मुंबईः राज्याच्या होमगार्डचे महासंचालक व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी राज्य सरकारने सेवेतून निलंबित केले. परमबीर सिंग यांच्याव
मुंबईः राज्याच्या होमगार्डचे महासंचालक व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी राज्य सरकारने सेवेतून निलंबित केले. परमबीर सिंग यांच्यावर खंडणी, अट्रॉसिटीचे गुन्हे असून त्यांनी शासकीय सेवा नियमांचेही उल्लंघन केल्याचा अहवाल राज्य सरकारला मिळाला. त्यानंतर गुरुवारी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांच्या स्वाक्षरी नंतर परमबीर सिंग यांच्यावर लगेचच निलंबनाची कारवाई करण्यात आली.
होमगार्डची सूत्रे मिळाल्यानंतर गेले ६ महिने परमबीर सिंग एकदाही कार्यालयात हजर नव्हते. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगत २९ ऑगस्टपर्यंत रजा घेतली होती. पण रजा संपल्यानंतरही ते हजर राहिले नव्हते. परमबीर सिंग यांच्या शासकीय सेवेतील एकूण वर्तनावर देबाशिष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर परमबीर सिंग यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रु.च्या वसुलीचे आरोप लावल्यानंतर कित्येक महिने परमबीर सिंग बेपत्ता होते. त्यांच्यावर काही पोलिस ठाण्यात वसुली व अट्रॉसिटीचे गुन्हेही दाखल झाले होते. त्यांना ठाण्यातील एका न्यायालयाने फरारही घोषित केले होते. या निर्णयानंतर काही दिवसांनी परमबीर सिंग हजर राहिले. ते हजर राहिले तेव्हा त्यांच्याकडे शासकीय गाडी आढळून आली होती.
परमबीर सिंग यांच्यासोबत अतिरिक्त पोलिस अधिक्षक पराग मणेरे यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. मुंबई व ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंग असताना पोलिस उपायुक्त म्हणून पराग मणेरे या दोन शहरात सेवेत होते.
COMMENTS