६० हजार रुग्ण ऑक्सिजनवर

६० हजार रुग्ण ऑक्सिजनवर

महाराष्ट्राला दररोज १,५५० मे टन ऑक्सिजनची आवश्यकता असून ३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे.

महाराष्ट्रात उद्या बहुमताची चाचणी, थेट प्रक्षेपणाचे आदेश
उ. प्रदेशात गंगा किनारी शेकडो मृतदेहांचे दफन
रत्नाकर मतकरींचे गूढगर्भी विश्व

मुंबईः महाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर असून राज्यात ७६,३०० ऑक्सिजन बेड्स आहेत. २५,००० पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राला दररोज १,५५० मे टन ऑक्सिजनची  आवश्यकता असून ३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी दिली. पंतप्रधानांनी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरे यांनी कोरोना महासाथीचा मुकाबला करणारी महाराष्ट्राची परिस्थिती सांगितली.

ते म्हणाले, राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून ऑक्सिजन  उपलब्ध करून देण्यात येत आहे. जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल. सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आपण रेल्वे मागाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘हवाईदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. केंद्र शासनाकडे आपण १३,००० जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटीलेटर्स मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.

 रेमडीसिवीरची टंचाई

रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडीसिवीरमुळे कमी होतो. परिणामी ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि  एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार व्हायल्सचे वाटप रेमडीसीवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. परदेशातून रेमडीसीवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी ठाकरे यांनी मोदींकडे केली.

लस पुरवठ्याचा वेग धीमा

ठाकरे यांनी महाराष्ट्रात लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे, याकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले. २२ एप्रिल रोजी सकाळी ६.५ लाख डोस उपलब्ध होते. त्यापैकी दिवसभरात ३.५ लाख डोस वापरण्यात आले. तसेच २ लाख लसींचा पुरवठा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला. त्या नुसार सद्यस्थितीत आपण आपल्या सोबत बोलत असताना राज्यात सुमारे ५ लाख लसींचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य लसीकरणात संपूर्ण देशात प्रथम क्रमाकांचे राज्य आहे. त्यामुळे राज्याला शाश्वत व नियमित लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

लसीच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे. मात्र कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल त्याविषयी अधिक स्पष्टता हवी लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली तर ती मिळायला  हवी. कारण महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ही ५ कोटी ७१ लाख असून त्यासाठी लसीकरणासाठी १२ कोटी खुराकांची आवश्यकता आहे. पण देशातील लस उत्पादक एव्हढ्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने त्याचा पुरवठा करू शकणार नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

खासगी कॉपोरेटस् समूहांना सीएसआरच्या माध्यमातून उत्पादकांकडून लस खरेदीची परवानगी द्यावी, अशीही सूचना ठाकरे यांनी मांडली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0