कांदळवनः जैवविविधतेचे सौंदर्य राखणारी संपदा

कांदळवनः जैवविविधतेचे सौंदर्य राखणारी संपदा

आज आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन (International Mangrove Day) आहे. मनमोहक वैशिष्ट्यपूर्ण स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक जैवविविधतेने नटलेली सौंदर्य संपदा राखून ठेवण्यासाठी आपला कांदळवन परिसर स्वच्छ ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.

राजधानीत घरातही कुणीही सुरक्षित नाही : सर्वोच्च न्यायालय
पर्यावरणाकडे दुर्लक्ष
जिम कॉर्बेटचे नामांतर रामगंगा नॅशनल पार्क?

आपण छोटा रोहित म्हणजेच फ्लेमिंगो हा पक्षी पाहिलाच असेल किंवा या पक्ष्याबद्दल ऐकलं तरी असेलच! किती आश्चर्यजनक बाब आहे, हजारो मैल दुरून हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्राच्या किनारपट्टी, खाड्या, नदीमुख या भागांमध्ये हजारोंच्या संख्येने येतात. फ्लेमिंगो सोबत रेड शॅन्क,  ग्रीन शॅन्क, कर्लीव, सॅण्डपाइपर, गॉडवीट, वेगळ्या प्रकारचे बगळे, करकोचे अशा जवळपास २००हून अधिक प्रजातींची नोंद आहे. यामध्ये ठाणे खाडी, शिवडी, उरण, भिगवण अशा अनेक ठिकाणी पेन्टेड स्टोर्क, ग्रेट क्नोट, गॉडविट सारख्या दुर्मीळ आणि नामशेष होणाऱ्या प्रजातीही दिसतात. अगदी जगाच्या उत्तर टोकावरून म्हणजे आर्क्टिक वर्तुळापासून, भारतातल्या हिमालयापासून ते युरोप, सायबेरिया अशा उत्तर गोलार्धापासून हे पक्षी आपल्या किनारपट्टीवर स्थलांतर करून येतात. अतिशय हिमवृष्टीमुळे अन्न व निवारा दुर्लभ होतो आणि त्यामुळे या पक्ष्यांना अन्नाच्या शोधात दरवर्षी स्थलांतर करावं  लागतं  आणि हे पक्षी मग उबदार भागांमध्ये काही महिने वास्तव्य करायला येतात. आपला महाराष्ट्र राज्य हा भाग अशाच पद्धतीचा उबदार वातावरणाचा पट्टा आहे, जिथे या पक्ष्यांना अनुकूल वातावरण व मुबलक प्रमाणामध्ये खाद्य उपलब्ध होते.

काय बरे असते यांचे खाद्य? सुंदर गुलाबी रंगाचे दिसणारे फ्लेमिंगो या पक्ष्याची चोच निराळीच असते, याच्या चोचीमध्ये गाळणी असते. या गाळणीमधून ते पाणथळ जमिनीवर वाढलेले शेवाळ तसेच छोटे शंख, शिंपले आरामात खाऊ शकतात आणि थोड्याच कालावधीत करड्या किंवा चॉकलेटी रंग बदलतो आणि त्यांना मूळ गुलाबी रंग प्राप्त होतो. काही पक्षी जसे कर्लिव, आयबीस यांची चोच खालच्या दिशेने झुकलेली असते, तर अवोसेट सारख्या पक्ष्यांची चोच वरच्या बाजूस

छायाचित्र - शीतल पाचपांडे

छायाचित्र – शीतल पाचपांडे

वळलेली असते, तर काही पक्ष्याची चोच छोटी तर काहींची लांब असते. या पक्ष्यांच्या चोचीमध्ये झालेले अनुकूलने या पक्ष्यांना दलदलीतून शंख, शिंपले, किडे इ. शोधण्यासाठी उपयोगाचे ठरतात. शिवाय या पक्ष्यांचे पाय सुद्धा थोडे उंचच असतात, ज्यामुळे पाणथळ प्रदेशामध्ये ते रुबाबाने वावरतात आणि सुरक्षित हालचाल करू शकतात.

खरं तर जमीन आणि समुद्राचा जिथे संगम होतो तेथील क्षाराचे प्रमाण, दलदल, लाटांचे प्रवाह, भरती ओहोटी इ. मुळे या प्रदेशांमध्ये वास्तव्य करणे तसे कठीणच आहे. तरीही, असंख्य जीव या प्रदेशांमध्ये आढळून येतात आणि या जीवांचे तारक ठरतात त्याला कारणीभूत असतात ती कांदळवने. काही विशिष्ट प्रकारची झाडे ज्यांना आपण खारफुटी म्हणून ओळखतो. जेव्हा या खारफुटी भरपूर संख्येने वाढतात, तेव्हा तिथे तयार होतात समृद्ध कांदळवने. या वनांमध्ये आढळणाऱ्या खारफुटी सगळ्यात जास्त सहनशील असतात, कारण अतिक्षारयुक्त माती, दलदल तसेच समुद्राच्या लाटांना सहन करत सक्षमपणे आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. हे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना अनेक अनुकूलने करावी  लागतात. विशेष अनुकूलन दिसून येते, ते म्हणजे या खारफुटीच्या मुळांमध्ये. जगातील ८० खारफुटी प्रजातींपैकी भारतात ४५च्या आसपास प्रजाती आढळतात तर महाराष्ट्रात २० प्रजाती आढळतात. सगळ्यांच्या माहितीची असलेली प्रजाती म्हणजे तिवर. ज्यामध्ये जमिनीपासून वरच्या दिशेने वाढणारी झाडाच्या सर्व बाजूंनी जमिनीवर पसरलेली श्वसन मुळे दिसून येतात. कांदळ या प्रजातीची मुळे तर वडाच्या झाडाच्या पारंब्यांसमान पण एकत्रितरित्या जमिनीवर वाढतात आणि त्या वरती हिरव्यागार फांद्या आणि पाने दिसतात. किरकिरी, छोटा झुंबर आणि मोठा झुंबर या प्रजातीमध्ये तर गुडघा वळवल्यावर दिसतो तशी मुळे जमिनीच्या सर्व बाजूंनी जमिनीवर पसरतात. हुरी, सुंदरी, समुद्रशिंगी सारख्या प्रजातींची मुळे जमिनीवर वेडीवाकडी पसरलेली दिसून येतात. या मुळांवर छोटी-छोटी छिद्रे असतात, ज्या मधून वायू विनिमय होत असतो. त्यामुळे जमिनीत जरी प्राणवायूची कमतरता असली, तरी ही, या खारफुटी प्रजाती मात्र या प्रदेशांमध्ये बहरू शकतात.

छायाचित्र - शीतल पाचपांडे

छायाचित्र – शीतल पाचपांडे

कांदळवनांमध्ये प्रजननासाठी एक विशेष अनुकूलन होते. काही बिया झाडापासून वेगळ्या होत नाहीत. त्या झाडावरच रुजतात आणि वाढतात. जेव्हा त्या स्वतंत्रपणे खाली पडून वाढू शकतील अशी स्थिती निर्माण होते त्याचवेळी त्या झाडापासून वेगळ्या होतात. टोकदार भाल्याप्रमाणे दिसणारे हे लहानसे रोप (रुजलेल्या शेंगा ज्यांना कांदिका म्हणतात) दलदलीत घुसतं आणि स्वतंत्र आयुष्य सुरू करतं. काही कांदिका भरतीच्या पाण्याच्या सोबत जातात आणि जिथे जागा मिळेल तिथे तग धरतात. जे प्राणी अंडी न घालता बाळाला जन्म देतात त्यांना जरायूज म्हणजे विविपॅरॉस म्हटलं जातं. त्याच प्रमाणे लहान रोपांना जन्म देणाऱ्या खारफुटीच्या या प्रक्रियेला विविपॅरी असे म्हटले जाते. कांदळवने खाडी परिसरात चांगली वाढतात कारण खाडी परिसरात नदीचे पाणी मिसळल्यामुळे पाण्याची क्षारता कमी असते, तसेच लाटांचा प्रवाह कमी होतो आणि त्यामुळे खाडी ही माशांच्या प्रजननासाठी उत्तम जागा असते. त्यामुळे समुद्रातली अन्नसाखळी सुरळीत सुरू राहण्यासाठी देखील फार मोठी भूमिका ही कांदळवने पार पाडतात. कांदळवनांची पाने जेव्हा खाली पाणथळ जमिनीवर पडतात, तेव्हा तिथे असलेले खेकडे त्या पानांचा भुगा करतात आणि मग इतर काही जीव तेथे आकर्षित होतात. खाण्यासाठी मुबलक प्रमाणात अन्न असल्यामुळे समुद्रातले अनेक मोठे मासे भरतीच्या पाण्याबरोबर खाडी परिसरात येतात, तेथे अंडी घालतात. माशांची पिल्ले मोठी झाली की, ती पुन्हा समुद्रात झेप घेतात. तसेच खेकडे, शंख शिंपले किडे यांचेही आश्रय स्थान ही कांदळवनेच आहेत कांदळवने ही जैवविविधता पूर्ण असतात, या प्रदेशांमध्ये दिसणारे हजारो स्थलांतरीत पक्षी हे याचे उदाहरण आहे.

कांदळवनांचे अनेक फायदे आहेत, हे जागतिक पातळीवर मान्य झालेले आहे. सध्याच्या काळात कार्बन हा वायूप्रदूषणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. यामुळेच कार्बन सिंक ही संकल्पना उदयास आली. कार्बन सिंक म्हणजे कार्बन शोषून घेणारे नैसर्गिक घटक; यात कांदळवनांचा मोठा सहभाग आहे. वैज्ञानिक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, कार्बन शोषून घेण्याची सगळ्यात जास्त क्षमता कांदळवनात आहे. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ही कांदळवने जमिनीची धूप थांबवतात आणि वादळ वारे आणि समुद्राच्या लाटा यांपासून जीवसृष्टीचे संरक्षण करतात. सध्या समुद्राची पातळी – वाढ आणि पर्यावरणीय बदल यामुळे किनारी गावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, परंतु आज कांदळवनामुळे त्यांना सुरक्षितता लाभली आहे. किनारपट्टीचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात आणि म्हणूनच कांदळवनांच्या रक्षणाकरिता महाराष्ट्र शासनाने अनेक नाविन्यपूर्ण कामे हाती घेतली ज्यामध्ये स्वतंत्र कांदळवन कक्ष आणि बरोबरीने कांदळवन प्रतिष्ठानची स्थापना करून स्थानिक सहभागातून अनेक शाश्वत उपजीविका जसे खेकडे पालन, जिताडा पालन, शोभिवंत मासे पालन, कांदळवन निसर्ग पर्यटन, या प्रकल्पांच्या माध्यमातून किनारी भागातील रहिवाशांसाठी रोजगार निर्मिती होऊ लागली आहे. लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला आहे आणि कांदळवनांबद्दल अधिक आत्मीयता निर्माण झाली आहे. या शिवाय कांदळवन स्वच्छता मोहीम कांदळवनांमधील तोड किंवा अनधिकृत बांधकामे काढणे, कांदळ रोपांची लागवड, कांदळवनांच्या विविध पैलूंवर संशोधन, जनजागृती उपक्रम अशा अनेक बाबी आज महाराष्ट्र राज्याच्या कांदळवन कक्ष वनविभागामार्फत राबविल्या जात आहेत. आज ऐरोली येथे किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्राला भेट देण्यासाठी आणि फ्लेमिंगो नौका सफारीसाठी देश विदेशातून पर्यटक गर्दी करतांना दिसत आहेत. म्हणूनच आज फक्त शासनच नाही तर किनारी भागातील रहिवासी, सामान्य नागरिक, इतकेच नाही तर पर्यटकांसह, आपण सगळ्यांनी या कांदळवन आणि तिथल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलायला हवा. हे मनमोहक वैशिष्ट्यपूर्ण स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक जैवविविधतेने नटलेली सौंदर्य संपदा राखून ठेवण्यासाठी आपला कांदळवन परिसर स्वच्छ ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून प्लास्टिकचा नायनाट करणे, कचऱ्याचे नियोजन घराघरात होणे एक महत्त्वाची भूमिका बजावेल. भरतीच्या पाण्यासोबत कित्येक टन कचरा कांदळवन परिसरात येतो व त्यांच्या मुळांना प्लास्टिक झाकून टाकते, ज्यामुळे या पाणथळ परिसंस्थांना अधिक धोका निर्माण झाला आहे. तर आजच्या या आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धनदिनाचे औचित्य साधून हा बदल जर आपण घडवू शकलो, तर एक जबाबदार नागरिक म्हणून मोलाची भूमिका पार पाडू आणि दूरवरून येणाऱ्या आपल्या या रंगीत पाहुण्यांचे स्वागत ही जोमाने करता येईल नाही का ?

(लेखाचे छायाचित्र : मँग्रुव्ह फाउंडेशन बँक)

डॉ. शीतल पाचपांडे, या कांदळवन प्रतिष्ठानच्या उपसंचालक (प्रकल्प) आहेत.

पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0