बापू @ 150

बापू @ 150

या देशाला फक्त कर्मठ सांप्रदायिक विचारांची गरज नसून इथं मानवता हा मूळ धर्म जागवण्याची खरी गरज आहे.. गांधी अभ्यासकांच्या अभ्यासपूर्ण विचारांची शिदोरी जोपर्यंत मिळत राहील तोपर्यंत आमची गांधीगिरी सुदृढ बनत राहील आणि यातून पुढच्या पिढ्यांना गांधीवादाचे गांधीगिरीचे दर्शन या भारतवर्षात निनादत राहील..

‘तुम्ही सेक्युलर नाही?’
आंबेडकरांना राष्ट्रीय भाषा संस्कृत हवी होतीः बोबडे
मनूच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्या दोघी!

मी सुरुवातीच्या काळात म्हणजे प्राथमिक शाळेत असताना तसेच माध्यमिक शालेय जीवनातही घरात चालणाऱ्या चर्चांमधून तसेच आमचे कुटुंबस्नेही असलेले आमच्या आजोबांचे मित्र काळीटोपीवाले बाबा आमच्या घरी नेहमी येत जात असत तेव्हा ते नियमितपणे बोलत असताना गांधी, नेहरु या द्वयीवर नेहमी टीका करूनच बोलत असत.. बाबासाहेबांवर अश्लाघ्यपणे बोलायचे.. आणि मधेच ताश्कंद करारावरून इंदिरा गांधींवर ताशेरे ओढायचे आणि तोच चर्चेचा परिणाम म्हणून त्यानंतरही कित्येक वेळा आमचे अण्णा आम्हाला बसल्या बसल्या सांगत असायचे.. मग तो विषय आमच्या डोक्यात दुर्दैवाने दृढ होत राहिला..

शाळेत असताना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला आमची गांवभर प्रभातफेरी निघायची तेव्हा आम्ही जोरजोरात घोषणा द्यायचो..

एक दोन तीन चार.. गांधीजींचा जयजयकार.

बाबासाहेबांचा जयजयकार..

नेहरुजींचा जयजयकार..

प्रभातफेरी संपवून शाळेत पोहोचलो की तिथं पहायचो तर काय या तिघांसह इतर महान देशभक्तांच्या तसबिरींना पुष्पहार असायचे.. तेव्हा मला राहून राहून वाटायचं की हे तिघेजण तर दोषी आहेत मग यांच्याविषयी आदर कशाला ठेवायचा..? मग द्वेषाची सुरुवात तिथून वाढीस लागली..

पण साधारण त्याच काळात आम्ही पाचवीला वगैरे होतो तेव्हा माझ्या गावात आमच्या नात्यातील मामा असलेले सयाजीरांव शिंदे हे सेवादलाची शाखा चालवायचे.. त्या शाखेला आम्ही मित्रमंडळी एकमेकांच्या ओढीने त्या शाखेला जात असू.. तिथं समतेची गीतं गाऊन मन प्रभावित व्हायचं.. तिथल्या एखाद्या कार्यक्रमात कुणा पाहुण्या मंडळीचा सत्कार करायचा असेल तर ते सुताचा हार असायचा … काय तो साधेपण… पण त्या साधेपणातलं मोठेपण कळण्याइतकं वय नव्हतं तेव्हा. किमान दोनेक वर्षे आम्ही नियमितपणे शाखेत गेलो.. पण आमच्या अण्णांना ते बहुदा आवडलं नसल्याने आमचा सेवादलातला तो प्रवास तिथंच थांबला पण मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात दबून का होईना पण तो रुतून राहिला..

नंतर महाविद्यालयीन जीवनात कालांतराने शालेय जीवनात कुजबुजू न ऐकलेल्या गोष्टी मी अधिकारवाणीनं मित्रांमधे सांगायला लागलो जसे नेहरुंचं लेडी माऊंटबॅटन तसेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीच्या बायकोचं लफडं किंवा गांधींना चालताना पण फक्त बायकांचाच आधार घ्यावासा वाटतो.. ही दोघं म्हणजे स्त्रीलंपट माणसे आहेत, यांना का म्हणून आपण आदर द्यायचा.. तसेच डॉ. बाबासाहेबांची आई एका ब्राह्मणाच्या घरी धुणीभांडी करायच्या तेव्हा त्यांचा जन्म झालाय अशा प्रकारची विकृत कुजबूज आमच्या तरुणमनावर बिंबवण्यात त्या काळच्या काहींना यश मिळालंच होतं…

समाजमन कसं बिघडवायचं व त्यासाठीचा मीडिया कसा वापरायचा याचं तंत्र काही संघटनांनी चांगल्या पद्धतीने अंगिकारलं होतं हे मी अकरावीत असताना अनुभवलं होतं.. तेव्हा जवळपास सहा महिने रा. स्व. संघाच्या शाखेत कुणाच्या तरी सांगण्यावरून जायला लागलो.. पण मनात दबलेली सेवादलातली समतावृत्ती मला तिथल्या एकांगी विचारसरणीत टिकवू शकली नाही.. मी प्रश्न विचारू लागलो तेव्हा मला तिथं अटकाव व्हायला लागला आणि सायन्सचा विद्यार्थी असल्याने दिवसभर कॉलेजमधे गुंतून असायचो.. मग संघप्रकरण असंच मागं पडलं..

मग पुढे पदवी शिक्षणास्तव शहर बदललं आणि प्राथमिकताही बदलल्या.. घरची परिस्थिती फारच हलाखीची बनल्याने मी फक्त अभ्यास एके अभ्यास यावरच अडकून राहिलो आणि त्यानंतर नोकरीनिमित्त मी पुण्यात पोहोचलो.. इथलं वातावरण मात्र मला गांधीजींविषयी हळूहळू कलुषित कसं होईल या मार्गानेच जायला लागलं.. कारण त्यासाठीचं पोषक वातावरण पुण्यासारखं शोधूनही सापडणारा नाही.. मग एक संघविचाराचे सहकारी ऑफिसमधेच लाभले.. हळूहळू परत रसभरण परत सुरू झाले.. मग परत एकदा फक्त ऐकणे या पद्धतीवर मी विश्वास ठेवून झाल्यानंतर त्या वरिष्ठ सहकाऱ्याने मला “मी नथुराम गोडसे बोलतोय” या नाटकाची सीडी आणून दिली.. मी त्या पुनःपुन्हा पाहिली.. सावरकरांच्या भाषाकौशल्यपूर्ण पुस्तकांचे वाचन वाढायला लागले.. ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ वगैरे पुस्तके वाचून झाली..

मग एकदा असेच बालगंधर्व रंगमंदिरात ते नाटक पाहायला स्वखर्चाने पाच जणांना घेऊन गेलो.. आणि तिथला नाटकातला भारदस्त अभिनय पाहून भारावलेल्या अवस्थेत त्यातल्या काही कलाकारांची भेट घेतली.. त्यावर त्यांनी विचारलं की तू काय करतोस वगैरे आणि सांगितलं की मग तू या नाटकाच्या किमान ४० ते ५० सीडीज विकत घेऊन तुझ्या मित्रमंडळी व परिवारातील व्यक्तींमधे हे पसरवायला हवं.. हेच तर राष्ट्रकार्य आहे.. देशाची सेवा आहे..

मग ते म्हणाले हवंतर मी डिस्काऊंट मिळवून देईन.

मी लागलीच खिशातून पैसे काढले आणि ४० सीडीज खरेदी केल्या आणि तेवढ्याच हिरीरीने वाटूनही टाकल्या.. आता मात्र अधिकृतपणे गांधीबापू, नेहरु व आंबेडकरांवर दोन्ही हातांनी हातोडी चालवायला घेतली.. मित्रपरिवारांमधे घडणाऱ्या चर्चांमधून बिनदिक्कतपणे झोडपायचो मी या तिघांना..

पण सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे मी गांधीजी, डॉ.आंबेडकर किंवा नेहरुंचा द्वेष करायचो म्हटलं तरी कुठंतरी मनात एक कुतूहलही असायचं की एवढं करूनही ही तिघं मला प्रकर्षाने समोर येत राहायची, माझ्या तेव्हाच्या विचारसरणीवर प्रश्न विचारती व्हायची.. मला उत्तरं सापडायची नाहीत पण मला निःशब्द मात्र जरुर करायची..

त्याकाळात माझा घरी जायचा रोजचा रस्त्यावर आगाखान पॅलेस ही इमारत होती.. मी नेहमीसाठी तिकडं पाहून एखादा दर्पयुक्त कटाक्ष मात्र टाकायचो.. पण एकदा गांधी जयंतीदिवशी २ ऑक्टोबरच्या निमित्ताने तिथं जाऊयाच एकदा म्हणून गेलो आणि ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक विकत घेतलं.. तसंही न आवडणाऱ्या दुष्ट माणसाचं आत्मचरित्र म्हणून मी तुटकतुटक पद्धतीने वाचत राहिलो.. पुस्तक लवकर कळत नव्हतं कारण गांधी लवकर त्यांच्यात घुसू देत नाहीत.. ते समजू पाहणाऱ्यास बरंच दमवतात, खूप दमवतात.. मी त्यातल्या कित्येक बाबी वरवर वाचत राहायचो .. परतपरत वाचायचो पण सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित झालेला मी त्या पुस्तकाच्या आत घुसू मात्र शकलो नाही..

पण त्यानंतर २००६ साली मी “लगे रहो मुन्नाभाई” हा चित्रपट पाहिला आणि माझ्या मनात गांधीबापूंची समतारुपी विचारांचं दबून राहिलेलं कोंदण झपकन् उघडं झालं आणि मग गांधींच्या विचारांचा प्रवाह मला आवडू लागला आणि मग माझी बदली ग्रामीण भागात झाली आणि मग वैवाहिक आयुष्यात गुंतत राहिलो.. पण गांधी स्वस्थ बसू देत नव्हते.. ‘साधना प्रकाशन’ची छोटीछोटी पुस्तके हळूहळू वाचून विश्वास यायला लागला..

