मध्यरात्रीचा ‘महा’गोंधळ

मध्यरात्रीचा ‘महा’गोंधळ

वडेट्टीवार यांनी तत्वतः शब्द वगळून जाहीर केलेला शब्द न् शब्द या मध्यरात्रीच्या आदेशात नमूद आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की वडेट्टीवार जे बोलले ते बरोबर असताना ते का नाकारण्यात आले?

….अन्यथा गरीबी-भूकबळीचे संकट
काँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक
१७ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका होणार

मध्यरात्री किंवा भल्या पहाटे काही अतर्क्य आणि अविश्वसनीय घटना घडण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. एके काळी महाराष्ट्र साखर झोपेत असतानाच नवा मुख्यमंत्री शपथ घेऊन तयार असल्याचे जनतेला सकाळी डोळे चोळत चोळत पाहण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे हल्ली रात्री झोपून सकाळी उठल्यावर आज काय नवीन याची तमाम जनतेला उत्सुकता असते. आणि त्याला साजेशी घटना घडली सुद्धा. मध्यान रात्री महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक करण्याची घोषणा वजा शासन आदेश जारी करण्यात आला. याच पाच टप्प्याच्या अनलॉक वरून दोन दिवसांपूर्वी मोठा तमाशा झाला होता. मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरला जाण्याचे विमान पकडायचे म्हणून हेच पाच टप्पे माध्यमांसमोर उडवले आणि कसे तरी धावत पळत विमान पकडले. नागपूर विमानतळावर उतरताच आपण असे काही पाच टप्प्याचे पतंग उडविले आहेत याची त्यांना तत्वतः जाणीव झाली. पण तो पर्यंत हा असा काही निर्णय झालाच नाही म्हणून शासनाने खुलासा केला. इकडे मी तत्वतः हा शब्द विसरलो पण मी जे बोललो ते खरे आहे असे वडेट्टीवार यांनी ठासून सांगताना दुपार पर्यन्त हा निर्णय जाहीर होईल असे सांगितले होते. पण हा निर्णय जाहीर झाला तो भर दुपारी नव्हे तर भर मध्यरात्री. एवढ्या मध्यरात्री ते सुद्धा सर्वजण झोपेत असताना असा निर्णय जाहीर करण्याची सुबुद्धी सरकारला का झाली याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

वडेट्टीवार यांनी तत्वतः शब्द वगळून जाहीर केलेला शब्द न् शब्द या मध्यरात्रीच्या आदेशात नमूद आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की वडेट्टीवार जे बोलले ते बरोबर असताना ते का नाकारण्यात आले? याचा सरळ अर्थ असा आहे की महाविकास आघाडी सरकारमधील सामील तुम्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे राज्याला एक मुख्यमंत्री आणि अन्य सर्व सुपर मुख्यमंत्री लाभले आहेत या वाक्याला आधार मिळतो. या तिन्ही पक्षात आणि सरकारमध्ये समन्वयाचा असलेला अभाव पदोपदी प्रकर्षाने जाणवतो.

सोमवारपासून राज्यात पाच टप्प्यात अन लॉक सुरू होत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात सर्व व्यवहार हे पूर्वी सारखे आणि पूर्ण क्षमतेने सुरू होतील. याचा अर्थ कोरोना संपूर्णपणे गेला असा काही जण अर्थ घेऊ शकतात पण ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण पूर्वी सारखे व्यवहार आणि समाज जीवन जगणे म्हणजे मुक्त आणि बेफिकीर राहणे असा होत नाही. आणि मास्क तसेच सोशल डिस्टन्स हे पाळणे आलेच. पण दुर्दैवाने शासन आदेशात याचा कोठेही उल्लेख नसावा हे धक्कादायक आहे. लग्न समारंभ आणि अन्य पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देताना शासनकर्ते नियम पालनाची आठवण करून देणे सोयीस्कर विसरले आहेत.

वास्तविक एकीकडे तिसऱ्या लाटेची धास्ती असताना आणि लसीकरण पूर्णपणे रखडले असताना शासनाने कोणत्या तार्किकतेचा आधार घेत सर्व व्यवहार हे १०० टक्के सुरू करण्यास मान्यता दिली हे एक मोठे कोडे आहे. कारण अन लॉक करताना कधीही एकाच वेळी १०० टक्के करता येत नाही. सर्व एकदम खुले न करता ते हळूहळू आणि टप्याटप्याने करण्यात येते. पण पण इथे मात्र हा विचित्र आणि धोकादायक निर्णय सरकारने घेऊन सर्वानाच बुचकळ्यात पाडले आहे. हा निर्णय सरकारने घेऊन तो स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून राबवावा हे शासन आदेशात नमूद असल्याने मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. कारण भले रुग्ण संख्या रोडावली असली तरी अद्यापही रुग्ण मिळत असताना हा घाईघाईने घेतलेला निर्णय का आणि कशासाठी याचे उत्तर माहीत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर खरोखरच संपूर्ण कोरोना नाहीसा झाला आहे अथवा पूर्ण नियंत्रणात असेल तर मग महत्त्वाच्या असलेल्या बारावी परीक्षेला का ब्रेक दिला? एवढे सर्व मुक्त होत असेल तर मग बारावी परीक्षा रद्द का केल्या? परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा सरकारने अन लॉक निर्णयाबरोबर घेतला आहे. जर सर्व काही परिस्थिती ही चांगली असेल तर या परीक्षा अजूनही सरकार घेऊ शकते. दहावी परीक्षाही मग या मार्गाने घेण्यास कोणाची हरकत नसावी.

पाच टप्यात आजपासून महाराष्ट्र उघडत आहे. त्यानुसार त्यातील पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यात १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. याचा अर्थ हे सर्व १८ जिल्हे सोमवारपासून संपूर्णपणे मुक्त होणार असून समाज जीवन, दैनंदिन व्यवहार हे पूर्वी प्रमाणे सुरू राहतील. एकीकडे ही समाधान आणि दिलासा देणारी बाब असली तरी त्याचे भविष्यात उद्भवणारे धोके हा चिंतेचा विषय आहे. कारण सर्व काही खुले झाले मग आता कसेही फिरा काहीही करा, मास्क लावला नाही तरी काही फिकीर नाही अशी येणारी मनोवृत्ती ही पुढील मोठ्या संकटास आमंत्रण देणारी ठरणार आहे. कारण मोकळीक आणि सूट दिली म्हणजे सर्व काही संपले हा विचार आततायीपणाचा ठरणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी ती अजून संपलेली नाही याचे भान सर्वानीच ठेवणे गरजेचे आहे. कारण पहिल्या लाटेनंतरच्या बेफिकीर वागण्याची मोठी किंमत सर्वाना दुसऱ्या लाटेत मोजावी लागली होती. त्यामुळे तो धडा नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. न्यू नॉर्मल आणि पूर्वी सारखे जीवन सुरू करत असलो तरी या मुक्ततामध्ये जर दक्षता घेतली नाही तर ही पुढील काळाची भयानकता ठरू नये हीच या निमित्ताने अपेक्षा.

तुम्ही कंच्या गटात? ते नव्हं, तुम्ही अ, ब, क की ड इयतेत. असा सवाल आता सर्वजण एकमेकांना विचारू लागले आहेत. आम्ही तर अ तुकडीत म्हणजे पहिल्या गटात असे काही ठासून सांगताना तंबाखू काहत पचकन थुंकत आहेत. नाय नाय तुम्ही क तुकडीत हायसा असेही उत्तर देण्यात येत आहे. एकूणच महाविकास आघाडीतील गोंधळाने पुढील काही काळात मोठा राडा होणार हे ठरलेलेच आहे.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0