आणि अन्य कर्मचारी १७ ऑगस्ट रोजी दुपारीच दिल्लीत पोहोचले आहेत,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे कळवले आहे.

१७ ऑगस्टच्या सकाळी भारतीय हवाईदलाच्या सी-सेव्हंटीन विमानाने १२० भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन काबूल विमानतळावरून उड्डाण केले. यामध्ये भारतीय दूतावासातील कर्मचारी, स्वत: राजदूत, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस कर्मचारी आणि चार पत्रकारांचा समावेश होता.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0