ड्रायविंग सीट

ड्रायविंग सीट

निवडणुका संपल्या होत्या...

केंद्रीयमंत्री शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
जेईई, एनईईटी पुढे ढकला; विरोधक ठाम
पंतप्रधान वस्तुसंग्रहालयात नेहरूंना जागा नाही

सरकार-स्थापनेची दंगल सुरु होण्यापूर्वी, निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपाने निर्माण झालेली कटुता पुसून काढावी, भाषणे करुन आणि प्रचारातील दगदगीतून थोडा विसावा मिळावा, म्हणून काही सर्वपक्षीय नेते एका एअर-कंडिशन्ड मिनी-बसने के.डी. शिवकुमार यांच्या रिसॉर्टकडे निघाले होते. मुंबईहून पुणे, सातारा, कोल्हापूर, मग वळून कोकण असे करत एक एक नेत्याला घेत हा ’गरीब-रथ’ पुढे चालला होता. तेवढ्यात या ’श्रमपरिहार-यात्रे’त सहभागी होऊ न शकलेल्या  विदर्भ नि मराठवाड्यातल्या एक-दोन नेत्यांचे, ’तुम्ही पुण्या-मुंबईवाल्यांचे नेहमी असेच असते. आम्हाला मुंबईला यायला लावता. आम्हाला डावलता.’ अशा तक्रारी करणारे फोन आले होते.

उजवीकडील सर्वात पुढच्या बाकावर भाजपच्या नेत्याशेजारी सेनेचा नेता बसला होता. ’शिवाजी महाराजांचा समुद्रातील पुतळा पटेलांच्या पुतळ्यापेक्षा उंच असायला हवा की खुजा’ यावर त्यांची हसत-खेळत चर्चा चालू होती. समोरच्याने एखादा चांगला मुद्दा काढला की प्रेमाने एकमेकांच्या पोटात गुद्दे मारत होते. त्यांच्या मागच्या सीटवर आठवले आणि सदाभाऊ खोत बसले होते. पैकी आठवले सीटच्या मधोमध बसून पुढच्या दोघांच्या मध्ये आपले तोंड खुपसून त्यांची चर्चा ऐकत होते. आणि ते दोघे लक्ष देत नसले तरी आपल्या मतांच्या चारोळ्या टाकत होते. त्यांना जागा करुन देण्यासाठी उजवीकडे एका बाजूला कलते बसून सदाभाऊ मात्र कृतकृत्य झालेल्या, भक्तिभावाच्या नजरेने त्या दोघांची चर्चा ऐकत होते.

डावीकडील सर्वात पुढच्या बाकावर कम्युनिस्ट नेता बसला होता. त्याचे नावही कुणाला आठवत नव्हते. पण गाडीत शिरल्याशिरल्या तिथे बसलेल्या कॉंग्रेसी नेत्यासमोर त्याने ’तुम्ही आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे’ म्हणून जे भाषण सुरु केले होते, ते ऐकून कॉंग्रेसी नेता निमूटपणे खुर्ची सोडून शेवटच्या आडव्या बाकावर जाऊन आडवा झाला. ’तसेही त्या आळशाला झोपायचेच होते’ असे शेजारची जागा पटकावलेल्या ’अण्णास्वराज्य’ पक्षाच्या नेत्याने शेरा मारला. त्यांच्या मागच्या सीटवर राष्ट्रवादीचा नेता बसला होता. त्याच्या आकारामुळॆ शेजारची सीट ’नो व्हेकन्सी’ अलिखित बोर्ड घेऊन कशीबशी अंग चोरुन खिडकीशी बसली होती. त्याने दोन सीटच्या मधोमध बस्तान बसवून, उजवा हात पाठीमागे सीटच्या पाठीवर आडवा टाकून आरामात बसत, आपले पाय तिरके ताणून उजवीकडील पहिल्या सीटवरील दोघांच्या पाठीमागे टेकवले होते. त्याने तसे करताच, ’हा नेहमी दोन्हीकडे कनेक्शन ठेवून असतो.’ असे अण्णास्वराज्यवाला कम्युनिस्टाच्या कानात कुजबुजला. राष्टवादीवाल्याच्या मागच्या सीटवर किरकोळ शरीरयष्टीचा, कपाळाला उभे गंध लावलेला मनसेवाला बसला होता. त्याने आपल्या धारदार जिभेच्या आधारे शेजारच्या शेकापवाल्याला हुसकावून लावत दोन्ही सीट स्वत:साठी बळकावल्या होत्या. आठवलेंप्रमाणेच मधोमध बसत, पुढे झुकून तो राष्ट्रवादीच्या नेत्याशी खालच्या आवाजात काहीतरी गुफ्तगू करत होता.

तिसर्‍या रांगेत मागे बसलेला बविआचा नेता कान राष्ट्रवादीवाल्याकडे नि नजर भाजप-सेनेवाल्यांकडे ठेवून होता.  वं.ब.आ. वाला गाडीत चढला तेव्हा कॉंग्रेसवाल्याने आधीच मागच्या बाकावर पथारी पसरल्याने, त्याला हवी असलेली एकमेव मधली सीट न मिळाल्याने त्याने कुरकुर केली होती. आता तो शेवटून दुसर्‍या रांगेत कधी डावीकडे, कधी उजवीकडे बसून कम्फर्टेबल सीट कुठली हे ठरवण्याचा प्रयत्न करत होता. त्या रांगेत खरंतर प्रहारच्या नेत्यासाठी एक सीट राखीव होती. पण  ऐनवेळी कुठल्याशा प्रशासकीय अधिकार्‍याला फटकावण्याच्या कार्यक्रमात अडकल्याने तो येऊ शकला नव्हता. त्यामुळे वं.ब.आ.च्या नेत्याला दोन्हीकडे चॉईस उरला होता. बसच्या बरोबर मधल्या रांगेत डावीकडे मिसेस राणा नि उजवीकडे मिस्टर राणा बसले होते. दोघांसाठी असलेल्या सीटवर एक-एकटेच बसले असल्याने, घाटात गाडी वळणे घेई तसतसे ते डावीकडून उजवीकडे नि उजवीकडून डावीकडे घसरत होते.

यावेळी पावसाने कहर केल्यामुळे कोकणात शिरताच गाडीला खड्ड्यांचे दणके बसायला सुरुवात झाली. अमित शाह ज्या बेगुमानपणे पक्ष आणि गृहमंत्रालय चालवतात त्याच बेगुमानपणे बसचा ड्रायवर गाडी हाणत असल्याने सदोदित स्वतंत्र गाडी, हेलिकॉप्टर, विमानाने प्रवास करणार्‍या नेत्यांची सुखवस्तू हाडे नि चरबी चिडचिड करु लागली. ’एकाच बसमधून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हा समाजवादी प्रयोग कुण्या मूर्खाने सुचवला?’ अशी पृच्छा उजवीकडील पहिल्या बाकावरुन झाली. डावीकडील पहिल्या बाकाने आपण तो ऐकलाच नाही अशी बतावणी करत. ’दिल्लीतील ’आप’चा प्रयोग मूलगामी कसा नाही’ यावर आपली चर्चा सुरूच ठेवली. राणा दांपत्याने खड्ड्यांच्या दणक्यापासून एकमेकांना आधार देता यावा म्हणून एकाच बाजूच्या दोन सीट पकडल्या. कॉंग्रेसवाल्याची झोपमोड होऊन त्याने कूस बसलून अलीकडच्या सीटचा दांडा घट्ट पकडून ठेवत पुन्हा निद्रासनात प्रवेश केला. राष्ट्रवादीवाला मात्र उजव्या नि डाव्या दोन्हीकडच्या सीटचा आधार असल्याने आरामात बसला होता. आठवले नि मनसेवाले सीटच्या मधोमध आणि पुढच्या सीटवर झुकून, तिच्या पाठीकडील आडवा दांडा घट्ट धरुन बसले असल्याने त्यांनाही खड्ड्यांच्या दणक्यांना तोंड देणे थोडे सुकर झाले होते. अखेर प्रवासातील तो अटळ क्षण आला…

तास-दोन तास प्रवास झाल्यानंतर मंडळींना निसर्गाची आणि बरेच कशाची ओढ लागली. तेव्हा घाट उतरताना एका कोपर्‍यावर वसलेल्या राष्ट्रवादीच्याच एका दुसर्‍या नेत्याच्या ’क्षुधा-तृष्णा-शांतिगृहा’वर गाडी थांबवण्यात आली. घरचेच होटेल असल्याने दोन-चार टेबल ताब्यात घेऊन ती जोडून सार्‍या नेत्यांची आयताकृती मोठ्या टेबलवर गोलमेज परिषद सुरू झाली. ’बोलण्याचा हक्क आमचाच’ असे जन्मल्याक्षणीच जाहीर केलेल्या अण्णास्वराज्य पक्षाच्या नेत्याने ’आपला चक्रधर हा अत्यंत बेलगामपणे गाडी चालवत असल्याने त्याने राजीनामा द्यावा अन्यथा त्याच्यावर अविश्वास ठराव आणून त्याला पदच्युत करावे.’ असा प्रस्ताव मांडला.  ’पण मग गाडी कोण चालवणार?’ असा प्रश्न कॉंग्रेसी नेत्याने हळूच राष्ट्रवादीच्या नेत्याला विचारला. पण तीक्ष्ण कानाच्या अण्णास्वराज्यवाल्याने तो ऐकला. ’आधी त्याला हाकला तर खरे. पर्याय आपोआप उभा राहील.’ अशी गर्जना केली. तोवर मागवलेले खाणॆ आले. या बाबाचे भाषण ऐकायला लागू नये, सुखाने खाता यावे, म्हणून सर्वांनी हा प्रस्ताव एकमताने मंजूर करुन टाकला.

खाणे झाल्यावर गाडीकडे येताच, अण्णास्वराज्यवाल्याने तातडीने ड्रायवरकडे जाऊन त्याला पदच्युत केल्याची बातमी स्वमुखे त्याला सांगितली. इतक्यात पोटभर खाऊन ढेकर देत तिथे पोचलेल्या कम्युनिस्ट नेत्याने ’सर्वहारा समाजातील या ड्रायवरच्या हक्काची तुम्ही पायमल्ली करत आहात, त्याच्यावर अन्याय करत आहात’ असा सूर लावला. ’चला आता या लेकाचीही सुरुवात झाली’ म्हणत वैतागून भाजपवाल्याने त्या ड्रायवरला प्रवासभत्त्यासह पूर्ण पैसे, वर आणखी हजार-दोन हजार देऊन त्याच्या घरी रवाना केले.

आता ’गाडी चालवणार कोण?’ या प्रश्नाकडे मंडळी वळली. ’ज्याने ड्रायवरच्या ड्रायविंगबाबत प्रथम आक्षेप नोंदवला, ज्याला सर्वाधिक त्रास होत होता त्यानेच गाडी चालवावी.’ असा प्रस्ताव राष्ट्रवादीवाल्याने  गालातल्या गालात आणि मिशीतल्या मिशीत हसत दिला. त्यावर ’आपल्याला गाडी चालवण्यात इंट्रेस्ट नाही.’ असे बाणेदार उत्तर ’अण्णास्वराज्य’वाल्याने दिले. पण सर्वांनी अधिकच आग्रह चालवल्याने त्याचा नाईलाज झाला आणि, ’आपल्याला गाडी चालवता येत नाही आणि आपल्याकडे ड्रायविंग लायसन्सही नाही.’ अशी कबुली त्याने दिली. त्याला चार शिव्या घालून मंडळी ड्रायवरच्या शोधाला लागली. आता असे घाटाच्या मध्यावर नवा ड्रायवर कुठून आणावा, जवळच्या शहरातून बोलवावा तर तासभर तरी वाया जाणार असे दिसू लागले.

एवढ्यात एक बोलेरो वेगात येऊन डौलदार वळण घेऊन कचकन ब्रेक मारत होटेलसमोर थांबली. त्या गाडीच्या पुढच्या काचेवर असलेला शिवाजी महाराजांचा फोटो पाहून सेना नेत्याच्या अंगी अचानक वीरश्रीचा संचार झाला. ’अरे मर्दाची अवलाद आहे. मनात आणले तर मायभवानीच्या आशीर्वादाने रेल्वे एंजिन चालवून दाखवू. एक य:कश्चित गाडी चालवू शकत नाही की काय?’ म्हणत त्याने ड्रायविंगचे काम आपल्या शिरावर घेतले. भाजपवाल्याने ’अरे तुला शहरात चालवायचा अनुभव आहे, घाटात चालवण्यासाठी वेगळे कौशल्य लागते.’ अशी समजून घालण्याचा प्रयत्न केला. पण तो आता मागे हटायला तयार नव्हता. त्यातच ’बराच वेळ झाला. आता निघायला हवे.’ या विचाराने राष्ट्रवादीवाल्याने त्याला पाठिंबा दिला. कॉंग्रेसवाल्यानेही अन्य काही पर्याय दिसत नसल्याने हरकत घेतली नाही. उरलेली मंडळी तर ’तुम्ही घ्याल तो निर्णय’ मोडमध्ये असल्याने काही न बोलता सरळ गाडीत जाऊन बसली.

गाडी सुरु झाली. घाटाची वेड्यावाकड्या वळणांची सवय नसल्याने सेनानायक गाडी इतकी सावकाश चालवत होता की मागे वाहनांची रांग लागली. ’हॅ: याच्यापेक्षा कॉंग्रेसवाला जास्त वेगाने निर्णय घेतो.’ असा कुत्सित शेरा- अर्थात ’अण्णास्वराज्य’वाल्याने मारला. मागून कर्कश हॉर्नचा कोलाहल ऐकू येऊ लागला. त्यातच मागच्या काचेतून डोकावून पाहणार्‍या यातल्या एक दोघांचे चेहरे पाहून मागच्या गाड्यांतील मंडळींमध्ये हे आपले नेते आहेत ही बातमी पसरली. मग ते अधिकच चेव येऊन हॉर्न वाजवू लागले. त्यातच आतले इतर नेते सेनानायकाला वेग वाढवण्यासाठी सांगू लागले. या गदारोळात गोंधळलेल्या सेनानायकाने वेग अचानक वाढवला. त्याने पुढचे वळण हुकून बस सरळ रस्ता सोडून बाजूच्या खड्ड्यात कोसळली. घाट तसा संपत आलेला असल्याने खड्डा मोठा असला तरी खोल नव्हता आणि बसचा वेगही फार नव्हता. त्यामुळे बसचे नि त्यातील माणसांचे फार काही बिघडले नाही.

सर्वजण धडपडत बाहेर पडले. आता काय करावे याचा विचार सुरू झाला. स्वत:चे काम स्वत: करण्याची सवय मोडलेली असल्याने, बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करु नये, त्याऐवजी आपण बाहेर कसे पडावे याचा विचार करावा या मुद्द्यावर अत्यंत दुर्मिळ असे एकमत ताबडतोब झाले. वर घाटामध्ये बसचा अडथळा दूर झाल्याने वेग पकडलेल्या मागच्या गाड्या थांबून यांना मदत करण्याच्या फंदात न पडता वेगाने चालू लागल्या होत्या. एकदोघांनी थांबून आत डोकावून पाहिले, कुत्सित हसून ते ही निघून गेले.

चांगला चार-पाच पुरुष खोल असलेल्या खड्ड्यातून बाहेर कसे पडावे यावर विचार विनिमय सुरू झाला. ’आपण आठ-दहा लोक आहोत. दहीहंडीप्रमाणे चळत लावून एकाने वर जाऊन एखादे वाहन थांबवावे नि त्यातील माणसांच्या मदतीने इतरांना बाहेर काढावे.’ असा सल्ला कॉंग्रेसवाल्याने दिला. त्यावर, ’तू चूप. हे सगळे तुझे पाप आहे. तू पनवती आहेस. तू आलास म्हणूनच अपघात झाला. तू विरोध केला नाहीस म्हणून हा लेकाचा सेनावाला ड्रायविंगला बसू शकला नि हे असं झालं.’ या मार्‍याने कॉंग्रेसवाला गळपटला आणि चर्चेतून अंग काढून घेत तिथल्या दगडावर खुरमांडी घालून निर्णयाची वाट पाहात बसून राहिला.

त्या घाटातून आज दिवसभरात कधी गेलात तर कोकणाकडे घाट उतरताना ’वाट पाहीन पण एस्टीनेच जाईन’ या बोर्डच्या पुढे सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या वळणावर थांबून बाजूच्या खड्ड्यात डोकावून पाहा. मूळ पांढरा पण चिखलाने बरबटलेला पोशाख घातलेली, काही जाकीटधारी मंडळी तावातावाने कशावर तरी वाद घालताना दिसतील. त्यांच्यासाठी अग्निशामक दलाची शिडी, जेसीबी वगैरे मदत चुकूनही पाठवू नका. त्याचा वापर करण्यापूर्वीच ’आम्हाला अशी मदत करुन मिंधे करण्याचा तुमचा कावा आहे’ असा आरोप करुन वं.ब.आ. वाला एका दगडावर एकटेच बसलेल्या एका बापुडवाण्या माणसाच्या शेजारी तुम्हाला बसवेल. त्याऐवजी ती मिनी-बस बाहेर काढण्यासाठी क्रेन पाठवता आली तर पाहा. त्या माणसांपेक्षा तुम्हा-आम्हाला तीच अधिक उपयुक्त ठरु शकेल.

(कथा, प्रसंग काल्पनिक, पात्रे मात्र अस्सल)

लेखाचे छायाचित्र साभार – bruceoutridgeproductions.files.wordpress.com

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0