त्यात “स्वदेशी” हे एक पुरातन असलेले सत्य व शाश्वत मूल्य गांधीजींना सापडले. पण बापूंनी इतक्या हिमतीनं त्याची मांडणी केली की स्वदेशी हे मूल्य जणूकाही जणू काही बापूंचं हे स्वतःचं अपत्य वाटायलं लागलं. गांधीजींची स्वदेशीची व्याख्या म्हणजे केवळ आपल्या देशातंर्गत तयार झालेल्या चीजवस्तू नव्हे. तर आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात “स्थानिक ग्रामीण पारंपरिक पद्धतीने तयार होणारी उत्पादने असा होय. आपल्या सर्व दैनंदिन गरजांसाठी अशा प्रकारच्या स्वदेशी उत्पादनांचाच आग्रहाने उपयोग करणे याला गांधीजींनी स्वदेशी मंत्र स्वरूपात सादर केले.

स्वदेशीवरील आचरण आणि स्वदेशी वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात गांधीजींनी आपल्या कमालीच्या व्यस्त जीवनातही विस्मयकारक असे भरीव कार्य जगासमोर ठेवले.

अशा “स्वदेशी-आचरणा’चे धर्मातील महत्त्व दाखवण्याचा त्यांनी जीवनभर कसोशीने प्रयत्न केला.

गांधी हा माणूस आपला आहे, आपल्याच घरातला कुणीतरी आजोबा आहे.. अशा समजुतीत मी आता बापूंना संबोधायला लागलो..

डॉ. बाबासाहेबांचे रिडल्स वाचून काढले.. पुपुल जयकरांचं इंदिरा गांधीविषयींचं पुस्तक वाचून झालं..

दरम्यानच्या काळात मग हातात इंटरनेट आले मग सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहरु कळायला लागले..

ही माणसं किती उंच व उत्तुंग होती व आहेत याचा अजूनही मला ठावठिकाणा मला लागला नाही.. शोध अविरत चालू आहे..

मध्यंतरी वाचत असताना गांधीजींनी एक महत्त्वाची बाब नमूद केली होती की ते नियमितपणे विपश्यना करायचे म्हणून आम्ही काही मित्रांनी विपश्यना पूर्ण करून त्यातल्या मौनाची गरज काय असते व उपयोग काय असतो याची प्रचिती घेतली..

याच काळात मला Knowing Gandhism Global Friends नावाचा समूह माहीत झाला. त्या माध्यमातून काही कार्यक्रम पुण्यात व्हायला लागले आणि मग शक्य होईल तेव्हा मी तिथं हजेरी लावायचो. गांधीजींची अहिंसा, आंबेडकरांची विद्वत्ता व नेहरुंची दुरदृष्टीता या विचारांचा संगम होण्यासाठी व त्या विचारांचं पारायण घालण्याची तीव्र गरज देशातल्या सध्याच्या परिस्थितीवरून तेथे लागली..

तुषार गांधी यांचे ‘लेट्स किल गांधी’ हा शोधग्रंथ तर मला रास्वसंघाच्या प्रत्येक शाखेस विकत घेऊन भेट द्यावासा वाटतो इतकं अतिसूक्ष्म विश्लेषण त्या ग्रंथात अचूकपणे नोंदलंय..

पाकिस्तानला द्यावयाचे ५५ कोटीं रु.चं प्रकरण असो की गांधीजींचं काळानुरुप परिस्थितीनुसार बदलणं असो अशा बऱ्याच बाबींचा परखडपणे प्रतिवाद करण्याचा ज्ञानपैलू Knowing Gandhism समूहात विकसित होऊन प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा क्रियावादी होण्याचा मूलमंत्र मी इथं शिकलो आहे शिकतो आहे..

हा समूह अभ्यासपूर्ण बनण्याचा व क्रियावादी राहण्याचा बहुमोल विचार आपल्या भारतीय समाजमनात नक्की रुजवेल कारण त्यात आम्हां तरुणांनी आता मनावर घेतलंय..

या देशाला फक्त कर्मठ सांप्रदायिक विचारांची गरज नसून इथं मानवता हा मूळ धर्म जागवण्याची खरी गरज आहे..

गांधी अभ्यासकांच्या अभ्यासपूर्ण विचारांची शिदोरी जोपर्यंत मिळत राहील तोपर्यंत आमची गांधीगिरी सुदृढ बनत राहील आणि यातून पुढच्या पिढ्यांना गांधीवादाचे गांधीगिरीचे दर्शन या भारतवर्षात निनादत राहील..

बापू, तुम्ही फक्त १५० वर्षांचे झालात.. येणारी १०००० वर्षे तुम्ही आमच्यांमध्ये असेच ताजेतवाने राहाल याची खात्री अगदी मनापासून आम्ही देत आहोत..

मरते है हमतुम..

गांधी कभी नही मरते..

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: