मगरमच्छके आंसू …

मगरमच्छके आंसू …

अश्रू ढाळणार्‍या माणसांमधील ‘मगर’ मात्र आपल्याला कळली पाहिजे आणि ती सुद्धा वेळीच!

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटांचे खेळ : एक प्रचारकी खेळी
मागे वळून पाहताना…
उद्धव वाकले पण मोडले नाहीत…
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

गेल्या आठवड्यातील निवडणुकांच्या प्रचारातील बाणयुद्ध, ठरीव मुलाखतींच्या फैरी इ. राजकीय घटनाक्रमानंतर नेत्यांच्या भावनावेगांविषयी आणि हुकमी रडण्यासंबंधी काही प्रश्न पडले आहेत. माणूस जाहीर सभांमध्ये भाषण करताना, बोलता बोलता अचानक रडू का लागतो? कधीतरी एखाद वेळेस तसे झाले असेल तर ते आपण समजू शकतो. परंतु पाचेक वर्षातून तीन-चार वेळा तसे होत असेल तर त्याचे काही विशेष कारण असेल का?  बोलण्यातून जे साध्य होऊ शकते, त्याहून अधिक रडण्यातून साध्य होत असावे का? रडण्याचे काही शास्त्र असते का? भारतीय राजकारणात प्रमुख  नेत्यांनी हे शास्त्र किंवा शस्त्र फार क्वचित वापरल्याचे दिसते, त्याची मुळे ‘पुरुषासारखा पुरुष असून रडतोस काय’ यासारख्या पुरुषसत्ता जोपासणार्‍या वाक्यांमध्ये रुजलेली असू शकतात का?

एखादी ऐतिहासिक घटना घडल्यावर अथवा वैयक्तिक, सार्वजनिक पातळीवरचे मोठे यश साजरे करताना नेते रडल्याची अनेक उदाहरणे जागतिक पातळीवर आहेत. जॉर्ज बूश, क्लिंटन, बराक ओबामा, हमिद करझाई अशी अनेक नावे सांगता येतील. लता मंगेशकर यांनी ‘ऐ मेरे वतनके लोगो’ हे गाणं म्हटलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरुंचे डोळे पाणावले होते असं म्हटलं जातं. परंतु भाषण करताना ते रडल्याचं ऐकिवात नाही. माणसं भाषणात आवेगानं बोलू शकतात, त्यांचा आवाज वाढू शकतो. बोलता बोलता गतस्मृतींमुळे एखाद्याचा गळा दाटून येऊ शकतो. पण थेट डोळ्यांत पाणी आले आणि त्या रडण्याला माहीत असलेली कोणतीच भावनिक पार्श्वभूमी नसेल, तर ते रडणं अप्रस्तुत समजले जाते. आसपासच्या लोकांमध्ये त्यामुळे दाटून येतो.

पंतप्रधान मोदींनाही गेल्या आठवड्यात, ९ मे ला कुरुक्षेत्रावरील भाषणावेळी आपले अश्रू आवरता आले नाहीत. २० मे २०१४लाआडवाणी म्हटले नरेंद्रभाईने कृपा की|’ (अश्रूंची जुळवाजुळव करण्यात अनेक मिनिटे) आईची सेवा कृपा होऊ शकते का? भारत माझी आई आहे तसेच भाजपा ही माझी आई आहे.” आडवाणी थेट back foot वर! अकारण एका अपराधभावाने ते घेरले जातात. या आधी आणि नंतरही मोदींचे आंसूभरे आविष्कार आपल्याला बघायला मिळालेले आहेत. दुर्दैवाने “रो मत पुष्पा, I hate tears” असं म्हणत त्यांचे सांत्वन करायला मात्र कोणी येत नाही. कठोर/कुटिल चेहर्‍यामागची मऊ/भावुक प्रतिमा मोदींच्या नक्कीच पथ्यावर पडते. रडून समोरच्याला एकदा विरघळवले, की मग विकास, आर्थिक माघार, बेरोजगारी यांची बासने माळ्यावर पडून राहू शकतात!

रडणं किंवा रडू येणं याचा स्त्री-पुरुष असण्याशी काही संबंध असतो का? असं म्हणतात की पुरुषामध्ये  टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन अधिक प्रमाणात असते, जे त्याला सहजगत्या रडण्यापासून रोखते. स्त्रीयांमध्ये मात्र प्रोलेक्टिन नामक हार्मोन असते, ज्यामुळे  त्यांच्या डोळ्यांत चटकन अश्रू येतात.  याचा अर्थ स्त्री-पुरुषाची भावनाशील असण्याची पातळी कमी जास्त असते असं मात्र अजिबात नाही. अश्रूंचा उपयोग पुरूषांपेक्षा स्त्रिया अधिक चांगल्याप्रकारे करु शकतात, या प्रतिपादनाशी मात्र बरेचजण सहमत होतील. या प्रतिपादनाचाच एक अर्थ असाही निघतो की रडणे ही प्रत्येकवेळी सहज घडणारीच बाब असते असे नसून ती नियंत्रण करता येण्याजोगी गोष्ट आहे, आणि त्यातच कदाचित जाहीररित्या रडण्याचे खरे मर्म लपलेले असावे.

मनुष्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही सजीवाला रडण्यातून विविध भावनांची अभिव्यक्ती करता येत नाही. माणूस रडतो, तो दुःख-वेदना होत असेल तर, वा एखाद्या गोष्टीचा शोक वा आनंद व्यक्त करताना! रडणारा बुद्ध वा कृसावर खिळयांनी जर्जर केलेल्या ख्रिस्ताच्या डोळ्यातला एक अश्रू या प्रतिमा, मानवी वेदनेला आत्मसात केलेली करुणा अधोरेखित करतात. युंगच्या भाषेत पुरुषामधील स्त्रीतत्वाचा (अनिमा) आविष्कार होण्याने पुरुषाच्या पूर्ण रूपाची जाणीव होते. कोठेतरी तो पुरुष आवाक्यातला (accessible and vulnerable), ‘आपल्यातला’ वाटू लागतो. निराशा-वैफल्यग्रस्त अवस्थेतही डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू शकतात. वैफल्य ही खाजगी भावना असते आणि त्याची कारणेही व्यक्तिकेंद्री असतात. रडू येण्यामागच्या या प्राथमिक कारणांपलीकडे मानसशास्त्रीय परिभाषेतही रडण्याची विविध कारणे सांगितली जातात. त्यातलं एक प्रमुख कारण आहे, रडण्याचा सामाजिक फायदा! म्हणजे नेमकं काय?

२०१६ साली जागतिक पातळीवर झालेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, जाहीरपणे अश्रू गाळण्यातून आसपासच्या लोकांची सहानुभूती मिळते. तो किंवा ती बिचारा/री असून आपण त्या व्यक्तीबद्दल सहानुभूतीचा दृष्टीकोन बाळगला पाहिजे अशी तीव्र भावना दाटून येते. मुख्य म्हणजे ही व्यक्ती खरं बोलत आहे, असं ऐकणारांच्या मनावर ठसायला त्याचा उपयोग होतो. जाहीर मुलाखतींमध्ये रडणाऱ्या हाली बेरी, आमीर खान, दीपिका इ कलाकार याचं मोठं आणि प्रमुख उदाहरण आहे. तुटलेल्या अथवा बिनसलेल्या नातेसंबंधांत आपली बाजू शब्दांतून मांडण्याऐवजी अश्रूंद्वारे मांडण्याचे अनेक फायदे असतात. एक, आधीच म्हटल्याप्रमाणे सहानुभूतीसाठीची पार्श्वभूमी तयार होते. दुसरे, गळा दाटून आला की पुढे फार बोलण्याची गरज राहात नाहीत. प्रश्न विचारणारी व्यक्तीही तो विषय फार लांबवत नाही.

प्रिन्सेस डायनाच्या अपघाती मृत्युंनंतर ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळताना दिसले आणि ब्लेअर यांच्याबद्दल सामान्यांना अधिक आस्था वाटू लागली. त्याची चर्चाही खूप झाली. परंतु त्यानंतर ब्लेअर वारंवार हुकमी रडताना दिसू लागले आणि मग त्यांच्या आधीच्या रडण्याविषयीही लोकांना संशय येऊ लागला. त्यावेळी अनेक तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यातली एक फार बोलकी होती- ‘माणसाचे जाहीर रडणे जर खरे असेल तर आपले अश्रू दिसू नयेत यासाठी तो आटोकाट प्रयत्न करतो. महत्वाचे म्हणजे माणूस खरा रडतो तेंव्हा त्याचे फक्त डोळेच रडत नसतात तर त्याची देहबोलीही त्या रडण्याला अनुकूल दिसावी लागते.’

यावरून एक लक्षात येईल की अश्रूंचा खोटेपणाशीही तेवढाच जवळचा संबंध आहे. जाहीरपणे रडण्याचे जरी टाळत असले तरी पुरुष, विशेषतः विवाहित पुरुष,  ‘प्रकरण करण्याच्या’ तयारीत असताना अश्रूंचा खुबीने वापर करत असतात. आपण संसारात कसे सुखी नाही, आपली जोडीदार आपल्याला कशी समजून घेत नाही, हे सांगताना त्याचा गळा अगदी अचूक टायमिंग साधून दाटून येतो. आपल्या चुका लपविण्यासाठी मुले रडतात, सासू-सुनांच्या भांडणात तर अनेकदा बायकोचे अश्रू खरे म्हणावे की आईचे, असा प्रश्न नवऱ्याला पडत असतो. अशा वेळी रडणे हे शस्त्र असते. परंतु राजकारणात, समाजकारणातही ते शस्त्र म्हणून वापरता येते.

‘रडणे’ हे निश्चितच परिणाम साधण्याचे एक प्रभावी साधन आहे. इंग्रजीत ‘क्रोकोडायल टीअर्स ही संकल्पना आहे, जिला आपण हिंदीतही ‘मगरमच्छके आंसू’ म्हणून आपलेसे केले आहे; तर मराठीत त्याच अर्थाने आपण नक्राश्रू असा शब्दप्रयोग करतो. या संकल्पनेमागची दंतकथा अशी आहे की, ‘आपले भक्ष्य गिळताना, त्या भक्ष्याबद्दलची सहानुभूती व्यक्त करण्यासाठी मगर अश्रू गाळत असते.’ फसव्या अश्रूंना त्यामुळेच आपण मगरमच्छके आंसू म्हणतो.

प्रामाणिकपणा हा यशाचा पहिला मंत्र आहे. ‘आपण प्रामाणिक आहोत असे तुम्ही भासवू शकलात की तुम्ही जिंकलात’ असे म्हटले जाते ते काय उगाचच! अश्रू गाळून प्रामाणिक असण्याची जणू ग्वाहीच दिली जाते ना !!

‘हजारो तऱ्हा के ये होते है आंसू, अगर दिलमे गम है तो रोते हैं आंसू, खुशीमे भी आँखे, भीगोते है आंसू…’ अश्रूंमागे काय दडलेले आहे, त्यावरुन आपण त्याचा खरे-खोटेपणा ठरवत असतो.

अश्रू ढाळणार्‍या माणसांमधील मगर मात्र आपल्याला कळली पाहिजे आणि ती सुद्धा वेळीच!

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: