मुंबईः बोरिवली उपनगरातल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ‘आरे’मधील ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी घेतला. या राखीव जागेत वनसंवर्धन करण्यात येईल, एखाद्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलवण्याचे जगातील एक पहिलेच उदाहरण ठरेल, असेल ठाकरे म्हणाले.
आरेतील ६०० एकर जागा राखीव ठेवताना या भागात राहणारा आदिवास समाज व अन्य संबंधितांचे हक्क अबाधित राहतील, व आदिवासांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राखीव कलमाबाबत कलम ४ लावण्यात आले असून येत्या ४५ दिवसांत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील व त्या मिळाल्यानंतर वनक्षेत्र निश्चित केले जाणार आहे.
ही प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाणार असून पहिल्या टप्प्यात सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपड्या, आदिवासी पाडे व इतर शासकीय सुविधा यांना वगळण्यात येणार आहे. या टप्प्याचा प्रस्ताव वनविभागाकडून लवकर सादर केला जाणार आहे.
बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरेच्या जागेसंदर्भातील प्रस्ताव मांडला.
COMMENTS