महात्म्याचा वारसा

महात्म्याचा वारसा

उठताबसता गांधीजींचे नाव घेणे, हे आता सत्तेची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी ‘सोशल-पोलिटिकल कम्पल्शन्स’ बनले आहे. परंतु, यात गांधीजींचा वारसा विस्मरणात गेलेला आहे. गांधी पुण्यतिथीनिमित्त त्या वारश्याची केलेली ही उजळणी...

मी आणि गांधीजी – ६
माझा शोध
मी आणि गांधीजी – ८

३० जानेवारी १९४८, मानवी इतिहासातील सर्वात क्रूर दिवसांतला एक दिवस. या दिवशी तथाकथित ‘वीर हिंदुत्ववाद्याच्या’ थेट नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आणि संघाच्या मुशीत तयार झालेल्या अधम मनुष्याने निःशस्त्र महात्म्यावर तीन गोळ्या झाडल्या. महात्म्याने त्या गोळ्या समोरून उघड्या छातीवर झेलल्या. ज्या मूल्यांचा साऱ्या आयुष्यभर पुरस्कार केला, ज्या मूल्यांच्या रक्षणार्थ आपले आयुष्य वेचले आणि ज्या मूल्यांच्या रक्षणासाठी जगला, त्याच मूल्यांसाठी या महात्म्याने एका शूर योद्ध्यासारखे आपले प्राण दिले. आपण एकमेकांचे रक्त सांडू नये म्हणून त्याने आपले रक्त सांडले. आपण एकमेकांचे जीव घेऊ नयेत या काळजीने त्याने आपले प्राणही दिले. मानवी इतिहासात महात्म्याच्या मृत्यूसोहळ्याची तुलना सॉक्रेटिस आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूसोहळ्याशीच करता येईल.

३० जानेवारी १९४८, हा दिवस जसा मानवी इतिहासातला जसा सर्वात क्रूर दिवस होता, तसाच तो सत्य-अहिंसेच्या आणि मानवतेच्या रक्षणासाठी किती पराकोटीचा त्याग करावा, याचा आदर्श घालून देणाऱ्या दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस होता. देहाचे बलिदान करून महात्म्याने मानवतेच्या रक्षणासाठी आणि साऱ्या जगाला सत्य, अहिंसा आणि सद्भावनांच्या आधारे एक नवी मानवी संस्कृती निर्माण करण्यासाठी चेतवलेल्या यज्ञकुंडात स्वतःची आहुती देऊन ते यज्ञकुंड अधिकच प्रज्वलित केले.

ज्या राजकारणाला नैतिक अधिष्ठान नसतं, विचारांचा मुकाबला विचाराने करायची कुवत नसते आणि मुख्य म्हणजे धर्माच्या नावाने लोकांना फसवून वर्णजातिवर्चस्वाचा छुपा अजेंडा राबवायचा असतो, अशा नादात राजकारणाला गुन्हेगारी कृत्य करण भागच असतं. महात्म्याच्या मारेकऱ्यांनी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी नेत्यांनी नेमके तेच केले. पण या उथळ आणि गलिच्छ राजकारण्यांना ‘व्यक्ती संपवून विचार संपविता येत नाहीत’ ही सामान्य गोष्ट समजली नाही. कत्तली आणि दंगली घडवून राष्ट्र निर्माण होत नाही आणि तसे केलेच तर ते टिकतही नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला जी वैचारिक परिपक्वता लागते तिचा अभाव या राजकारणात होता. या द्वेषाच्या राजकारणाची परिणीती महात्म्याच्या हत्येत झाली.

गांधीहत्येच्या निलाजऱ्या समर्थनासाठी, जी फाळणी आणि ५५ कोटी ही कारणे आजही सांगितली जातात, त्यातील असत्य आता पुरेसे समोर ठेवले गेले आहे. आणि  तो या लेखाचा विषयही नाही. महात्म्याचे १५० वे जन्मवर्ष साऱ्या जगाने नुकतेच साजरे केले. अगदी ज्या विचारसरणीने महात्म्याची हत्या केली, त्या विचारसरणीच्या वारसांनाही ‘गांधी 150’ मध्ये सामील व्हावे लागले. त्यातला ढोंगाचा व त्यातील त्यांच्या सोयीच्या राजकारणाचा मुद्दा दुर्लक्षित केला, तरी साऱ्या जगाने महात्म्याच्या जन्माचे १५० वर्ष साजरे करण्यासारखा नेमका कोणता वारसा महात्म्याने आपल्याला दिला आहे ते समजून घेतले पाहिजे. आज ज्या परिस्थितीतून आपला देश आणि जवळजवळ अर्धे जग चालले आहे, त्या परिस्थितीत हा वारसा नीट समजून घेण्याची आणि आचरणात आणण्याची गरज आहे.

महात्म्याचे जीवन एक प्रदीर्घ संघर्ष होता. संघर्षाच्या प्रदीर्घतेबाबत तुलना करायचीच झाली, तर ती लेनिनच्या संघर्षाशी करता येईल. पण महात्म्याचा संघर्ष, महात्म्याचे राजकारण अशा अन्य संघर्षांहून अगदी वेगळे होते. महात्म्याच्या संघर्षात द्वेषाचा लवलेशही नव्हता. सत्य-अहिंसा यांचे शस्त्र घेवून लढणाऱ्या निशस्त्र महात्म्याच्या हृदयात सर्वांप्रति केवळ प्रेम आणि प्रेमाचीच भावना होती. म्हणूनच महात्मा अगदी संघर्षाच्या प्रारंभाच्या काळातही दक्षिण आफ्रिकेत त्याला तुरुंगात टाकणाऱ्या जनरल स्मटला स्वहस्ते केलेले जोडे भेट देऊ शकत होता आणि तो स्मटही इतका थोर की ते जोडे न वापरता तसेच जतन करून ठेऊ शकत होता.

प्रतिपक्ष आपला शत्रू नाही, तो केवळ तात्पुरता विरोधक आहे आणि त्यालाही आपल्यासारख्याच भावभावना असल्याने त्याच्यात परिवर्तन होऊ शकते. म्हणूनच त्याच्या विरोधात संघर्ष करताना त्याच्याबद्दलच्या सद्भावना सोडता कामा नयेत, हा महात्म्याचा वारसा आपण विसरता कामा नये. ‘हेट द सिन नॉट द सिनर’ (पापाचा तिरस्कार करा, पाप्याचा नाही) हा महात्म्याने सोडलेला वारसा आपण सांभाळून ठेवायला हवा. शांती आणि सद्भावना यांसाठी ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

महात्म्याला आपण राष्ट्रपिता म्हणतो. महात्म्याला राष्ट्रपिता संबोधन केवळ औपचारिकता नव्हे. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारत लोकशाही राजवटीस पात्र बनविणे, ही सोपी गोष्ट नव्हती. लोकशाही आली, रुजली आणि तिचे जतन केले गेले यामागे महात्म्याने न्या. रानडे आणि नामदार गोखले यांनी लोकशाही पद्धतीने संस्था परंपरा निर्माण परंपरा निर्माण केली. न्या. रानडे आणि नामदार गोखले यांनी संस्था स्थापन केल्या आणि लोकशाही पद्धतीने चालविल्या. सभा घेणे, पदाधिकाऱ्यांची निवड करणे, व्यापक चर्चा केल्यानंतरच एखादा निर्णय घेणे, विरोधकांच्या मतालाही महत्त्व देणे या साऱ्यांतून लोकशाही पद्धतीच्या कामकाजाचा परिचय भारतीयांना स्वातंत्र्यपूर्वकाळातच झाला. महात्म्यानेही तोच कित्ता गिरवत अनेक संस्था स्थापन करून लोकशाही पद्धतीच्या कामकाजाचा परिचय जनतेला करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शक्यतो सर्वसहमतीने निर्णय घेणे. सहमती न झाल्यास बहुमताने निर्णय घेणे. पण तसे करताना विरोधकांची बाजूही समजून घेणे या लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या गोष्टी महात्म्याने भारतीय समाजात स्वातंत्र्यापूर्वीच रुजविल्या. म्हणूनच महात्मा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा राष्ट्रपिता झाला. लोकशाही टिकण्यासाठी अशा लोकशाही जनसंस्था हा महात्म्याचा वारसा आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याचा अंगीकार आवश्यक आहे.

महात्म्याने राजकारणात धर्म आणला असा आक्षेप अनेकजण वेगवेगळे हेतू मनात ठेऊन घेत असतात. महात्म्याने राजकारणात धर्म आणला नाही, तर राजकारणालाच धर्म बनविले. त्यांचे राजकारण नैतिक आणि अध्यात्मिक होते आणि ते तसे असणे समाजात शांती आणि सद्भावना निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. आज हा नैतिकतेचा आणि अध्यात्मिकतेचा धागा तुटला आहे, तोडून टाकला आहे. समाजसेवा वा राजकारण सत्ताप्राप्तीसाठी, नव्हे तर जनकल्याणासाठी करायचे, व्रतस्थ राहून व्रत म्हणून करायचे, हा वारसा आता लोप पावत चालला आहे. त्याला आता उठताबसता गांधींचे नाव घेणाऱ्या सर्व सेवा संघासारख्या संस्थाही अपवाद राहिलेल्या नाहीत.

सर्व सेवा संघात गेली काही वर्षे सुरू असलेले प्रकार आणि अध्यक्षाच्या निवडणुकीच्या निमित्ताने केले गेलेले अट्टल राजकारण्यांनाही भारी पडतील असे निरनिराळे प्रयोग, हे संस्थांमधील नैतिकता आणि पावित्र्य लोप पावल्याचे व या संस्था केवळ पदाधिकारी बनण्यासाठीच शिल्लक राहिल्याचे लक्षण आहे, असे वाटते. त्यासारखेच प्रकार बाबा आमटे यांच्या आनंदवनात आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सुरू आहेत. संस्थांबाबत गांधीजींचा वारसा हा नैतिक आणि अध्यात्मिक आहे, तो जपायलाच हवा. कुणी किती वर्षे सत्तेत राहायचं? घराणेशाही कशी निर्माण होऊ द्यायची नाही आणि कितीही मोठे असलो तरी लोकशाहीचा निर्णय मान्य करायचा, हा तो वारसा आहे. महात्म्याचे राजकीय गुरू नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची गांधींना भारत सेवक समाजाचे सदस्य करून घेण्याची इच्छा होती. परंतु संस्थेच्या सदस्यांनी त्यांना सदस्यत्व नाकारले. पण गोखल्यांनी त्यात हस्तक्षेप केला नाही. गांधींनीही सदस्यत्वासाठी केलेला अर्ज मागे घेण्याची समंजसता दाखविली. अशा गोष्टींनी लोकशाही रुजते. म्हणूनच हा राजकारणाच्या अध्यात्मिकीकरणाचा वारसा जपायला हवा.

लोकशाहीला महात्म्याने दिलेला आणखी एक वारसा म्हणजे, कोणतीही गोष्ट लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्यामध्ये योग्यप्रकारे जागृती निर्माण करून करणे. विनोबाजींनी हा वारसा जपला होता. ग्रामदान अमलात आणण्यापूर्वी त्या-त्या गावातील लोकांना ती कल्पना समजावून, त्यांची संमती घेऊन नंतर ग्रामदानाबाबतचा कायदा आणला गेला. भूदान आंदोलन सुरू करण्याआधी १३ वर्षे विनोबा लोकांना मालकी हक्क विसर्जनाबाबत समजावण्यासाठी फिरत होते. महसूल कायदा, कूळ कायदा, हे कायदे फारसा विरोध न होता अमलात आणता, आले याचं कारण या जागृतीत आहे.

लोकशाहीत निर्णय लोकांवर लादायचा नसतो, तो लोकांना विश्वासात घेऊन करायचा असतो, हा महात्म्याचा वारसा आहे. कोयना धरण बनविण्याआधी त्याने विस्थापित होणाऱ्या लोकांना कोयना धरण ही महाराष्ट्राची भाग्यरेषा आहे, काहींना याचा त्रास होईल, पण समाजाचा व्यापक हितासाठी हे आवश्यक आहे, हे समजून सांगण्यासाठी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण दौरे करत होते. म्हणूनच इतकी मोठी योजना राबवताना विस्थापितांचा प्रखर विरोध होणे व त्यामुळे योजना रखडणे असे घडले नाही. कायदा लोकांवर लादला की काय घडते, याचं प्रत्यंतर आपल्याला शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदे बनविल्याचा दावा केला गेल्यावरही जो शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध झाला, त्यातून आले आहे. निर्णय घेताना तो ज्यांच्यासाठी घेतला जातोय त्यांना विश्वासात घेवून घेणे, हा महात्म्याचा वारसा आहे. ज्यावेळी लोकांना असे विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात वा कायदे बनविले जातात, त्यावेळी त्यामध्ये छुपा अजेंडा असण्याची शक्यता अधिक असते व अशा गोष्टींना लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते.

महात्म्याने सर्वसामान्य जनतेला अन्यायाच्या प्रतिकारार्थ सत्याग्रह आणि आत्मक्लेश म्हणजे, उपोषणाचा नवा मार्ग दाखविला. दुर्बलातील दुर्बलालाही अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा दिली. महात्म्याचा हा वारसा जपायला हवा आणि त्यासाठी तो जपून वापरायला हवा. सत्याग्रहात सत्य महत्त्वाचं असतं आग्रह नाही, ही गोष्ट समजून घ्यायला हवी. विनोबाजींनी सत्याग्रहाला सत्यग्राही, सत्याचे ग्रहण करणे असा शब्द वापरला, याचे कारण सत्याग्रह हा सौम्यतम असला पाहिजे, त्यात कर्कश्यतेला आणि आक्रस्ताळेपणाला स्थान असता कामा नये. ही गोष्ट समजून घेऊन तो वारसा जपायला हवा. आजकाल सत्याग्रहांच्या नावाने जे लोक ज्या गोष्टी करतात त्या पाहिल्यावर हा सत्याग्रह आहे की हट्टाग्रह आहे, असा प्रश्न पडतो. अशा वागण्याने सत्याग्रहामध्ये जी अध्यात्मिकता सामावलेली आहे ती अध्यात्मिकता लोप पावते आणि सत्याग्रह केवळ प्रतिपक्षाला बदनाम करण्याचे साधन बनते आणि त्याचा फारसा परिणाम न झाल्याने ते हत्यार बोथट होऊन निरुपयोगी होते.

सत्याग्रहाच्या वारशाचे जे केले तेच उपोषण या आत्मक्लेशाच्या मार्गाचे केले आहे. उपोषणाचे हत्यार हे प्रभावासाठी वापरायचे असते, दबावासाठी नव्हे ही साधी बाब आपण दुर्लक्षित केली आहे. आणि ते करणाऱ्याने ते शुद्ध हेतूने करायला हवे आणि मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे करायला हवे, हा गाभ्याचा भाग आपण पूर्णपणे बाजूला सारून ते करतो. असे केल्याने आता ते शस्त्र केवळ प्रभावहीन झालेय असेच नाही तर हास्यास्पदही झाले आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावरचे असे स्वतःला दुसरा गांधी म्हणवून घेणाऱ्या सुमार कुवतीच्या मनुष्याचे ‘स्टेनलेस स्टीलच्या’ पेल्यातले उपोषण, त्यातील राणाभीमदेवी भाषणे, त्या स्टेजवर चढण्यासाठी चाललेली धक्काबुक्की, आणि दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि शिव्याशाप, ठोकलेल्या आरोळ्या, आणि नाचवलेले झंडे पाहिल्यावर आता उपोषणे आत्मक्लेशांसाठी असतात,की आपल्या राजकीय विरोधकांना उपद्रव देण्यासाठी असतात असा प्रश्न पडतो. उपोषणाचा मार्ग हा महात्म्याने दुर्बलांना दिलेला अहिंसक प्रतिकाराचा मार्ग अशा दुरुपयोगाने आपण निरुपयोगी करून ठेवला आहे, ते टाळायलाच हवे. तो महात्म्याचा वारसा नाही.

आपणास सर्वात जास्त दुःख कशाचे होते? या प्रश्नावर महात्म्याने ‘सुशिक्षितांची असंवेदनशीलता’ असे उत्तर दिले होते. आज याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येत आहे. खोट्या आणि विद्वेषी प्रचाराला बळी पडल्याने असेल की आजच्या शिक्षणव्यवस्थेच्या समाजविन्मुखतेच्या दोषामुळे असेल, पण सुशिक्षित समाज हा क्रमाने अधिकाधिक असंवेदनशील बनत चालला आहे. स्वार्थी, आत्मकेंद्रित आणि समाजविन्मुख बनत चालला आहे. गोमांस बाळगल्याच्या वा सेवन केल्याच्या केवळ संशयाने मॉब लिचिंग होत असताना, लव जिहादच्या नावे कुणाला जिवंत जाळले जात असताना (त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर पराक्रम म्हणून प्रसारित केले जात असताना), अल्पसंख्यांक आणि दलितांना पशूंची वागणूक देऊन वर त्यांना बेदम मारले जात असताना, काश्मीरची स्वायत्तता नष्ट करून, साऱ्या काश्मीरला एक मोठा तुरुंग बनविले जात असताना, एनआरसी आणि सीएए अशा कायद्यांनी ज्यांच्या अनेक पिढ्या या देशाच्या मातीत मिसळल्या आणि पुढेही मिसळतील अशा लोकांना अभारतीय ठरविले जात असताना, बलात्कारी जामिनावर सुटला म्हणून त्याचे सत्कार केले जात असताना, बलात्कार कोणत्या जातिधर्माच्या व्यक्तीने केलाय आणि कोणत्या जातिधर्माच्या मुलीवर केलाय याचा विचार करून बलात्काऱ्यांना राजकीय संरक्षण दिले जात असताना, निवडणूक आयोगासह साऱ्या संविधानिक संस्थांना शासनाची बटिक बनवून सत्तेचा दुरुपयोग केला जात असताना, अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे विस्थापित मजूर भर उन्हात उपाशीपोटी केलेल्या पायपिटीने आणि चिरडले जावून मरत असताना, अशा असंख्य वेळी आणि सध्या कडाक्याच्या थंडीवाऱ्यात देशाच्या राजधानीच्या सीमेवर अडवून ठेवलेल्या शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारले जात असताना या सुशिक्षित वर्गाकडून जी प्रतिक्रिया यायला हवी ती न येणे, हे या असंवेदनशीलतेचे द्योतक आहे.

फॅसिस्टांच्या खोट्या प्रचाराला आणि संकुचित राष्ट्रवादाला बळी पडलेल्या या सुशिक्षित पिढीला ‘दीनदुबळ्या समाजबांधवांच्या’ दुःख आणि यातनांनी हृदयात दाटून येणारा उमाळा ही राष्ट्रभक्तीची पहिली पायरी आहे, ही गोष्ट समजून सांगायला हवी. दीनदुबळ्यांच्या हुंदक्यांनी दाटलेल्या उमळ्यांतून महात्मे निर्माण होतात आणि तोच त्यांचा खरा वारसा असतो.

आज ज्या परिस्थितीतून देश आणि विश्व चालले आहे, त्यातून दुःख, यातना आणि रक्तपात आणि शेवटी अराजकता याखेरीज दुसरे काही निष्पन्न होणार नाही. अशा परिस्थितीत महात्म्याचा वारसा जपणे आणि त्याचा अंगीकार करणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे.

हुतात्मादिनी महात्म्याला श्रद्धांजली वाहताना आपण त्याच्या या वारशाचे नेमके काय करणार आहोत यावर मानवजातीचे भवितव्य ठरणार आहे.

(लेखक गांधीविचारांचे अभ्यासक, शिक्षण व्यापरविरोधी चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

‘मुक्त संवाद’ पाक्षिकातून साभार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0