‘तोंडी पुराव्या’च्या आधारे फारुखीला जामीन नामंजूर

‘तोंडी पुराव्या’च्या आधारे फारुखीला जामीन नामंजूर

नवी दिल्ली: सौहार्द आणि बंधूभावाला प्रोत्साहन देणे हे प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य आहे असे सांगत, मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर पीठाने, ग

वुहानला मुंबईने मागे टाकले
कानठळ्या बसवणाऱ्या उन्मादाला थोपवताना…
अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक

नवी दिल्ली: सौहार्द आणि बंधूभावाला प्रोत्साहन देणे हे प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य आहे असे सांगत, मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर पीठाने, गुरुवारी मुनावर फारुखीचा जामीन अर्ज फेटाळला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी फारुखीला १ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. अर्जदारांनी स्टॅण्डअप कॉमेडीच्या नावाखाली धार्मिक भावना दुखावणारे कृत्य केले आहे याचा प्राथमिक पुरावा दिसत आहे, असे न्यायमूर्ती रोहित आर्य यांनी अर्ज फेटाळताना नमूद केले.

मूलभूत स्वातंत्र्यासोबत कर्तव्याचे भान राखणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा समतोल त्याच्या कर्तव्यांसोबत तसेच अन्य नागरिकांप्रती असलेल्या बांधिलकीसोबत साधला गेला पाहिजे,” असे जामीन नाकारणाऱ्या आदेशात म्हटले होते. आपली परिसंस्था व कल्याणकारी समाजातील सहअस्तित्वाची शाश्वतता नकारात्मक शक्तींनी प्रदूषित होऊ न देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले.

इंदूरमधील एका कॅफेमध्ये नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हिंदू देवदेवतांवर तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अश्लाघ्य टिप्पणी केल्याप्रकरणी स्टॅण्ड-अप कॉमेडियन मुनावर फारुखीला अन्य चार जणांसह १ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष म्हणजे फारुखीने प्रत्यक्षात ही टिप्पणी केली की नाही याबद्दल शंका आहे. तो या शोची तालीम करत असताना जे बोलत होता ते एका भाजप आमदाराच्या मुलाने ओझरते ऐकले आणि त्याने दिलेल्या “तोंडी पुराव्यावरून” फारुखीला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.

फारूखीसह नलीन यादव, प्रकाश व्यास, एडविन अँथनी आणि प्रियम व्यास यांनाही अटक करण्यात आली होती. हे सगळे कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी होते. या सर्वांना भारतीय दंड संहितेच्या कलम २९१ए खाली (धार्मिक भावना दुखावणे) अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी फारुखीचा मित्र सदाकत खान यालाही गौर यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. खानने सत्र न्यायालयात केलेला जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. फौजदारी तक्रारीत नमूद केलेले कोणतेही विधान फारुखीने केलेले नाही हा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणाचा तपास सुरू असून यापुढे आणखी स्पष्ट पुरावाही मिळू शकतो. यात अटक झालेल्या अन्य व्यक्तींविरोधातही महत्त्वाचा पुरावा मिळू शकतो, असे न्यायमूर्ती आर्य जामीनअर्ज फेटाळताना म्हणाले.

अर्जदाराविरोधात अशाच प्रकारची तक्रार उत्तर प्रदेशातील जॉर्जटाउन पोलिस ठाण्यातही दाखल झाल्याचे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. फारुखीने याने मे २०२० मध्ये केलेल्या एका विधानाच्या तपासासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याचा ताबा मागितला आहे.

तुम्ही अन्यधर्मीयांच्या भावनांचा निरादर का करता, तुम्ही व्यवसाय म्हणून असे कसे करू शकता, असे यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती आर्य यांनी फारुखीला विचारले होते. त्यावेळी त्यांनी निर्णय राखून ठेवला होता. फारुखीचे वकील विवेक तांखा यांनाही तुम्ही जामीनअर्ज मागे का घेत नाही, असा प्रश्न न्या. आर्य यांनी विचारला होता. मात्र, अर्जदाराने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्याला जामीन मंजूर झाला पाहिजे, असे वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले होते. दुसऱ्या एका वकिलांनी फारूखीवर राम व सीता यांच्याबद्दल “आक्षेपार्ह विधाने” केल्याचा आरोप केला तेव्हाही “अशा लोकांना सोडायला नको. मी गुणवत्तेवर आदेश राखून ठेवत आहे,” अशी टिप्पणी न्यायमूर्तींनी केली होती.

१६ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान इंदूर पोलिस केस डायरी न्यायालयापुढे सादर करण्यास असमर्थ ठरले होते आणि त्यात फारुखी व अन्य पाच जणांविरोधातील आरोपांना पाठबळ देणारे असे काहीही नाही, असेही त्यांनी न्यायालयापुढे सांगितले होते. फारुखीने हिंदू दैवतांचा किंवा अमित शहा यांचा अवमान केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही, असे तुकागंज पोलिस ठाण्यातील निरीक्षक कमलेश शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.

शोदरम्यान फारुखीने हिंदू दैवतांवर विनोद केल्याचे पुरावे नाही पण त्याने फारसा फरक पडत नाही. तालमीदरम्यान तो राम आणि शिवाजी यांच्यावर विनोद करत होता, असे तक्रारदारांनी आम्हाला सांगितले आहे, असे इंदूर पूर्वचे पोलिस अधीक्षक विजय खत्री यांनी आर्टिकल फोर्टीनला सांगितले आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: