हे तू चांगलं नाही केलंस, सुधीर!

हे तू चांगलं नाही केलंस, सुधीर!

मी तुला प्रथम पाहिलं तेव्हा तुझा हात प्लास्टरमध्ये होता. आम्ही आयआटीत बहुधा तिसऱ्या वर्षाला होतो. प्रफुल्ल बिडवईने दुरूनच मला सांगितले की हा कुमार केतकरचा मित्र आहे आणि मार्क्सवादी आहे. त्यावेळी तू नुकतीच आयआयटीची डिग्री घेऊन काही काळासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटच्या कुठल्यातरी लॅबमध्ये डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम करत होतास. लवकरच तू ती नोकरी सोडलीस. तुझ्या आयुष्यातली ती बहुधा पहिली आणि शेवटची नोकरी होती. तेव्हा आम्हाला कुणालाच कल्पना नव्हती की तू आमचा मित्र, कॉम्रेड आणि मार्गदर्शकही बनणार होतास.

ते व्हायला फार वेळही लागला नाही. दोनेक वर्षात आपण सगळे एकत्र आलो. ते दिवस फार वेगळे होते. आज जी परिस्थिती आहे त्याच्या नेमकी उलट परिस्थिती होती. जगभर जनआंदोलनांना उधाण येऊ लागलेले होते. फिडेल आणि चे यांच्या नेतृत्वाखाली क्यूबात क्रांती झाली होती. चे लॅटिन अमेरिकेतील इतर देशात क्रांती घडवण्याच्या मोहिमेवर गेला होता. फ्रान्समधल्या मे ६८च्या उठावानंतर जगभर विद्यार्थ्यांचे उठाव होत होते. चिमुकल्या व्हियेतनामने अमेरिकेला जेरीस आणले होते. खुद्द अमेरिकेत युद्धविरोधी चळवळीने जोर धरला होता. भारतातही संप, मोर्चे, घेराव सर्व मार्गाने लोक रस्त्यावर येत होते. नक्षलबारीच्या सशस्त्र आंदोलनाने नेमस्त मार्गांना आव्हान उभे केले होते. वैचारिक क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात, समाजाच्या सर्व अंगांमध्ये मोठी घुसळण चालू होती.

तर थोडक्यात ते दिवस असे होते की बंडखोर तरुणांना वाटावे की क्रांतिकारक परिवर्तनाचा काळ हा पुढे केव्हातरी येणारा काळ नसून, नजीकच्या भविष्याचा प्रश्न आहे. आजच्या आपल्या कृतीने ते प्रत्यक्षात आणायचा प्रश्न आहे. याचसाठी, या जाणिवेने आपण एकत्र आलो आणि मागोवा गट स्थापन झाला. ‘आयआयटी’मध्ये प्रफुल्ल बिडवईभोवती जमलेले आम्ही लोक, ‘टीआयएफआर’मधल्या विनोद मुबई आणि मुकुल सिन्हाभोवती जमलेले लोक, वहीद मुकादम, शहाद्याला जाऊन पोचलेली कुमार शिराळकर वगैरे मंडळी, पुण्याला तुझ्याभोवती जमलेली मंडळी, नागपूरच्या सुभाष काणे भोवती जमलेला ग्रुप, भारत पाटणकर, बेळगाव मधील नाईक-कामत आणि मंडळी (सगळ्यांची नावे घेण्याचा प्रयत्नही करत नाहीय!) असे आपण सगळे एकत्र आलो. तुझ्या संपादनाखाली मागोवा मासिक सुरू झाले.

मागोवा गटाच्या स्थापनेअगोदर तुझी माझी फारशी ओळख नव्हती. हळू हळू आपली ओळख वाढली. कॉम्रेड तर होतासच. आणि आधी मार्गदर्शकही. प्रफुल्ल आणि तू माझे दोन टोकांचे मार्गदर्शक होतात! मग केव्हातरी आपण मित्रही झालो आणि सहकारीही. मार्क्सच्या १८४४च्या हस्तलिखितांचं महत्त्व तूच माझ्यावर बिंबवलंस. मार्क्सवादातील द्वंदात्मक अस्तित्वमीमांसा (ontology) आणि ज्ञानमीमांसा (epistemology) याचे धडेही तूच दिलेस. ऐतिहासिक आणि द्वंदात्मक भौतिकवादाचेही प्रारूप तूच आम्हाला समजाऊन सांगितलेस. अर्थात त्यानंतर याबाबत माझी तुझी मतं थोडीफार वेगळी झाली तो भाग निराळा. तरीही आपला या विषयांवरचा संवाद काल-परवापर्यंत चालू होता हे खरेच.

मागोवा मासिक चालू होतं त्या काळात मी बहुतेक वेळ शहाद्याला होतो. पुण्यात आलो की दिवसा मागोवाच्या ऑफिसवर पडीक असायचो. तुमच्या घराच्या गच्चीवरची ती खोली बहुधा कार्यकर्त्यांनी पडीक असण्याची जागाच होती. (तुझ्या घरासाठी मात्र वेगळा नियम होता. त्या गडाचे दरवाजे क्वचितच काहीजणांसाठी उघडायचे.) आम्हीपण त्या काळात डीक्लास होण्याच्या धुंदीत असायचो. कामाबद्दल चोख असलो तरी वैयक्तिक राहण्यात, बोलण्या-वागण्यात अत्यंत बेफिकिर, बेशिस्तच म्हणा. (नंतर पुसुची मंडळी, जी तिथे बऱ्याचदा असायची तीही याबाबतीत आमच्यासारखीच होती असं आठवतंय.) तर आमचं वागणं बेबंद, बेशिस्त होतं.

तू आमची ही बेशिस्त कसा सहन करायचास कुणास ठाऊक. कधीतरी सौम्य शब्दात आम्हाला समज देण्यापलीकडे तू आम्हाला कधी काही बोलला नाहीस. तू आमचं हे वागणं नुसतं खपवून घ्यायचास की कुठेतरी त्यात एक सुप्त कौतुकही होतं? आपण करावंसं वाटूनही जे करू शकत नाही ते इतरांना करताना पाहून तुला सुप्त आनंद वाटायचा? कुणास ठाऊक. कारण मी पाहिलेला तू सर्वात नीटनेटका बंडखोर होतास. मागोवाच्या ऑफिसमध्ये तुला काम करताना पाहणं हा एक अनुभव होता. बाकीचा ऑफिसचा भाग कसाही असो, तुझ्या डेस्कवर, आणि तुझा कायमचा साहाय्यक कॉ. पुरुषोत्तम पानसे याच्यातही, बेशिस्तीचा लवलेशही नसायचा. तू प्रुफं तपासायला बसलास की प्रथम त्या प्रुफांना टाचणी लावून ती एकत्र राहतील याची खात्री केली जायची. नंतर बाजूला फूटपट्टी असायची. खिळेजुळणीचा जमाना होता तो. प्रुफावर दुरुस्तीच्या खुणा करताना नेमक्या ओळीसमोर त्या येतील याची तू फूटपट्टी लावून खात्री करून मगच दुरुस्त्या नोंदवायचास. त्याही तुझ्या सुंदर अक्षरात. तुझं अक्षर इतकं नेटकं आणि सुंदर होतं की नुसते तुझ्या हस्तलिखितांचे फोटो काढूनही पुस्तक छापता आलं असतं!

हेच नीटनेटकेपण तुझ्या विचारातही होतं. मला वाटतं की तुझ्या डोक्यात एक विचारव्यूह असायचा आणि प्रत्येक नवी गोष्ट त्या विचारव्यूहात योग्य त्या ठिकाणी बसली तर मगच तिला त्यात स्थान मिळायचं. तोवर ती बाजूला ठेवलेली असायची. या विचारांच्या नेटकेपणामुळेच नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना तू मार्क्सवादाचा प्रभावी परिचय करू द्यायचास. परंतु या संघटित विचारव्यूहाच्या जोडीलाच तुझ्यात एक विलक्षण विनोदबुद्धी होती. निरनिराळ्या विसंगतींवर नेमके बोट ठेवणारी. तीही वेळोवेळी आणि काही वेळा अगदी अनपेक्षितपणे प्रगट होत असे. हे दोन्ही विचारप्रवाह एकाच वेळी तुझ्या डोक्यात चालू असायचे. संगती-विसंगतीचे हे एकात्म द्वंदच चालू असायचे असे म्हणावे का?

पण तुला एक सांगू का सुधीर? मला बऱ्याच वेळा वाटतं की या नीटनेटकेपणाची एक परिणती बंदिस्तपणातही होते. आपण बऱ्याचदा होऊन गेलेल्या पॅरडाईम शिफ्टची उदाहरणं घ्यायचो. पण तिथे आधीचे व नंतरचे पॅरडाईम स्पष्ट असायचे. पण जुने पॅरडाईम कालबाह्य झालेले आहे आणि नवीन अजून दिसत नाहीय अशा परिस्थितीत सगळंच धूसर असतं. अव्यवस्थित असतं. नीटनेटकं नसतं. अशावेळेला नीटनेटकेपणाच्या हव्यासापोटी आपण वारंवार जुन्या पॅरडाईमकडे आकर्षित होतो. मला वाटतं की तुझं बऱ्याचदा असं व्हायचं. जे नवीन विचार, ज्या नवीन गोष्टी आवश्यक आहेत असं तूच म्हणायचास त्यांचा तू पुरेसा स्वीकार केला नाहीस, स्वागत करू शकला नाहीस,  त्या सामावून घेऊ शकला नाहीस असं मला वाटतं. असो.

मागोवा हे मागोवा गटाचे ‘मुखपत्र समजले जात असले तरी खरे तर ते तू, कॉ. पानसेच्या साहाय्याने (आणि कधी कधी अडथळ्यासह), एकट्यानेच चालवायचास. पहिल्याच अंकात आम्ही मार्क्सला सूक्ष्मदर्शकाखाली घालू असे म्हटल्याने आपण कम्युनिस्ट पक्षांच्या टपल्या खाल्ल्या होत्या. पण लवकरच मागोवात येणारा मजकूर हा एकंदरच डाव्या प्रवाहातील कार्यकर्त्यांची, जिज्ञासू तरुणांची बौद्धिक भूक भागवू लागला होता. कारण मागोवाने त्यात दलित साहित्यिकांपासून ते सर्व डाव्या प्रवाहातील लेखकांना व विचारांना स्थान दिले होते. छाया दातार इत्यादींनी मुंबईत मागोवा मंडळ सुरू केले होते. मागोवा मासिकाभोवती एक प्रकारे एक सहानुभूतीदारांचा मागोवा `परिवार’ उभा राहिला होता, ज्याच्या सीमारेषा धूसर होत्या परंतु तो महाराष्ट्रात ठिकठिकाणी पसरलेला होता हे नक्की. आजही मला अजिबात माहीत नसलेली अनेक माणसे भेटतात जी आपण या परिवाराचा भाग असल्याचे सांगतात. याचे बरेचसे श्रेय हे नक्कीच तुला व तुझ्या संपादनाला जाते. हा परिवार अजूनही पूर्णपणे विरून गेलेला नाही आणि आपली प्रागतिकता बहुतांश प्रमाणात टिकवून आहे.

परंतु खुद्द मागोवा गटात मात्र मतभेदांना सुरुवात झालेली होती आणि ते पुढे तीव्रच होत गेले. प्रफुल बिडवाई ट्रॉट्स्कीवादी झाला व मागोवा गटात त्याचा प्रभावीपणे पुरस्कार करू लागला. त्यावर वाद झडले. मतभेद जर वैयक्तिक हेवेदावे, तात्कालिक धोरणे यांबाबत नसतील, खरोखर सैद्धांतिक-राजकीय प्रश्नांभोवती असतील आणि त्यांची चर्चा जर अभ्यासपूर्ण पद्धतीने होत असेल तर ते तुम्हाला किती समृद्ध करणारे असतात हा अनुभव मागोवाने घेतला. त्या काळात मागोवातील सर्वांनी केलेले वाचन एकत्र केले तर त्याचा मोठा ढीग होईल! वैचारिक दृष्ट्या आम्ही सर्वजण समृद्ध झालो असलो तरी संघटनात्मक पातळीवर मात्र त्याचा परिणाम खच्ची करणाराच होता. आपल्यातल्या समजेच्या पातळ्या आणि वैचारिक राजकीय दिशा इतक्या वेगवेगळ्या होत होत्या की शेवटी त्या काळी अठरा पूर्ण वेळ कार्यकर्ते असलेल्या मागोवा गटाचे थेट विसर्जन झाले! त्यानंतर कालांतराने मागोवा मासिकही बंद झाले. तुला हे विसर्जन पसंत नव्हते. छोटासा का होईना पण एक संघटित गट असला पाहिजे असे तुझे मत होते. ते गैरही नव्हते. ट्रॉट्स्कीवाद्यांना बाजूला ठेऊन तू आणि काही इतरांनी तसा प्रयत्नही केलात. पण तो यशस्वी झाला नाही.

खरे तर ट्रॉट्स्की, स्टॅलिन, माओ यांच्यापलीकडे जाऊन मार्क्सच्या विचाराची मुळापासून तपासणी करत पुढे जाण्याची गरज होती. जग झपाट्याने बदलत होते. भोवतालची वैयक्तिक आणि राजकीय–सामाजिक परिस्थिती बदलत होती. हळू हळू आपल्या सर्वांचीच लग्ने झाली, संसार सुरू झाले. विसर्जन झाल्या झाल्या काही दिवसातच आणीबाणी आली. आपल्यातील बरेच जण भूमिगत झाले. काहीजणांना तुरुंगात जावे लागले. आणीबाणी उठल्यावर देशाचे चित्रच पालटले होते. मागोवा गटाच्या विसर्जनानंतर मागोवातले कॉम्रेड्स विखुरले गेले. पण विखुरले तरीही डाव्या चळवळींना सशक्त करतच विखुरले. तू, कुमार शिराळकर आणि शहाद्याचे अनेक कार्यकर्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेलात. अशोक मनोहरने लाल निशाण पक्षात प्रवेश केला. भारत पाटणकर, विजय आणि विक्रम कान्हेरे इत्यादींनी मागोवाचेच कार्य पुढे नेण्यासाठी स्वतंत्र गटाची गरज आहे असे म्हणून श्रमिक मुक्ती दलाची स्थापना केली. वाहरू सोनावणे, अनंत फडके, दिलीप नाईक इत्यादीही त्यात सामील झाले. मागोवा परिवारही विखुरला. प्रत्येकाने आपापला त्यातल्या त्यात जवळचा राजकीय आधार शोधला.

तू तात्पर्य मासिक चालू करायचे ठरवलेस. कुणीतरी तुला विचारले की हा उपद्व्याप परत कशाला करतोयस. तू त्याला म्हटलेस, सवय झालीय. तेही खरेच होते. मासिकातून सकस वैचारिक खाद्य पुरवायची तुला सवयच झाली होती. तात्पर्यमधून पुन्हा तू ते पुरवू लागलास. सर्व प्रवाहांना सामील करत तू अंकाची बांधणी चालू ठेवलीस. दहा वर्षे तू ते नेटाने चालवलेस. पण शेवटी शेवटी ते जमेनासे झाले. एकीकडे हवे तसे चांगले, सकस साहित्य मिळवणे तुला दुरापास्त होऊ लागले आणि दुसरीकडे आर्थिक भार वाढत चालला होता. प्रबोधनाचे एक फार मोठे साधन शेवटी बंद करावे लागले. मागोवा आणि तात्पर्यच्या संपादनाच्या काळात तू दोन्ही अंकांसाठी विपुल लेखन केलेस. कुठल्याही विषयाला स्पर्श करायचे तू बाकी ठेवले नाहीस. ‘हजार हाताचा ऑक्टोपस’ ही त्याचीच प्रचीती आहे.

पण काय झाले कुणास ठाऊक. तात्पर्य बंद झाले आणि तुझी लेखणीही बंद झाली. एकीकडे तुझे अफाट वाचन त्यानंतरही चालूच राहिले पण तुझी लेखणी मात्र थांबली. दर महिन्याला लेख लिहणारा तू नंतर तीस वर्षात जवळपास एकही लेख लिहला नाहीस. असे का झाले हे आम्हाला कोणालाच समजले नाही.  आम्ही अनेकांनी त्यानंतर तुला “लिही” म्हणून अनेकदा छेडले. अनंत फडके तर इतकी वर्षे नियमितपणे तुला त्याबद्दल छेडत आला आहे. पण काही न काही प्रकारे तू ते टाळायचास. तू कधीच आम्हाला कुणाला दाद लागू दिली नाहीस. काय चालले होते तुझ्या मनात? अशी कुठली दुखरी नस होती जिला त्यामुळे स्पर्श होत होता? अर्थात यापेक्षा वेगळ्या तऱ्हेने प्रबोधनाला हातभार तू लावतच राहिलास. ‘समाजविज्ञान अकादमी’ आणि ‘भगतसिंग व्यासपीठ’ तुझ्या सहभागानेच उभे राहिले. दत्ता देसाई व इतरांच्या मदतीने तिथे अनेक प्रकारचे समाजवादी प्रबोधनाचे काम चालू राहिले. शिबिरांमध्ये आणि वैयक्तिकरीत्या तू कार्यकर्त्यांशी बोलत राहिलासच. राजन क्षीरसागर आणि अमित नारकरप्रमाणेच इतरही अनेक कार्यकर्त्यांना त्याचा चांगला अनुभव आला आहे. अलीकडेच बरेच परिश्रम घेऊन तू मागोवा आणि तात्पर्यचे सर्व अंक सूचीसह इंटरनेटवर काही काळ उपलब्ध करून दिलेस. पण तुझी लेखणी थांबली हे खरं.

२०१२ ला मी निवृत्त होईपर्यंत मी सोपेकॉम या संस्थेत पाणी, जमीन व ऊर्जा या विषयांवर काम करायचो. सोपेकॉमचे ऑफिस पुण्यातच होते. मी लिहत असलेल्या “दास कापितालः सुबोध परिचय” या पुस्तकासंबंधी सुलभा ब्रह्मे यांच्याशीही चर्चा होत असत. त्यामुळे तीस चाळीस वर्षे मी बऱ्याचदा पुण्याला यायचो. बहुतेकवेळा अनंत-संध्याकडे, कधी जॉय-मणी यांच्याकडे असायचो. तरीही आपली फारशी भेट व्हायची नाही. चित्राचा आणि स्वातिजाचा फोनवर, इमेलवर बराच संपर्क होता. पण तरीही घरी जाणे व्हायचे नाही. चित्रा तिच्या स्वभावानुसार खूप आग्रह करायची पण जमत नसे. कधीमधी मी आणि तू बाहेर भेटलो होतो तेवढेच. आपली खरी भेट व्हायची ती आपले अमेरिकेत स्थायिक झालेले जुने मागोवा कॉम्रेड विनोद आणि वहीद भारतात यायचे तेव्हा. शेवटी मागोवाचे बंधच कामी यायचे!

नंतरच्या काळात तू कितीतरी आघात पचवलेस. तीनदा मृत्यूच्या दारातून परतलास. चित्रा अचानक अशीच भरल्या ताटावरून उठून गेली. निस्सीमचीही वाट वेगळी झाली होती. सुकन्याशी मात्र तुझे  बहीण आणि कॉम्रेड म्हणून घट्ट नाते राहिले. मधून मधून सुकन्या येऊन राहत असे. पण तरी तसा तू एकटा राहिलास. आपण असेच एकदा बाहेर भेटलो होतो तेव्हा मी तुला विचारलं होतं की या एकटेपणाचं काय करतोस? तर तू नेहमीच्या पद्धतीने विनोदाने म्हणालास, आपलं रूटीन सांभाळलं ना की काही जाणवत नाही, आणि विषय तिथेच थांबवलास. वैयक्तिक बाबतीत तू एक रेष ओढलेली होतीस, त्यापलीकडे जायला मला मनाई होती. बहुधा इतर अनेकांचाही तोच अनुभव असावा. तू काय काय आतल्या आत पचवत असशील कुणास ठाऊक.

गेल्या दोनतीन वर्षात, कोविडनंतरच्या काळात, तू बराच अस्वस्थ होतास. देशात परदेशात जे काही घडत होतं ते भयंकर होतं. विचारच गळाठून जावेत इतक्या क्रौर्याचं दर्शन त्यातून होत होतं. दोन तीन वेळा आपलं फोनवर खूप बोलणं झालं. जुन्या लिखाणाचा आणि मी २००७ मध्ये लिहिलेल्या ’ऑन कॅपिटॅलिझम’ आणि ’ऑन नेचर’ (अर्धा) या  दीड निबंधांचा संदर्भ होता. तू म्हणालास अरे, आता एकदा पुन्हा वाचलं तर कळतं की आपण खूप चांगलं काम केलं आहे. पण आता हे तुझ्या माझ्यानंतर असंच संपून जाणार? मला वाटतं या जाणिवेने तुला एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं होतं. तुला पुन्हा एकदा जुन्या मागोवा कॉम्रेड्सशी संपर्क करायची इच्छा झाली होती. बेत शेवटी मार्चमध्ये फलद्रूप झाला. अमेरिकेतून वहीद मुकादम आलेला होता. कुमार शिराळकर, विवेक माँटेरो, मुकुल सिन्हा, बालमोहन लिमये, सुकन्या आणि तू असे १३ मार्चला कांजूर मार्गच्या एका फ्लॅटमध्ये दिवसभर भेटलात. सगळ्यांनी सांगितलं की खूप चांगली चर्चा झाली होती. पाठीच्या मणक्यांच्या ‘काँप्रेशन फ्रॅक्चर’ने पूर्ण आडवा असल्याने मी या चर्चेला हजर राहू शकलो नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी १४ तारखेला आमच्या घरी यायचा तुझा बेत होता.

दुसऱ्या दिवशी तू, मुकुल आणि सुकन्या घरी आलात तेव्हा तू मला व स्वातिजाला एक सुखद धक्का दिला होतास. इतका मोकळा सुधीर आम्ही आधी कधी पाहिलेला आठवत नाही. मागोवाच्या काळात मित्रांच्या बैठकीत असायचा तितका मोकळा. खूप गप्पा, खूप चर्चा झाल्या. जगभरातले विषय हाताळले गेले. आपण पुन्हा एकदा पॅरडाईम शिफ्टबद्दल बोललो. रिचर्ड फेयनमनच्या क्वांटम थिअरीवरच्या पुस्तकात ती शिफ्ट कशी दिसते त्याबद्दल बोललो.

कुमार शिराळकरशी तुझी अगदी घट्ट मैत्री होती.  तू भविष्यासाठी काही नवीन योजू लागला होतास. कुमार आणि इतरांबरोबर प्रबोधनादी कामासाठी तुझ्या पैशातून एक ट्रस्ट उभा करायचे तू  योजत होतास. कुमारला तू कार्यकर्त्यांचे शिबिर घेण्याचा वायदा केला होतास. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू मला म्हणाला होतास की बघ आता, मी परत लिहायला सुरुवात करणार आहे, आणि तूही लिहिले पाहिजेस. अर्थात मी तुला म्हटलेच, की आधी तू सुरू कर, मी तुझ्या मागे  आहेच! पण खरंच, सुधीरची बंद झालेली लेखणी पुन्हा सुरू होणार होती ही केवढी मोठी गोष्ट होती. स्वातिजा आणि मी पुढचे दोनतीन दिवस या भेटीबद्दल बोलत होतो. आम्हाला नुसता आनंदच झाला नव्हता, आम्हाला हुरूपही आला होता.

नंतर तुला बारीकसा ताप आला होता त्याबद्दल माझे व स्वातिजाचे तुझ्याशी बोलणे झाले. किरकोळ ताप होता उतरलाही होता.

आणि मग २५ तारखेला सकाळी सकाळी आम्हाला वहीदचा फोन आला.

हे तू बरं नाही केलंस, सुधीर. अशा आमच्या आशा उंचावून असा निघून गेलास.

हे तू अजिबात चांगलं नाही केलंस, सुधीर!

सुहास परांजपे हे लेखक आणि अभ्यासक आहेत.

COMMENTS