मँक

मँक

मँक ही एका पटकथा लिहिणाऱ्या मॅनकीविझ (Mankiewicz) ची गोष्ट आहे. सिटिझन केन या  बायोपिक चित्रपटाची पटकथा त्यानं लिहिली. पण चित्रपटाच्या दिग्दर्शकानं, ऑ

बोचरा थट्टापट : बोराट
आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ ‘मिनारी’
भारतातर्फे ऑस्करसाठी ‘जल्लीकट्टू’ची शिफारस

मँक ही एका पटकथा लिहिणाऱ्या मॅनकीविझ (Mankiewicz) ची गोष्ट आहे. सिटिझन केन या  बायोपिक चित्रपटाची पटकथा त्यानं लिहिली. पण चित्रपटाच्या दिग्दर्शकानं, ऑर्सन वेलेसनं, श्रेय लाटलं. १९४१ साली पटकथेचं ऑस्कर मँक आणि वेलेसमधे विभागलं गेलं.

हे प्रकरण सिनेवर्तुळात, अमेरिकेत गाजलं. त्यावर वाद झाले, चर्चा झाल्या, लेख आणि पुस्तकं प्रसिद्ध झाली. १९९८ साली जॅक फिंचर यांनी या विषयावर चित्रपट करण्यासाठी पटकथा लिहिली, पण तो चित्रपट  होऊ शकला नाही. जॅक फिंचर यांचा मुलगा डेविड फिंचरनं त्या पटकथेला थोडंसं नवं रूप देऊन मँक हा प्रस्तुत चित्रपट २०२० साली पडद्यावर आणला.

पटकथा लेखकानं पटकथा कशी लिहिली त्याचं नाट्यमय चित्रण या चित्रपटात आहे.

१९३५ च्या दशकातली अमेरिका.

निसर्गरम्य वातावरणात एका बंगल्याच्या दारात दोन गाडया उभ्या रहातात. एकीतून वॉकर व काठीच्या मदतीनं चालणारा मँक उतरतो. त्याच्या एका पायाला प्लास्टर आहे.

दुसऱ्या गाडीतून हातात कातडी ऑफिस बॅग घेतलेला एक ऑफिसात काम करणारा, मॅनेजर  टाईप, माणूस उतरतो.

मँक पलंगावर पहूडतो.

मॅनेजर एक मोठा खोका उघडतो. त्यात कित्येक दारूच्या बाटल्या असतात. त्या ठिकाणी दारू प्यायला परवानगी नसली तरीही त्यानं दारू पुरवलेली असते. भरपूर सिगार असतात. एक स्टेनो आणि एक मदतनीसही दिमतीला दिलेली असते.

तीन महिन्यात पटकथा लिहून द्यायची असते. त्यासाठी त्याला पूर्ण बंदोबस्तासह बंगल्यात ठेवलेलं असतं.

फ्लॅश बॅक.

मँक आणि त्याचा सहकारी मिळून कारनं जात असतात. कार बेफाम चाललेली असते. अपघात होतो. मँकच्या नाकातोंडात नळ्या आणि पायात प्लास्टर चढतं.

मँक पलंगावर. पलंगावर गोळे करून फेकलेले कागदाचे बोळे पलंगभर पसरलेले. मँक घोरतोय. पलंगाच्या बाजूला दारूची रिकामी बाटली पडलीय.

मँक स्टुडियोत जातो. तिथं दिग्दर्शक वगैरेंशी बैठक चालते. चर्चेत मुद्दे असतात की चित्रपटात सेक्स, गुन्हा, चकचकाट, सामाजिक तणाव, तत्वचर्चा इत्यादी गोष्टी यायला हव्यात.

खोलीत चर्चा चाललीय. बाजूच्या टेबलावर एक माणूस एका स्त्रीला काही तरी डिक्टेशन वगैरे देतोय. त्या स्त्रीनं कंबरेच्या वर वस्त्रं घातलेलं नाही. भलेमोठे स्तन उघडे असतात आणि स्तनाग्रांच्या जागी  चकचकीत गोल चकत्या लावल्यात.

मेट्रो गोल्डविन मेयर या कंपनीच्या  मालकाबरोबर चर्चा होतात. हर्स्ट या पेपर मालकाशी चर्चा होतात.

कोणाचा तरी जन्मदिवस साजरा करण्यासाठी पार्टी.

कसलंसं निमित्त काढून फॅन्सी ड्रेस पार्टी.

भरपूर दारू काम.

मँक पार्टीत दारू पितो. जाम दारू पितो.

एका पार्टीत पी पी पितो आणि शेक्सपियरच्या नाटकात शोभेल असं लांबलचक भाषण करतो. ओकतो. किळस येऊन पार्टीतले लोक एकेक करून निघून जातात.

पार्टी देणारा श्रीमंत माणूस मँकला ओरडून सांगतो की तू दरबारी विदुषक आहेस.

दुसरा माणूस एक कथा सांगतो. मालकानं दाखवलेल्या प्रेमामुळं माकडाचं माकड कसं होतं ते त्या गोष्टीत असतं. गोष्टीचा अर्थ समजण्यासारख्या शारीरीक आणि मानसीक स्थितीत मँक नसतो. त्याला बाहेर ढकलून दरवाजा बंद होतो.

माणसं आपण कसे थोर आहोत ते दुसऱ्यावर ठसवण्याच्या प्रयत्नात दिसतात.  दुसरा कसा कमी प्रतीचा आहे ते दाखवण्याचा खटाटोप माणसं करतात.

मध्येच एक अध्यक्षपदाची  निवडणूक येते. त्यात मेट्रो गोल्डविन मेयरचा मालक रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराची बाजू घेतो, त्याच्या प्रचारासाठी एक खोट्या माहितीवर आधारलेली फिल्मही करून देतो. समाजवाद म्हणजे काय, कम्युनिझम म्हणजे काय, अमेरिकेनं हिटलरला मदत करावी की नाही, इत्यादी विषय माणसं पार्ट्यांत बसून दारू पीत पीत चर्चितात. वेटर लोकं ग्लासं भरत असतात, चर्चा रंगत जाते.

चित्रपटभर मँक पलंगावर पडून लिहीत असतो आणि आधीच्या काळात घडलेल्या घटना फ्लॅशबॅकमधे येत असतात.स्टुडियो, चित्रण इत्यादी गोष्टी आपल्याला दिसत असतात.

मँक पटकथा लेखनाचं ऑस्कर हातात धरून एक पत्रकार परिषद घेतो, सहलेखनाचं बक्षीस कसं चोरलं गेलंय ते सांगतो. इथे चित्रपट संपतो.

१९४१ साली झालेल्या सिटीझन केन चित्रपटाची पटकथा हे प्रकरण त्या काळात प्रचंड गाजलं होतं. चित्रपटाचा दिग्दर्शक ऑर्सन वेलेसचं म्हणणं होतं की पटकथा लिहिण्यासाठी त्यानं ३०० पानांचं टिपण मँकला पाठवलं होतं आणि त्यातच सुधारणा करून, ते ठीकठाक करून मँकनं पटकथा करावी असंच मुळात ठरलं होतं. मँकला श्रेय मिळणार नाही असं करारात म्हटलं होतं, असंही त्याचं म्हणणं.

मँकचं म्हणणं की तसा काहीही करार नव्हता. पटकथा आपण पूर्णपणे स्वतंत्रपणे लिहिली असं त्याचं म्हणणं होतं. मँक कोर्टात गेला. मँकनं व्यावसायिकांच्या युनियनकडं धाव घेतली. त्याच्यावर उद्योग आणि मालकांकडून खूप दबावही आला होता. तरीही बक्षीस विभागूनच मिळालं.

पॉलीन केल या एका चित्रपट समीक्षिकेनं या प्रकरणाचा तपशीलवार अभ्यास केला, न्यू यॉर्करनं त्यांचे दोन लेख, एकूण ५० हजार शब्द, छापले. नंतर त्यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिलं. केल यांचा प्रतिवाद करणारे लेख आणि पुस्तकंही प्रसिद्ध झाली.

सिटिझन केन हा चित्रपट कलेला वळण देणारा चित्रपट मानला जातो. श्रीमंती, उथळ आणि भडक पत्रकारी, प्रसिद्धीची हौस, भ्रष्टाचार आणि प्रसिद्धी मोहीम यांचा राजकारणाशी असलेला संबंध, गुन्हेगारी, सनसनाटी, इत्यादींचं मिश्रण म्हणजे हॉलीवूड सिनेमा हे समीकरण सिटिझन केननं सिद्ध केलं.

सरळ एका ओळीत गोष्ट सांगायची नाही, ती फ्लॅशबॅकमधे, पुढं मागं करत, वळणावळणानं सांगणं हे तंत्र या चित्रपटात ऑर्सननं सिद्ध केलं. प्रकाशाचा खोलवर वापर, अधिक तीव्र प्रकाश आणि वेगवेगळ्या ठिकाणी दिवे वापरून दूरवरच्या गोष्टी दाखवणं, पडद्यावर दिसणाऱ्या सर्व गोष्टी कमी अधिक दिसतील अशा रीतीनं प्रकाशित करणं, छताचं चित्रण, इत्यादी गोष्टी ऑर्सननं या चित्रपटात आणल्या. ही तंत्रं त्या आधी कोणी कोणी कुठं कुठं वापरलीही असतील पण ती सर्व एकत्र करून एक एकसंध शैली ऑर्सननं तयार केली.

चित्रपट कला शिकणाऱ्या सर्वांना सिटिझन केनचा अभ्यास करावा लागतो.

गॅरी ओल्डमन यांनी मँकची भूमिका केलीय. या भूमिकेसाठी त्यांचं ऑस्करला नामांकन झालंय. दोन वर्षांपूर्वी त्यांना डार्केस्ट आवर या चित्रपटातल्या विन्स्टन चर्चील यांच्या भूमिकेसासाठी ऑस्कर मिळालं होतं.

ओल्डमन यांना मिळालेल्या अनेक भूमिका काहीशा बटबटीत, लाऊड असतात. त्यांनी रंगवलेली पात्रं पटकथांमधे वास्तवापेक्षा अधिक मोठी आणि ठळक रेखलेली असतात. चर्चीलही काहीसे तसेच होते. चर्चील यांचं एकूणच लोकांसमोर येणारं व्यक्तिमत्व अती या बाजूला झुकणारं असतं. मँकचीही भूमिका काहीशी अती या बाजूला जाणारी होती, तशीच ती मँकमधे आहे. मँक फार दारू पीत असे हे खरं आहे, तो बेताल वागत असे हे खरं आहे. तरीही ओल्डमन यांनी ते पात्र फार लाऊड होऊ दिलेलं नाहीये.

भूमिकेत विरघळून जाणं या पेक्षा त्या भूमिकेचा प्रभाव लक्षात घेऊन अभिनय केला पाहिजे, असं ओल्डमन म्हणतात.

मेरियन डेविस या अभिनेत्रीची भूमिका अमंदा सेफ्रीड यांनी साकारलीय. तो काळ त्यांच्या भूमिकेतून नेटकेपणानं दिसतो.

चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे. कारण पटकथा ज्या चित्रपटासाठी लिहिलेली असते तो सिटिझन केन हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता. तो काळ रंगीत दाखवण्यात काही अर्थ नव्हता असं दिग्दर्शक डेविड फिंचरला वाटलं. सेपिया रंगातही चित्रपट केला असता तर ब्लॅक अँड व्हाईटमधला देखणा चकचकीतपणा, काळ्या पांढऱ्याच्या अनंत छटा दाखवता आल्या नसत्या. ब्लॅक व्हाईट चित्रीकरण इतकं लख्खं आहे, त्यातल्या काळ्या पांढऱ्या छटा इतक्या छान आहेत, त्यातला काँट्रास्टही इतका छान आहे की चित्रपट पहाताना बहार येते.

भूमिकांचे कपडे, त्यांची केसांची ठेवण, घरातलं फर्निचर, स्टुडियो, बाह्य चित्रीकरणासाठी लागणारे कॅमेरे व दिवे, दारूच्या बाटल्या आणि सिगार ठेवायचे खोके, मोटारी, पलंग, कपाटं इत्यादीमधून १९३५ च्या आसपासचा काळ आपल्याला कळतो. माणसांच्या ढगळ पँट्स, ढगळ शर्ट पहाताना मौज वाटते. साऱ्या गोष्टी बारीकसारीक तपशीलात जाऊन उभ्या केलेल्या आहेत.

चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, सहाय्यक स्त्री अभिनेत्री, ओरिजिनल स्कोर, छायाचित्रण, ध्वनी, कला दिक्दर्शन, वेषभुषा, केशभुषा आणि रंगभुषा अशी ११ नामांकनं आहेत.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

मँक
दिग्दर्शक – डेविड फिंच 
कलाकार – गॅरी ओल्डमन, अमंदा सेफ्रीड, लीली कोलिन्स    

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0