गो-तस्करीच्या संशयावर मुस्लिम व्यक्तिची जमावाकडून हत्या

गो-तस्करीच्या संशयावर मुस्लिम व्यक्तिची जमावाकडून हत्या

भोपाळः मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम (होशंगाबाद) जिल्ह्यातील बराखड गावात २ ऑगस्टला गाईच्या तस्करीच्या संशयावरून ५० वर्षाचे नजीर अहमद यांची जमावाने हत्या केली. अहमद हे महाराष्ट्रातील अमरावती नजीकच्या नंदेरवाडा या गावात राहणारे असून ते २८ गायींना ट्रकमधून घेऊन जात होते. त्यांच्या सोबत शेख लाला (३८) व सैय्यद मुश्ताक (४०) हे दोघे जण होते. अहमद यांचा ट्रक ८-९ किमी अंतरावर बराखड गावानजीक रात्री आला असता जमावाने थांबवला. जमावाकडे लोखंडी कांब, लाठ्या होत्या. हा जमाव अहमद यांच्या गावापासून ८-१० किमी अंतरावर राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जमावाने गायींची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करत या तिघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत अहमद यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद यांच्या ट्रकमध्ये २८ गायींपैकी २६ गायी जिवंत होत्या व दोन मृत होत्या. या गायी गुरांच्या बाजारात विक्रीस नेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी जमावाविरोधात व मारहाणीत वाचलेल्या दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. जमावावर आयपीसी कलम ३०२, ३०७, १४७, १४८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जमावाच्या मारहाणीत वाचलेल्या शेख लाला याने ५० ते ६० जणांचा जमाव आमच्यावर चालून आल्याचे पत्रकारांना सांगितले. आमचा ट्रक जमावाने अडवला व काही मिनिटांतच त्यांनी लोखंडी कांब व काठ्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली, यात अहमद मरण पावला असे लाला यांचे म्हणणे आहे.

COMMENTS