भारतीय माध्यमांकडून अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार

भारतीय माध्यमांकडून अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार

माध्यमांची दीर्घकाळ टिकणारी शिस्नताठरता ही भ्रामक पुरुषत्वाची जाणीव वाढवत नेणारी अवस्था आहे. या कालखंडाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्यात प्रसारमाध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचा खास उल्लेख करावा लागेल.

आत्महत्या प्रकरणात चौकशीचे पाटील यांचे आश्वासन
रिपब्लिक टीव्ही प्रसारण बंदी : हायकोर्टात २ याचिका
८-१० आठवड्यांसाठी टीआरपीचा खेळ बंद

कार्यक्रमाचा सुत्रधार पाकिस्तानी सैन्याने भारतीय वायूदलाचे एक विमान पाडल्याच्या बातमीचे विश्लेषण करत असलेल्या एका निवृत्त एअर चीफ मार्शलची मुलाखत घेत होता. ‘पाकिस्तान करत असलेल्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश,’ असा मथळा टीव्हीच्या पडद्यावर कर्कशपणे झळकत होता.

चॅनेलने या विषयाबाबत जी बातमी केली होती ती सरकारी आवृत्तीपेक्षा थोडीशीच अधिक व्यापक होती. त्यांच्या स्वतःच्याच बातमीचा एकंदर सूर पाहता हे शब्द म्हणजे त्या बातमीची कुचेष्टाच होती. मात्र उपरोधाची समजच नसलेल्या भारतीय प्रसारमाध्यमांचे एकूण स्वरूप पाहता, पडद्यावरचा सुत्रधार किंवा पडद्यामागची बातम्या तयार करणारी मंडळी यांच्यापैकी कुणालाही ते जाणवले असेल असे वाटत नाही. आणि जरी जाणवले असते, तरीही त्यामुळे ते थांबले असते का? बहुधा नाहीच, कारण त्यांच्या मते जे  राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत, त्यापुढे पत्रकारितेची तत्त्वे वगैरेची तमा कोण बाळगतो? शिवाय टीआरपीत होणारी वाढ हाही एक चांगला बोनस आहेच!

“..राष्ट्रवादी असणे ही पत्रकार असण्याची पूर्वअट आहे,” हे भारतातील आधुनिक न्यूज टेलिव्हिजनचे गुरूदेव अर्णब गोस्वामी यांचे शब्द आहेत. त्यांचे क्लोन आणि भक्तपरिवार श्रद्धापूर्वक त्यांच्या वचनांचे पालन करत आहेत. आपल्याला या राष्ट्रवादी दिखाव्याचे प्रदर्शन रोज रात्री पाहायला मिळते आणि त्यामध्ये प्रामाणिक तरुण तरुणींच्या नेतृत्वाखालील उत्साही चर्चांचाही समावेश असतो.

आज तक वर, इंडिया गेटच्या पार्श्वभूमीवर, पाच पुरुष उभे आहेत, आजकाल महिला चर्चासत्रात दिसेनाश्या झाल्या आहेत, प्रत्येकाकडे ‘पाकिस्तानला कसे गुडघे टेकायला लावायचे’ आणि ‘हा कर्करोग कायमचा कसा संपवायचा’ त्याचे तोडगे आहेत. त्यांच्या समोर, प्रेक्षकांमधला एकजण प्रचंड मोठा भारतीय ध्वज फडकावतो आहे.

“कुठे आहेत ते देशद्रोही”, आणखी एक सुत्रधार चॅनेलवर ओरडताना दिसला. नेहमीच्याच ‘राष्ट्रद्रोही’ संशयितांच्या दिशेने त्याचा रोख होता – विद्यार्थी, उदारमतवादी, शांततावादी! एका तेलगू चॅनलवर अँकर चक्क लष्करी गणवेश घालून आणि हातात एक खेळण्यातली बंदूक घेऊन आला. “तू चित्रे पुरव, मी युद्ध पुरवतो,” एका वार्ताहराने क्यूबामध्ये सर्व काही शांत आहे आणि युद्ध चालू नाही असे कळवले तेव्हाचे विल्यम रँडॉल्फ हर्स्ट याचे हे प्रसिद्ध वाक्य. भारतीय टेलिव्हिजन चॅनल आणखी पुढे जाऊ पाहत आहेत. ते स्वतःच युद्ध पुरवू पाहत आहेत. माध्यमांची ‘दीर्घकाळ टिकणारी शिस्नताठरता’ (एका डॉक्टर मित्राने सुचवलेला शब्द) ही भ्रामक पुरुषत्वाची जाणीव वाढवत नेणारी अवस्था आहे.

चॅनल्सच्या बाहेरही परिस्थिती फारशी चांगली नव्हती. ज्यांच्याकडून थोड्या गांभीर्याची, संयमाची अपेक्षा करावी अशा अनेक वरिष्ठ पत्रकारांनी पाकिस्तानी सीमेमध्ये हवाई हल्ले केल्याबद्दल भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले. हा वैयक्तिक दृष्टिकोन आहे आणि त्याच्याबाबत वाद घालण्याचे कारण नाही, पण अतिरेकी राष्ट्रवादाच्या अशा उघड पुरस्कारामुळेच युद्धखोर राष्ट्रवादी घटकांना एक प्रकारची वैधता पुरवली जाते.

खरे तर तथ्यांची पडताळणी, सरकारकडे पुराव्यांची मागणी करणे, आणि स्वतःच उन्मादात सामील होऊन आपण राष्ट्रवादी असल्याचे सिद्ध करण्याऐवजी चालू असलेल्या घडामोडींपासून थोडी अलिप्तता, थोडे अंतर राखणे या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये आहेत. कदाचित ‘देशाची मनःस्थिती’ तशी असेलही – जी मुळातच शंकास्पद संकल्पना आहे – पण तरीही पत्रकाराने त्याचा विचार करावा का?

मला पूर्वी असे वाटत असे की रोज रात्री देशाबद्दल, देशभक्तीबद्दल आणि पाकिस्तानबद्दल असे ओरडणे आणि ‘देशद्रोह्यां’च्या विरोधात सतत द्वेष निर्माण करत राहणे हे (टीआरपीच्या) आकड्यांवर डोळा ठेवून केले जात असावे. वातावरण कठीण आहे आणि चॅनलना पैसे मिळवणे अवघड जात आहे, अशा वेळी असे सगळे प्रकार केले जाणारच! प्रेक्षकांनाही ते हवे वाटतात आणि चॅनल त्यांना ते देऊन आपल्याकडे आकर्षून घेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या सगळ्याचा अर्थ नीट लावता येत होता.

आता मात्र मला खात्री वाटत नाही. ‘देशाच्या तथाकथित शत्रूं’च्या विरोधातली ही आक्रमक मोहीम या सरकारच्या आणि त्याहून व्यापक असलेल्या संघ परिवाराच्या उद्देशाशी फारच मिळतीजुळती आहे. टेलिव्हिजन चॅनल – किमान त्यांच्यापैकी काही – एक विशिष्ट मनःस्थिती, एक विशिष्ट कथन तयार करण्यासाठी संघटितपणे काम करत असल्यासारखे वाटते, जे या सरकारच्या पथ्यावर पडणारे आहे!

ती चॅनलस केवळ नरेंद्र मोदी आणि त्यांचे प्रशासन यांची मुखपत्रे किंवा समर्थक नाहीत. ते कानठळ्या बसवणारे भोंगे आहेत. ते जे आहे त्याचा प्रसार करत नाहीत, तर तो प्रसार इतक्या कर्कशपणे करतात की इतर आवाज त्यात बुडून जातात. त्यांचा युद्धखोरपणा हा केवळ एक पवित्रा नाही, ते त्यांचे महत्त्वाचे शस्त्र आहे! ज्या शत्रूला चिरडून टाकायचे त्यांच्यावरच त्या शस्त्रांना धार लावली जात आहे.

राष्ट्रवादी उन्मादावस्थेची निर्मिती हा केवळ स्वार्थी व्यवसायासाठी खेळलेला डावपेच नाही. तो एका व्यापक रणनीतीचा भाग आहे आणि त्यामध्ये केवळ टेलिव्हिजन चॅनलच नाहीत तर समजामाध्यमे, ट्रोलसेना आणि खोट्या बातम्या प्रसवणारे कारखाने हे सगळे त्यात सामील आहेत. देशभक्तीपर गाण्यांचे व्हिडिओ पसरवले गेले. सैनिकांच्या शौर्यकथा आणि घोषणांनी व्हॉट्सॅप दुमदुमले. राजस्थानमधल्या एका राजकीय मिरवणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी घोषणा केली,सौगंध मुझे मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा”.

चित्रपटसृष्टीतील काही घटकही स्वतःहून यात सामील होत आहेत. नेमकी निवडणुकांची वेळ साधून राष्ट्रभक्तीपर चित्रपटांचा अचानक आलेला पूर बघा. सैन्याचे – आणि स्वतः मोदींचेही – उदात्तीकरण करणारे चित्रपट मागच्या काही महिन्यांतच प्रदर्शित होणे हा योगायोग नाही. ‘हाऊज् द जोश’ सारखी वाक्ये व्यवस्थितपणे लोकांच्या रोजच्या बोलण्यात अलगद पेरली गेली आहेत. मंत्रीसुद्धा आपल्या बोलण्यात त्या शब्दप्रयोगांचा वापर करत आहेत आणि मणिकर्णिका, उरी यासारख्या चित्रपटांची उघड प्रशंसा करत आहेत.

Gleischaltung असा एक उद्बोधक जर्मन शब्द आहे, ज्याचा साधारण अर्थ ‘सर्व गोष्टींमध्ये जबरदस्तीने समन्वय साधणे’ असा होतो. १९३३ मध्ये हिटलर चॅन्सेलर झाल्यानंतर जर्मनीचे अत्यंत कौशल्याने जे नाझीकरण केले गेले त्याचे वर्णन या शब्दाने केले जाते. काही महिन्यांमध्येच जर्मनीला एकपक्षीय राज्यव्यवस्था बनवणारे कायदे करण्यात आले. विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांना तुरुंगात डांबले गेले किंवा ठार केले गेले आणि इतर पक्षांवर बंदी आणण्यात आली. सगळ्या ट्रेड युनियनसचे एकत्रीकरण करण्यात आले. थोड्याच काळात शासनाच्या आणि समाजातल्याही जवळजवळ सर्व संस्था नाझींच्या ताब्यात गेल्या.

या सगळ्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग होता प्रचार. जोसेफ गोबेल्स याच्या नेतृत्वाखाली, ‘मिनिस्ट्री ऑफ एनलाइटन्मेंट अँड प्रोपॅगंडा’ नावाच्या सरकारी प्रचार करणाऱ्या मंत्रालयाने वर्तमानपत्रे, मासिके, नाटके, संगीत, कला आणि त्यावेळी नवीन असणारी प्रसारमाध्यमे म्हणजे रेडिओ आणि चित्रपट या सर्वांना आपल्या नियंत्रणाखाली आणले. ज्यांनी विरोध केला, त्यांना एकतर पळून जावे लागले किंवा तुरुंगात जावे लागले किंवा त्याहीपेक्षा जास्त भीषण परिणामांना सामोरे जावे लागले. ही सर्व प्रसारमाध्यमे केवळ देशाच्या किंवा पक्षाच्या नव्हे तर स्वतः हिटलरच्या सेवेत रुजू करण्यात आली. अगदी नागरी सेवांमधील कर्मचारी आणि सैनिकांनासुद्धा देश आणि फ्यूररच्या प्रति आपली निष्ठा व्यक्त करणारी ‘हिटलर ओथ’ घ्यावी लागायची. नाझी पक्षाच्या सदस्यसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली. 

आपण अजून अशा जबरदस्तीच्या समन्वयाची पातळी गाठलेली नाही. अजूनतरी प्रचार मंत्रालय नाही किंवा प्रत्येकाने पंतप्रधानांच्या प्रति आपली राजनिष्ठा जाहीर करावी अशी सक्ती केली जात नाही. पण आज तशी गरज तरी कुठे आहे? अधिकृतरित्या सक्ती करणाऱ्या आदेशाविनाच जो समन्वय निर्माण केला जात आहे तो फारच कमालीचा आहे.

नागरिक सार्वजनिकरित्या त्यांचे दृष्टिकोन मांडण्यास मुक्त असतात. पाकिस्तानबरोबर शांतता प्रस्थापित करावी असे म्हणणाऱ्यांना, कुणा कट्टर राष्ट्रवाद्याचा युद्धखोरपणा घृणास्पद वाटू शकतो, किंवा याच्या उलटही होऊ शकते. समाजमाध्यमांमध्ये किंवा व्हॉट्सॅप ग्रुपवर टोकाच्या भूमिका घेतल्या जातात आणि त्यातली भाषा अश्लीलतेच्या सीमारेषेवरची असू शकते. पण तेच भाषण स्वातंत्र्य आहे!

प्रसारमाध्यमांना मात्र ही चैन परवडणारी नाही. वस्तुनिष्ठ आणि संतुलित राहणे, तथ्यांचे रिपोर्टिंग करणे आणि अधिकाराच्या पदांवरील व्यक्तींना प्रश्न विचारणे ही पत्रकारांची आपल्या व्यवसायाप्रति असलेली बांधिलकी असते. ते सरकारचा किंवा सरकारी प्रचारयंत्रणेचा भाग नसतात. पत्रकारांचे वैयक्तिक दृष्टिकोन असू शकतात, पण रिपोर्टिंग करताना त्यांनी ते बाजूला ठेवणे आवश्यक असते – त्यात त्यांच्या देशभक्तीचे प्रतिबिंब पडत नसते, पण तो त्यांनी त्यांच्या वाचकांशी केलेल्या व्यावसायिक कराराचा भाग असतो.

भारतीय टेलिव्हिजन माध्यमांनी फार पूर्वीच व्यावसायिकपणाचे ढोंग करणे सोडून देऊन एका राष्ट्रीय  कार्यक्रमाचा भाग बनण्याचे अभिमानाने स्वीकारले आहे. त्यांना त्यांचा राष्ट्रवाद उघड मिरवायचा आहे. सत्ताधारी पक्षाची उद्दिष्टे त्यांनी आनंदाने आत्मसात केली आहेत. त्यांनी बदलावे अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल.

पण यावेळी त्यांनी अतीच केले आहे. इथे खूप काही पणाला लागले आहे. गोष्टी अशाच वाढत जाऊन हाताबाहेर जातील अशीही शक्यता आहे. एरवी सतत पाकिस्तानला धोपटत राहणे ही एक गोष्ट झाली. सर्वसामान्य काळात ते काहीसे मनोरंजकही असते. पण आजचा काळ सामान्य नाही. अगदी आतड्यातून पाकिस्तानचा द्वेष करणाऱ्या लोकांच्या नेतृत्वाखाली असणारे आणि स्वतःची कणखर बाजू प्रदर्शित करण्याच्या दबावाखाली असणारे सरकार, आपल्याला अत्यंत धोकादायक परिस्थितीकडे घेऊन जाऊ शकते.

आज प्रसारमाध्यमे जे एका सुरात गात आहेत, तोच सूर उद्या जनतेचे मत बनू शकतो. सरकार त्यालाच जनतेचे समर्थन समजू शकते. युद्धाच्या दिशेने जाणारे पाऊल उचलले तर निवडणुकीत काय फायदा होऊ शकतो याचाही विचार केला जाऊ शकतो. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

तरीही, प्रसारमाध्यमांच्या मोठ्या आणि प्रभावी विभागांनी जबाबदारीचे काहीही भान दाखवलेले नाही; परकीयांबाबतच्या द्वेषाला खतपाणी घालण्याच्या बाबतीत त्यांचे आजवरचे रेकॉर्ड लाजिरवाणे आहे. देशाच्या धर्मनिरपेक्ष बांधणीवर याचे गंभीर दीर्घकालीन परिणाम होतील. अंतिमतः आजच्या काळाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्यात प्रसारमाध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचा खास उल्लेख करावा लागेल.

(छायाचित्र ओळी – लष्करी गणवेश घालून आणि हातात खेळण्यातली बंदूक घेऊन आलेला TV9 चा अँकर सौजन्य: यूट्यूब)

हा मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद – अनघा लेले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: