पोलिसांसमोर युवकाचा जामियातील विद्यार्थ्यांवर गोळीबार

पोलिसांसमोर युवकाचा जामियातील विद्यार्थ्यांवर गोळीबार

नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरात वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर एका व्यक्तीने गुरुवारी दुपारी १ वाज

दिल्ली हिंसाचाराबद्दल इतकं दीर्घ मौन का?
‘एनपीआर’च्या नव्या मसुद्यावर केंद्राचे शिक्कामोर्तब
ए लाव रे तो……!

नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरात वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर एका व्यक्तीने गुरुवारी दुपारी १ वाजून ४० मिनिटाच्या आसपास आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. यात जामियातील एक विद्यार्थी शादाब फारुख हा काश्मीरी युवक जखमी झाला. त्याच्या डाव्या हाताच्या बोटांमध्ये गोळी घुसली. त्याला जखमी अवस्थेत होली फॅमिली इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर त्याच्यावर उपचार करून सोडण्यात आले आहे. शादाबवर गोळी मारणाऱ्याचे नाव गोपाल असून तो आंदोलकांना ‘ये लो आझादी’ असे धमकावत पिस्तुल दाखवत होता. पोलिसांनी गोपालला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. गोपाल अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

३० जानेवारीला म. गांधी यांची पुण्यतिथी असल्याने जामियातील विद्यार्थ्यांनी म. गांधींच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी शांततामय मोर्चाची परवानगी दिल्ली पोलिसांकडे मागितली होती. पण दिल्ली पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण सांगत ही परवानगी नाकारली. तरीही बुधवारी सकाळपासून जामियातील शेकडो विद्यार्थी राजघाटकडे जाण्यासाठी जमा झाले होते पण पोलिसांनी त्यांना थोपवून धरले होते. या दरम्यान गोपाल हा पोलिस व विद्यार्थ्यांच्या मध्ये रिकाम्या जागेत शिरला आणि त्याने विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी पिस्तुल दाखवण्यास सुरूवात केली व नंतर एक गोळी झाडली.

या घटनेच्या छायाचित्रात व व्हीडिओत गोपाल आंदोलकांच्या दिशेने पिस्तुल रोखून त्यांना धमकावत होता तर पोलिस त्याच्या मागे उभे असल्याचे दिसून येत आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या दिशेने गोपालने ‘ये लो आझादी’ म्हणत गोळी झाडली. तो पिस्तुल हवेत फिरवत विद्यार्थ्यांना धमकावत होता. पण त्या दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

गोळीबार करणाऱ्या युवकाच्या फेसबुक प्रोफाइलवर त्याचे नाव ‘रामभक्त गोपाल’ असून तो या गोळीबार घटनेचे थेट प्रक्षेपण फेसबुकवरून करण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या फेसबुकवरच्या काही पोस्टवरून तो हिंसा करण्याच्या तयारीत असल्याचेही दिसून येत होते.

जामियातील विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले

गोपालने केलेल्या गोळीबारात आपला सहकारी जखमी झाल्याने संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी राजघाटकडे जाण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाच ते सहा तास विद्यार्थी व पोलिस यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. विद्यार्थ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडही तोडण्यास सुरूवात केली. काही विद्यार्थी व विद्यार्थीनी बॅरिकेडवर उभे राहून निदर्शने करत होते. निदर्शक विद्यार्थी दिल्ली पोलिसांच्या एकूणच भूमिकेवर प्रचंड नाराज होते. पोलिसांकडून व्हीडिओग्राफी सुरू होती व पोलिस विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगत होते. आंदोलक विद्यार्थी आपल्या जागेवरून हटत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी जामियातील शिक्षकांना घटनास्थळी बोलवून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यास सांगितले. काही विद्यार्थींनींना पोलिसांनी ताब्यात घेतले पण त्यांची नंतर सुटका करण्यात आली.

अमित शहा यांच्यावर केजरीवाल यांचा निशाणा

जामियाच्या परिसरात गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक तासानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्याची गय केली जाणार नाही असे ट्विट केले. तर या ट्विटला उत्तर देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीची अवस्था शोचनीय झाली असून गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे असे ट्विट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: