लोकशाही म्हणजे स्वगत नव्हे!

लोकशाही म्हणजे स्वगत नव्हे!

मोदींच्या पूर्वनियोजित आणि अ-राजकीय गप्पांच्या अगदी विरुद्ध असा राहुल गांधींनी एनडीटीव्हीच्या रविश कुमारांशी साधलेला संवाद विनम्र आणि प्रामाणिक होता असे म्हणता येईल.

राजस्थानः बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा
शेतकरी आंदोलनात भाजप हस्तकांचा शिरकाव?
‘एक देश, एक निवडणूक’ – भाजपची खेळी

मध्यप्रदेशात शाजापूर येथे भर प्रचारा दरम्यान एनडीटीव्ही हिंदीचे  वृत्तनिवेदक आणि पत्रकार रविश कुमार यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली. नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये केवळ मर्जीतल्या पत्रकारांना मुलाखती दिल्या आहेत, अथवा सिनेकलाकारांसोबत आपल्या निवासस्थानी ‘अराजकीय’ बातचीत केली आहे. त्यांच्या तुलनेत काँग्रेस अध्यक्ष भारतातील एका महत्वाच्या आणि प्रेरणास्थानी असलेल्या पत्रकाराच्या पूर्वनियोजित नसलेल्या प्रश्नांना उत्साहात सामोरे गेले असे दिसले.

नैतिकदृष्ट्या अशिष्ट आणि द्वेषाने भरलेल्या सध्याच्या वातावरणात राहुल गांधींना प्रेमाच्या राजकारणावर भर देणे महत्त्वाचे वाटते. पूर्व दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या उमेदवार अतिशी यांच्याबद्दल जे पत्रक काढले गेले त्यात अनाकलनीय असे काही नाही.  या पत्रकातील भाषा तीन प्रकारच्या वृत्तींचा मिलाफ झाल्याचे दर्शवते – एक म्हणजे, पुरुषप्रधान मानसिकतेची अरेरावी, दुसरे म्हणजे राजकीय विरोधकांची खिल्ली उडवणे, आणि तिसरे म्हणजे अत्यंत घाणेरड्या अफवा पसरवून एकूण राजकीय चर्चाविश्व खालच्या पातळीला आणणे.

गेल्या पाच वर्षांत या प्रवृत्ती कोणत्या राजकीय विचारसरणीमुळे फोफावल्या आहेत हे आपल्याला माहित आहे. हा पॅटर्नअगदी  स्पष्ट आहे. राजकारणाची भाषा इतकी हिणकस आणि अर्वाच्य केली गेली आहे की ज्यामुळे लोक आपल्या आदीम भावनांना शरण जाऊन मतदान करतात. या अतिरेकी राष्ट्रवाद्यांना जणू काही असे वाटते की जोपर्यंत ते असभ्य भाषेचा आणि पद्धतींचा अवलंब करून मतदारांना लुब्ध करणार नाहीत, तोपर्यंत मतदार त्यांना मत देणार नाहीत.

राहुल गांधींनी मात्र या असभ्य भाषेला उत्तर देताना प्रेमाच्या भाषेवर जोर दिला आहे.  द्वेषाचे वारे वाहत असताना आणि त्याचे विष व्हॉट्स अँप आणि इतर समाजमाध्यमांतून पसरलेले असताना, गांधी यांनी प्रेमावर भाष्य करणे धाडसाचे आहे.  तर दुसरीकडे एका मनुष्याने लोकांना आपल्या कथित श्रेष्ठत्वाच्या आणि द्वेषपूर्ण भाषेच्या जाळ्यात ओढून जणू संमोहित केले आहे हे आपण पाहतोच आहोत.

आपला पक्ष भाजपला ‘राजकीय टक्कर’ देण्यास यशस्वी झाला आहे असे म्हणत राहुल गांधींनी काँग्रेस अजूनही  ताठ मानेने राजकारणात उभी असल्याचा दावा केला. हे म्हणताना आत्तापर्यंत मोदींनी मोठ्या प्रमाणात कोणावर हल्लाबोल केला असेल तर तो काँग्रेस पक्षावर आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

२)काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २०१९ निवडणुकीचा प्रचार करताना.सौजन्य: पीटीआय

२) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी २०१९ निवडणुकीचा प्रचार करताना.सौजन्य: पीटीआय

राहुल गांधींचे निःस्वार्थ आवाहन

सॅम पिट्रोडांनी १९८४ सालच्या शीख हत्याकांडावर केलेल्या असंवेदनशील आणि नीच पातळीवरील विधानांचा भाजपला फारसा फायदा होऊ न देण्याची खबरदारी राहुल गांधींनी घेतलेली दिसते. राहुल म्हणाले की ही विधाने “पूर्णपणे मर्यादा सोडून केलेली आहेत आणि अजिबात दखलपात्र नाहीत”.

पंजाबमधील शीख जनतामोदी-मुक्त राज्याचे स्वप्न पाहत असताना दिल्लीतील लोकांना १९८४ सालची आठवण करून देणे ही भाजपसाठी मुश्किल खेळी आहे. राष्ट्रवाद आणि अल्पसंख्याक-विरोधी भूमिका या भाजपच्या समीकरणाला शीख सहजासहजी बळी पडणार नाहीत. त्यांना कदाचित काँग्रेसबद्दल फार प्रेम नाही, परंतु बहुसंख्यांची सत्ता सीमेपालिकडच्यांशी असलेले ऐतिहासिक आणि व्यावहारिक संबंध कसे बिघडवू शकते याचे राजकीय मूल्यमापन मात्र त्यांनी जरूर केलेले आहे. द्वेष हे कशाचेही उत्तर नाही, पण ते इतिहासात घडलेल्या दुर्घटनांना अधोरेखित करण्याचे माध्यम आहे. ज्यांनी ते भोगले आहे, त्यांना हे निश्चितच ज्ञात आहे.

राहुल गांधींनी आणखी एक महत्वाचे विधान केले. राहुल यांनी राजकारणामध्ये ‘स्वत्वाला मिटवण्याची’ इच्छा व्यक्त केली. याची सुरुवात अहंकाराचा नायनाट करण्यापासून करावी लागेल. इतरांसमोर अथवा इतरांच्या आवाजासमोर स्वतःचा आवाज कमी करण्याची तयारीही त्यांनी दाखवली. हे बोलताना त्यांनी शेतकऱ्याचे उदाहरण घेतले. शेतकऱ्यांसमोर मी ऐकणाऱ्याच्या भूमिकेत असलं पाहिजे, तिथे माझा आवाज बंद हवा तेव्हाच त्याची ‘खरी वेदना’ मी जाणून घेऊ शकतो.  हेच उदाहरण त्यांनी कामगार, पत्रकार किंवा इतर कोणीही जे त्यांना भेटायला येईल त्यांच्याबाबतीत लागू होईल असे म्हटले. ही एक मूल्याधारीत स्वत्वाची चळवळ आहे, ज्यात इतरांच्या आवाजाला (आणि अस्तित्वाला) स्वतःच्या अहंकारापेक्षा अधिक महत्व दिले जाईल.

यामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. चंपारण सत्याग्रहातशेतकऱ्यांना भेटल्यावर गांधींना सत्याची जाणीव झाली होती, तेव्हा ते ‘परमेश्वर, अहिंसा आणि सत्याला’ सामोरे गेले होते. भौतिक पातळीवर ही चळवळ जशी उलगडत गेली तसे दिसून आले की त्याची परिभाषा ही धार्मिक नसून नैतिक होती. नैतिकतेच्या या प्रवासात राहुल यांनी आपला आवाज मिसळला आहे. हे महत्वाचे आहे. ज्यात तुम्ही तुमच्या वरचढ असणारा आवाज कष्टपूर्वक ऐकता; तो ऐकण्यासाठी स्वतःला उंचावता. ही एक मूल्याधारीत प्रक्रिया आहे ज्यात तुम्ही बहिऱ्या-स्वकेंद्रित अशा अहंकारापासून मुक्त होऊन तुमच्यापेक्षा वेगळ्या-विरोधी अशा आवाजाला ऐकू पाहता. हा आवाज नेहमीच तुमच्या फायद्याचा किंवा तुम्हाला आनंददायी असेलच असे नाही, तर कदाचित जास्त आव्हाने समोर उभी करेल.

राहुल यांच्या बोलण्यात आढळणारी समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि विचारांशी जुळवून घ्यायची इच्छा कौतुकास पात्र आहे. त्यांना स्वतःच्या साचेबद्ध विचारांपालिकडे जाण्याची आकांक्षा आहे असेत्यांच्या भाषेचे निरीक्षण केल्यास दिसते.

बोलणे आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील संबंध हा अनेकदा बेगडी आणि वादग्रस्त असतो. वेळ आणि साधनांच्या मर्यादा त्यास असतात. परंतु तरीही या भाषेचा अर्थ उलगडणे आवशयक आहे, विशेषतः अशा देशात जेथे गेल्या पाच वर्षांत राजकारणाची भाषा अगदी खालच्या पातळीला जाऊन पोहोचली आहे.

भारतातील मुख्यप्रवाही राजकारणात प्रेरणादायक म्हणावे असे सध्या काहीही नाही. अपवाद म्हणजे जिग्नेश मेवानी आणि कन्हैय्या कुमार. या सगळ्यात राहुल गांधी राजकारणामध्ये पुन्हा मुल्याधिष्ठित भाषा आणू पाहत आहेत ही बाब नमूद करण्यासारखी आहे.

मोदींच्या घमेंडी प्रतिक्रिया

राहुल गांधींनी पत्रकारांना दिलेल्या खुल्या मुलाखती पाहूनच कदाचित मोदींनीही इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्राला आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत दिली.  राहुल यांच्या लोकशाही बळकट करायच्या भाषेच्या अगदी विरुध्द अशी मग्रूर भाषा मोदींनी वापरलेली दिसते. वर्तमानपत्रांनी चांगल्या गोष्टींचा आढावा न घेतल्याबद्दल त्यांनी मुलाखतकारांचा समाचार घेतला. आयएनएस विराटचीबातमी केल्याबद्दलही त्यांनी वर्तमानपत्रावर तोंडसुख घेतले. (मोदींच्या “अनौपचारिक सफरी’वर भाजपने प्रचंड पैसे खर्च केल्याचा आरोप करण्यात आला होता.)

इंडियन एक्सप्रेससारख्या वर्तमानपत्रांमध्ये आपली ‘प्रतिमा’ कशी चित्रित केली जाते याबाबत पंतप्रधानांना बरीच चिंता आहे असे वाटले.   त्यांच्यामते जे काही त्यांच्याविरोधात लिहिलेले असते ते पूर्वग्रहदूषित असते आणि तो अजिबातच माध्यमांचा हक्क वगैरे नसतो. कुठल्याही वर्तमानपत्राचे पहिले कार्य सत्याचे संरक्षण हे आहे, राजकारण्यांची प्रतिमा उंचावणे हे नव्हे!

राहुल गांधींना जेव्हा मोदींच्या फक्त तीन तास झोप घेण्याबाबत आणि बाकी अठरा तास काम करण्याबाबत विचारले गेले तेव्हा त्यांनी त्याचा संबंध त्यांच्या आधीच्या मुद्द्याशी विस्ताराने जोडू पाहिला.  राजकीय नेत्यांसाठी ‘कामाची’ परिभाषा नेमकी काय आहे अशी पृच्छा राहुल यांनी केली आणि हे काम म्हणजे लोकांचा ‘आवाज’ ऐकणे आणि त्यावर ‘विचार’ करणे हे आहे असे नमूद केले. मोदींनी जनतेच्या मुद्द्यांवर राजकीय वादविवाद करावा असे आव्हानही त्यांनी दिले.

येथे राहुल यांनी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला तो म्हणजे नेत्यांची राजकीय निष्ठा ही ते किती (कमी) काळ झोप घेतात याआधारे मोजायची नसते, तर ते किती तास जनतेशी संवाद साधतात यावर ठरवायची असते. या मोजपट्टीवर मोदी कमी पडतात असे त्यांना वाटते.

राहुल गांधी राजकारणाला वक्तृत्वापुरते मर्यादित मानत नाहीत. लोकशाहीमध्ये भाषण करणे आणि प्रतिक्रिया देणे यांपुरते राजकीय कार्य सीमित नसते. हे स्वगत सांगितल्यासारखे आहे. हा मुद्दा त्यांनी अगदी योग्य पद्धतीने मांडला. मोठी स्वगते करणे हे हुकूमशहांचे लक्षण मानले जाते. जो नेता आपल्या जनतेचे ऐकून घेत नाही, त्याचा लोकशाहीवर विश्वास नसतो. लोकांचा आवाज ऐकणे हे लोकशाही कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असते – जिथे जनतेचे म्हणणे त्यांच्या प्रतिनिधींकडून (संसदेमध्ये) ऐकून घेतले जाते. प्रातिनिधीक लोकशाहीमध्ये सत्ता ही नेत्यांमध्ये आणि जनांमध्ये वाटून घेतली जाते. कुठल्याही नेत्याची प्रथम जबाबदारी ही लोकांच्या मागण्या आणि इच्छा-आकांक्षा जाणून घेऊन वर्तन करणे ही असते. सध्या भारतात उलट चित्र आहे जिथे लोकांना पंतप्रधानांच्या मर्जीनुसार वर्तन करावे लागते आहे. हे सगळे लोकशाहीच्या संकल्पनेविरुध्द आहे.

राहुल गांधी यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची इच्छा तर वर्तवलीच, परंतु त्याचसोबत मायावती यांच्याबद्दल आदर व प्रेम व्यक्त करून आपला ‘प्रेमाच्या राजकारणावरचा’ विश्वास अधिक ठळक केला.  भारतीय राजकारणात अशी भाषा सध्या ऐकू येत नाही, त्यामुळे हा एक स्वागतार्ह दृष्टीकोन आहे असे म्हणायला हरकत नाही. मायावतींना त्यांनी राष्ट्रीय ‘आयकॉन’ म्हणून संबोधले. राजकीय विरोधकांसाठी अशी परस्पर आदराची भावना असणे चांगले लक्षण आहे. यामुळे नेत्याचा लोकशाहीवरील विश्वास दिसतो, त्याउलट हिंदुत्ववादी नेते मात्र विरोधकांबद्दल सतत कटू विधाने करताना दिसतात.

टीका पचवू न शकणारे मोदी

या मुलाखतीत मोदींनी अ-राजकीय मुद्दे जसे “स्वच्छता” आणि “आरोग्य” हे आपल्या सरकारचा परंपरागत वारसा असल्याचे सांगितले.  एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना केवळ एकदा निश्चलनिकरणाचा उल्लेख केला गेला. मुसलमानांच्या गळचेपीविषयी विचारताच त्यांनी दिवंगत एपीजे अब्दुल कलाम आणि सानिया मिर्झा यांची नावे ‘सक्षमीकरणाची प्रतीके’ म्हणून वारंवार घेतली.

मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना मोहम्मद अखलाख आणि पहलू खान यांच्याविषयी प्रश्न विचारले नाहीत.  १९६५ साली शाहिद झालेले अब्दुल हमीद यांना भारतीय देशभक्तीचे प्रतीक बनवून त्यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध केले गेले आणि त्यापुढे गौरक्षकांच्या आणि लव जिहाद गटांच्या हातून मारल्या गेलेल्या मुसलमानांच्या मागण्या झाकल्या गेल्या. ‘खान मार्केट गँग’ने असा काय गुन्हा केला ज्याने मोदींना इतका संताप यावा असा येथे प्रश्न पडतो.  जर मोदी नक्षलवादाप्रति ‘शून्य सहिष्णुता’ दाखवतात तर मग जेव्हा हिंदू राष्ट्रवादी अल्पसंख्याक आणि टीकाकारांवर हल्ले चढवतात तेव्हा ते आत्यंतिक सहिष्णू कसे बरे होतात?

मुलाखतीत मोदी म्हणतात – “मला वाटते की टीका जरूर व्हावी, पण आरोप लावले जाऊ नयेत”. हे कोण ठरवते? आरोपांकडे टीकेचाच एक भाग म्हणून पाहिले पाहिजे. लोकशाहीमध्ये टीकेचे मूल्यमापन जनतेने, विरोधकांनी आणि माध्यमांनी त्यांच्या मताप्रमाणे करावे अशी अपेक्षा असते. ते सत्ताधारी पक्षाने करायचे नसते. मोदींची टीकेप्रति असणारी भावना राहुल यांच्या उपहासाबाबतच्या विचारांच्या अगदी विरुद्ध आहे.  उदयोन्मुख नेता म्हणून त्यांची जी टर उडवली गेली त्यातून ते बरेच काही ‘शिकले’ हे जेव्हा त्यांनी मान्य केले, तेव्हा राहुल यांनी त्यांच्या ‘राजकारणात स्वत्व विसरण्याच्या’ इराद्याला पुष्टी दिली असे म्हणता येईल.

ह्या विधानामुळे राविश कुमार निश्चितच स्तिमित झाले. आपणा सर्वांसाठीही तो एक मोठाच धडा आहे. भारतात सध्या आपल्या खऱ्याखुऱ्या संस्कृतीवर सातत्याने हल्ला चढवला जातो आहे. एक नवीच संस्कृती जन्माला घातली जात आहे: ज्यात उपमर्द करणे आणि आततायी राष्ट्रवादाच्या द्वेषयुक्त ब्रॅण्डला नाही म्हणणाऱ्यांचे दमन करणे हे अंतर्भूत आहे.  या सगळ्यापासून दूर राहणे आणि आपले राजकीय कर्तव्य पार पाडत राहणे महत्त्वाचे आहे. राहुल गांधींनी याबाबतीत आपल्याला चांगली शिकवण दिली आहे असे म्हणावे लागेल.

मानश फिराक भट्टाचरजी हे स्पिकिंग टायगर बुक्सने ऑगस्ट २०१८ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘Looking for the Nation: Towards Another Idea of India’ या पुस्तकाचे लेखक आहेत.

मूळ लेखाची लिंक

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: