मणिपूर लॉकडाऊन उल्लंघनः वृंदा यांना तात्पुरती अटक

मणिपूर लॉकडाऊन उल्लंघनः वृंदा यांना तात्पुरती अटक

इम्फाळः मणिपूरच्या नार्कोटिक्स अँड अफेअर्स ऑफ बॉर्डर ब्युरो (एनएबी)मधील अतिरिक्त पोलिस अधिक्षक थोऊनाओजम वृंदा यांच्यासह अन्य दोघांना लॉकडाऊनचे उल्लंघन

कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको
कोरोनानंतर काय होणार?
न्यूझीलंडमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात?

इम्फाळः मणिपूरच्या नार्कोटिक्स अँड अफेअर्स ऑफ बॉर्डर ब्युरो (एनएबी)मधील अतिरिक्त पोलिस अधिक्षक थोऊनाओजम वृंदा यांच्यासह अन्य दोघांना लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

काही दिवसांपूर्वी वृंदा यांनी अंमली पदार्थाच्या तस्करीत अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवरील गुन्हे मागे घ्यावेत म्हणून मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह व राज्य भाजपातील एक ज्येष्ठ नेते यांनी दबाव आणल्याचा आरोप केला होता व तसे आपले म्हणणे इंफाळ उच्च न्यायालयात १३ जुलै रोजी मांडले होते.

इम्फाळ फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी रात्री शहरातील संगिप्राऊ लामखाई भागात लॉकडाऊनचे नियम तोडल्याचा ठपका वृंदा व त्यांच्या अन्य सहकार्यांवर ठेवला.

संगई एक्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इम्फाळचे पोलिस महानिरीक्षक के. जयंता यांनी वृंदा यांना पोलिसांकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, वृंदा यांना ताब्यात घेतल्यानंतर त्या फेसबुकवर घटनाक्रम लिहीत होत्या. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. पण पोलिसांनी वृंदा यांच्यावर कोणता गुन्हा दाखल केला हे स्पष्ट झालेले नाही.

वृंदा यांना ताब्यात घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना इम्फाळ पश्चिमचे पोलिस अधिक्षक के. मेघचंद्र यांनी सांगितले की, वृंदा ज्या कारमध्ये होत्या ती कार चालवणार्या महिलेने आपली ओळख अतिरिक्त पोलिस अधिक्षक अशी करून दिली व त्या कार घेऊन निघून गेल्या. ही ओळख संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पुढे इशारा देऊन कार अडवली व चौकशी केली.

पोलिसांचा वृंदा यांच्यावर असाही आरोप आहे की, त्यांनी कारमधून कोठे जात आहोत याची माहिती पोलिसांना देण्यास नकार दिला व त्यांचे वर्तन योग्य नव्हते. त्यांनी कारवरची काळी फिल्मही काढण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिस व त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे वृंदा यांना कारमधून खाली उतरवण्यात आले, त्यांच्या कारची तपासणी केली. नंतर रात्री अडीचच्या सुमारास पावती फाडून त्यांना जाण्यास सांगितले.

पोलिसांनी आपल्या या आरोपात वृंदा बेजबाबदारपणे आपल्या मित्रांसोबत पाच जिल्ह्यातून फिरून आल्या होत्या अशी दुरुस्ती केली.

या संदर्भात वृंदा यांनी फेसबुकवर हा घटनाक्रम विशद केला आहेः मंगळवारी रात्री पाऊण वाजता आम्हाला क्वाकीथेल एफसीआय क्रॉसिंगवर पोलिसांनी लॉकडाऊन उल्लंघन केल्याप्रकरणात ताब्यात घेतले. नंतर माझे पती घटनास्थळी आले व त्यांनी माझ्या कारमधील अन्य महिला सहकार्यांचा दंड भरला व त्यांना घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी नकार दिला. माझ्याभोवती सशस्त्र पोलिस उभे होते व ते आम्हाला अटक करण्याच्या तयारीत होते.

कोण आहेत वृंदा?

जून २०१८मध्ये वृंदा यांनी अंमली पदार्थाच्या तस्करीचा पर्दाफाश केला होता. त्यांनी सुमारे २८ कोटी रु. किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या तस्करीतील प्रमुख आरोपीचे नावे लुखाऊसी जू हे असून तो मणिपूर अमली पदार्थ तस्करीतील मोठा गुन्हेगार आहे. त्याच्या घरातही अंमली पदार्थ सापडले. तो चंदेल जिल्ह्यात भाजपचे कामही करतो. जूचे राजकीय नेत्यांशी संबंध असतानाही त्याला अटक झाल्याने मोरेह या शहरात खळबळ उडाली होती. त्याला अटक झाली तेव्हा तो चंदेल जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. त्याला अटक केल्यानंतर लगेचच त्याच्या सुटकेसाठी राजकीय दबाव वाढत गेला.

अखेर मार्च २०१९मध्ये जूला जामीन मिळाला पण तो म्यानमारमध्ये पळून गेला. मात्र गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याने आत्मसमर्पण केले. त्याच्या जामीनावर इंफाळ उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाने सांगितले की, जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाहीत तोपर्यंत ते निर्दोष असतात.

न्यायाधीशाच्या या टिपण्णीवर वृंदा यांनी गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे तक्रार केली होती. त्यांनी सोशल मीडियात न्यायाधीशांवर टीकाही केली होती. त्यानंतर वृंदा यांना अवमान केल्याची नोटीस पाठवण्यात आली. त्यावर १३ जुलै रोजी त्यांनी उत्तर दिले.

वृंदा या २०१२मध्ये मणिपूर पोलिस सेवेत रुजू झाल्या होत्या आणि २०१८मध्ये त्या एनएबीची सूत्रे घेतली होती. त्यांना या पूर्वी मणिपूर सरकारने अंमली पदार्थाची तस्करी रोखल्याबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.

या पूर्वी एनएबीच्या पथकाने १०० कोटी रु. हून अधिक अमली पदार्थ ताब्यात घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी या पथकाला १० लाख रु.चे बक्षिस दिले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1