जुन्या-नव्या पर्वांचा दुवा

जुन्या-नव्या पर्वांचा दुवा

जरी तेव्हाचे आणि आजचे स्वयंभू पुरोगामी टिळकांना ‘ब्राह्मणांचे’ प्रतिगामी पुढारी मानत असत, तरीही प्रत्यक्षात टिळकांनी ‘ब्राह्मणी’ सीमा केव्हाच ओलांडल्या होत्या. ते मराठी प्रांतातील शेतकऱ्यांकडे जात, खेडोपाडी दौरे काढत. ‘केसरी’मधून दुष्काळी समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर कष्टकरी वर्गाच्या समस्यांना वाचा फोडली जाई. म्हणूनच ते ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. सनातनी ब्राह्मणांना टिळकांचे हे रूप मान्य नसे. टिळक केवळ असंतोषाचे जनक नव्हते, तर मराठी उद्योजकतेचेही जनक होते. केवळ गणेशोत्सव-शिवजयंतीसारख्या उत्सवांचे प्रणेते नव्हते, तर कामगार-शेतकऱ्यांच्या समस्यांवर आंदोलन करायला पुढे आलेले- एका अर्थाने रस्त्यावर उतरलेले पुढारी होते. जर ते अशा सर्वंकष राजकारणात उतरले नसते तर ते गणित, खगोलशास्त्र, संस्कृत, तत्त्वज्ञान या विषयांत पारंगत असे फक्त प्रकांड ‘टिळकशास्त्री’ झाले असते. साप्ताहिक साधनामध्ये प्रसिद्ध झालेला लेख.

राज्यपाल कोश्यारी नमले, माफी मागितली
लसीकरणात ६० टक्क्यांची घसरण
कुटुंब व समाजामधील स्त्री-पुरुषाच्या भूमिकेकडे भारतीय कसे पाहतात?

लोकमान्य टिळक गेले तेव्हा गोपाळकृष्ण गोखले जाऊन पाच वर्षे झाली होती. गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन होऊन तर 25 वर्षे झाली होती. तरीही मराठी वैचारिक वर्तुळात या तीन महानुभवांना एकच त्रिकोणात बसवले जाते.

‘टिळक आणि आगरकर’ नावाचे नाटकच विश्राम बेडेकर यांनी लिहिले होते. ‘अगोदर राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक सुधारणा?’ हा वाद अजूनही त्यांचा दोघांचा संदर्भ देऊन हिरीरीने घातला जातो. ‘आजचा सुधारक’ नावाच्या नियतकालिकाची प्रेरणा आगरकरच आहेत. य.दि.फडके यांचे ‘शोध बाळगोपाळांचा’ हे पुस्तक त्या दोघांची विचारसरणी आणि वाद-संवाद यांवरच प्रकाशझोत टाकते. अशी आणखीही काही उदाहरणे देता येतील. काही विचारवंतांमध्ये आजही ‘आगरकरवादी’ आणि ‘टिळकवादी’ असे दोन तट आहे. सर्वसाधारणपणे आजचे आगरकरवादी गट टिळकांची संभावना ‘प्रतिगामी-सनातनी’ अशी करतात. टिळकवादी मंडळी- म्हणजे आजची- आगरकरांची तशी अवहेलना करीत नाहीत, पण त्यांना तसे महत्त्वही देत नाहीत. राजकीय वर्तुळात (आता फारशी तशी वर्तुळे उरलेली नाहीत म्हणा!) अनेक स्वयंभू हिंदुत्ववादी टिळकांचा वारसा सांगतात. पण त्याचबरोबर कित्येक कम्युनिस्टही- विशेषत: डांगेवादी- टिळकांनाच राजकीय आद्यगुरू मानतात. समाजवादी पंथातले बहुतेक लोक मात्र आगरकरांचा संदर्भ देतात.

गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले

काही जण अशा तटा-गटात जात नसले, तरी त्यांचाही कल असतोच. उदाहरणार्थ- गंगाधर गाडगीळ (‘दुर्दम्य’ या टिळकांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखक) टिळकांच्या पक्षात धरले जातात. य.दि.फडकेंचा सुरुवातीचा कल आगरकरांच्या दिशेने होता, पण नंतर त्यांनी टिळकांना आद्य क्रांतिकारकाचे स्थान बहाल केले. आचार्य अत्र्यांपासून गोविंदराव तळवळकरांपर्यंत बहुतेकांचा कल टिळकांकडे होता. गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी पुस्तकांमध्ये नि:संदिग्ध टिळकविरोधी (प्रतिगामी) सूर आहे- त्यांच्यापैकी बहुतेक उदारमतवादी टिळकविरोधात. सर्वसामान्य मराठी माणसांचा टिळकांच्या बाजूने असलेला झुकाव हा गणेशोत्सव आणि शिवजयंती या समारंभी उपक्रमांमुळे असतो. त्यांच्या दृष्टीने टिळक-आगरकर असे ‘द्वैत’ नसते आणि त्या दोघांच्या वैचारिक मांडणीबाबत त्यांना काही देणे-घेणे नसते. टिळकांनी हे दोन्ही उत्सव 1895 मध्ये सुरू केले. आगरकरांच्या नावाने असे कोणतेही समारंभ नाहीत; पण ज्यांना ‘एनजीओ’ म्हणून ओळखले जाते- असे गट, स्त्री-मुक्तिवादी व समता-समानतावादी चळवळी साधारणपणे आगरकरांचे अधिष्ठान मानतात. टिळक त्यांच्या आसपास फिरकत नाहीत.

या तथाकथित ‘एनजीओ’वाल्यांमध्ये थोडेफार गांधीजी असतात, थोडेफार मार्क्स-एंगल्स असतात; पण गेल्या 40-50 वर्षांत महात्मा फुले अधिक मोठ्या प्रमाणात आले आहेत. जोतिराव आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावाने होणारे कार्यक्रम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सतत होणारे उत्सव व पुतळे यांनी आता बरीच सामाजिक-सांस्कृतिक जागा व्यापली आहे. सुमारे 50-60 वर्षांपूर्वी फक्त टिळकप्रणीत गणेशोत्सव होत होते, शिवजयंती होत असे; पण आजच्यासारखी नाही! असो.

या सर्व सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गदारोळ-धांदलीत (बिचारे) गोपाळकृष्ण गोखले तसे उपेक्षित राहिले. ज्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले, त्याच वर्षी म्हणजे 1915 मध्ये गोखलेंचे निधन झाले. गांधीजी भारतात आले तेच मुळी गोखल्यांच्या आग्रही निमंत्रणामुळे.

गोखलेंच्या नावाने कोणतेही उत्सव-समारंभ नाहीत. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पुण्यतिथीचे शताब्दीवर्ष पुणे येथे साजरे झाले. पण ते इतके औपचारिक होते की, देशात व एकूण मीडियात त्यांच्या त्या पुण्यतिथी कार्यक्रमाचा गाजावाजा झाला नाही.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तेव्हा फक्त 7-8 महिने झाले होते. त्या ‘मोदीमय’ माहोलामध्ये गोखले कोण? मोदी जरी गांधीजींच्या नावाने ढोल बडवत असले, तरी त्यांना गांधीजींच्या या गुरूबद्दल काही आस्था असल्याचे जाणवले नाही. (तशी मोदींना कुणाबद्दलच आस्था नाही- अगदी गोळवलकर-सावरकरांबद्दलही नाही. पण ते असो!)

लेखाच्या सुरुवातीला टिळक-आगरकर-गोखले यांच्या त्रिकोणी वारशाचा उल्लेख केला. या त्रिकोणाचे तीन कोन समान अंशांचे नाहीत. टिळकांना जसा मंडाले येथे हलाखीचा तुरुंगवास सहा वर्षे सहन करावा लागला, तसा आगरकर-गोखलेंना करावा लागला नाही. टिळकांचा व त्यांच्या लेखनाचा जसा धसका इंग्रजांनी घेतला, तसा गोखले-आगरकरांचा घेतला नाही.

सामाजिक सुधारणा अगोदर आणि मग राजकारण- हे सूत्र टिळकांनी व तत्कालीन काँग्रेसने स्वीकारले असते, तर अजूनही स्वातंत्र्य मिळाले नसते. कारण समाजातील सनातनी-प्रतिगामीपण आणि सांस्कृतिक मागासलेपण अजूनही प्रचंड प्रमाणात आहेत. (किंबहुना, वाढले आहे. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन सात वर्षे झाली, पण (बहुतांशी आगरकरवादी) दाभोलकरांना, ते जिथे असतील तिथे मान खाली घालावी लागेल इतके उग्र आणि हिंस्र पारंपरिक व अंधश्रद्धेचे प्रकार या काळात घडले आहेत.)

गोखले मवाळ विचारांचे होते. ब्रिटिश संसदीय उदारमतवादी परंपरेवर बऱ्यापैकी विश्वास ठेवून थेट जहाल संघर्षाऐवजी लोकशाही मार्गाने स्वातंत्र्य मिळविता येईल, असे त्यांना वाटत होते. ते स्वत: सर्वार्थाने उदारमतवादी, सेक्युलर, बुद्धिवादी आणि लोकशाही विचाराचे होते. पण त्यांनी स्थापन केलेल्या ‘सर्व्हंट्‌स ऑफ इंडिया सोसायटी’ची जी अवस्था झाली, तीच त्यांच्या विचारसरणीचीही झाली, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

पण 1885 ते 1905 ही 20 वर्षे काँग्रेसचे रूप आणि धोरण बऱ्याच अंशी मवाळच होते. बंगालच्या फाळणीनंतर (1905) मवाळवादी मागे पडू लागले. सुरतला 1907 मध्ये झालेल्या अधिवेशात चक्क घमासान अशी धुमश्चक्री जहाल व मवाळवादी यांच्यात झाली. काँग्रेसमधली ती पहिली अधिकृत फूट म्हणता येईल. टिळक आणि गोखले यांचे संबंध पराकोटीला परस्परविरोधात गेले. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध तीव्र टीका करू लागले. वर्षभरानंतर 1908 मध्ये टिळकांना अटक होऊन मंडालेला धाडण्यात आले. नाही म्हटले तरी, टिळक नसल्यामुळे जहालवादी गटाची पीछेहाट झाली. याच काळात गोखले इंग्लंड, आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला गेले. इंग्लंडमधील समविचारी मंडळींबरोबर त्यांची चर्चा झाली. गोखलेंची सभ्यता, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि उदारमतवादी विचार यांमुळे प्रभावित झालेले काही ब्रिटिश राजकीय पुढारी गोखलेंचे कट्टर चाहते बनले.

जरी तेव्हाचे आणि आजचे स्वयंभू पुरोगामी टिळकांना ‘ब्राह्मणांचे’ प्रतिगामी पुढारी मानत असत, तरीही प्रत्यक्षात टिळकांनी ‘ब्राह्मणी’ सीमा केव्हाच ओलांडल्या होत्या. ते मराठी प्रांतातील शेतकऱ्यांकडे जात, खेडोपाडी दौरे काढत. ‘केसरी’मधून दुष्काळी समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर कष्टकरी वर्गाच्या समस्यांना वाचा फोडली जाई. म्हणूनच ते ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. सनातनी ब्राह्मणांना टिळकांचे हे रूप मान्य नसे.

टिळकांच्या सूचनेवरून, सल्ल्यावरून अनेक ब्राह्मण व्यवसाय-उद्योगधंद्यांत उतरले. कारखानदारी आणि एकूण उद्योगधंदे यांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. शेकडो मराठी उद्योजक-कारखानदार तयार झाले ते टिळकांच्या प्रेरणेनेच. ज्या काळी ब्राह्मणांनी उद्योगधंदा-व्यापारात उतरणे निषिद्ध मानले जात असे, त्या काळात सर्कस काढण्यापासून ते उपाहारगृहापर्यंत आणि कारखानदारीपासून दुकानदारीपर्यंत व्यवसायात अगदी अस्सल पुणेरी ब्राह्मण उतरले. (आजही त्यांचे ते व्यवसाय सुरू आहेत- खरे तर त्यांचा तत्कालीन संदर्भ इतिहास लिहायला हवा.) म्हणजेच टिळक केवळ असंतोषाचे जनक नव्हते, तर मराठी उद्योजकतेचेही जनक होते. केवळ गणेशोत्सव-शिवजयंतीसारख्या उत्सवांचे प्रणेते नव्हते, तर कामगार-शेतकऱ्यांच्या समस्यांवर आंदोलन करायला पुढे आलेले- एका अर्थाने रस्त्यावर उतरलेले पुढारी होते. जर ते अशा सर्वंकष राजकारणात उतरले नसते तर ते गणित, खगोलशास्त्र, संस्कृत, तत्त्वज्ञान या विषयांत पारंगत असे फक्त प्रकांड ‘टिळकशास्त्री’ झाले असते. तो व्यासंग त्यांनी जपलाच (म्हणूनच ‘गीतारहस्य’ लिहू शकले- तेही मंडालेच्या तुरुंगात)!

कामगारवर्ग हा एक समांतर पण प्रभावी सामाजिक शक्ती आहे, याचे भान त्यांना आले ते 1905 नंतर आणि मुख्यत: रशियातील कामगार क्रांतीनंतर. म्हणूनच तर इंग्लंडमध्ये 1919 मध्ये ते मजूर पक्षाच्या सभेला प्रमुख वक्ते म्हणून हजर राहिले. (त्यानंतर भारतात आल्यावर 2000 हजार पौंडांची देणगी त्यांनी मजूर पक्षाला पाठवली) सभा तेथील कामगारसंघटनांनी आयोजित केली होती, तेथे जॉर्ज बनॉर्ड शॉ हे एक वक्ते होते. वस्तुत: टिळकांची लंडनभेट एका वकिली खटल्याबद्दल होती. या सभेला हजर राहणे हा बराचसा ऐच्छिक आणि काहीसा योगायोगाचा भाग होता.

पण टिळकांमधील या दृष्टिकोनावर बारीक नजर ठेवून असलेल्या लेनिन यांनी ‘टिळक कोण?’ ही नुसती चौकशी केली नाही, तर ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीच्या त्यांच्या एका कॉम्रेडला टिळकांना भेटायला सांगितले. आजही लंडनमध्ये टिळकांचा फोटो तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या कचेरीत आहे.

तसे पाहिले तर हे सर्व जण पेशवाईच्या अखेरीनंतर प्रकाशात आलेले विचारवंत नेते आहेत. म्हणजे त्यांचा राजकीय परिसर समान आहे. महात्मा फुले सोडले, तर बहुतेक जण पुणेरी ब्राह्मणी वातावरणात वाढले आहेत; पण त्यांच्या मनात धुमसणाऱ्या असंतोषाचा आविष्कार वेगवेगळा आहे. त्यांच्या जन्मापासून कार्यकाळाकडे आणि त्यांच्या प्रेरणास्रोतांकडे नजर टाकली तरी लक्षात येईल की, त्या सर्वांच्या सामाजिक-राजकीय सर्जनशीलतेला त्या विलक्षण ऐतिहासिकतेचे परिमाण आहे.

टिळक-आगरकर-गोखले रंगमंचावर येण्यापूर्वीच नेपथ्यरचनेला सुरुवात झाली होती- तीसुद्धा समाजाच्या आणि आर्थिक स्तराच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरून. त्या नेपथ्याची पहिली रचना एका अर्थाने बाळशास्त्री जांभेकरांनी केली होती, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस.

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म पेशवाईच्या शेवटच्या टप्प्यातला- 6 जानेवारी 1812 म्हणजे अगदी लहान वयात (सहाव्या वर्षी) पेशवाईची अखेर त्यांनी पाहिली. परंतु ‘पाहिली’ म्हणजे, त्या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व त्यांना समजले असे नाही. पण जसजसा त्यांनी तारुण्यात प्रवेश केला, तसतसा वातावरणातला गोंधळ त्यांना दिसू लागला. त्या गोंधळाला वाचा फोडण्यासाठी वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. 6 जानेवारी 1832 रोजी. पण टिळक-आगरकरांचा जन्म होण्याच्या अगोदर दहा वर्षे जांभेकर यांचे 34 व्या वर्षीच निधन झाले- 18 मे 1846 रोजी. म्हणजेच जांभेकर असोत वा फुले, लोकहितवादी असोत वा टिळक-आगरकर, हे कोणत्या लाटांवर स्वार होत होते, ते पाहणे म्हणूनच उद्‌बोधक आहे. त्या शतकाचा अखेरचा उद्‌गार केेशवसुतांनी काढला (7 ऑक्टोबर 1866 – 7 नोव्हेंबर 1905)- ‘ना मी हिंदू, ना मी ब्राह्मण, नाही एक पंथाचा’!

महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 चा. म्हणजे पेशवाईनंतर नऊ वर्षांनी आणि टिळक-आगरकरांच्या जन्माअगोदर 29 वर्षे! फुलेंचा संघर्ष तर सर्वंकष होता. पेशवाईशी वा त्या अनुषंगाने आलेल्या ‘ब्राह्मणी’ असंतोषाशी त्यांचा काही संबंध असणे शक्यच नव्हते. पण मराठी स्वायत्ततेची अस्मिता होतीच. म्हणूनच पहिले शिवाजीमहाराजांचे स्मारक आणि चिंतन त्यांनी केले. अस्पृश्यता आणि जातीची उतरंड याविरुद्ध बंड करताना त्यांचे वैश्विक परिप्रेक्ष्य प्रगट होत गेले. अमेरिकेत गुलामगिरीविरुद्ध लढणारे अब्राहम लिंकन यांचे स्मरण करून त्यांना लेखन अर्पण करणारे फुले हे आगरकरांच्याही अगोदर समाजसुधारणा चळवळीत लढाऊपणे उतरले होते आणि टिळकांच्याही अगोदर शिवजयंतीचा समारोह त्यांनी आयोजित केला होता. त्याचप्रमाणे टिळकांच्याही अगोदर कामगारांच्या मागण्या व संघटनाविचाराकडे लक्ष दिले होते. कोण अधिक मोठा वा अधिक द्रष्टा हे ‘तुलनेने’ ठरविण्याचा हा मुद्दा नाही, तर काळ व परिसर समजून घेण्याचा आहे.

गोपाळ हरि देशमुख ऊर्फ ‘लोकहितवादी’ यांचा जन्मही टिळक-आगरकरांच्या अगोदरचा आहे- 18 फेब्रुवारी 1823. आपल्या समाजाची अशी दुर्दशा का झाली आहे, इंग्रज येथे येऊन राज्यकर्ते झाले ते त्यांच्याकडे असलेल्या कोणत्या गुणांमुळे; आपल्या समाजातील विषमता, तंत्रकौशल्याबद्दल अनास्था, उच्चभ्रूपणा आणि उपेक्षितांबद्दल द्वेष इत्यादींविषयी ‘लोकहितवादीं’नीही कोरडे ओढले. फुले व सावित्रीबाईंनी तर येथील स्त्री-पुरुष विषमतेला व सनातनी विचारसरणीला आव्हान दिले होते. टिळक-आगकरांच्या जन्माअगोदर ‘बॉम्बे असोसिएशन’ची सुरवात झाली होती. हे सर्व संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय टिळक-आगरकर-गोखले या त्रिकोणी प्रगल्भतेचा वेध घेता येणार नाही.

टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 आणि आगरकरांचा 14 जुलै 1856. आगरकर हे टिळकांपेक्षा फक्त नऊ दिवसांनी मोठे. गोखलेंचा जन्म 9 मे 1866. म्हणजे गोखले त्या दोघांपेक्षा 10 वर्षांनी लहान. टिळक-आगरकरांचा जन्म 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाअगोदर एक वर्ष आणि गोखलेंचा युद्धानंतर नऊ वर्षांनी. या सर्वांची आयुष्यरेषा तशी फारशी लांब नव्हती. आगरकर वयाच्या 39 व्या वर्षी, गोखले वयाच्या 49 व्या वर्षी आणि टिळक 64 व्या वर्षी गेले. लोकहितवादी वयाच्या 69 व्या वर्षी आणि महात्मा फुले वयाच्या 63 व्या वर्षी. पण सर्वांचा कार्यकाळ सुमारे 50 वर्षांचा आणि तोही एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या पर्वातला. या पर्वाचा शेवटचा दुवा म्हणजे लोकमान्य टिळक. तो दुवा बरोबर 100 वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी तुटला. नव्या पर्वार्ची, नव्या कालखंडाची- गांधी-नेहरूयुगाला सुरुवात झाली.

(हा लेख १ ऑगस्ट २०२० रोजी ‘साप्ताहिक साधना’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. )

मूळ लेख 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: